इंद्रधनुष्य

©️धनश्री दाबके
दरवर्षी फेब्रुवारी महिना लागला की भारतीची मे महिन्यातल्या मुंबई वारीची तयारी चालू व्हायची.  तसे भारती आणि रमेश दोघंही मुळचे मुंबईचेच. पण रमेशने करीअर ग्रोथसाठी हैद्राबादची कंपनी जॉईन केली. 
भारतीनेही मग तिच्या बॅंकेच्या हैद्राबादच्या ब्रॅंचला बदली करुन घेतली आणि दोघांची मुंबई सुटली. 
सुरुवातीला फक्त दोन तीन वर्षच इथे राहायचं असा विचार करुन हैद्राबादला आलेले दोघं हळूहळू तिथे रमले आणि कायमचे तिथेच स्थाईक झाले. 

यशसाठी चांगले पाळणाघर, शाळा, क्लासेस सगळं काही मनासारखे मिळाले आणि बघता बघता यश सेकंडरीतही गेला. धाकटी पूर्वा तर हैदराबादचेच प्रॉडक्ट. त्यामुळे तिचे बस्तान अगदीच सहजगत्या बसले.  घर, नोकरी आणि दोन मुलं ह्यात भारतीची वर्षांमागून वर्ष फुल स्पीडमधे पळत होती. 
सगळ्या प्रायोरीटीज मुलांच्या आणि दोघांच्या ऑफिस भोवतीच फिरत होत्या. 

त्यात अपवाद फक्त एकच होता तो म्हणजे दरवर्षीची मे महिन्यातल्या दोन आठवड्यांच्या माहेरपणासाठी केलेली जीवाची मुंबई. 
काहीही झालं तरी भारती आईवडिलांकडे सुट्टीला मात्र न चुकता यायची. वर्षभरात अनेकदा मनाला  मुरड घालत रजा साठवायची. 
शक्य तेवढा जास्त वेळ आईवडील, भाऊ, वहिनी आणि भाच्यांबरोबर घालवायला मिळावा म्हणून हैद्राबाद मुंबई प्रवासही ती फ्लाईटने करायची. 

त्यामुळे फेब्रुवारीपासूनच ऑफिसमधून रजा मंजूर करुन घेणे, फ्लाईटची तिकिटे बुक करणे हे सगळे प्लॅनिंग सुरु व्हायचे. 
माहेरचेही सगळे खूप आतुरतेने तिच्या येण्याची वाट पाहात असायचे. 
तिची वहिनी भारतीच्या बुकिंगनुसारच स्वतःच्या माहेरपणाचा प्लॅन ठरवायची. कारण तीही भारती सारखीच नोकरीच्या चक्रात अडकलेली. 
नणंद भावजय दोघी एकेमेकींच्या सोयीने रजा टाकायच्या आणि मुलांसोबत एकत्र मे महिनातली सुट्टी एंजॉय करायच्या. 

मुलंही वर्षभर ह्या मामाकडच्या सुट्टीची वाट बघत असायची.
“एवढं काय असतं ग तुझं माहेरी? आपण मुलांना घेऊन मस्त ट्रीप करुया की. तिथेही तुला छान आराम मिळेल.” असं रमेश नेहमी भारतीला चिडवायचा. आणि ती म्हणायची ” तुला नाही कळणार रे .. माहेर काय असतं ते सासरी आल्यावरच कळतं… इथला आनंद माहेरी जाऊन वाटला.. त्याला आईबाबांच्या समाधानात न्हाऊ घालून आणला की तो आयुष्य नव्या उमेदीने जगायची स्फूर्ती देतो. आपली मुलगी सुखात आहे ह्या भावनेची अनुभूती काही वेगळीच. ती प्रत्येक सुखी लेकीने आपल्या आईवडलांना द्यायलाच हवी.

