तुला काय कळतयं??

©शुभांगी मस्के
“तुला पैशातलं काय कळतं?  मी करतो बरोबर मँनेज..” अंतराचा पगार झाल्याचं कळताच. रोहीतने अंतराच्या हातून पगार काढून घेतला.
आपण नोकरी करायची आणि पगार.. पगार नव-याच्या हाती द्यायचा… अंतराला रोहीतचं वागणं खटकलचं होतं..|
अंतराला पगारातून, आर.डी, भिसी आणि बाबांनी काढून दिलेल्या एल आय सी चे, पैसे ही भरायचे होते… रोहीतने कसलाच विचार न करता, पगार काढून घेतला अंतरासाठी धक्कादायक बाब होती..

हिसकावून घेतलेल्या, करकरीत नोटा रोहीत एक एक करुन मोजत होता… बस्स!! एवढा कमी पगार… एवढ्या पगारासाठी खर्डेघाशी करेतयसं, त्याच्या दृष्टीने अंतराचा 12 हजार पगार खूप कमी होता…
त्यातलेच काही रुपये त्याने त्याच्या आईला घरखर्चासाठी म्हणून दिले… मोजून दोनचार नोटा, पेट्रोल आणि वर खर्चासाठी, महिनाभर पुरतील ह्या अंदाजाने अंतराच्या हाती टिकवल्या.
बाकी उरलेला सगळा पगार त्याने स्वत:जवळ, पाकीटातच ठेवला…

लग्नापूर्वी, अंतरासाठी पगाराचा दिवस काहीसा स्पेशल असायचा, पगार झाला की, ती छानसं काहीतरी गोड घरी घेवून जायची. पगार देवाजवळ ठेवायची.. त्या दिवशी लहान बहिण भावंडांना सोबत घेवून छान पार्टी करायची..
पूर्ण पगार आईला दिला की आई, बाबांकडे सोपवण्यासाठीचा आग्रह करायची.. बाबा, पगार घेत नव्हतेच.. उलट स्वत:जवळ ठेवायला सांगून, महिन्याभ-याच्या व्यवस्थापनाचे धडे तिच्याकडून गिरवून घेत, आणि महिन्याअखेर चौकशी ही करतं..
पगारातले  मोजके लागतील एवढेच रुपये, स्वत:जवळ ठेवून, बाकी उरलेले, बँकेत टाकण्यासाठी प्रोत्साहन देत..  आर डी, भीसी, एल आय सी.. तारखेवर भरण्याची सक्त ताकीदच होती…

लग्नानंतर, कॉलेज जॉईन केल्यानंतरचा पहिलाच पगार, अंतराने मोठ्सा हौशीने घरी जिलेबी आणली.. जिलेबीला बघून,  सासूबाई जोरात खेकसल्या.. आता डायबिटीज असलेल्या आम्हा म्हाता-यांना मारणार आहेस की काय ही जिलेबी चारुन.
सासूबाईंच्या बोलण्यावर, काय बोलावं अंतराला कळेनासं झालं… जिलेबीचं पँकेट तीने ओट्यावर नेऊन ठेवलं..  रुममधुन फ्रेश होऊन आली आणि आली तशी स्वयंपाकाच्या तयारीला लागली..
हार्डवेअर आणि मटेरियल सप्लायर्सचा वडिलोपार्जित बिझनेस असलेल्या रोहीतशी अंतराचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

Msc Bed झालेली अंतरा, एका कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला शिकवत होती. अर्थांत माहेर आणि सासर एकाच शहरात असल्याने, नोकरी तशीच सुरु रहाणार होती..
उन्हाळ्याच्या सुट्टया संपल्या आणि आता कॉलेज सुरु होणार त्या दिशेने, अंतरा तयारीला लागली.
नोकरी, करायलाच हवी का?
माहेरी ठिक पण सासरच्या जबाबदा-या, आले गेले, पै पाहूणे ह्यांचे दाखले देवून तिला नोकरी करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी सासरच्यांनी एकही संधी सोडली नव्हती..
नोकरी करायला बाहेर जाशील, आणि घर कोण सांभाळेल?

