तेलमीठपोहे

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
एका प्रशस्त बंगल्यातली एक रम्य सकाळ.
हीराताई दिवाणखान्यात नातीशी खेळत बसलेल्या.. सुनेची सकाळच्या कामांची धांदल चाललेली.. मध्येच ती येऊन हीराताईंना विचारून गेली,”आई, नाश्त्याला काय बनवू ?”
“तुमच्यासाठी काहीही बनव.. मला मात्र तेलमीठपोहेच !”, हीराताईंनी सांगितलं.
काहीतरीच आई तुमचं!” सूनबाई वैतागली.. कच्चे पोहे कशाला? छान कांदेपोहे करू का मी? की दडपे पोहे करू?”

“तुम्हाला कर काय हवं ते! मला मात्र तेलमीठपोहेच!” हीराताईंचा हट्ट कायम होता.
“ह्यांचं आपलं काहीतरीच ! असले कच्चे पोहे खातं का कुणी ? लग्न झाल्यापासून बघतेय .. अधूनमधून ह्यांना हुक्की येतेच .. काय तर नाव म्हणे.. तेलमीठपोहे !” सूनबाईनं स्वयंपाकाच्या मावशींना बोलून दाखवलं.
“हो ना ! मी ही हीराताईंकडूनच ऐकलं.. पूर्वी मलाही नव्हतं माहीत ..” मावशींनी सूनबाईच्या री ला री जोडली.


नाश्त्याला डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी मस्त कोथिंबीर अन् खोबरं पेरलेले कांदेपोहे आले अन् हीराताईंसमोर एका वाडग्यात तेलमीठपोहे. त्यांनी सूनबाईला अन् स्वयंपाकाच्या मावशींना शिकवून ठेवले.. अगदी तस्सेच !
“अरे व्वा ! आज पण तेलमीठपोहे का ?” हीराताईंच्या यजमानांनी कौतुकानं विचारलं अन् त्यांच्या मुलानंही वाडग्यातले घासभर पोहे हातानंच उचलून तोंडात टाकले.
नाश्ता आटोपून घरातली पुरुष मंडळी आपापल्या कामाला निघून गेली अन् नात शिकवणीला.. घरात सासू सून दोघीच..

“आई, तुम्हाला एक विचारू ?” सूनेनं अदबीनं विचारलं .
“अगं, विचार की ! त्यात एवढ्या परवानग्या कशाला ?” हीराताईंनी मोकळेपणानं सांगितलं.
“आई, हे तेलमीठपोह्यांचं काय ? लग्न झाल्यापासून बघतेय मी.. आपल्या घरात एव्हढी सुबत्ता ! धनधान्य काठोकाठ भरलेलं.. कामाला नोकरचाकर.. रोज म्हणाल तर साजूक तुपातली पुरणपोळी पानात आयती येईल.. पण तुम्हाला ते दळभद्री तेलमीठपोहेच काय हो आवडतात ?” सूनबाईच्या बोलण्यात नकळत का होईना पण कटूपणा डोकावलाच.


“दळभद्री म्हणू नकोस हो !” हीराताईंचा स्वर रूक्ष झाला.. “सुदाम्यानं कृष्णाला पोहेच नेले होते भेट म्हणून..” त्यांनी रागातही संयम ठेवला अन् समजुतीचा राग आळवत त्या सूनेला सांगू लागल्या.. “अन् हे तेलमीठपोहे तर कृष्णानं सुदाम्यासाठी आणलेले.. तेही एकदा नव्हे.. अनेकदा !”
“सॉरी, आई.. मला तसं म्हणायचं नव्हतं..” सूनेनं बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.. “पण हे तुम्ही काय म्हणालात ? कृष्णाचे पोहे.. सुदाम्याला ?” सुनेची उत्सुकता शिगेला पोचली होती.
“ती एक मोठ्ठी कहाणी आहे.. तुला वेळ असला की सांगेन..” हीराताईंनी वेळ मारून नेली.


