बोन्साय

©समीर खान
“सागर ऽऽऽऽऽऽ ….ऐ सागर्या… बहिरा झालास का…?? तुला ऐकू येत नाहीये का? थांब काकूलाच ईथे घेऊन येते.. ” चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडणार्या सागरला सबा खाली ऊभी राहूनच ओरडत होती. 
” सबा ऽऽऽऽ ,थांब सबा, ऐक….चमच्ये… ” धप्पकन  सागरने खाली ऊडी मारली. 
“मला चमच्ये म्हणतोय होय, थांब तुझ डोकंच फोडते… ” सबा सागरमागे दगड घेऊन पळत धावू लागली. 
“जाड्ये तुला पळता येत होय.. ऽऽ  पळ  जाड्ये पळ ऽऽऽ हा हा हा ऽऽऽ हा हा हा ऽऽऽऽ   …….सबा ऽऽऽऽऽऽऽऽऽ”
“काय झालं गं ऽऽऽ खुप लागलं का गंऽ  …? ” धापा टाकत सागर बोलला. 
“हाड.. पळ ईथून…हात नको लावू मला.. मी चमची.. मी जाडी… ” सबा रडवेली बोलत होती. 
“दाखव गं, खुप रक्त येतयं… “

“मरू दे, तुला काय करायचयं? सांडू दे सगळे रक्त.. मी मेले ना नाव तुझ्यावरच येणार… ” निरागस डोळ्यांची सबा ऊद्गारली. 
“सबा ऽऽऽऽऽ…. याद राख जर पुढे असं मरायच बोललीस तर… ” टप टप टप सागरच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. काही थेंब त्या फुटलेल्या गुडघ्यावर ही पडले व सबा वेदना विसरून त्याकडे पाहण्यातच रममाण झाली. आपल्याला झालेल्या वेदना त्यालाही जाणवतात तर.. 
 “जाड्ये, आता ईथेच राहणार आहे का? “
“नाटक्या, खोट खोट रडत होतास ना? त्या कसौटी जिंदगी की मधल्या कोमलिका सारखा? “
“हाड, डेलिसोप कुठली . मुर्खांसारखी त्या आरती कडे जातेस ना केबल पहायला. कसली भाव खाते ती. कशाला जातेस गं?” 

“मोठी आहे रे ती आपल्यापेक्षा “
“मोठी असली म्हणून काय झालं? भाव किती खाते आणि काही तुला लाज वाटत नाही का गं तिथं जाऊन बसायला? “
” मूर्ख आहे मी, त्या कोमोलिकाचं नाव घेतलं. चल आता”
आलिशान 2 bhk flat मधल्या मोठ्या led tv वर झळकत असलेल्या पुन्हा नव्याने आलेल्या त्याच मालिकेतली ती नविन अभिनेत्री कोमोलिकाचं पात्र रंगवताना पाहून सबा १९ -२० वर्षांपूर्वीच्या भूतकाळात फेरफटका मारून आली.
जी मजा त्या भाव खाणार्‍या आरतीच्या घरात बसून ती मालिका पाहण्यात होती ती नक्कीच या flat मधल्या led tv मध्ये नाही याची पुरेपूर जाणीव सबाला झाली. नकळत सागर ही आठवला. 

सागर… सबाचा बालमित्र. जिवलग दोस्त. एकाच मोहल्ल्यात राहणारे. फक्त झोपण्यापुरते आपापल्या घरी परतणारे. खाणे, पिणे, हुदडने, अभ्यास, शाळा सर्व सर्व गोष्टी एकत्रच करणारे. सागर सबाच्या आईला अम्मी तर सबा सागरच्या आईला आई म्हणणारी. त्या माऊल्याही कधीच दोघात फरक करत नसत.
सागरचे बाबा मात्र घरी असल्यावर ऊगाचच धीरगंभीर वातावरण निर्माण झाल्यासारखे भासत असे. एरवी सबाला ईतकी माया लावणारी आई सागरचे बाबा असल्यावर स्वयंपाकघरातून बाहेरच येत नसे. याचा ऊलगडाच सबाला होत नसे. 
“हे शिकून आलास का तू तिथुन? हे शिकुन आलास का? एका ताटात जेवणारे ते घाणेरडे लोक कुठले.. ही असली थेरं ईथं चालणार नाही सागर. हजार वेळा बोललोय आज शेवटचं बोलतोय ” सागरचे बाबा सागरला खुप फटकारत होते. सागरला भेटण्यासाठी गेलेली सबा तिथेच थबकली. आल्यापावलीच ती सागरला न भेटताच माघारी परतली.