कुटूंबाला पोसू शकतो एवढं, मी कमावतोच, रोहीतने अंतराला नोकरी करायची नाही म्हणून सांगून टाकलं..
नोकरी करायची नाही? अंतराच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवण्यासारखचं होतं..
“मी शिकलेली आहे, लग्नाआधीही नोकरी करायचे,  तुम्हाला मला नोकरी करुच द्यायची नव्हती, तर सांगायचं होतंत ना तसं, मी विचार केला असता.” अंतरा चिडून उत्तरली..
“सरकारी नोकरी थोडीच काही आहे, प्रायव्हेटच आहे ना.. अशा लाख मिळतील.. त्या दिड दमडीच्या दोन पैशाच्या नोकरीसाठी खर्डेघाशी करणार? त्यापेक्षा घरी रहा, घर सांभाळ.” रोहीत बोलला.

भांडणाच्या मूडमध्ये अंतरा नव्हतीच परंतू गप्प बसून फायदा ही नव्हता…
घरकाम आटोपून, स्वयंपाक करुन.. पै पाहूणे आल्या गेलेल्यांच सगळ पाहून,कुठल्याच व्यत्ययाशिवाय,  रोहीत ने मोठ्या जोरावर अंतराला नोकरी करण्याची संमती दिली  होती… त्यासाठी अंतराला कितीतरी आनाभाका, मानमिनत्या कराव्या लागल्या होत्या.
अंतराचं सकाळी नऊचं कॉलेज असायचं, सकाळी पटापटा सगळं आवरुन, स्वयंपाकपाणी घरातली सगळी काम करुन, ती घाईघाईतच कॉलेजला पळायची.

उरलीसुरली कामं तिला, कॉलेजमधून आल्यावर करावीच लागत होती..सासूबाईंनी तर… सूड उगवायचच ठरवलं होतं.. सासूबाईंना सगळचं हाता हातात लागायचं.. स्वत: चा चहाचा कप, विसळूनच काय पण ओट्यावर नेवून ठेवण्याचं सौजन्य ही त्या दाखवत नसत.
अंतराची चांगलीच धावपळ व्हायची, आल्या-गेल्यांच करताना तीची तारांबळ उडायची. ती थकून जात होती.
पण आपल्या बोलण्यावर ठाम रहायचं, करुन दाखवायचं.. हार मानायची नाही तिने ठरवलं होतं..
पहिला पगार आला की, निदान धुण्याभांड्याला तरी बाई लावायचीच, तीने मनोमन ठरवलं होतं.

परंतू, गेल्या दोन पगारापासुन आलेला तिचा पगार तिचा रहातच नव्हता… रोहीतकडून तो काढून घेतला जात होता. त्याच्या दृष्टीने कामवाल्या बाईचे चोचले त्याच्या व्यवस्थापनाचा भाग नव्हताच..
ह्याबद्दल आज तिने बोलायचं ठरवलं…. कॉलेजमधल्या मैत्रीणींशी, चर्चा ही केली.. चेह-यावर सुखाचा मुखवटा घेवून वागायचा खरं तर कंटाळा आला होता.. पण पर्याय नव्हता.  माहेरी सर्वांना उगाच टेंशन येईल म्हणून आजवर तिने काहीच सांगितलं नव्हतं..
आज ही रोहीत तिच्या पगाराची जणू चातकासारखी वाट पाहात होता.. आल्या आल्या त्याने पगाराविषयी विचारलं.. एक मोठी investment करायची आहे सांगून, त्याने आजही तिचा पूर्ण पगार तिच्याकडून काढून घेतला. अंतराला वाईट वाटलं.

मन दु:खी झाल होतं.. उर दाटून आणि डोळे भरुन आले होते.. स्वयंपाक उरकून अंतराने सर्वांची जेवणाची ताट वाढली. विचारांच चक्र मनात सततच सुरु होतं…
जेवण आटोपलं, सगळी आवराआवर झाली तसा … तीने स्वत:च्या हक्काच्या पगाराचा विषय उचलून धरला..
“मी नोकरी करते, माझ्या पगारावर माझा अधिकार आहे, मला मिळालेल्या पगाराचे काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार ही माझाच आहे. मला माझा पूर्ण पगार माझ्या हाती हवाय” तीने निक्षुन सांगितलं..

“ये बाई, माझं माझं काय!! माझं माझं… लग्न करुन घरात आलीय, हक्काने रहाते आहेस… आणि माझंतुझं काय घेवून बसलीयसं… नव-यानेच घेतलेत ना तुझे पैसे?” सासूबाई चिडक्या स्वरात बोलल्या.
त्यांचा लेक, चुकतोय त्यांना पटतच नव्हतं.
“आई, मी माझं समजून सगळचं करतेय. आपल्या जबाबदा-या सांभाळते, एका सुनेच्या कर्तव्यात जराही कसुर ठेवत नाही.
रोहीत, तुम्ही पूर्ण पगार माझ्याकडून काढून घेता,  लागतील एवढे मोजकेच पैसे मला देता… माझ्या बाकी पगाराचं तुम्ही काय करता?  हे विचारण्याचा मला अधिकार नाही का?”

