मृगजळ भाग 3

This entry is part 3 of 3 in the series मृगजळ

भाग २ इथे वाचा

© परवीन कौसर
सौंदर्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली . तिचे आता घराबाहेर जाणे बंद केले. सिद्धार्थने तिच्या मैत्रिणीच्या मार्फत चिठ्ठी लिहून पाठवली त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट पण.
चिठ्ठी मध्ये त्याने लिहिले होते की,” सौंदर्या तुझ्या विना मी जगूच शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गं. आपल्या प्रेमासाठी मी वाट्टेल ते करेन. आपले घरचे लोक आपल्याला एकत्र होऊच देणार नाहीत. यावर एकच उपाय पळून जाऊन लग्न करायचे. माझ्या मित्राचे घर आहे तिथे . भाड्याने राहू तोपर्यंत मग मी घेईन नवे घर. आपले दोघांचे सपनो का महल. मला आईबाबांचे पैसे इस्टेट बिझनेस काही नकोय. मी माझ्या स्वबळावर सगळे कमवून दाखवणार आहे. पण यामध्ये तुझी साथ हवीय मला. तू माझी प्रेरणा आहेस तू माझी ताकद आहेस. तू आणि मी मिळून हे सर्व शक्य होणार आहे.

सौंदर्यां आय लव्ह यू सो मच माय डार्लिग. मी तुझी वाट पाहतोय मुंबईत. तुझे तिकीट उद्याचे आहे. मी आज निघतोय. तू येईपर्यंत मी रेल्वे स्टेशनवर बसलेलो दिसेल तुला. ते पण उपाशीपोटी. तू जेव्हा येशील तेव्हा तुझ्या हाताने दोन घास खाईन. आशा आहे निराशा होणार नाही.
तुझाच
फक्त तुझ्यासाठी जगणारा.
हि चिठ्ठी वाचताच सौंदर्या रडू लागली. आता तिला काही सुचत नव्हते.

” आजी प्लिज हे लग्न थांबव. मला खरंच नाही करायचे लग्न. का माझ्या प्रेमाची आहुती देत आहात.”
” चूप बस. तुला काय कळतंय बर वाईट. हे जे आम्ही करतोय न तुझ्या उज्वल भविष्यासाठी. तू सुखी रहावीस म्हणून. त्या उडाणटप्पू मुलाचे नाव पुन्हा काढशील तर याद राख. जीभच हासडून देईन तुझी. ” आजी रागारागाने म्हणाली.
रात्रभर सौंदर्या झोपली नाही. तिला सिद्धार्थ फक्त सिद्धार्थ दिसत होता.
दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण पुन्हा आली. तिने सौंदर्याला पार्लर मध्ये नेते असे सांगून घराबाहेर नेले. सौंदर्यां घराबाहेर पडण्याआधी आपल्या आईला मिठी मारली.

” आई …!”
” काय ग ? “
” काही नाही असेच..!”
ती रिक्षात बसली. जोपर्यंत रिक्षा रस्ता ओलांडत नाही तोपर्यंत ती आपले घर पहात होती.
‘ न जाणे मी इथे आता परत कधी येणार. आमचे सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत थोडा वेळ लागणारच. तेव्हा आम्ही दोघे मिळून येऊन सर्वांच्या पाया पडणार. जोडीने…!’ असे मनात म्हणत तिने हळूच आपले डोळे पुसले.

रेल्वेमध्ये घाबरत घाबरतच ती चढली. रेल्वे सकाळी मुंबईला पोहोचली. स्टेशनवर सौंदर्या उतरली तोच समोर सिद्ध उभा होता. त्याला बघून तिने एकदमच मिठी मारली. नकळतच तिच्या डोळ्यांतून टपटप अश्रू वाहू लागले.
” ये वेडू रडतेस का . आता आपले आनंदी राहायचे दिवस सुरू झाले आहेत. चल बाहेर टॅक्सी उभी आहे जाऊ आपण आपल्या घरी.
” बापरे ….! किती मोठ्या इमारती आहेत.” सौंदर्यां म्हणाली.
” रोज तुला मुंबई फिरवून आणतो मेरी जान.” असे म्हणत तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला. हे ऐकून सौंदर्या आनंदी झाली.