 “अम्मी, हम सब एक साथ खाना खाने बैठते है ये बुरी बात है क्या? साथ बैठते तो है पर दस्तरख्वान भी तो बिछा हुवा होता है और खाना झुठा भी तो नही होता फिर ये गलत कैसा? “
“क्या हुआ बेटी ? किसीने कुछ कहा क्या? “
“नही अम्मी, बस सागर के यहा सब अलग अलग ताट मे खाते है और पाट पर बैठते है वैसे हम क्यू नही करते? “
“सबकी अलग अलग तहजिब होती है बेटी , अलग खाओ या साथमे बात तो एक ही है ना, बस मिलझुलकर खाओ यह बडी बात है. समझी बुद्धु.. “
*****************************

 “खाना लगा दूँ मेमसाहब? ” मोलकरणीच्या आवाजाने सबा भानावर आली. मोठ्या डायनिंग टेबल वर ती एकटीच बसली होती. होते तरी कोण घरात? अम्मी व ती.अब्बु या flat मध्ये रहायला आल्यावर काही वर्षांतच वारले होते. अम्मी व सबा एका नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. ती तसंच न जेवता परतली होती flat वर. ड्रायव्हर ला अम्मीला घरी आणण्यास सांगितले होते. त्या दिवसानंतर सबा कधीच एका ताटात जेवली नव्हती. अगदी कुणाचं लग्नही असलं तरी ती न जेवताच घरी परतत असे कारण एका ताटात जेवावे लागू नये म्हणून. बुद्धु ची बुद्धु च राहीली होती ती. 
” रफत बी.. रफत बी… “
“जी मेमसाहब…. “
“ये क्या परोसा है थाली मे ? आपको पता चला है ना मै आमरस नही खाती ? फिर भी ये यहाँ क्यो रखा है? “

 “जी…. वो….. “
“बस रहने दो आप…… “
*************************
“सबा बघ आईने तुझ्यासाठी काय पाठवलंय? “
“wow, आमरस? My favorite. “
“हो, जसं अम्मीने माझ्यासाठी खीर पाठवली होती ना तसच” 
“हम्म, पण ना आईच्या हातचं आमरस ना अप्रतिम अगदी डबा भरून खाल्लं ना तरी मन भरत नाही. आणि ते काय रे सागर्या? पोली?”
“सबा, पुरणपोळी रे… तुझ्या लक्षात कस राहत नाही गं? “
“हो जसं तुला शिरखुरमा लक्षात राहत नाही ना तसं. “असं म्हणताना लाडीकपणे सबाने सागरच्या पाठीत धपका मारला. 

“आऽह.. स्स स्स… “
“सागर्या, काय झालं? दाखव? काय झालं? “
“काही नाही गं , असच “
“ते काही नाही, शर्ट काढ “
“नको “
“मी बोलतेय ना शर्ट काढ “
“या खुदा, कुणी मारलं रे तुला? तुझ्या वडीलांनी ना? का? “
“काही नाही गं , अभ्यास नव्हता केला म्हणून.. “
“सपशेल खोटं, अभ्यास नेहमीच पुर्ण असतो तुझा, मला नको शिकवू, नायतर मीच जावून विचारते काकांना, थांब “