तेव्हा फिरायला आपण ख्रिसमसच्या सुट्टीत जाऊया पण आत्ता मात्र मिशन मुंबई म्हणजे मुंबई.”हे असे ठरलेले संवाद घडल्या नंतरच भारतीचं बुकिंग कन्फर्म व्हायचं. 
पण ह्या वेळचा फेब्रुवारी जरा वेगळाच होता. कारण चार वर्षांपूर्वीच भारतीचे वडील गेले होते आणि आता आठ महिन्यांपूर्वीच साधाशा आजाराने आईही गेली. 
वडलांनंतर भारती आईच्या अजूनच जवळ गेली होती. न चुकता फोन, जमेल तेव्हा मुंबईला चक्कर आणि ही मे महिन्यातली निवांत भेट तर फारच आवश्यक झाली होती. 

भारतीची वहिनी स्वभावाने खूप चांगली आणि समंजस होती. आईशी खूप प्रेमाने वागायची. तिची काळजीही घ्यायची. 
त्यामुळे आई सुखात असली तरीही भारतीच्या येण्याची मात्र खूप वाट बघत असायची. 
वडील तर आधीच गेले होते आणि आता आईही नाही. तेव्हा आता कसले माहेरपण? ‘तुझे माहेरपण संपले ग आता’ हे आई गेल्यानंतरचे आत्याचे शब्द हल्ली सारखे भारतीच्या विचारांमधे घोळत होते. 

तिच्या जवळच्या मैत्रीणीचाही हाच अनुभव होता. तीही ‘आता काही ओढ नाही राहिली ग माहेरी जायची’ असं म्हणत भारतीकडे मन मोकळं करायची.
भारतीला जरी मनापासून भावाकडे जावेसे वाटत असले तरी आईच्यावेळी वहिनीची बरीच सुट्टी झाली होती. 
वहिनी दिवसभर ऑफिसला जाणार आणि आपण तिथे जाऊन काय करणार?
तेव्हा ह्यावर्षी नकोच जायला असा विचार भारती करत होती आणि आईच्या आठवणीने अजूनच उदास होत होती.

आजही रोजच्यासारखीच संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर भारती आईच्या आठवणीने व्याकूळ झाली होती. त्यात आता मुंबईला जायचे नाही म्हणून सारखे तिचे डोळे भरुन येत होते आणि एकीकडे यंत्रवत घरातली कामंही सुरु होती.
इतक्यात तिचा फोन वाजला.
वहिनीचाच होता.
” ताई फ्लाईट बुक केलत का?” तिने विचारले.

“नाही केलं ग अजून.” भारती म्हणाली आणि तिचा भरुन आलेला गळा वहीनीला लगेच जाणवला.
“अहो.. मग वाट कसली बघताय? करुन टाका बुकिंग लवकर. म्हणजे मला सुट्टी टाकायला तशी. 
यंदा तुम्ही आणि मुलं येणार तेव्हा सुट्टी टाकणारे मी. 
आई असतांना तुम्ही आलात तरी ऑफिसला जायचे मी. पण यंदा मी ठरवलय. अगदी आजीसारखी नाही जमली तरी ह्या वेळची मुलांची सुट्टी मामीच्या स्टाईलने स्पेशल करायची. 

तर पटापट तयारीला लागा आता. तुमचा भाऊ आणि भाच्यांही वाट बघतायत तुमची. मला माहित आहे तुम्ही माझ्या सुट्टीचा विचार करत असाल. पण आहेत तेवढ्या बॅलन्स आहेत माझ्याकडे. नाहीतर इतकी वर्ष नोकरी करुन काय उपयोग? 
तेव्हा दरवर्षीच्या मे महिन्यातल्या प्लॅनमधे चेंज नाही म्हणजे नाही. ओके ? “

भारतीकडून ओके आल्यावरच तिने फोन ठेवला.
वहिनीने भारतीच्या मनातला गोंधळ त्याचा उल्लेखही न करता सावरला आणि तिच्या प्रेमाने, अगत्याने आपले माहेरपण अजूनही अबाधीत असल्याचा निर्वाळा भारतीला मिळाला. तिच्या मनातल्या उदासीनेतेच्या मळभावर भावाच्या व वहिनीच्या आपुलकीचा प्रकाश पसरला आणि डोळ्यांतल्या आसवांवर ओठांवरच्या हास्याचे इंद्रधनुष्य पसरवून गेला.
समाप्त
© धनश्री दाबके
सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!