©सौ.वैशाली प्रदीप जोशी
वर्ष -1990 (काल)
“नमस्कार! मी देशपांडे… बँकेत नोकरीला आहे. माझी मुलगी स्वप्ना लग्नाची आहे… आपले धाकटे चिरंजीव मंदार ह्यांना कर्तव्य आहे असं कळलं. त्यासंदर्भात भेटायला आलोय.” सुधीर देशपांडे ह्यांनी पटवर्धन ह्यांच्या दारात उभं राहून स्वतःची ओळख करून दिली.
दाराच्या “त्या” बाजूला सौ. पटवर्धन अर्थात् मंदारची आई उभ्या.
“बरं बरं! मुलीचा फोटो, पत्रिका अन् बायोडाटा दाखवा”
देशपांडेंनी दारातूनच सर्व सामग्री बाईंच्या हातात सोपवली. बाईंनी पाकिटातून फोटो काढून पाहिला. नाकीडोळी नीटस अन् गौरवर्णी स्वप्नाचा फोटो बघून त्यांनी देशपांडेना घरात घेतलं.
एव्हाना श्रीयुत पटवर्धनही बैठकीच्या खोलीत आलेले.
“हे बघा, मुलगी एम ए झालीये म्हणता तर तिनं तिच्या शिक्षणाचा उपयोग करावाच… म्हणजे नोकरी… आम्हाला नोकरी करणारी मुलगी हवीये. हो, हो नोकरी देऊ आम्ही लावून आणि मंदार आमचा एकुलता एक मुलगा.तेव्हा घरची संगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा मुलगी गृहकृत्यदक्ष हवी.
आमच्याकडे येणारा-जाणारा पै-पाहुणा नेहमीच असतो.. तिला माणसांचा कंटाळा नको. सासू-सासऱ्यांची सेवा करणारी हवी. दोन मुली आहेत आम्हाला … लग्न झालंय दोघींचं.. सासरी सुखात आहेत. त्यांचंही माहेरपण करायला हवं तिनं.”
देशपांडेंनी मान डोलावली अन् पुढच्या रविवारी सकाळी दहा वाजता मुलगी “दाखवण्याचा” कार्यक्रम ठरला. कार्यक्रम सकाळीच हवा असं पटवर्धन बाईंचं म्हणणं होतं कारण उजेडात मुलगी नीट “बघता” येते. काही व्यंग असेल तर तपासता येतं.
रविवारी सकाळी दहा वाजेपासून देशपांडे पती-पत्नी सगळी तयारी करून पाहुण्यांची वाट बघत होते. शेजारच्या सावंतांकडून चार-पाच खुर्च्या मागवल्या. ठेवणीतल्या कप-बश्या काढून ठेवल्या. महागातलं जाजम जमिनीवर अंथरलं… कांदेपोह्यांची पूर्वतयारी करून ठेवली… पेढे विकत आणले.
दहा म्हणता म्हणता शेवटी साडेअकरा वाजता श्री व सौ पटवर्धन, मंदार, त्याचे गावात राहणारी बहीण-जावई, बहिणीचे सासू-सासरे,काका-काकू आणि दोन मित्र असे 11 जण हजर झाले.
पाहुण्यांचे कांदेपोहे खाऊन झाले अन् हातात चहाचा ट्रे घेऊन स्वप्ना हॉलमध्ये आली. तिनं सगळ्यांना चहा दिला अन् वडिलांनी सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसली.
सगळ्यांकडून नांव, जन्मतारीख, शिक्षण, भावंडं, मामकुळ, स्वैपाकाची आवड, छंद अश्या प्रश्नांची सरबत्ती झाली. मुलाकडच्या प्रत्येकाला मुलीला प्रश्न विचारायचा आग्रह झाला. अगदी मंदारलाही.
मंदारच्या बहिणीच्या सासूबाईंनी अगदी हळू आवाजात तिला एक-दोन प्रश्न विचारले… त्यांच्यापासून जरा दूर बसलेल्या स्वप्नाला नीट ऐकू नाही आले… मग मुलगी बहिरी तर नाही ना ह्याची खातरजमा करण्यात आली. मुलीला चष्मा तर नाही, चालण्यात व्यंग नाही, दात पुढे नाहीत.चेहऱ्यावर डाग वगैरे नाहीत ह्याची खात्री करण्यात आली.
