मृगजळ भाग 2

This entry is part 2 of 3 in the series मृगजळ

सौंदर्यां सर्व मुलींपेक्षा वेगळी होती. ती अभ्यासक वृत्तीची होती. तिचे लक्ष शिक्षणावर असायचे. तिच्या मैत्रिणी पण तशाच होत्या. ज्या मुली अभ्यासाकडे दुर्लक्ष करायच्या त्यांच्या बरोबर ही मैत्री करायची नाही. आज सौंदर्याला क्लासला यायला उशीर झाला होता. ती धावतच येत होती. तिला असे धावत येताना बघून सिध्दार्थने लगेचच तिच्या समोर जाऊन,” अरे इतकी का गडबडीने धावते. चल मी पण क्लासला जात आहे बस गाडीवर असे म्हटले.”
” नको नको मी जाईन चालत. थॅक्यू.” असे कोरडेच उत्तर सौंदर्याने दिले.

तिच्या अशा उत्तराची अपेक्षा सिद्धला नव्हती. त्याच्या गाडीवर बसण्यासाठी किती मुली आतुरतेने वाट पाहत असतात आणि ही चक्क मला नाही म्हणाली याचा त्याला अपमान वाटला. काहीही करून हिला पटवायला पाहिजे. इतकी सुंदर मुलगी माझ्या जवळच असावी. माझीच व्हावी. असे मनात म्हणत तो क्लास समोरच्या चहाच्या दुकानात जाऊन बसला.
आता रोजच तो सौंदर्याला पाहून हाय हॅलो करु लागला. कधी कधी काही तरी अभ्यासाची शंका विचारायची हा खोटा बहाणा करत तिच्या जवळ जाऊन बसू लागला. असे करता करता त्याने तिला आपल्या मोहात पाडले. काही दिवसांतच तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले .

आता तिला देखील सिद्ध आवडू लागला होता. तो रोज वेगवेगळी महागातली गिफ्ट तिला आणून देत होता. कधी परफ्यूम तर कधी इयररिंग कधी पर्स तर कधी ड्रेस. आज तर चक्क सोन्याची अंगठी आणून दिली.
“अरे नको नको सिद्ध. इतकी महागातली सोन्याची अंगठी मी नाही घेऊ शकत. ड्रेस, पर्स कसे तरी घरात मैत्रीणींची नावे सांगून पटवले पण अंगठी म्हणजे….! खरंच नको सिद्ध. जेव्हा आपले लग्न होईल तेव्हा तू दे अंगठी.” असे म्हणत सौंदर्याने अंगठी परत केली.
“अगं लग्न आपण करणार तेव्हा तुला सोन्याने मढवून देईन. ही अंगठी काय छोटीशी. याचे काय मोल. आपण लग्न करून मुंबईत जाऊन राहायचो. तिथे आमचा मोठा बंगला आहे. आमचा बिझनेस आहे तिथे पण. माझे शिक्षण पूर्ण झाले की लगेच लग्न करायचे आणि आपण दोघे राजाराणी मुंबईत आपल्या स्वप्नातील नगरीत. काय ऐकतेस न महाराणी सरकार….!” सिध्दार्थ तिच्या ओठांवरून आपली बोटे फिरवत म्हणाला.

ती काही क्षणांसाठी स्वप्न नगरीत गेली. तिथे तिला मोठा बंगला, नोकर चाकर, बंगल्यासमोर मोठी बाग एक झोपाळा सुंदर सुंदर फुलांची झाडे. झोपाळ्यावर सिद्धार्थच्या खांद्यावर डोके ठेवून आपले बसलेलो आहोत. तो आपला हात आपल्या हातात घेऊन तिला अजून जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवत प्रदीर्घ चुंबन घेत आहे.
“ये सोड न कोणी तरी बघेल.” असे म्हणत तिने त्याला आपल्या पासून दूर केले.
“अगं काय ? काय झाले ? ये सौंदर्या बरी आहेस न तू ?” सिध्दार्थ ने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले.
ती एकदम भानावर आली आणि गालात मंद हसली.

