नको तो दिखावा

© वर्षा पाचारणे.
आज दोन वर्षांनी शारदा आणि तिची मैत्रीण तिचं सासर असलेल्या परिसरातील एका दुकानात शॉपिंगसाठी गेल्या होत्या. तिथे सेल लागलेला पाहून मैत्रीण पटकन म्हणाली, “अगं सेल म्हणजे फक्त ‘दिखाऊ धंदा आणि फसावू माल’… पण तिच्या या एका वाक्यावरून शारदा मात्र भूतकाळात हरवून गेली. तिचं आयुष्यसुद्धा तर असंच दिखाऊ धंद्यामुळे भरकटल होतं.
माणसांच्या दिसण्यावरून त्यांची पारख होत नाही हेच मुळात खरं. नाती म्हटलं की ती रक्ताची असो किंवा मनाने जुळलेली…. त्यात ओढ असेल तरच त्यातला ओलावा जपला जातो. नाहीतर केवळ दिखावा करण्यासाठी नाती टिकवण्याचा प्रयत्न केला, तर ती कधी ना कधीतरी तुटणारंच.
शारदा आज खूप रडत रडत बेडरूममध्ये आली. रामने तिला खूप वेळा रडण्याचे कारण विचारले, पण ती काहीच सांगायला तयार नव्हती… लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते. शारदाच्या बडबड्या स्वभावाचे रूपांतर शांत, अबोल, स्वतःमध्ये मग्न असणाऱ्या मुलीमध्ये कधी झाले, ते तिचे तिलाही कळले नाही.

लग्न करून शारदा जेव्हा देशमुखांची सून म्हणून येणार होती, तेव्हा सासुबाई अतिशय उत्साही वाटल्या होत्या. नव्या नवरीला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे त्यांना वाटायचे.लग्नात देखील अतिशय महागड्या साड्या, दागिने घेऊन त्यांनी सुनेची भारीच हौस पुरवली होती.
लग्न झाल्यावर पाहुणे मंडळींसमोरही सासूबाई सुनेचे गुणगाण गाण्यात कमी पडत नव्हत्या.नातेवाईक देखील खूप कौतुक करायचे.. लोक म्हणायचे देखील की सासूच एवढी प्रेमळ असेल, तर सुनेला सासरी नांदण्यात कसली अडचणच येणार नाही.नव्या नवलाईचे दिवस संपले आणि सासूबाईंनी मात्र त्यांचे स्वभावातील वेगळे पैलू दाखवायला सुरुवात केली. 

शेजारपाजाऱ्यांना, नातेवाईकांना अगदी भरभरून खायला घालणाऱ्या सासुबाई, सुनेचे मात्र ताटातील घास जणू मोजू लागल्या. शारदाने सकाळी लवकर उठून स्वयंपाक घरात पाऊल ठेवले, तरीही ‘तू भांडी, फरशी ही कामे कर, तोपर्यंत मी स्वयंपाक करते’, असं म्हणून त्या कायम तिला हुसकावून लावत होत्या… कधीतरी ‘तुला कपड्यांना चांगले घसरे देता येत नाहीत’, म्हणत तिला बाथरूममधूनही बाहेर पाठवून द्यायच्या.
कोणी पाहुणे मंडळी घरी आली तरीही सासुबाई किचनचा ताबा घ्यायच्या.. शारदाने ‘मी काही काम करते’, असे म्हणताच, मुद्दाम पाहुण्यांसमोर त्या म्हणायच्या ,’अगं, नको… तू थोडी निवांत बस… रोज तूच तर सगळी कामं करतेस… कधीतरी पाहुण्यांसमोर मलाही थोडी हालचाल करू दे, नाही तर लोक म्हणतील की ‘सासु फक्त बसून ऑर्डरच सोडते’… असं म्हणून पुन्हा जोर जोरात हसायच्या.

त्यांचे हे असं वागणं आता आता शारदाला नकोसं होऊ लागलं होतं कारण रामने टिफिनमध्ये कुठली भाजी न्यायची इथपासून ते त्याने पैसे किती खर्च करावेत इथपर्यंत सारं काही सासूबाई ठरवत होत्या.बरं सुरुवातीला हे शारदाला अगदीच ठीक वाटलं पण पुढे जाऊन त्या आपल्याच घरात आपल्याला वाळीत टाकल्याची वागणूक देतील अशी तिला कल्पनाही नव्हती.
शारदाची गोड बातमी समजली. चौथा महिना लागला. इतके दिवस शारदाला कायम कामापासून दूर ठेवणाऱ्या आणि स्वतःचा उदोउदो करण्यात दंग असलेल्या सासूबाई आता मात्र मुद्दाम शारदाला सगळी कामं करायला लावत होत्या. 
राम समोर त्या मुद्दाम म्हणायच्या की, ‘सारखी हलत राहिलीस तर नॉर्मल डिलिव्हरी होईल’… आपली आई बायकोचा किती विचार करते, या विचाराने रामलाही फार कौतुक वाटायचं.