एका मोठ्या घरासमोर टॅक्सी उभी राहिली.
” आई गं…! ह्या घरात राहयचो आपण. सिद्धार्थ आय लव्ह यू सो मच डियर. स्वप्नात पण मी असे घर बघितले नव्हते.” अगदी लहान बाळासारखे टाळ्या वाजवत सौंदर्या अक्षरशः नाचू लागली.
” अगं हो डियर. चल आत तर चल. बघं आपला आशियाना कसा सजवला आहे तुझ्या स्वागतासाठी.” असे म्हणत तिच्या हातात हात घालून तो तिला आत घरामध्ये घेऊन गेला.
” व्वाॅव किती सुंदर घर आहे. थोडे दिवस जाऊ दे. मग आपण आपल्या आईबाबांना आजी आजोबांना इकडे बोलावून घेऊ”

” हो राणी सरकार. तुम्हारा हुकूम सर आंखोपर.”
” चल मी आंघोळ करून येते. मग स्वयंपाक करते.”
” ये येडपट. तू महाराणी आहेस. तू काही काम करायचे नाही. मी जेवण बाहेरून आणतो. तू फक्त आराम करायचा. “
” अरे …! कशाला पैसे वाया घालवायचे. मी करेन न.”

” नाही म्हणजे नाही. तू अजिबात काही करायचे नाही. मला इतकी छान नोकरी मिळाली आहे. पगार पण खूप आहे. सगळे तुझा पायगुण राणी. आय एम सो हॅप्पी.” असे म्हणत सिद्ध ने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवत प्रदीर्घ चुंबन घेतले.
दिवस सगळा दोघांचा मजेत गेला. रात्री जेवणानंतर झोपण्यासाठी सौंदर्याने आपला बिछाना बाहेर हॉलमध्ये केला.
” अरे यार इथे का बिछाना केला. आपण इथे नाही आत आपल्या बेडरूममध्ये झोपायचो.”
” आता नको.आधी आपण लग्न करू मगच तिथे .”

” अगं माझ्या वर तुझा विश्वास आहे न. असे काय करतेस. लग्न आपण रविवारी करायचे आहे. जवळच मंदिर आहे तिथे जाऊन. कारण मला आता सुट्टी नसते रविवारीच करूया. तुला मंगळसूत्र पण आणले आहे मी. हे बघं. ” असे म्हणत सिद्ध ने पटकन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले.
” आता तू माझी बायको झालीस. मिसेस सिद्धार्थ. आता तर खूश मेरी जान.” असे म्हणत तिला त्याने बेडरूम मध्ये नेले.
दोघांचे एक होण्यासाठी वेळ लागला नाही.

सकाळी उठल्यावर सौंदर्याला न जाणे तिच्या आईची आठवण आली. तिला आपण चूक केली ही भावना अनावर होत होती. पण आता नाइलाजाने हे सत्य नाकारता येणार नव्हते.
रोज दिवसभर सिद्ध कामाला जायचा रात्री वेळाने घरी यायचा. अन्नाची भूक भागली की शरीराची भूक भागविण्यासाठी सौंदर्यावर तुटून पडायचा.
एकदा सौंदर्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानेही जाऊ नक्कीच. मी नेईन तुला असे सांगितले.
त्यादिवशी सकाळी सौंदर्याला मळमळायला लागले. उलटी आल्यासारखे झाले म्हणून ती पळतच बाथरूममध्ये गेली. तिला सुक्या ओकाऱ्या सुरू झाल्या. दिवसभर तिला ओकाऱ्या होतच होत्या.

संध्याकाळी सिद्ध ने तिला डॉक्टरांकडे नेले.
” अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहात.” डॉक्टरांनी सांगितले.
हे ऐकून सिद्ध खुप खूश झाला. सौंदर्यांपण खूप आनंदली.
नऊ महिने सिद्ध ने सौंदर्याला खूप जपले. तिची खूप काळजी घेतली.
तिला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. तिला लगेचच सिद्ध ने दवाखान्यात नेले. तिने गोजिरवाण्या गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीचे स्वागत खुपचं आनंदाने या दोघांनी केले.

तिचे नाव इंद्रायणी ठेवले. पण लाडाने तिला छकुली म्हणून बोलावत होते.
बघता बघता छकुली एक महिन्याची होत आली.
” सौंदर्यां उद्या आपली छकुली एक महिन्याची होणार. आपण न तिचा एक महिन्याचा वाढदिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचा . तू संध्याकाळी तयार रहा. मी कामावरून येऊन तुला घेऊन जातो. “
सौंदर्यां खूप आनंदली.