“कळवतो” असं सांगून पटवर्धन मंडळींनी रजा घेतली.
तसं स्वप्नामध्ये डावलण्याजोगं काही नव्हतंच. मात्र पटवर्धनांच्या विहीणबाईंनी लक्षात आणून दिलं की स्वप्नाला भाऊ नाहीये…त्या तिघी बहिणीच आहेत… त्यात स्वप्ना मोठी…उद्या म्हातारपणी तिच्या आईवडिलांची जबाबदारी आपल्या मंदारवर यायला नको ह्याचाही उहापोह झाला… तिच्या आईला सगळ्या मुलीच आहेत आणि ही आईच्या वळणावर गेली तर… हा ही दूरदृष्टीचा विचार करून झाला.
“अगं आई, सगळ्या मुलीच आहेत त्यांना तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळेलच की मंदारला.. शिवाय जबाबदारी काय तिची एकटीची असणारेय का ? बाकीच्या बहिणी आहेत की तिच्या! आणि बँकेत आहेत तिचे वडील… म्हातारपणाची सोय करतीलच की स्वतःची” मंदारच्या बहिणीनं माधवीनं कौल दिला…
इकडे स्वप्नाला मंदारला नीटसं बघता नव्हतं आलं. मंडळी निघाली तेव्हा तिनं मागच्या खोलीतल्या खिडकीतून बघितलं… अन् मंदार आवडला तिला… सावळा, उंच, स्मार्ट… सरकारी नोकरीत असलेला.
आणि मंदारलादेखील स्वप्ना आवडली होतीच. तसा होकार कळवण्यात आला. लग्नाचा व्यवहार ठरवायला बैठक बसली…त्यात पटवर्धनांकडचे 10 आणि देशपांडे कडचे 9…सगळी पुरुष मंडळी.
सात तोळे सोनं, मुला-मुलीचा कपडा, जाण्यायेण्याचं भाडं, मानपान आणि रोख एक लाख अशी मागणी पटवर्धन मंडळींनी केली. शिवाय लग्न मुलीकडच्यांनी थाटात करून द्यायचं. वरमाय आणि त्याच्या बहिणींची हौसमौज…. सगळंच..लग्नात मुलाकडचे 100 लोक असतील हेही सांगितलं.
त्यात घासाघीस करून देशपांडे मंडळींनी 5 तोळे सोनं, मुलामुलीचा कपडा, जाण्यायेण्याचं भाडं आणि रोख 35000 एव्हढं देण्याची तयारी दाखवली. शिवाय दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नातेवाईकांचा मानपान करायचा हे देखील ठरलं. लग्न आपल्या ऐपतीप्रमाणे नीट करून देण्याचं कबूल केलं.
अखेर स्वप्ना-मंदारचं शुभमंगल थाटात पार पडलं आणि कु. स्वप्ना सुधीर देशपांडे हिनं सौ मेघना मंदार पटवर्धन म्हणून पटवर्धनांच्या घरात गृहप्रवेश केला!
तर आपल्या स्वप्ना अन् मंदारचं शुभमंगल थाटात पार पडलं आणि कु. स्वप्ना सुधीर देशपांडे हिनं सौ मेघना मंदार पटवर्धन म्हणून पटवर्धनांच्या घरात गृहप्रवेश केला!
अनेक गोड-कटू अनुभवांना सामोरे जात मेघना आपल्या संसारात रूळली.
संसारवेलीवर दोन फुलं उगवली. दोघेही मुलंच. थोरला शुभम अन् धाकटा स्वयम्…
दोन्ही मुलंच म्हणून पटवर्धन घरात आनंदी-आनंद! मेघनादेखील खूष!! मुलं एव्हाना मोठी झालीत.. शुभम इंजिनिअर झालाय अन् मल्टीनॅशनल कंपनीत मोठया पदावर आहे अन् स्वयम् एम बी बी एस होऊन एम डी ची तयारी करतोय..
