नव्यानं उमगले बाबा

© अनुजा धारिया शेठ
“आज किती वर्षांनी मी बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघतोय ग..  खरच रश्मी तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले… तू त्यांचा वाढदिवस किती छान साजरा केलास.” राकेश रश्मीला प्रेमाने जवळ घेत म्हणाला.
श्मी म्हणाली, “राकेश तुला तुझे बाबा कधी उमजलेच नाहीत… हो ना ??”
राकेश म्हणाला, “असे काही नाही ग… आईला तर मी कधी बघितलच नाही.. बाबांनीच सार केले माझे.. पण नेहमीच मला जाणवायच की त्यांच्या मनात काहीतरी खूपतय… पण काय तें कधी समजलं नाही मला. नेहमीच ते वेगळे असायचे… सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागताना मी त्यांना कधीच बघितले नाही… मनमोकळे हसताना… समजात वावरताना कायम दडपणात असायचे तें.

सुरुवातीला खूप प्रश्न विचारायचो मी त्यांना पण तें काहीच बोलायचे नाहीत… माझी आई.. कशी होती? कशी दिसायची? तिच्या विषयी कधी बोलताना मी त्यांना पाहिलेच नाही… सर्व मुलांचे लाड करणारी आई बघितली की मला पण वाटायचं… पण आईचा विषय काढला की बाबा एकदम गप्प व्हायचे… हळू हळू मी सोडून दिले विषय काढणे… मी मोठा होत होतो, मला सर्व समजत होते.. काहीतरी आहे जे बाबा लपवत आहेत.. पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही कधीच.”

रश्मी हसुन म्हणाली, “राकेश तू सुद्धा कधी त्यांच मन समजला नाहीस.”
राकेशला तिच्या बोलण्याचा अर्थच उमजला नाही… तो तिला म्हणाला “म्हणजे ग…?”
“अरे आपले बाबा खूप हळवे आहेत, त्यांच्या मनाच्या कोपर्यात कितीतरी कडू आठवणी आहेत रे… तू त्या मनाला हळुवार फुंकर कधी घातलीस नाही… मला अजूनही आठवत आहे तो दिवस.. आपल्या लग्नाचा दिवस.

त्यांना पटणार नाही, हे तुझे तूच ठरवून त्यांना न सांगता माझ्याशी लग्न केलंस.. तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर राग तर होताच शिवाय एक वेगळीच भीती होती.. जी मला दिसली अगदी काही क्षणात मला जाणवलं पण तुला इतक्या वर्षात कधी कळलेच नाही”
राकेश म्हणाला, “कळेल असे बोल प्लीज.”
रश्मी म्हणाली “सर्व सांगते, पण तू त्यांना काही सांगणार नाहीस.. असे मला वचन दे.
राकेश, तुझे बाबा सत्याला घाबरतात.. सत्य हे आहे की, ते कधीच बाप होऊ शकणार नव्हते.. तुझ्या आईचा पाय घसरला आणि ती.. 

मी नाही बोलू शकत रे पुढचे.. पण तुझ्या बाबांना मात्र मानले पाहिजे.. त्यांनी तुझा स्वीकार केला… तुला कधीच जाणवून पण दिले नाही की तू त्यांचा मुलगा नाहीस.”
सत्य ऐकताच राकेश मात्र गडबडला, “तू काय बोलतेस? असे होऊच शकत नाही.”
रश्मी म्हणाली, “अरे आपले लग्न झाले तेव्हा ते घाबरले होते त्याच कारण म्हणजे हे सर्व सत्य एकाच व्यक्तीला माहिती होते आणि तें म्हणजे माझे बाबा.. डॉक्टर म्हणून त्यांनी त्यावेळी तुझ्या बाबांना सावरले.

म्हणूनच आतापर्यंत तें या समाजासमोर यायला घाबरत आले अन् अजूनही घाबरतात.. त्या मागे त्यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे हे सत्य तुला समजले तर तू हे सहन करू शकणार नाहीस… तू त्यांना सोडून जाशील ही भीती सुद्धा.
मला माझ्या बाबांनी आपल्या लग्नाआधीच सर्व काही सांगितले होते. तू ऑफिसला गेलास की दिवसभर स्वतःच्याच घरात ते परक्यासारखे वागायचे. किती दिवस मी त्यांच्याशी या विषयावर कसे बोलू याचा विचार करत होते.

