डायरीतील निखळलेली पाने

© परवीन कौसर
” मनू लवकर आणि तुझे कपडे बॅग पॅक करतेय गं मी. आणि हो आपली ट्रिप आठ दिवसांचीच आहे उगीचच भरमसाठ कपडे घेऊ नकोस. आणि हो तुझ्या बाहुल्या पण घेऊ नकोस. तिथे जाऊन मस्त फिरायचे बागडायचे .बाहुलीबरोबर तर तू रोजच घरी खेळतेस न.” निमा आपल्या छोट्या मुलीला म्हणत होती.
निमा नरेश ची पत्नी. नरेश हा शहरातील खुप मोठा नावाजलेला प्रसुती तज्ञ होता. मनू ही या दोघांची पाच वय वर्षांची मुलगी. आता ती देखील शहरातील नामवंत शाळेत जात होती.

मनूला ख्रिसमसची सुट्टी दहा दिवसांची मिळाली होती. आणि खूप दिवसांनी हे कुटुंब कुठे बाहेर फिरायला पण गेले नव्हते म्हणून यावेळी नरेशने बाहेर फिरायला जायचे ठरविले होते.
” मम्मा मम्मा हे बघं न. मी माझ्या बाहुल्या कबर्ड मध्ये ठेवत होते तेव्हा तिथे ही डायरी मला मिळाली.तिथे कोणी ठेवली? कोणाची आहे ही ? पप्पांची आहे का ?” असे म्हणत मनू आपल्या खोलीतून पळत पळत निमा जवळ आली.निमा बॅगेत आपले कपडे पॅक करत होती मनूच्या आवाजाने तिने तिच्याकडे पाहिले. आणि जेव्हा मनूच्या हातातील डायरी कडे तिचे लक्ष गेले तेव्हा एकदम घाबरून जाऊन पटकन तिने ती डायरी मनूच्या हातातून हिसकावून घेतली.

” कशाला तिथून ही डायरी काढलीस. कळतं नाही का तुला.” कधी नव्हे ती पहिल्यांदा मनूवर निमा खसकन ओरडली.
मनू आपला इवलासा पडलेला चेहरा घेऊन परत आपल्या खोलीत गेली. ती गेल्याबरोबर निमाने ती डायरी उघडली. एक एक करत पाने चाळू लागली. जसजशी ती पाने चाळत होती तसतसे तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते.पाने चाळता चाळता मध्येच तिला काही पाने निखळलेली आहेत असे जाणवले. तिने आपले अश्रू पुसले आणि पुन्हा डायरीत ती पाने कुठे आहेत का हे पाहू लागली.पण तिला ती निखळलेली पाने कुठे मिळेनाच.

रात्री जेवण बनवायला पण निमाला तितकासा उत्साह नव्हता. तिने उदास मनाने अगदी साधे जेवण म्हणजे वरणभात केला. नरेश दवाखान्यातून घरी आल्यावर रोजच्या प्रमाणे,” मनू कुठे आहे मेरा बच्चा. ये बाबू हे बघं तुझ्या पप्पांने तुला काय आणले आहे.” मनू वडिलांच्या आवाजाने पळत पळत आपल्या खोलीतून बाहेर आली. येताक्षणी पटकन नरेशच्या गळ्यात पडून रडू लागली. ,” काय ग काय झाले तुला रडायला.” नरेश ने मनूला विचारले.
जेवणाच्या टेबलावर निमा अगदी निस्तेज चेहरा करून बसली होती. तिचे लक्ष जेवणाकडे नव्हतेच. ती न जेवता उठून आपल्या खोलीत गेली. मनूचे जेवण झाल्यावर नरेश ने तिला तिच्या खोलीत झोपायला पाठविले आणि तो आपल्या खोलीत गेला.

निमा आपल्या खोलीतील खिडकीतून वर आकाशाकडे बघत होती. नरेशने बोलावले तसेच निमाने एकदम मागे वळून पाहिले.'”अं ..हो..हा..आले..आले..”
” ये इकडे बस इथे. तुझ्या बरोबर मला काही बोलायचे आहे.”
निमाने आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि ती नरेश समोर बसली.
” मनू ने मला सगळे सांगितले. आणि तुझ्या मनात एका प्रश्नाचे काहूर माजले आहे हे मी जाणतो आणि तो प्रश्न काय आहे तेही जाणतो. तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो आहे ते म्हणजे की त्या डायरीतून पाने निखळली कशी ?