मेघनाचे सासूसासरे आता अनुक्रमे 80 अन् 82 वर्षांचे आहेत. ते मंदारसोबतच राहतात.
शुभम 28 वर्षांचा झालाय आणि बऱ्यापैकी सेटलपण.. आता त्याच्या लग्नाची आणि वरमाय म्हणून मिरवण्याची घाई झालीय सौ मेघना पटवर्धन ह्यांना आणि हो त्याच्या आज्जीला पण !!!
पण हे काय??? काळ बदललाय का ???
वर्ष -2020 (आज)
नातेवाईक-मित्रमंडळींकडे शुभमला कर्तव्य आहे म्हणून सांगून झालं… पण मुली सांगूनच येईनात. दोन महिने झाले तशी मेघनाला चुटपूट लागली अन् तिनं ऑनलाईन वधुवर सुचक मंडळात नांव नोंदवलं. तरीही काही रिस्पॉन्स येईना. शोध घेतला तेव्हा कळलं की इथे मुलांचीच नोंदणी जास्त आहे… मुली अगदीच नाममात्र.
त्यांच्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मुली मंडळात नांव नोंदवत आणि मुलंवाले घरी आयतं स्थळ येईल म्हणून वाट बघत…
शेवटी तिनं स्वतः पुढाकार घेऊन मुलीकडच्यांशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. अनुरूप मुलींची माहिती समोर घेतली अन् फोन लावायला सुरुवात केली –
“मुलाला पगार किती? घरी कोण कोण असतं? मुलाला बहीण असेल तर बोलूच नका! त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे का? तुमचं पुढे मुलाकडे राहण्याचं प्लॅनिंग तर नाही?” अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं देताना तिचा जीव गुदमरू लागला.
एका स्थळानं घरी आजी-आजोबा आहेत ह्या कारणास्तव नकार दिला…तर दुसरीनं मुलाचा स्वतःचा फ्लॅट नाही म्हणून.
एकीला एकत्र कुटुंबाची ‘ऍलर्जी’ होती त्यामुळे तिने “तुझे नातेवाईक आले तर तूच अटेंड कर मी घरात राहणार नाही… असेन तरी बेडरूममध्ये झोपून जाईन” असे सांगितले तर दुसरीनं “मी स्वैपाक करणार नाही” अशी अट घातली.
एका मुलीचा देवधर्मावर विश्वास नसल्याने ती घरात काही पूजा वगैरे असल्यास सहभागी होणार नाही हे स्पष्टच सांगितले तर एकीला पटवर्धनांचे जुन्या धाटणीचे घर पसंत पडले नाही.
सरतेशेवटी एका मुलीला ऋतुजा काळेला शुभमचा बायोडाटा पसंत पडला अन् ती तिच्या आईवडिलांसहित मुलाला “बघायला” आली. ऋतुजादेखील एका कंपनीत जॉब करत होती… तिचं बोलणं, वागणं, आत्मविश्वास… मेघना पाहतच राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तीस वर्षांपूर्वीची “स्वप्ना” तरळून गेली… बुजरी, अबोल, घाबरलेली…
ऋतुजाने स्वतःहून शुभमशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली…मंदार-मेघनाने अनुमती दिली.
मग शुभम आणि ऋतुजा बाहेर रेस्टॉरंटमध्ये भेटले.. बोलले…त्यानंतरही दोघांनी निर्णय देण्यासाठी वेळ मागितला. ते अजून दोनतीनदा भेटले… आणि सुमारे दोन महिन्यांनंतर दोघांनीही आपली पसंती घरी कळवली.
शुभमची आज्जी आता नातवाच्या लग्नात “विहीण पाय धुणार, सगळी हौसमौज होणार” म्हणून खुशीत होती…
व्यवहाराच्या गोष्टी करताना काय मागायचं, काय घ्यायचं ह्याबद्दल चर्चा करण्यासाठी आजोबा सरसावून बसले होते.