शारदाची डिलिव्हरी झाली आणि घरात बाळकृष्ण रांगू लागला. छोटी मुलं घरात असल्यावर घरात थोडाफार पसारा हा होणारच.. परंतु सासूबाईंना मात्र राम घरात नसताना शारदाला घालून पाडून बोलण्यासाठी नवीन कारण मिळालं होतं.
घरात कधी कोणीही आलं तरी ते लगेच म्हणायच्या ,”पूर्वी आमच्या घरात अजिबात पसारा नसायचा पण आज-काल घरभर खेळणी आणि बाळाच्या दुपट्यांचा वास दरवळतो नुसता”…. असं म्हणून हसून टोमणे मारायच्या.
बाळाचे शी शू चे कपडे धुण्यासाठी शारदा बाथरूममध्ये गेली, की तेवढ्या वेळात त्या कुठल्यातरी नातेवाईकाला फोन करून गप्पा मारत बसायच्या.शारदा किती बेजबाबदारपणे वागते, तिला कामं जमत नाहीत, या गोष्टींचा पाढा वाचण्यासाठी जणू ते फोन असायचे.

बाथरूममधून या गोष्टी कानावर पडताच शारदाच्या तळपायाची आग मस्तकात जायची. आपली काहीही चूक नसताना आपली बदनामी केलेली पाहून तिला संताप अनावर व्हायचा.असंच एक दिवस फोनवर सासूबाई बोलत असताना शारदा इकडून त्यांना जोरात म्हणाली,”आई कुठलेही काम करायला गेले तर तुम्ही मला ते करू देत नाही आणि वर फोनवर या असल्या उचापती करत बसता… माझं नक्की चुकतंय कुठं? हेच मला कळत नाही. 
साधी भांडी घासायला गेले, कपडे धुवायला घेतले तर ते मला नीट धुता येत नाही असं म्हणता पण माझ्या माहेरी सगळं काम मीच करत होते.तेव्हा कधीच मला काम येत नाही असं कोणीही बोललं नाही.

बरं प्रेमापोटी माझ्या चुका झाकतील असे माझ्या घरचे लोकच नाहीत. पण तुम्ही मात्र लोकांसमोर एक आणि घरात एक असा जो दिखावा सुरू ठेवला आहे तो बंद करा.”तिचं असं परखड बोलणं ऐकून सासूबाई चांगल्याच भडकल्या. त्यावेळी शारदाला त्या काहीही न बोलता शांत बसल्या पण संध्याकाळी राम घरी आल्यावर मात्र त्यांनी ‘तुझी बायको मला उलटं बोलते’ असं म्हणून भांडण उकरून काढलं.आणि वर म्हणाल्या ,” राम ज्या वेळेस तू सकाळी ऑफिसला जातो त्या वेळेला ही मला कुठलीही मदत करत नाही आणि जेव्हा तू ऑफिसवरून येतो तेव्हा देखील मीच काम करत असते हे तू बघतोस… तरी हिचा रुबाब मात्र केवढा ते बघ… वन्संनी हे स्थळ सुचवलं, म्हणून त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी ही मुलगी सून म्हणून स्वीकारली…. नाहीतर तुला कितीतरी चांगल्या मुली सांगून आल्या होत्या….  पण हे असलं ध्यान पदरात पडलं आहे.”त्यांच्या एवढ्या विधानांवर राम मात्र तोंडातून ब्र म्हणून काढत नव्हता. 
सगळं बोलून झाल्यानंतर सासूबाईंनी मात्र डोळ्याला पदर लावून चार आसवं गाळली आणि त्या अश्रूंच्या ओघात खऱ्या खोट्याची पारख न करणाऱ्या रामचं मन पुन्हा एकदा पाघळलं.