अन् त्या दिवशी अचानक तू मला म्हणालास त्यांचा वाढदिवस याच महिन्यात येतो.. मग् माझ्या बाबांना फोन करून मी मस्त प्लॅन केला… खरतर त्यांना सर्व काही सरप्राइज द्यायचे असे मी ठरवले होते.. पण माझे बाबा मला म्हणाले, आयुष्याची एवढी वर्षे सर्व गोष्टींपासुन अलीप्त राहिलेला माणूस एकदम सुख नाही पचवु शकत.
मग हळूहळू मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.. मी त्यांना समजावले कोणताच माणुस हा परीपूर्ण नसतो.. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमी असते.. तुम्ही का स्वतःला कमी लेखता… मी असे म्हणाले आणि त्यांना धक्का बसला.. तें मला म्हणाले सर्व काही माहिती असून देखील तू माझ्या राकेशसोबत लग्न केलेस.. खरच ग्रेट आहात तुम्ही.. डॉक्टर आणि तू सुद्धा… माझ्या समोर हात जोडून रडू लागले.”

राकेश सर्व शांतपणे ऐकत होता.. रश्मी पुढे म्हणाली, “मग मी त्यांना सांगितलं, कोणतीही बाई सुद्धा सवतीचे मूल सांभाळत नाही.. तुम्ही तर तें स्वीकारलेच शिवाय एकेरी पालकत्व त्याची धुरा सुद्धा नीट सांभाळलीत.. ग्रेट आम्ही नाही तुम्ही आहात बाबा… एवढे वर्ष तुम्ही सर्व एकट्याने सांभाळलेत.. आता तुमच्यासाठी काही करायची संधी आम्हाला द्या बाबा.”
राकेश हे सर्व ऐकताच खूप रडायला लागला… “मी खूप मोठा गुन्हेगार आहे त्यांचा… मला कायम आई हवी असायची… त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तर दिली नाही की मी त्यांना काही बाही बोलायचो.. आज मला खरच लाज वाटते स्वतःची… लहान असताना ठीक होते ग, पण मोठा झाल्यावर सुद्धा शीsss.. मी त्यांच्या बाजूने कधी विचारच केला नाही… ते नेहमीच माझ्यासाठी आई-बाबा… तर कधी मित्र बनत आले.

ज्या आईने मला जन्म दिला, ती माझा विचारही न करता निघून गेली. पण माझ्या बाबांनी मला घडवले, एवढा मोठा अन्याय सहन करून, त्यांची झालेली फसवणूक विसरून त्यांनी मला लहानाचे मोठे केले… माझ्या चेहेऱ्यावर हसु यावे म्हणून किती प्रयत्न केले.
पण मी मात्र कायम त्यांनी जे मला दिले नाही किंवा जे तें देऊ शकले नाही याचा राग धरून त्यांच्याशी कायम अंतर ठेवून वागत आलो… खरंतर त्यांनी मला आपले मानून माझे पालकत्व स्विकारले नसते तर आज मी कुठे असतो? काय करत असतो? याचा विचार केला तरी माझ्या अंगावर काटा येतो.”

रश्मीने राकेशला सावरले… “राकेश सारं काही विसरून नवीन सुरुवात कर… त्यांना प्रेम, आपुलकी हवे… आज कितीतरी वर्षांनी त्यांच्या चेहेऱ्यावर हे हसु आले.. त्यांच्या मनातला न्यूनगंड गेलाय आता तो कधीच परत येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवा. पुरूषार्थ म्हणजे फक्त मुले जन्माला घातली म्हणजे नाही सिद्ध होत तर तुम्ही मुलांना कसे घडवता? कसे संस्कार देता? यांवरही अवलंबुन असतो.. अन त्यांनी खऱ्या अर्थाने तो सिद्ध केलाय… आपल्या बायकोच कौतुक दुसऱ्या पुरूषाने केले तरी राग येतो तुम्हा पुरूषांना… तुमचा पुरूषी अहंकार दुखावला जातो… इथे तर त्यांनी परपुरुषाचे मूल जे त्यांच्या बायकोच्या उदरातून जन्माला आले.. त्याचा स्विकार तर केलाच, पण बायको सोडून गेली तरीही यथोचित सांभाळही केलाय… ते खरच खूप ग्रेट आहेत…

राकेशला आज रश्मीमुळे त्याचे बाबा नव्याने उमगले.

वाचकहो कशी वाटली कथा?? पूर्ण काल्पनिक आहे बर का!!!… प्रत्येक वेळेस हा समाज, कायदा नेहमीच स्त्रियांच्या बाजूने असतो. पण प्रत्येक वेळेस पुरुष दोषी असतो असे नाही, काही स्त्रीया सुद्धा व्यभिचारी वागतात.. आपले कुटुंब, संसार, नवरा याचा विचार करत नाहीत, अश्या वेळेस काही पुरूष आपला मोडलेला संसार सावरतात, आपला पुरूषी अहंकार बाजूला ठेवून.
************
समाप्त
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!