नवरा आणि बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं.. मग आपण कमावत असलेल्या, पैशाचं व्यवस्थापन दोघांनी मिळून नको का करायला? आणि मुळात तेवढी पारदर्शकता तर नवराबायकोच्या  नात्यात असायलाच हवी. मुळात, मी माझा पगार तुमच्या हाती का द्यावा? का,  तर फक्त तुम्ही माझा नवरा आहात म्हणून! पण मला माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे, पैशाचं मँनेजमेंट मी बरोबर करु शकते हा विश्वास ही आहे मला.” बोलताना अंतराचा आवाज चढला..

“तरीच म्हणत होतो! नोकरी करणारी मुलगी सुन म्हणून नको, ह्या घरात.. दिमाख असतो खूप.. ह्या नोकरी करणा-या मुलींना.. कमावतील चाराणे, खर्च करतील आठाणे आणि दिमाख मात्र रुपयाचा. ” असचं काहीस बडबडत, सासूबाई बेडरुमकडे वळल्या.. रोहीत, म्हणूनचं म्हणत होतो.. सगळं क्लिअर कर पहिले.. नोकरी करणारी मुलगी म्हणजे डोक्याला ताप.. आजवर आपल्या घरात, कुणी नोकरी केली नाही.. नव-यांनी कमवायचं आणि बायकांना घरखर्चाला थोडाथोडका पैसा देवून, आपल्या धाकात ठेवायचं.. तेव्हाच संसार सुखाचा होतो.
ज्या घरातल्या बायका अशा पदर खोचून कामाला जातात ना, त्या बायका नव-याच्या डोक्यावर मिरे वाटायला मागेपुढे पाहात नाही.” सासरे बोलले..

“तुम्हाला नोकरी करणारी मुलगी, सुन म्हणून नको होती, रोहीत तुम्हाला नोकरी करणारी बायको नको होती,  तर तसं सांगायचं होतात ना तुम्ही. ही शुद्ध फसवणूक नाही का?” एवढं बोलून अंतरा बेडरुममध्ये गेली..
“आमची मुलगी शिकलेली आहे, तुम्ही आमच्या मुलीला नोकरी करु देणार आहात का!! हे तरी कुठे विचारलं होतं तुझ्या माहेरच्यांनी?” रोहीतच्या प्रश्नावर अंतरा अनुत्तरीत मात्र झाली होती.
आपली फसवणूक झालेली आहे, अंतराच्या लक्षात आल होतं… पण पर्याय नव्हताच..

अंतराची ओढाताण, काहीच महिन्यात माहेरी ही कळली… पाठी दोन बहिण भावंड, घरच्या जेमतेम परिस्थीतीचे दाखले देवून… आईवडिलांकडून ही तडजोड करण्याचेच धडे मिळत गेले..
अनेकदा तिला, सगळं सोडून माहेरी परतावं वाटे, पण तेवढ्याच ताकदीने तिचा तो विचार तिचं मन खोडून काढण्यात यशस्वी होई, आणि ती माघार घेई..
लग्नापूर्वी तिने काढलेल्या आर डी, भीसी आणि एल आय सी चा भुर्दंड ही सुरवातीला तिच्या आई वडिलांवर बसला होता.. नंतर नंतर मात्र अंतरा आपल्या खर्च करुन उरलेल्या पैशातून तो काढून घेत होती..

तुला पैशातलं काय समजतंय? तो बायकांचा प्रांत नाही,  मी बरोबर पैसा invest करतो, असं सांगून तो त्याच त्याचं काहीतरी करायचा. अंतराच्या, उरलेल्या पगारावर, रोहीतच अधिकार गाजवत होता ..
सरकारी नोकरी थोडीच आहे, आज ना उद्या एखाद लेकरु पदरात पडलं की… ओढाताण केवळ अशक्य.. तेव्हा सोडावीच लागेल ना नोकरी… म्हणत अनेकदा तिला, सासर काय आणि माहेराकडून ही गृहीत धरलं जात होतं…
कुणालाच काय पण,  स्वत:साठी काही खरेदी करायची तरी, अंतराला सासू किंवा रोहीतला पैसे मागावे लागत होते..