पण मंदार आणि मेघनाचं आधीच ठरलं होतं…तीन मुलींच्या लग्नात वडिलांची झालेली घालमेल अन् आर्थिक ताण तिनं अनुभवला होताच…शिवाय आजकालच्या मुलींची मानसिकता अन् लग्नसंस्थेबाबतची उदासीनता पाहता शुभमला अनुरूप वधू मिळावी आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा फक्त एव्हढीच अपेक्षा राहिली होती तिची.
बैठकीत दोघांच्या आईवडिलांसह पटवर्धन आजीआजोबा आणि स्वतः शुभम आणि ऋतुजा हजर होते.
दोन्ही पक्षांनी लग्नात लागणारा खर्च, खरेदी इ. आपली आपण करण्याचे ठरवले. तसेच लग्नाचा खर्चही अर्धा-अर्धा वाटून घेण्याचे निश्चित केले. शिवाय मेघनानं पुढाकार घेत वरपक्षाची हौस-मौज, पाय धुणे, विहीण पंगत अश्या प्रथांना फाटा देत नवा पायंडा पाडण्याचे ठरवले.
ऋतुजानं लग्नानंतर नांव बदलणार नाही ती लग्नानंतरही “ऋतुजा काळे” म्हणून ओळखल्या जाईल अशी इच्छा व्यक्त केली.
हा सर्व व्यवहार आणि विचार सिनियर पटवर्धनांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते… लग्नात वरपक्षाची कुठलीही “वरवर” होणार नाही हे त्या दोघांना समजावून सांगण्याची जबाबदारी अर्थातच भावी सासूबाई मेघनाची होती.
शुभम-ऋतुजाच्या इच्छेनुसार डेस्टिनेशन वेडींग चा घाट घातला गेला अन् मोजक्या 60 लोकांच्या उपस्थितीत नववर्षाच्या सुरुवातीला गोव्याला हे लग्न अत्यंत आनंदात आणि दिमाखात पार पडलं.
लग्नानंतर नवीन जोडपं मधुचंद्रासाठी मालदीव्ज ला आणि तेथून परस्पर त्यांच्या नोकरीच्या गावी रवाना झालं.
शुभम आणि ऋतुजा लग्नानंतर आपल्या नोकरीच्या गावी आलेत आणि कामावर रुजू पण झालेत…आणि त्यांचे आईवडिल गावी आहेत… आता आजीआजोबा पण नाहीयेत.
दोघांनी एक टू बी एच के फ्लॅट घेतलाय अन् त्यात दोघेच राहतायेत. शुभमच्या धाकट्या भावानं स्वयम् नी प्रेमविवाह केलाय त्याच्या वर्गमैत्रिणीशी ऐश्वर्या स्वामीनाथनशी…
ते दोघंही शुभमच्या घरापासून जवळ दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहताहेत… दोघा भावांनी काही दिवस एकत्र राहावं असं मेघनाला वाटलेलं पण प्रायव्हसी हवी म्हणून दोन्ही जोड्या वेगळ्या राहताहेत.
मेघनाला सतत वाटतंय की आजकालच्या DINK (double income no kids) चं फॅड तर नाही ना ह्यांचं! दोन नाही तर नाही पण एक तरी मूल हवंच नं!
पण शुभमनं आईबाबांना निराश केलं नाही अन् दोघांचं तीन वर्षांचं “प्लॅनिंग” संपताच मेघना आणि मंदार एका गोड नातीचे “पर्णवी” चे आजीआजोबा झालेत.
ऋतुजाचा ओढा माहेरी बराच असल्याने तिचं बाळंतपण आणि नातीचं संगोपन ह्यात मेघनाचा विशेष सहभाग नव्हताच.. ऋतुजा तिच्या आईसोबत जास्त comfortable असते हे सत्य त्यांनी स्वीकारलं आणि पचवलं देखील.
पाहता पाहता पंचवीस वर्षे उलटली… आता ही पर्णवी पण लग्नाची झालीये.