तुला डायरीत रोजची रोजनिशी लिहून ठेवायचा छंद होता. तू तुझ्या मैत्रिणींबरोबर किंवा तुझ्या काॅलेजमध्ये जे काही अनुभवलं ते सर्व यामध्ये लिहून ठेवले आहेस. जेव्हा तुझा फायनल इयर होता तेव्हा तुझ्या क्लासमध्ये एका नव्या तरुणाने प्रवेश घेतला होता. त्याचे ते रुप पाहून तू पहाता क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. तो तरुण एका मोठ्या पैसेवाल्या बापाचा मुलगा होता. तो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तुझ्या सारख्या अनेक पोरींना फसवलेले होतं. त्याच्या वडिलांच्या पैशांच्या जोरावर तो काहीही करायला तयार व्हायचा. त्यापैकी तू पण त्याच्या जाळ्यात फसली होती.

तू जेव्हा त्याच्या प्रेमाचे अंकुर तुझ्या पोटात वाढत आहे आणि आपण लवकरात लवकर लग्न करूया असे त्याला सांगितले तेव्हा तुझ्या समोर पैसे फेकून गर्भपात करून घे असा सल्ला देत तो निघून गेला होता. तेव्हा तू नदीच्या काठावर रडत बसली होती. योगायोगाने मी तिथेच होतो. एकदमच धप्पकन आवाज आला पाहतो तो तू तुला नदीमध्ये स्वतः ला समर्पित केले होते . तुला नदीतून बाहेर काढून मी माझ्या दवाखान्यात आणले तेव्हा कळाले की तू तीन महिन्याची गर्भवती आहेस. यानंतर जेव्हा तू शुध्दीवर आलीस तेव्हा तुझी कथा सांगितली आणि आता मला जगण्याची इच्छा नाही का मला वाचवले असे म्हणत रडत होतीस. पण तेव्हा तुझी मी समजूत काढली. तुझ्या निरागस आणि निष्पाप चेहरा पाहून माझे मन गहिवरून आले होते.

तुला मी तुझ्या घरी सोडायला गेलो. तुझ्या आई-वडीलांना सगळे सांगितले तेव्हा ते दोघे शून्य नजरेने पाहत बसले त्यांची ती अवस्था मला बघवत नव्हती. तेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की तुम्ही काही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत. नंतर मी घरी परतलो रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती.
मग मी मनाशी पक्का निश्चय केला होता.सकाळी लवकर उठून तुझ्या घरी आलो आणि मी माझ्यासाठी तुला मागणी घातली.तसे आपल्या वयात खूप अंतर आहे हे मी मानतो. माझी बायको एका अपघातामुळे मृत्यूच्या छायेत गेलीं होती तेव्हा पासून मी एकटाच आयुष्य जगत होतो. पण तुझ्या रुपात मला पत्नी मिळणार होती. तुझ्या बाळाला मी माझे नाव देणार होतो. तुझ्या आई वडिलांनी पण माझ्या निर्णयाला होकार दिला आणि आपले लग्न झाले.

जेव्हा तू इथे आलीस तेव्हा मला तुझ्या मनाची चलबिचल जाणवत होती. तू दिवसभर एक डायरी हातात घेऊन वाचत होती. वाचता वाचता रडायची पण. जेव्हा तू मनूची आई झाली होती तेव्हा तू दवाखान्यात असताना मी तुझी डायरी उघडली आणि वाचली. तेव्हा तुझ्या चांगल्या दिवसांची आठवणींचे क्षण टिपलेले तेवढे मी ठेवून नको असलेल्या कटू आठवणींची पाने फाडून टाकली होती. यासाठी क्षमस्व.”

इतके ऐकून निमाने नरेशचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली,” खरंच मी आज मनूवर पहिल्यांदा ओरडले. का कोणास ठाऊक पुन्हा एकदा त्या दिवसांत गुरफटून गेले. ती निखळलेली पाने ज्या पानांवर मला लागलेला कलंक होता त्या पानासाठी मी माझ्या सुखी संसारात असे सुतकी चेहरा करून बसले.
मला खरंच माफ करा. डायरीतून निखळलेल्या पानांबरोबर माझा इतिहास देखील पुसला तुम्ही.” असे म्हणत निमाने ती डायरी आपल्या खोलीतून बाहेर फेकून देऊन नरेशच्या उबदार मिठीत स्वतः ला समर्पित केले.
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!