सुख म्हणजे ते हेच

©कांचन सातपुते हिरण्या
” सुरेखाताई , पेढे घ्या मनीषाला मुलगा झाला आमच्या . सुटली बाई एकदाची . ” शेजारच्या काकू नातू झाला त्याचे पेढे देऊन गेल्या आणि सुरेखाताईंची बडबड सुरु झाली .
” देवा , मीसुद्धा इतकी वर्षं सगळं करत आले तुझं . मग काय आणि कुठे चुकलं माझं ?  माझ्या वसंतला एक तरी मुलगा हवा होता . दोन्ही मुलीच दिल्यास . पुढं कसं होणार त्याचं ? या पोरी जातील लग्न होऊन सासरी . त्याला कोणाचा आधार म्हातारपणी ?”

सुरेखाताईंचं बोलणं स्वयंपाकघरातून ऐकलं आशानं .  तिनं मुलींना हाक मारली ,” मीनल, सोनल , हात-पाय धुऊन घ्या . शुभंकरोती म्हणायचंय , चला पटकन .”
आशाने मुलींना आत पाठवलं .
“आई नका हो असं बोलत जाऊ मुलींसमोर तरी . मुलगा मुलगी काय आपल्या हातात असतं का ? मुली सुदृढ , निरोगी आहेत आपल्या हे महत्त्वाचं नाही का ? बघा या मुलीच नाव मोठं करतील पुढे .”

आशा बोलत होती पण सुरेखाताई “तुला आता नाही कळायचं” असं म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेल्या .
रात्री झोपताना आशाने वसंतला सांगितलं ,”आई सारखं बोलत असतात मुलींवरून . खूप लागतं हो मनाला . एवढ्या सोन्यासारख्या मुली पण त्यांचं आपलं एकच पालुपद , मुलगा हवा होता . मुलगा हवा होता ..”
” नको लक्ष देऊन आशा . आपल्या मुली अभिमान आहेत आपला . बघ एक दिवस आईला पटेलच हे .”

” पटेल तेव्हा पटेल पण आत्ताच काय . मला नाही सहन होत त्यांचं सारखंच बोलणं ,सतत काळजी करत राहतं मन .”
वाचकहो ,कोणाच्या वागण्या ,बोलण्याकडे लक्ष न देता आशा वसंतने मुलींना उत्तम संस्कारांची शिकवण आणि शिक्षण देऊन वाढवलं आणि एक दिवस.. ” आईsss ए आई , लवकर बाहेर ये . बाबा तुम्ही पण या .”
” मीनल काय गं , काय झालं ? “
“बसा इथे , आई हे तुझ्यासाठी . बाबा हे तुम्हांला .”

कॉम्प्युटर इंजिनियर झालेल्या मीनलने आज पहिल्या पगारातून आईसाठी साडी , बाबांना शर्ट , थकलेल्या आजीसाठी सुती गाऊन , सोनलसाठी कुर्ते .. असं काय काय आणलं .
“आशा, बघितलंस कुठं कमी नाहित आपल्या मूली . यापेक्षा वेगळं काय हवंय आपल्याला.” वसंतराव म्हणाले.
मीनल पाठोपाठ सोनलचंही एमबीए झालं . चांगल्या पगाराची नोकरी लागली .आशाताई वसंतरावांच्या कष्टांचं चीज झालं .

एक दिवस आशाताईंनी विषय काढला सगळेजण बसलेले असताना ,” आता यांच्या लग्नाचंही बघायला हवं .दोघींचे हात पिवळे केले म्हणजे आपण जबाबदारीतून मोकळे .”
” आई काय गं असं बोलतेस . आम्ही काय जबाबदारी आहोत का  ? ” मीनल रागावली .
” आणि आई आम्हांला नाही व्हायचं पण आमच्या जबाबदारीतून मोकळं .” सोनल म्हणाली तसं आशाने विचारलं ,
” तुमची कसली गं जबाबदारी आता ? “
” ते तुला आत्ता नाही सांगणार . वेळ आल्यावर कळेल .”