वर्ष- 2050 (उद्या)
शुभम आणि ऋतुजा मुळातच नवीन विचारांचे असल्याने त्यांनी लेकीला सगळी सूट दिलीये. तिला हवे ते कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, वेगवेगळ्या फॅशन एक्सेसरीज अन् काय काय…
तसंही आता जग इतकं जवळ आलंय… बोस्टन युनिव्हर्सिटीतून एम एस करून तिथेच जॉब करायचा तिचा मानस आहे…
तिथेच तिला एक जीवाभावाचा मित्र मिळालाय – ऑड्रीन नांव त्याचं… युरोपमधल्या एका लहानश्या देशामधला हा मुलगा बोस्टनला शिक्षणासाठी आला अन् पर्णवीच्या मनात घर करून बसला…
काळ कितीही पुढे गेला आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मनातील प्रेमभावना फुलवण्याच्या निसर्गाच्या कामात हस्तक्षेप करणं कुणाला जमलेलं नाही.
अर्णवीच्या बाबतीतही आपलं काम निसर्गाने चोख बजावलंय. पर्णवी आणि ऑड्रीन हे तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि आता हल्लीच लग्नाच्या निष्कर्षाप्रत आलेत.
काही वर्षांपूर्वी आलेलं लिव्ह इन रिलेशनचं वादळ आता बऱ्यापैकी शमलंय..
मागच्या पिढीत लिव्ह इन रिलेशनशिपमुळे नात्यांमध्ये प्रचंड गुंतागुंत निर्माण झालीये.. आणि ह्यातून जन्माला आलेल्या अपत्यांचे प्रश्न ही जगाची मोट्ठी समस्या बनलीये.
हा सगळा सावळागोंधळ आसपास बघितल्यानं पर्णवीचा विवाहसंस्थेवरचा विश्वास बळकट झालाय.. आणि ऑड्रीनदेखील भारतीय संस्कृतीचा चाहता आहे.त्यामुळे लग्न करूनच आपल्या नात्याला ओळख देण्याचं दोघांनी ठरवलंय.
पर्णवीनं व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे ऑड्रीन आणि त्याच्या आईवडिलांची गाठभेट घालून दिलीय. आणि शुभम-ऋतुजाने व्हिडिओ कॉलवरच लेकीच्या पसंतीला दुजोरा दिला.
तिकडे ऑड्रीनच्या पेरेंट्सना पण पर्णवी पसंत आहे…पण दोघांनाही अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचंय. तसंही जवळपास 30 वर्षांपूर्वी आलेली कोरोनाची साथ आता पूर्ण आटोक्यात आली असली तरी त्यावेळी घालण्यात आलेल्या निर्बंधांची जनतेला आता सवय झालीये. त्यामुळे तसंही आजकाल लग्न 50-60 व्यक्तींमध्येच पार पडतात.
लग्न भारतीय पद्धतीने आणि भारतातच पार पडावं ह्या
पर्णवीच्या आईवडिलांच्या इच्छेचा आदर करत ऑड्रीन त्याच्या आईवडिलांसह भारतात आला आणि अखेर हे शुभमंगल अत्यंत साधेपणाने महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडलं.
पर्णवी लग्नानंतरही “पर्णवी शुभम” च राहणार आहे.. तिनं तिचं नांव, धर्म आणि आस्था कायम ठेवल्या आहेत आणि ऑड्रीननं त्याच्या…
पर्णवीच्या लग्नात आजीआजोबा म्हणून मिरवणारे मंदार आणि मेघना तीन पिढ्यामधील लग्न पद्धतीमध्ये झालेला बदल पाहून थक्क झालेत तर दुसरीकडे नवीन पिढीच्या विचारांमध्ये बदल झालाय, भौगोलिक अंतर मिटलंय, काळ कितीतरी बदललाय तरी आपल्या मुलांमध्ये आपल्या संस्कारांची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत हे बघून समाधानाने भरून पावले!
समाप्त
©सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
खुप खुप छान सुंदर, सत्य सांगितले आहे, मी मनापासून आभार मानते, आपण सांगितले आहे, ते अगदी असेच माझ्या मनात विचार आहेत, आणि शक्य तेवढे आत्ता, वेळेनुसार, बदलत्या काळानुसार , सर्वांनी मिळून मिसळून सुखी , समाधानी जिवन जगावे 🙏👌👌👍🙂
खूप खूप धन्यवाद मॅम