तिला सिद्धार्थ ने नवीन महागातली साडी ,सॅडल, गळ्यात सोनसाखळी आणून दिली. तिचे सुंदर केस तिला खूप आवडायचे. ती रोजच वेगवेगळे हेअरस्टाईल करायची. आजही तिने खूप सुंदर हेअरस्टाईल केली. साडी तिला खूप खुलून दिसत होती. आज ती जणू अप्सराच दिसत होती.
संध्याकाळी सिद्ध घरी आला. त्याने सौंदर्याला पाहिले ,” बापरे…! आज तो गजब दिख रही हो. आज किती जणांचे कतल होणार काय माहित.”
” ये काही तरी काय बोलू नको. चल…!” असे म्हणत लाजत लाजत सौंदर्या घराबाहेर पडली.

टॅक्सी एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलसमोर येऊन उभी राहिली.
” चलो मॅडम. आज तुमची इच्छा पूर्ण होत आहे.” असे म्हणत सिद्ध ने छकुलीला आपल्या जवळ घेतले.
हे तिघे हाँटेलमध्ये गेले.
” ऐक ना. आजची रात्र आपण इथेच रहाणार आहोत. वरची रुम मी बुक केली आहे. चल तिथे जाऊ.”
सौंदर्यांला आपण स्वर्गात आहोत असेच भासू लागले.

रुममध्ये गेल्यानंतर ” सौंदर्यां बस तू. मी जरा छकुलीला फिरवून आणतो. तिथे पुस्तके आहेत बघ वाचत बस तोपर्यंत मी आलोच.” असे म्हणत तिच्या ओठांवर ओठ टेकवून तो छकुलीला घेऊन बाहेर पडला.
सौंदर्यांने रुम बघत बघत समोर असलेले पुस्तक चाळण्यासाठी घेतले. पुस्तक उघडले तर त्यामध्ये एक लिफाफा दिसला. त्यावर टू सौंदर्या असे लिहिले होते.
‘ आता हे काय नवीन ‘ असे मनात म्हणत तिने मंद हसत तो लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. ती तिने उघडली आणि वाचू लागली. वाचता वाचता ती ताडकन उठून रूमचे दार उघडण्यासाठी गेली पण दार बाहेरुन बंद केले होते.

ती चिठ्ठी घेऊन रडत बसली. तोच बाहेरून कोणीतरी दार उघडले. तसे ती पटकन उठली आणि बाहेर जाऊ लागली.
” ये कूठे पळतीय. थांब. काहीही न देता जाशील कशी. तुझ्या साठी चिक्कार पैसा मोजला आहे. चल बस. आजची रात्र तुझी आम्ही विकत घेतलीय तुझ्या यार कडून समजले. ” असे म्हणत त्या पुरुषाने तिला हिसडा देऊन पलंगावर पाडले.
तोच तिथे अजून दोघे जण आले.

ती आपल्याला सोडा म्हणून विनवण्या करू लागली.
” हो हो सोडणारच आहोत. पण सकाळी.” असे म्हणत तिघांनी संपूर्ण रात्रभर तिचे लचके तोडले.
ज्या सौंदर्यावर तिला गर्व होता तेच तिच्या साठी शाप बनले होते.
तिच्या डोळ्यासमोर चिठ्ठी मधील एकेक वाक्य दिसत होते.

” सौंदर्यां मला तुझ्या वर प्रेम कधीच नव्हते. मी तुझ्या सारख्या मुलींबरोबर लग्न करावे हे शक्यच नाही. मला लग्नाच्या बेडीत अडकायचे नाही. तुला इथे मुंबईत आणायचे हेच कारण की तू सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहेस म्हणून. तुला काय वाटते मी कामाला जायचो. छ्छे …! मी तर आपले रात्री चे सगळे सीन शूट करून त्याची ब्लू फिल्म बनवत होतो. तुझे आंघोळीचे पण मी शूट केले आहे. तुला पंचतारांकित हॉटेलमध्ये यायचे होते न आता तू इथे रोज येशील. मी छकुलीला सांभाळेन तिची काळजी करू नकोस. जोपर्यंत तू इथे येशील ती सुखरूप असेल मजजवळ. तू जेव्हा नाही म्हणशील तेव्हा छकुलीला मी विकणार कोठ्यावर. बघं तूच ठरव काय करायचे ते. चल बाय. एन्जॉय हा.”

आज तिला आपल्या आईबाबांचे आजी आजोबांचे ऐकले नाही याचा खुप पश्चात्ताप होत होता. तिला आज आपण जे प्रेम आहे हे समजून त्याच्या मागे पळत आले ते तर एक मृगजळ होते हे कळून चुकले होते पण आज कळून काही फायदा नव्हता कारण ती आता या मृगजळामागे धावत एका मोठ्या दलदलात फसली गेली होती.
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.


Series Navigation<< मृगजळ भाग 2

Leave a Comment

error: Content is protected !!