“सबा ऽऽऽ ,थांब गं सबा , सबा ऽऽऽ एवढं मारलं ते कमी आहे का??? “अनपेक्षितरित्या सागरच्या तोंडून त्याला मारण्याच्या कारणाचा ऊलगडा झाला. 
सबा जागच्या जागीच थबकली , “काय ऽऽ ??”
“पुन्हा एकदा बोल सागर… “
“सबा तू पण ना… काहीच नाही जाऊदे… ” म्हणत सागर घराकडे वळाला .त्यामागोमाग सबाही न रहावून आली. सबा आलेली सागरने पाहीलेच नाही. आत शिरताच सागरचे वडील त्याच्यावर खेकसले.. 
“चला, तर आता बारी ईथवर आलीये की पट्टयाने सोलून काढूनही राजे ऐकायला तयार नाहीत. थांबा. आणखी थोडे दिवस.बंदोबस्त होईलच तुमचा. या असल्या ‘मोहल्ल्यात ‘रहाव लागतयं त्याचीच ही शिक्षा समजायची आणखी काय? “

“अहो, लहान आहेत हो मुलं ” सागरची आई रडतच बोलली. 
“छान, तुमचाच पाठींबा आहे त्याला, द्या आणखीन डबे भरून द्या, आमच काय जातयं? नाही म्हणायला दारात कुत्रा आल्यावर त्यालाही पोळी टाकायची संस्कृती आहे म्हणा आमची, डबा देताय त्यात वाईट नाही पण त्याने आणखीच बंध घट्ट करून काय मिळवणार आहात तुम्ही? सांगाल का? ” यापुढचे शब्द ऐकण्याचे धाडसच झाले नाही सबाचे. तरातरा ती घराकडे परतली. आईने मायेने पाठवलेल्या आमरसाची गोडी कडू कारल्यागत कशी जिभेवर पसरली सबाला कळलेच नाही. 
त्या प्रसंगानंतर अगदी मनावर मनामनाचे ओझे वागवत तीने सागरशी दुरावा सुरू केला. ऊगवलेल्या दिवसात कितीदातरी संपर्क आला तरी पहिल्यासारखी ओढ मुद्दामच तीने त्यात  येऊ दिली नाही. सागरलाही नकळत हे जाणवत होते. त्याचीही तीच अवस्था होती. मात्र एक न दिसणारी लक्ष्मण रेषा दोघांत कधीच ओढली गेली होती. जी दोघांतली दरी आणखीन वाढवणारच होती. 

 सणासुदीचे दिवस होते. कधी नव्हे ते ईद व दिवाळी एकत्रच येणार होते. मोहल्ल्यातील मुलांचा खरेदीचा ऊत्साह ओसंडून वाहत होता पण सागर, सबा ह्या दोघांनाही आपण एकमेकांशिवाय बाजारात जावू ही कल्पनाच करवत नव्हती. सुट्ट्या लागल्या होत्या. मागच्या वर्षीच्या खरेदीच्या, दिवाळी सुट्टीत केलेल्या धमालची राहून राहून आठवण येत होती. सबाला हुंदका दाटून आला. 
“हमे मामूजान के यहाँ भेज दिजिए अम्मी, हम छुट्टीयाँ खत्म होने तक वही रहेंगे ” कधीच मामाकडे न गेलेली सबा आज स्वतःहून जाण्याचं बोलतेय म्हटल्यावर आनंदानेच तीचा मामा येऊन सबाला घेऊन गेला. ही एक घटना तीच्या जिवनात खुप मोठा बदल घडवणार याची पुसटशी कल्पनाही सबाला नव्हती.

सबा मामाबरोबर निघून गेली. सागरला न भेटताच. यावेळची दिवाळी रोषणाई असूनही फिकीच वाटत होती. ऊदास बसलेल्या सागरकडे आईला पहावत नव्हते. दुसर्‍या दिवशी ईद होती. प्रथमच सबा नसल्याने अम्मीला चुकल्यासारखे वाटत होते. सबा नाही कमीतकमी सागरला तरी गोडधोड खावू घालावं म्हणून अम्मी त्याला बोलवण्यास त्यांच्या घरी निघाली. समोरचं दृश्य बघून अम्मी अचंबित झाली. सागरच्या घरातले सर्व सामान ट्रक मध्ये भरले जात होते. 
“वहीनी…. ” ईतकीच अस्पष्ट हाक अम्मीच्या तोंडून निघाली. 
“भाभी… ” दोघी गळाभेट घेऊन रडू लागल्या. जास्त काही न बोलता दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. अहमदनगर सोडून मुंबईला चालले ईतकेच मोघम ऊत्तर मिळाले . पुढे काही विचारण्यास जागाच ऊरली नव्हती. वहीनींचे डोळे सर्व हकीकत सांगत होते.