“नाही.. नाही.. मला आत्ताच वेळ आहे ..आत्ताच सांगा..” सूनबाईनी हट्ट केला अन् ती गोष्ट ऐकायला बसली.. आवरून सावरून..
“अगं, ही गोष्ट साठपासष्ट वर्षांपूर्वीची.. त्यावेळी मी शाळेत असेन .. फार फार तर चौथीत !” हीराताईंचा भूतकाळाचा प्रवास सुरू झाला होता.. “माझी आई सावत्र.. तिला आम्ही माई म्हणत असू.. तुला माहित आहेच !” हीराताईंनी उत्तराच्या अपेक्षेने सूनेकडं बघितलं.
सुनेनं होकारार्थी मान डोलावली अन् सासूला पुढे बोलण्याची खूण केली.


“तर नऊदहा वर्षांचं वय माझं.. पण माई खूप छळायची .. घरातली धुणीभांडी अन् केरवारे करावे लागत. शिवाय घरी गायीम्हशी होत्या.. त्यांचा शेणगोठासुद्धा !”
ऐकता ऐकता सुनेला गलबलून आलं .. “नऊ दहा वर्षांचीच लेक आपली.. पण तिचे नखरे किती ! आईंनी किती सोसलं असेल त्या वयात !” तिच्या मनात आलं.
“मी तरी लहानच होते ना ग ! कधी कधी कंटाळा यायचा अन् जीव थकून जायचा.. पण कामाला नकार देण्याची सोय नव्हती.. माई जळत्या लाकडानं डागण्या द्यायची.. हातांवर.. पायांवर .. कधीकधी पोटावर सुद्धा!” हिराताई पुढं सांगू लागल्या..


हीराताईंच्या बालपणीच्या आठवणी फारश्या सुखद नाहीत हे सूनेला माहीत होतं .पण इतकं क्रौर्य ! नुसत्या कल्पनेनेच सून शहारली. सासूला हे सगळं आठवण्यापासून थांबवावं असं तिला वाटू लागलं.. पण हिराताई धबधब्यासारख्या बोलत होत्या.. त्यांनी मोकळं झालेलंच बरं.. सूनेने विचार केला अन् ती काळजीपूर्वक ऐकू लागली.
“बरं.. पहाटे उठून कामाचा रगाडा उपसून न जेवता शाळेत जायचं .. कारण माईचा स्वयंपाक झालेला नसायचा .. मग ती आदल्या दिवशीची शिळी भाकरी किंवा पोळी आणि भाजी डब्यात देऊन शाळेत पाठवणी करायची.”
“पण मग आजोबा.. तुमचे वडील.. काही बोलत नसत माईंना ?” सूनेनं मध्येच विचारलं.


“छे गं ! पुरुषांनी घरात लक्ष घालण्याचा काळ नव्हता तो ! आणि माझीही त्यांना काही सांगण्याची हिंमत झाली नाही. त्यांना सांगितलं असतं तर माईचा छळ वाढला असता कदाचित..” हिराताईंनी पुढं बोलायला सुरूवात केली.. “शाळेच्या मधल्या सुट्टीत सगळ्या जणी मिळून डबा खायच्या.. पण माझ्या डब्यातली पोळी भाजी अगदी विटून गेलेली असायची. मी डब्याचं झाकण उघडलं की सगळ्या मुली नाक दाबायच्या .. इतका वास यायचा अन्नाला..” त्या आठवणीनं हीराताईंच्या डोळ्यांत आजही अश्रू तरळले. “तेव्हा कुठले फ्रिज वगैरे ग ! आदल्या दिवशीच अन्न ते .. विटणारच.” हीराताई जराश्या थांबल्या.