आई वरती असलेल्या प्रेमापोटी तो बायकोच्या भावनांना मात्र कधीच न्याय देत नव्हता. कायम आपली आईच बरोबर आणि बायको चुकते हे जणू त्याने ठरवूनच टाकलं होतं.त्याचं असं शांत बसणं शारदाला खूप काही सांगून गेलं. जो स्वतःच्या बायकोची बाजू समजून न घेता तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याप्रमाणे तिच्याकडे कटाक्ष टाकतो, तो माणूस आयुष्यात आपल्या भावना काय समजून घेणार… या विचाराने तिला रडू कोसळलं… आणि त्यावर वरकडी म्हणून रामने तिला सगळ्यांसमोर आईची माफी मागायला सांगितली. 
पण यावेळी मात्र शारदाने निक्षून सांगितलं ,’जर माझी चूकच नाही तर मी माफी मागणार नाही.. उलट आई गावभर माझी बदनामी करत फिरतात, पण मी मात्र घरातल्या गोष्टी घरातच राहतील याची काळजी घेते. पण तू तर माझा नवरा आहेस ना…. तू समजून घ्यावं अशी साधी अपेक्षा आहे”.

त्यावर इतर वेळी शांत असणारा राम मात्र आज शारदेवर हात उगारत म्हणाला ,”माझी आई कशी आहे, हे तू शिकवायची गरज नाही… लहानांनी मोठ्यांचा आदर करावा, एवढी साधी अक्कल तुझ्या आई-वडिलांनी तुला शिकवली नाही का?…. एकतर दिवस रात्र माझी आई घरातलं सगळं काम करते… हे मीच नाही घरातील पाहुणे मंडळींनीही पाहिलं आहे…आता परवा दिवशीच शेजारच्या मावशी बोलत होत्या की ‘सून आली तरीही सासूचं राबणं मात्र काही कमी झालेलं नाही’… या वाक्यावरून तरी थोडीशी समज यायला पाहिजे होती तुला…. पण छे…. माझं नशीबच फुटकं, की तुझ्यासारखी बायको मिळाली. त्यापेक्षा मी आत्ताचं न ऐकता दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं असतं, तर आज कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं.”त्याच्या या बोलण्याने दुखावलेली शारदा सुन्न बसुन राहीली.

आपल्या घरच्यांनी लग्नात दिलेल्या वस्तूंवर संतुष्ट नसलेली सासु नावाची बाई सुनेवर सूड उगवण्यासाठी मुलाच्या आयुष्याबरोबर कुठल्या प्रकारचे खेळ खेळत आहे हे आता शारदा मनोमन ओळखून चुकली होती.ज्या नवऱ्याला खऱ्या खोट्याची पारख नसून केवळ आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, तिने उभ्या केलेल्या देखाव्याला सत्य मानणाऱ्या नवऱ्याबरोबर आता संसार करण्यात शारदाला काडीचा रस राहिला नव्हता. 
तिने त्याच रात्री घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. आई-बाबांनी तिची परिस्थिती ऐकून घेऊन एक-दोनदा रामच्या घरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला.परंतु सगळा प्रयत्न निष्फळ ठरला.. आणि शेवटी राम आणि शारदाचा घटस्फोट झाला.

केवळ स्वतःच्या हेकेखोरपणामुळे, दुसऱ्याला कमी लेखण्याच्या भावनेमुळे किंवा घरात केवळ आपलंच वर्चस्व टिकून रहावं या हेतूमुळे अनेकदा सासुरवासाचे असे छोटे-मोठे प्रसंग अनुभवयास मिळतात.क्वचित प्रसंगी मुलं बायकोची बाजू घेऊन वेगळी राहिली तर बायकोच्या ताटाखालचं मांजर, बैल अशी उपमा देत तुच्छतेची वागणूक त्या मुलांना मिळते किंवा छळ सहन करत राहिल्या तर त्या मुलींचे आयुष्य मखमली होण्याऐवजी एखादी कळी फुलण्याआधीच सुकून जावी, त्याप्रमाणे उध्वस्त होतं.सासू-सुनेचं नातं हे आई मुलीप्रमाणे जरी कदाचित बहरू शकत नसेल तरीही आपण स्वखुषीने आपल्या मुलासाठी तिला जोडीदार म्हणून निवडलेलं असतं हे मात्र लक्षात ठेवावं. केवळ आपण किती चांगले आहोत याचा दिखावा करण्यापेक्षा, तो चांगुलपणा वागण्यातून जाणवला तर प्रत्येक मुलीला सासरी माहेरची उब मिळेल.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!