सागरने अम्मीला मिठी मारली. जड अंतःकरणाने अम्मीने त्यांना निरोप दिला. कितीतरीवेळ अम्मी गेलेल्या ट्रक च्या रोखाने तिथेच ऊभी राहीली. कितीतरी विचार डोक्यात काहूर माजवत होते. सबाला आल्यावर काय बोलणार हा विचारही डोक्याचा भुगा पाडत होते. सुट्टी संपली. सबा घरी परतली. सागरला कधी भेटावे असे तिला झाले होते. मागील घटनांमुळे आलेला कडवटपणा या सुट्टीने भरून काढला होता. अम्मी काही बोलण्यापूर्वीच ती सागरच्या घराकडे पळाली .
“अम्मी, सागर के घर को तो कुलुप है? कहाँ गये है वो? कब आने वाले है? बताओ ना अम्मी… बोलो ना? “
“मुंबई गये है बेटी वो सब.. “
“कब आनेवाले है? दिवाली मे आईने मेरे लिए मिठाई तो जरूर बचाकर रखी होगी. सागरने पटाखे ऊडाये क्या? तुमने ऊसे शिरखुरमा तो खिलाया ना अम्मी? बहोत पसंद है उसे. “सबाची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. 

“मामूजान के यहाँ क्या क्या मजे किये हमारी बेटी ने? “अम्मी विषय बदलण्याचा प्रयत्न करत होती.
मात्र सबा ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हती. अम्मीने तीला प्रेमाने जवळ घेत हळूवारपणे सांगितले, “अब वो फिर कभी नही आयेंगे सबा, ये शहर छोडकर चले गये है वो लोग. “
” क्या ऽऽऽ ?” सबाने जोरात टाहो फोडला. 
“मुझसे मिले बगैर?? कैसे जा सकता है अम्मी वो? “भरून आलेला पाऊस मनसोक्त बरसावा तशी कितीतरी वेळ ती रडत होती. रडत रडतच ती झोपी गेली. अब्बू आल्यावर त्यांनाही तीची हालत बघवेना. 

” सदाशिव भाऊ वैसे मन का बहोत अच्छा आदमी था पर कमाल का अडियल. जिस बात पर अड गया समझो ऊसकी शामत आ गई . मोहल्लेवाले भी आखिर कबतक चुप बैठते. आए दिन हंगामा. मोहल्लेवाले और वो खुद भी दोनो की गलती है. भई झगडो से हासिल कुछ नही होता. सिवाय नफरत के.. कुछ पता लगा बेगम ?कहाँ गए है वो ? वहीनी तो गाय थी गाय ” 
“नही जी, बंबई गए है ईतना ही पता चला. सबा बहोत रो रही थी “
“भई बच्चे है, साथ खेलकुद लेते थे.. अब कोई एक चला जाए तो गम तो होगा ही ना.. वक्त बहोत बडा मरहम होता है बेगम, गहरे से गहरे जख्म अपने आप भर देता है. ” खरचं या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन खरच योग्य होता अब्बुंचा. 

