विरोधाभास

“काय ग कसला एवढा विचार करतेय?” माधवने विचारलं. पण सुमेधाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंग होऊन गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती.
शेवटी गिअरवरचा हात काढून माधवने सुमेधाच्या हातावर ठेवला तेव्हा तिने दचकून त्याच्याकडे पाहिले.
“काय झालं? तासभर झाला आपल्याला निघून पण तू एकही शब्द बोलली नाहीस तेव्हापासून. किती छान झाला ना नेहाकडचा कार्यक्रम? अगदी आनंदात पार पडली नेहाच्या सासऱ्यांची एकसष्टी. चांगली माणसं आहेत सगळी नेहाच्या सासरची.”
“सगळी? खरंच ? ” सुमेधाने विचारलं.
“हो मग? का ग?” सुमेधाला काय खटकतय ते माधवला माहित असूनही त्याने विचारलं.

वर्ष सव्वा वर्ष झालं होतं नेहा आणि सुहासच लग्न होऊन. पण सुहासच्या स्वभावाचा अजिबत काही अंदाजच येत नव्हता. म्हणजे नेहाने तसं कधीच काही वावगं सांगितलं नव्हतं त्याच्याबद्दल. पण नेहा भरपूर बोलायची, खळखळून हसायची आणि सुहास मात्र अगदी तिच्या विरूध्द वागायचा. म्हणजे मोजकच बोलायचा, सतत गंभीर राहायचा आणि हसायचा तर कधी नाहीच.
आजही इतका सुरेख सोहळा झाला होता. छान प्रशस्त ए.सी. कार्यालय होते. सगळे नातेवाईक जमले होते. नेहा आणि सुहासची मजा मस्करी करत होते. हास्याचे फवारे उडत होते. पण तिथेही सुहास अगदी गंभीर चेहऱ्याने वावरत होता.

कोणाशी गप्पा नाहीत की आनंदाने मिसळणं नाही. तसा आलेल्या लोकांशी तो बोलत होता पण तेही अगदी मोजकं. माधव आणि सुमेधाची सुद्धा त्याने आवर्जून चौकशी केली. त्यांना काय हवं नको ते पाहिलं, बरोबर जेवायला घेऊन गेला. त्याच्या नातेवाईकांशी माधवची गाठ घालून दिली जेणेकरून माधवला कंटाळाल्यासारखं होणार नाही.
म्हणजे एका जावयाने करायला हवं ते सगळं सुहासने व्यवस्थित केलं होतं. परत त्यात कुठेही त्रासल्याचा आविर्भावही नव्हता. पण तरीही त्याचं अतिगंभीर वागणं माधव आणि सुमेधाला खटकत होतं. कारण नेहाच्या अगदी विरूध्द स्वभाव होता त्याचा.

“अरे का काय? काय तो सुहास. आज एवढा आनंदाचा दिवस. त्याच्या वडलांच्या एकसष्टावा वाढदिवस. पण त्याचा चेहरा तसाच अगदी एक रेषही इकडची तिकडे न करणारा.. गंभीर. जसं काही हा हसला तर याला टॅक्सच भरावा लागणारे.. कुठल्या मुहूर्तावर त्याच्या आई वडलांनी त्याचं  नावं सुहास ठेवलंय कोण जाणे. किती तो विरोधाभास ! ते म्हणतात ना नाव सोनूबाई आणि..” असं म्हणून सुमेधाच हसायला लागली.
पण लगेच काळजीने पुढे म्हणाली, “मला तर नेहाची काळजीच वाटते बघ. तशी ती मनात एक आणि बाहेर एक असं वागणारी नाही. त्यामुळे तिला काही त्रास असता तर आत्तापर्यंत आपल्याला तिने नक्कीच सांगितलं असतं. पण दोघातल्या काही काही गोष्टी त्या दोघांनाच माहीत असतात रे. बाहेरून बघणाऱ्यांना नाही कळत त्या. आपली नेहा खरंच खुश असेल ना रे सुहास बरोबर?” सुमेधामधल्या आईला काही केल्या चैन पडत नव्हतं.

माधवलाही खरंतर तिचं बोलणं पटत होतं पण लेकीबद्दलच्या काळजीची भावना काही वेळापुरती बाजूला ठेवून विचार केला तर खरोखरच सुहासबरोबर नेहाला काही त्रास आहे असं वाटत नव्हतं आणि अनेकदा विचारूनही नेहाने त्याच्याबद्दल काही वावगंही सांगितलं नव्हतं.
त्यामुळे आपणच आपला चष्मा बदलायला हवाय असा विचार करून माधव म्हणाला, “हे बघ सुमेधा आई म्हणून तुला वाटणारी काळजी मी समजू शकतो. पण ती काळजी खरोखरच रास्त आहे का याचाही विचार आपण करायला हवा.

आपली लेक सुशिक्षित आहे, हुशार आहे, कमावती आहे आणि कॉंफिडंट आहे. तिचे स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. ती जर आनंदी नसती तर तिने उगीच मी किती आनंदात आहे असं ओढूनताणून आपल्याला दाखवलं नसतं. आज बघीतलंस ना ती किती मिळून मिसळून वागत होती सगळ्यांशी. अगदी मनापासून सगळं एंजॉय करत होती. तेव्हा मला वाटतं आपण कशाला उगीच नको ते चिंतून त्रास करून घ्यायचा? आणि आता आईवडलांनी त्याचं नाव सुहास ठेवलय त्याला तो काय करणार ग? तो त्याच्या स्वभावानुसारच वागणार ना? मला वाटतं नेहाने तो जसा आहे तसं त्याला स्वीकारलंय आणि आपणही तसंच करायला हवंय. सुहास स्वतः हसरा नसला तरी तो आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचे स्माईल जपतोय ना? मग झालं तर. आपल्याला अजून काय हवंय?”

माधवचं बोलणं अजिबातच चुकीचं नव्हतं. खरोखरीच सुहासचा गंभीर आणि अबोल स्वभाव सोडला तर बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता. हा सगळा विचार करून सुमेधाही शांत झाली.
पुढे येणाऱ्या काळानेही माधवची ही विचारसरणी अगदी योग्य होती यावरच शिक्कामोर्तब केलं.नेहा आणि सुहासचा संसार बहरला. एका गोड परीच्या रूपाने घरात आनंदाच्या झऱ्याचा खळखळाट होऊ लागला आणि सुमेधा, माधवच्या मनातल्या काळजीला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळाला.
आणि सुहासने खरोखरच नेहाच्या चेहऱ्यावरचे हसू कधी लोपणार नाही याची काळजी घेऊन स्वतःचे सुहास नाव वेगळ्या अर्थाने सार्थ केले.
******
समाप्त
© धनश्री दाबके
सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “विरोधाभास”

Leave a Comment

error: Content is protected !!