© अर्चना अनंत धवड
प्रिया अणि परेश नातेवाईकाच्या लग्नाला गेलेले. हॉलमध्ये पोहचताच प्रिया बायकांच्या ग्रुपमध्ये आणि परेश पुरुषांच्या ग्रुपमध्ये निघून गेला..
हाय हॅलो झालं आणि प्रियाच्या मावस सासुबाई अचानक म्हणल्या… “काय ग प्रिया… सासूला तुझ्याकडे का नाही घेऊन येत? बिचारी सगळी काम स्वतः करते. या वयात तिला कीती त्रास होतो…”
“अहो मावशी… त्या यायलाच तयार नाही तर मी काय करू” प्रिया थोडी दुःखी स्वरात म्हणाली.
असं चारचौघात बोलल्याने प्रियाला फार वाईट वाटले. बाकीच्या बाया पण आपल्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात असं तिला वाटत होतं आणी तिने मनात ठरवले की आता काहीही झाले तरी सासुबाईला घेऊनच यायचे.
लग्नात तिचा मूडच ऑफ झाला होता…घरी येताच तिने ही गोष्ट परेशला सांगीतली.
“हो ग…. मला पण काका म्हणत होते की आईची काळजी घे.तुला वाढवताना तिने किती त्रास घेतला… इतकं ऐकवलं ना जणू मी नालायक मुलगा”परेशने आपला अनुभव सांगितला.
“हो ना… काय करावं काही कळत नाही.. कितीही समजावलं तरी लोकांना वाटतं आपणच आपली जबाबदारी नाकारतोय “प्रिया थोडी चिडून म्हणाली.
“खरंय गं…मी पण काकांना म्हंटल की ती येत नाही तर काय करू… पण त्यांना माझे म्हणणे पटले नाही.. त्यांना वाटलं मी जबाबदारी टाळतो…. मलाही वाटते की आईनी आपल्या सोबत रहावे…. पण तुला माहीत आहे ना आई कीती हट्टी आहे” परेश हताशपणे म्हणाला.
“मला ते काही माहिती नाही…. पण मी त्यांना घेऊन येणार… लोक माझ्याकडे असं बघतात की किती दृष्ट सुन आहे” प्रिया थोडं चिडून म्हणाली.
“बरं …. या रविवारी जाऊ या…” परेश तिला आश्वस्त करीत म्हणाला.
रविवारी सकाळीच दोघेही गावाला गेले…. सासुबाई भांडी घासायला बसल्या होत्या.
” आई… राहू द्या… मी घासते “प्रिया सासूबाईला भांड्यावरून उठवत म्हणाली.
प्रियाने कपडे बदलले आणि कामाला लागली.प्रियानी सगळी कामे केली….भांडी, धूनी, स्वयंपाक.. सगळं करुन प्रिया थकून गेली.
प्रिया मनात म्हणाली, “कशा करीत असेल एवढी कामे आई….या वयात कसं जमतं सगळं?”
प्रियाने स्वयंपाक केला आणि सगळ्यांची पानं घेतली… जेवणं करतांना सासूबाई आनंदी दिसत होत्या.
“कित्येक दिवसाने असं चारी ठाव जेवले मी “सासूबाई प्रियाला म्हणाल्या.
“का? रोजच छान जेवायचं ना!”प्रिया सासूबाईला भात वाढत म्हणाली.
“आता कुठे होते बाई या वयात.. एकटाईम रांधते आणि दोन टाइम खाते “
म्हणूनच म्हणते आमच्या सोबत चला..आता तुम्ही थकल्या.आता नाही होत तुमच्याने…आता एकटे राहणे बरोबर नाही” प्रिया सासूला समजावीत म्हणाली.
“नाही बाई.. हे घर सोडून मी नाही येत.. मला तीथे करमत नाही.. तुम्ही दोघे बाहेर जाता.. त्या तुमच्या फ्लॅटचा दरवाजा बंद.. कैदेत असल्यासारखं वाटतं मला.. इथे कसं अंगणात बसलं की चार लोकं दिसतात.. येता जाता कुणी चौकशी करतं.. आपल्या गड्याची बायको दुखलं खुपलं तर मदत करते.. जोपर्यंत माझे हात पाय चालतात तोपर्यंत मी इथेच राहते…”
प्रिया अणि परेशनी आईला सोबत येण्यासाठी खूप आग्रह केला…
” नाही… मी नाही येणार… मला तिथे करमत नाही. मी माझं घर सोडून येणार नाही…मी या घरातील प्रत्येक वस्तू कष्टाने जमवली… ही भांडी बघतेस ना? अगं जुने कपडे घेऊन घ्यायची.. हा पंखा, टीव्ही, कपाट सगळं कष्टाने घेतलं मी… सासूबाई पूर्ण घरावर नजर फिरवीत म्हणाल्या.