 त्या दिवसानंतर सबा चुप चुप राहू लागली. खेळणे तर कधीच बंद झाले. अभ्यास मात्र आणखी जास्त करू लागली होती ती.पुस्तकं तीचे मित्र झाले होते. कुणी खास अशी तीची मैत्री कुणासोबत झालीच नाही. कालांतराने त्यांनीही तो मोहल्ला सोडला. दुसर्‍या ठिकाणी flat घेतला स्वतःचा. सबा आता १८ वर्षांची झाली होती. सागरची साथ सुटून ९ वर्षे लोटले होते. वाळवंटात एखादी वस्तू वाळूखाली गाडली जावी तशा त्याच्या आठवणी खोल गाडून टाकल्या होत्या तीने. पण म्हणतात ना की अशा खोल गाडलेल्या वस्तूही वार्याच्या मारासमोर फार काळ लपून राहू शकत नाही. असंच वादळ घेऊन आल्या त्या देशमुख काकू!! आरतीची आई. होय तीच आरती ज्यांच्याकडे सबा केबल पाहायला जात असे.

आरतीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी त्या आल्या होत्या. अधूनमधून त्या येत असत. मात्र आज त्या आल्या होत्या सागरच्या पत्त्यासहीत !! मोबाईलचं प्रस्थ नव्हतं त्यामुळे फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. लग्नात सागर व त्याचा परिवार सहकुटुंब येणार ही बातमी ही त्यांनीच दिली. सबाच्या आनंदास पारावार राहिला नाही. आतुरतेने ती त्या दिवसाची वाट पाहू लागली. अखेर तो दिवस ऊजाडला. 
लग्नमंडपात सबाची भिरभिरती नजर सागरला शोधत होती. अखेर सागर त्याच्या आईबाबांसह आला.सबाला सागरला पाहून प्रेम, राग, आपुलकी, संताप, माया सर्व भाव एकत्रितच दाटून आले. आपल्या बालमित्राला कडकडून मिठी मारून दोन गुद्दे त्याला टाकावे असे मनोमन तीला वाटून गेले.

तो मात्र अगदी शांत वाटत होता. सबाच त्याकडे न रहावून गेली. मिठी तर लांबच साधं हस्तांदोलन ही त्याने अगदी औपचारिकपणे केलं. पुढे काही विचारण्याचा प्रश्नच ऊरत नव्हता. जुजबी बोलून सबा तडक flat वर आली. तीला भेटलेला सागर तीचा सागर नव्हताच. तो ९ वर्षांपूर्वीच हरवला होता.डोळ्यातून गंगाजमूना वाहत होत्या. बालपणीच्या त्या रम्य आठवणी सरसर सरसर डोळयासमोरून सरकत होत्या.
प्रत्येक प्रसंगात नवा भासणारा सागर कुठे खेळकर, कुठे हसरा, कुठे काळजीत रडणारा, कुठे चिडवणारा, कुठे मायेने घास भरवणारा अशी कितीतरी रूपं सबाभोवती पिंगा घालत होती. सबा सबा हाका मारत होती.खळळ् ऽऽऽऽऽ सबाने आरसा फोडताच ते सर्व रुपं अंतर्धान पावले. यापुढे कधीही त्याला आठवायचे नाही असा मनोमन पण केला तीने. 

काळ आपल्या गतीने चालतच होता.आणखी काही वर्ष लोटली गेली. अल्लड १८ वर्षीय सबा प्रौढ झाली होती . तिशीत पोहोचलेली सबा लग्नासाठी तयारच होत नव्हती.   सागरवर असलेले मित्रप्रेम होते की आणखी काही या प्रश्नाचे उत्तर तीच्या स्वतःकडेच नव्हते. कालांतराने सबाच्या अब्बुचे देहावसान झाले. त्यावेळी प्रकर्षाने तीला सागरची आठवण आली पण क्षणभरच !!
स्वतःला सावरण्यास ती शिकली होती. काही गोष्टी माणूस आपसूकच आत्मसात करतो. काही गोष्टी समाज शिकवतो. पण काही नाती अशी असतात की त्यांना कसल्याही व्याख्येची आवश्यकता नसते. नातं हे झाडासारखं असतं. त्याची योग्य निगा राखली नाही की ते कोमेजून जातं.