उलट आवश्यक अनावश्यक दृष्टीने खर्चाला तोलूनमापून धरत.. तिच्याच पैशात तिने केलेल्या खर्चाचा जाब ही अनेकदा तिला विचारला जात होता. हळूहळू, म्हणायला, तसं स्थिरस्थावर झालं सगळं.
लग्नाला दहा वर्ष झालीत,  जान्हवी नावाच्या परीने तिच्या संसारवेलीची शोभा वाढवली. आजही अंतरा नोकरी करतेयं…. आपल्या मुलीचा बराचसा खर्च ती एकटीच उचलते. आजकाल पगार, बँकेत जमा होवू लागला असला तरी, तिने खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मात्र तिला अजूनही नव-याला द्यावाच लागतोय.

तिनेच कमावलेला पैसा उजागिरीने खर्च करण्याचा तिला अधिकार नाही.. तुला काय कळतयं पैशाचं व्यवस्थापन म्हणत तिला आजही गृहीत धरलं जातयं.
त्यावरुन अनेकदा घरात कटकटी ही होतात.. पण आता त्याचीही सवय तिने करवून घेतलीय, असं म्हणायला हरकत नाही.
अनेकदा तिच्याच पगाराच्या भरोवशावर छोटी मोठी कितीतरी काम केल्या गेलीत.. कोरोना काळात, जेव्हा सगळच बंद पडलं होतं, तेव्हा तिचा तोच तुटपुंजा पगार मदतीला धावून आला होता.
आपला हक्काचा पगार!! फक्त पगार नसून तिची ओळख आहे, तिचं स्वत्व, तिचं अस्तित्व, अनेकदा नव-याला पटवून दिलं असलं तरी, काहीच दिवसात पहिले पाढे पंचावन्न अशीच गतं.
स्वाभिमान जपण्यासाठी ती नोकरी मात्र करते..
तिचा पगार, अजून तरी काही तिचा पूर्णपणे झाला नाही.
*********

अशा किती अंतरांचा श्वास, मनाविरुद्ध वागून सासरी घुटत असेल काय माहीती?
“दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत” हे लक्षात घेणे गरजेचे असते. लग्न जुळवताना, सगळ्या दृष्टीने विचार विनिमय करुन, शक्य अशक्यता चाचपडून पाहून, सगळं पाण्यासारखं स्वच्छ असल्याशिवाय लग्न जूळवण्याची घाई कधीच करु नये.
सासर कितीही श्रीमंत असलं.. नव-याचा पगार कितीही जास्ती असला तरी, स्वाभिमानाने मेहनतीने कमावलेल्या तिच्या मिळकतीची तुलना, कशातच होवू शकत नाही.. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे.

लग्न म्हणजे दोन विभिन्न विचारसरणी असलेल्या दोन कुटुंबाचं मिलन असतं.. तेव्हा मतभेद, मनभेद ह्या बरोबर फसवणूक झाल्याने .. अनेकदा अंतरा सारख्या कितीतरी मुलींना मन मारुन जगावे लागते. का सहन करतेय मी? ह्या प्रश्नाने ती अनुत्तरीत होते..
सासरच्यांनी, ही… स्वत:मध्ये, व्यवहारामध्ये छोटे मोठे बदल करुन घेवून सुनेला तिला तिचं स्वतंत्र मत आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
लग्न करुन सासरी आलेली मुलगी ही कुणाची गुलाम नसते, तिला तिचं स्वतंत्र मत असूच शकतं, तिला तिचं व्यक्तीस्वातंत्र्य दिलं असता संसाराचं चित्र काही निराळच असेल.
पिगी बँकेत, एक एक रुपया टाकून जमा करणा-या, चिमुकल्यांच्या डोक्यात, गुल्लक भरल्यावर पैशाचं काय करायचं… त्यांच त्यांच ठरलेलं असतं..
तेव्हा, घरातल्या स्त्रीला तुला पैशातलं काय कळतयं? म्हणून उगाच टोमणे मारुन तिचं खच्चीकरण करु नये.. कारण हीच आई, बहिण, ताई, पत्नी.. एक रुपयातले बाराणे खर्च करु चाराण्यात लेकरांच भविष्य घडवताना दिसते..
उगाच नाही म्हणत.. यशस्वी पुरुषामागे एक एक स्त्री असतेच असते.
©शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!