“मग ? तुम्ही काय करायचात ?” सूनबाईनं काळजीनं विचारलं.
“काही नाही.. घरी जाण्यापूर्वी डबा कुत्र्याला घालायचा . जर भरलेला डबा घरी नेला तर चुलीतल्या लाकडानं मार मिळायचा .. अन्नाची किंमत नाही म्हणून..‌आणि पुढचा एक दिवस उपास !” हीराताई खेदानं बोलल्या..
सून आता पुरती हबकलेली.. ती जीवाचा कान करून ऐकू लागली..
माझ्या वर्गात एक मुलगी होती.. काळीसावळीशी .. विजू तिचं नाव .. ती ही काही फार श्रीमंत नव्हती .. आमच्यासारखीच .. पण तिची आई सख्खी होती.. ती विजूला डब्यात रोज तेलमीठपोहे द्यायची.”

“रोज ?” सुनेनं आश्चर्यानं विचारलं.
“हो. तिच्या घरी सोवळंओवळं फार होतं.. खरकटं काही डब्यात द्यायला आवडायचं नाही तिच्या आईला.. मग तिची आई तिला सकाळीच पोटभर जेवू घालायची अन् डब्यात इतर मुलींबरोबर खायला म्हणून पोह्यांना तेल, मीठ अन् तिखट लावून द्यायची.. त्यालाच म्हणायचं.. तेलमीठपोहे !” हीराताईंनी खुलासा केला‌ अन् पुढे सांगायला सुरूवात केली.. ” विजूच्‍या डब्यातले तेलमीठपोहे खूप खाल्लेत मी.. पोटभरून.. कधी कधी तर ती मला तिचा सगळा डबा देऊन टाकायची.. अन् मी ही खाऊन टाकायचे .. आधाशासारखे !”

“विजूच्या डब्यातल्या तेलमीठपोह्यांनी अक्षरशः जगवलंय मला त्या काळी.. मला भूकेतून तारलंय..” हीराताईंचा कंठ रुद्ध झाला होता ..
“अच्छा ! म्हणून मघाशी तुम्ही म्हणालात.. कृष्णाने पोहे आणलेत सुदाम्यासाठी म्हणून..!” सूनबाईंनं समजल्यासारखं केलं.
“हो, मी तिला कितीदा तरी म्हणायचे.. विजू, मी मोठी झाले अन् कमवायला लागले की तुझे सगळे पोहे परत करेन तुला !” हीराताईंना आठवणीनंही हसू आलं.


“पुढे माझे वडील वारले.. मी मामाकडे गावी राहिले .. कालांतराने माईचा स्वभावही निवळला. पण विजूचा संपर्क तुटला तो तुटलाच.. लग्न झाल्यावर तुझ्या सासऱ्यांनी आणि मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला.. तिचं घरही बदललेलं अन् तिचंही लग्न झालं असावं.. नाहीच सापडली ती !” हीराताई कसनुसं हसल्या.
“आई, आपण शोधू या.. विजूमावशींना.. हल्ली माणसं शोधणं सोप्पं झालंय.. फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर.. ” सुनेनं आशा दाखवली.


“छे गं ! लग्नानंतर मुलीची नावंही बदलतात अन् आडनावंही.. तिचंही नाव पूर्ण बदललं असेल तर ? आपण कसं ओळखणार ? अन् तिला आठवत तरी असेन का मी ?” हीराताई हताश होत म्हणाल्या.
“पण मी आठवण काढते तिची.. अधून मधून.. ह्या तेलमीठपोह्यांतून .. आणि तुझ्या सासऱ्यांनाही माहीत आहे हो हे सगळं..! नवीन लग्न होऊन आल्यावर सासरी सगळे टर उडवायचे माझी.. ह्या तेलमीठपोह्यांवरून .. पण तुझ्या सासऱ्यांनी माझं मन जाणलं.. त्यांनी कधीच थट्टा नाही केली माझी ह्यावरून..”
हीराताईंचं बोलून झालं होतं.. त्या सुन्न बसल्या होत्या.. सूनेचा हात हातात घेऊन !
*******
समाप्त 
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!