मात्र एकदा का ते रूजलं तर कसल्याही प्रकारची आवश्यकता त्यास रहात नाही. आयुष्यभर रसाळ फळं तर ते देतोच पण थंडगार सावलीही देतो. गैरसमज हा त्यावर येणारा सर्वात मोठा रोग.त्यानंतर नंबर लागतो अभिमानाचा!! वृथा अभिमानाचा! मीच का पुढाकार घ्यावा? मीच का नेहमी झुकावं? त्याने असेच केले वगैरे वगैरे. पहायला गेलं तर अगदी क्षुल्लक गोष्ट. पण दूरगामी परिणाम करणारी. सबाचं आणि त्याचं नातं असच होतं. खोलवर रूजलेलं. मात्र ऐन बाळसं धरण्याच्या वेळीच मुळासकट ऊपटून काढलेलं. सागरचं माहीत नाही मात्र सबाच्या मैत्रीचा वृक्ष बहरलाय एकतर्फी बोन्सायसारखं !! होय बोन्सायचं!!

त्या टीपाॅय वर ठेवलेल्या आंब्याच्या बोन्साय सारखं. ते पहा, छोटुल्या तीन चार कैर्‍या ही लगडल्यात त्याला. मात्र फक्त शोभेपुरत्या!! ना त्या वृक्षाची सावली ना फळं काहीच नाही. फक्त दिवाणखान्याची शोभा तो वाढवणार!! तेच जर त्याला मोकळ्या आकाशाखाली वाढवले असते तर आज तो काही वेगळाच असता. फुलला असता. मोहोरला असता. रसाळ फळं दिली असती. पानांना शुभकार्यात पुजलं गेलं असतं. कितीतरी आबालवृद्धांचं तो विश्रांतीस्थान असता.
पण…. हा पण जिथे येतो ना तिथे पहिल्या पुर्ण वाक्यालाच अर्थ राहत नाही. पण… त्या मुळ स्वरूपातल्या रोपाचे मनमानीपणे तांब्याच्या तारेने त्याची मुळे घट्ट बांधून त्याची वाढ खुंटवायची व अशी शोभेची वस्तू म्हणून त्या रानातल्या त्याच्या अवाढव्य स्वरूपाला थिटं करुन दिवाणखान्यात सजवायचं.

वाह!! ही किमया फक्त माणूसच करू शकतो. स्वतःला ईश्वर जो समजतो तो! सागरच्या आठवणीही अशाच त्या तारांसारख्या घट्ट लपेटल्या गेल्याय माझ्या अवतीभवती. फक्त माणसानं ‘माणुस’म्हणुन असणंच गरजेचं नसतं तो आपल्याच समुहातला हवा असा अलिखित नियमच असतो. संस्कृती, तहजिब आणखी काय काय… यादी न संपणारी आहे.आज सागर फक्त मित्र म्हणूनही असता तरी…… सबाचा मनाशीच चाललेला संवाद अधिकाधिक कर्कश होत होता….. तीने मोबाईल ला हेडफोन लावले व कितीतरीवेळा ऐकलेले ते गाणं play केलं 
“ये प्यार था या कुछ और था… ये प्यार था या कुछ और था.. 
ना तुझे पता ना मुझे पता.. ये निगाहो का ही कसूर था.. 
ये निगाहो का ही कसूर था.. ना तेरी खता ना मेरी खता… “

क्षणभराचा हा सुखावा तुझ्या वेड्या आठवणीत रे….
मजं फुटतो मोहोर तुझ्या गंधीत रमणीत रे… 
सख्या रे.. साजणां रे कसा सांगू मी तुला मनमित रे.. 
अजूनही कोवळी आहे माझी प्रीत रे… 
तुझ्या हुंकारास आसुसलेली मी रे… 
जसं मृगजळामागे धावे हरीणी रे..
समाप्त
*********
वाचक हो, माझ्या बालपणात घडलेल्या अशाच एका सत्यघटनेवरून प्रेरीत होऊन मी ही कथा लिहीली आहे. कृपया धर्माच्या बाबतीत काहीही गैरसमज करून घेऊ नये. माझा तसा कसलाही हेतू यात नाहीये.
©समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!