सौंदर्यांच्या मावशीने सौंदर्यासाठी एक चांगले स्थळ सुचवले. घरात सर्वांना मुलगा त्याचबरोबर त्याचे घरचे वातावरण, घरची लोकं सगळे पसंत पडले‌ . मुलगा चांगल्या कंपनीत काम करत होता. स्वतः चे मोठे घर होते. मोठी बहीण होती पण ती लग्न करून आपल्या नवऱ्याबरोबर परदेशी राहत होती. एकंदरीतच सर्वांना हे स्थळ पसंत पडले.
बारावीची परीक्षा झाली की लगेच लग्न करायचे असे ठरले. पण याआधी सौंदर्याला पण विचारून तिचे मत ऐकून तिची संमती घेऊन करायचे असे आजी आजोबा म्हणाले.
संध्याकाळी सौंदर्या घरी आली. तेव्हा तिला आजोबांनी आपल्या जवळ बोलावून घेतले आणि तिला मुलाचा फोटो दाखवून सर्व सांगितले.

ते ऐकून तिने जोरातच म्हटले,” मी नाही लग्न करणार याच्याशी. श्शी..! किती वेंधळा दिसतो आहे. मी कुठे हा कुठे. आणि तुम्ही पण कोणालाही उचलून आणून माझे लग्न करुन देणार का ? मला हे मंजूर नाही अजिबात सांगून ठेवते.” असे म्हणत ती पाय आपटत आत निघून गेली.
तिच्या अशा उत्तराची अपेक्षा कोणालाच नव्हती. सर्व जण आश्चर्य चकित होऊन बसले.
“अजून लहान आहे पोर. तिला काय समजते बरे वाईट. उद्या मी समजावून सांगते तिला.” आजी म्हणाली.
दुसऱ्या दिवशी आजीने तिला आपल्या जवळ बोलावून घेतले.‌

“बाळा आज न उद्या तुझे लग्न करावेच लागेल न आम्हाला. मुलगी हे परक्याचे धन असते. ते किती दिवस ठेवणार आम्ही? हे स्थळ आपणहून चालत आले आहे. पहिलेच आलेले तुला स्थळ ते पण इतके चांगले. बघं शांतपणे विचार करून निर्णय घे. आमची जबरदस्ती नाही.” आजी म्हणाली.
” ये आजी पुन्हा तो विषय नकोय. मी नाही म्हणजे नाही हे लग्न करणार. कारण मी…! माझे…! आमचे एकमेकांवर प्रेम आहे. तो येणारच आहे तुम्हाला भेटायला.” असे म्हणत सौंदर्याने आजीला सगळे सांगितले.
संध्याकाळी सगळ्यांनी सिध्दार्थ कुठे राहतो काय करतो याची विचारपूस करायला सुरुवात केली.

सौंदर्यांने त्याची सर्व माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना भेटायचे असे आजोबांनी सांगितले.
आईबाबा,आजी आजोबा सिध्दार्थच्या घरी गेले. तिथे जाऊन त्याच्या वडिलांना भेटून या दोघांबद्दल सांगितले.
हे ऐकून त्याचे वडील जोरजोराने हसायला लागले.

“अहो सिध्दार्थ अजून त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही. तो काही कामच करत नाही. त्याचे लग्न कसे करणार आम्ही. त्यात तो अजून बारावीतच अडकला आहे. यावेळी जर तो नापास झाला तर त्याला मी हाकलून देणार आहे. बघा मग असा मुलगा जावई म्हणून चालेल का तुम्हाला.”
हे ऐकून सौंदर्याचे आईवडील आजी आजोबा काही ही न बोलता घरी परतले.
” छे हो…! अशा मुलाला कशी द्यायची मुलगी. उद्याच निरोप द्या त्या घरी . एका महिन्यात लग्न उरकून देऊ. मुलगा चांगल्या नोकरीवर आहे घर आहे आणखीन काय हवंय.” आजीने घरी आल्या आल्या म्हटले.
क्रमशः

© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Series Navigation<< मृगजळ भाग -1मृगजळ भाग 3 >>

Leave a Comment

error: Content is protected !!