” आई घर म्हणजे काय हो? या चार भिंती म्हणजे घर आहे का? की जिथे तुमचा मुलगा, सून अणि नातू आहे ते घर नाही का?काय पंखा, टीव्ही, भांडी यात जीव अडकवता.. या वस्तू आपल्यासाठी असतात. आपण वास्तुसाठी नाही.प्रिया काकुळतीला येऊन सासूला समजावीत म्हणाली.
सासूबाई थोड्या हळव्या झाल्या.. पण लगेच सावरल्या आणि म्हणाल्या “तुला समजत कसं नाही.. मी हे घर सोडलं की आजूबाजूचे अतिक्रमण करतील.. तो बाजूचा शामराव टपूनच आहे.. कितिदा म्हणतो मला.. काकू तू परेशकडे जा.. त्याचा डोळा आपल्या घरावर आहे “
सासूबाई आता प्रियाला मोह दाखवीत होत्या.. प्रियाला त्यांची सबब ऐकून हसायला आलं.. तिला कळून चुकलं की सासूबाई काही यायच्या नाही. शेवटी प्रियानी मधला मार्ग निवडला…. तिने ठरवले की एक पूर्ण वेळ बाई ठेऊ या.
“ठीक आहे आई, आपण त्या रखमाला पूर्ण कामाला ठेऊ या “
“कशाला एवढा खर्च करायचा… एकटीची कामे ती किती” सासुबाईने आपलं म्हणणं रेटलं.
” पैशाची काळजी तू कशाला करते… आम्ही आहोत ना” परेश आईला समजावू लागला.
“अरे मी करते ना… तुम्ही नका काळजी करू”
“ते काही नाही मी रखमाला बोलावतो.” परेश म्हणाला.
“अरे ठेवेल मी.. तुम्ही पैसे पाठवून देत चला दर महिन्याला.”
“नाही.. मी पैसे नाही पाठवणार.. मी सरळ पैसे राखमाच्याच हातात देणार.” परेश म्हणाला.
परेशला माहिती होतं की आई पैसे दिले तरी बाईवर खर्च करणार नाही आणि जमा करेल.
खूप वादविदानंतर सासूबाई तयार होत नाही हे पाहून शेवटी प्रियानी दोन पर्याय समोर ठेवले… एक तर आमच्याकडे चला नाहीतर बाई ठेऊ द्या.
शेवटी नाईलाजास्तव सासुबाई बाई ठेवायला तयार झाल्या .
प्रियानी विचार केला… चला… कमीतकमी सासुबाईना आराम तर होईल…अणि आपणही थोड रिलैक्स राहू… या आनंदात ते घरी परतले.
महिना होत नाही तोच गावावरून गड्याचा फ़ोन आला… सासुबाई पडल्या… अणि हाड फ्रॅक्चर झाले….
“पण कशा?”
“फरशी पुसताना पाय घसरला…..”
“अरे तुझी बायको करायची नी कामे ?मग या फरशी पुसायला गेल्याच कशाला?” प्रिया फोनवर त्याला विचारू लागली.
“अहो, वाहिनी तुम्ही गेल्या अणि पंधरा दिवसात तिला बंद केली… एक तर त्यांना एवढे पैसे द्यायला आवडत नव्हते… अणि त्यांना हिने केलेले काम पण आवडत नव्हते….त्यामुळे त्या हिच्यावर खूप चिडचिड करायच्या…. तरी तुमच्याकडे पाहून जायची.. पण एकदिवस म्हणाल्या की उद्यापासून येऊ नकोस “
प्रियानी कपाळाला हात लावला….मनात म्हणाली “काय कराव यांचे?”
लगेच प्रिया सासूबाईला घ्यायला गावाला गेली.परेश अणि प्रियानी त्यांना शहरात आणले… हॉस्पिटलमध्ये भर्ती केले… प्रियानी ऑफिसला रजा टाकली.
दोघेही सासुबाईची सेवा करू लागले… डॉक्टरांनी सांगितले की कमीतकमी तीन महीने त्यांना ऑन बेड रहावे लागेल… प्रिया सगळे करते आहे.. तिला ऑफिस, घर, मूलं, सासुबाईचे आजारपण सांभाळताना भयंकर त्रास होतो आहे अणि आता सासुबाईपण चुपचाप प्रियाकडे राहत आहे.
प्रिया विचार करतेय आधीच रहायला आल्या असत्या तर कदाचित पडल्या नसत्या अणि ही वेळ आलीच नसती….का म्हातारी माणसं अशी हट्टी पणा करतात.
लोक आताही म्हणतात की म्हातार्या आईला एकटीला ठेवले तेव्हा पडणार नाही तर काय?
असतात ना अशा हट्टी सासुबाई???
*********
समाप्त
©अर्चना अनंत धवड
सदर कथा लेखिका अर्चना अनंत धवड यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.