आशाताई आणि वसंतरावांनी मीनल सोनलसाठी वरसंशोधन सुरू केलं . मॅट्रिमोनियल साइट्सवर रजिस्ट्रेशन केलं . नातेवाईकांकडूनही काही स्थळांची माहिती मिळत होती . आता कुठे योग जुळून येणार याचीच वाट पाहत होते आशाताई आणि वसंतराव .
योगायोगाने या दोघींसाठी स्थळं सांगून आली दोन सख्ख्या भावांची ,मिहिर आणि समीर .
बघायचा कार्यक्रम कधी ठेवायचा असे विचारण्यासाठी वसंतरावांनी मध्यस्थांना फोन केला तेव्हा त्यांनी मुलाच्या आई वडिलांचा निरोप सांगितला ,

“नवीन पिढी आहे . नवे विचार . आधी यांना भेटून घेऊ देत त्यांचं बोलणं काय होतं त्यावर आपण ठरवू  पुढं जायचं की नाही .”
मूलांचे आईवडील सुधारित विचारांचे , “तसंही मुली म्हणजे काही वस्तू नाहीत पसंत नापसंत करायला. आम्हांला काही हे पटत नाही.”
मीनल मिहीर आणि सोनल समीर भेटले . शिकलेली , सुसंस्कृत समंजस पिढी..
अनेक विषयांवर बोलले . विचार जुळले आणि मग घरी भेटण्याचा कार्यक्रम ठरवला . कार्यक्रमात औपचारिकता अशी नव्हतीच .

अगदी हसून खेळून गप्पा गोष्टी झाल्यावर मंडळी मुख्य मुद्द्याकडे वळली .
आम्हांला थोडं बोलायचं होतं ,”मीनल म्हणाली .
“मीनल मोठी माणसं आहेत ना बोलायला. तुम्ही दोघी नंतर बोला .” सुरेखाताई थकल्या असल्या तरी त्यांचं मत काही फारसं बदललं नव्हतं.
मिहिरचे वडीलच म्हणाले  मग ,”आज्जी अहो बोलू द्या मूलींना त्यांच्या मनात काय आहे .”

मीनल आणि सोनलनं मिहिर , समीरच्या आई बाबांना सांगितलं ,”आमची एकमेकांची पसंती झाली आहे फक्त एक सांगायचंय . आम्ही दोन्ही मुलीच त्यामुळे आई-बाबांना कधी सरळ , कधी आडून आडून विचारलं जायचं . दोन्ही मुलीच मग पुढे तुमचं कसं काय होणार ? पण यांनी आम्हांला शिकवण्यात घडवण्यात कशा कशाचीच कमी ठेवली नाही कधी .
त्यांच्या आयुष्याचा कितीतरी मोठा काळ त्यांनी आमच्यासाठी दिलाय . तेव्हा एक मुलगा ज्या जबाबदाऱ्या पार पाडतो तीच कर्तव्यं व जबाबदाऱ्या आम्हांलाही पार पाडायच्यात . आई-बाबांना मानसिक , भावनिक , आर्थिक कोणत्याच पातळीवर एकटं पडू द्यायचं नाहीये आयुष्याच्या या टप्प्यावर या दोघांना आणि हे करताना सासरच्यांची मनं दुखावली जाणार नाहित याचीही काळजी घेऊ आम्ही.”

दोघींचे डोळे भरून आले आई-बाबांसाठी.
मिहिर समीरची आई मुलींजवळ आली ,”तुमच्यासारख्या मुली आमच्या घरात येत आहेत खरंच भाग्यंच आमचं .”
आशाताई आणि वसंतरावांना म्हणाल्या , “खूप नशीबवान आहात अशा मुली तुमच्या घरी जन्मल्या आणि आता आमच्या घरी येताहेत. “
आशाताई आणि वसंतरावांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. आज्जीला आता खूप नाही पण थोडं तरी पटलं मूलीही कुठेच कमी नसतात मूलांपेक्षा .
************
समाप्त
©कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार. अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!