© धनश्री दाबके
मधुरा आज ऑफिसमधून हाफ डे टाकून निघाली होती आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या स्पॉटवर मंदारची वाट बघत थांबली होती. आज दोघांचा दिवाळीच्या खरेदीचा प्लॅन होता. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच दिवाळी असल्याने आजची खरेदीही खास होती.
मंदारसाठी पहिल्या दिवाळीला काय गिफ्ट घ्यावं यावर तिचा खूप उहापोह करून झाला होता.
सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं असल्याने अजून तिला मंदारच्या आवडीनिवडींचा अंदाज यायचा होता. त्यात लग्नात भेट म्हणून मिळालेल्या बर्याच नविन आणि त्याला वापरता येतील अशा वस्तूही घरात होत्या.
मग अजून काय बरं घेता येईल जे त्याला आवडेल ह्यावर बराच विचार करून तिने मंदारसाठी त्याच्या गोऱ्या रंगावर उठून दिसेल असा मरुन कलरचा किंवा त्याला आवडेल त्या कलरचा सिल्कचा झब्बा, जो त्याच्याकडे नाहीये, तो घ्यावा असं ठरवलं होतं.
मंदारकडे मात्र मधुराची दिवाळी स्पेशल करायला भरपूर ऑप्शन्स होते. मंदार मुळातच स्वभावाने तसा रसिक होता आणि त्याला खरेदीची मनापासून आवडही होती. त्यामुळेच मधुराने हाफ डे टाकून माझ्याबरोबर खरेदीला येशील का विचारल्याववर तो एका पायावर यायला तयार झाला होता.मधुराच्या लांबसडक व नाजूक बोटावर शोभेल अशी एखादी नाजूक व सुंदर डायमंड रिंग खरेदी करण्याचा त्याचा प्लॅन होता जेणेकरून ही पहिल्या दिवाळीची भेट त्यांच्या आयुष्यात एक गोड आठवण बनून राहील.
मधुराला तिच्या आईनेही बजावले होते, “ हे बघ मधुरा, ही तुमची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे आम्ही तर आमच्या परीने दिवाळसणाचा आहेर करूच पण तूही घरात प्रत्येकासाठी चांगले काहीतरी घे. कारण सुरवातीच्या दिवसांतल्या अशा प्रेमळ भेटी घरातल्यांच्या मनात शिरायचा मार्ग सोपा करतात.
सूनेने आपल्यासाठी घेतलेली पहिली साडी तर सासूबाईंसाठी खूप खास असते हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरुन सांगतेय तेव्हा तुझ्या सासूबाईंना आवडेल अशी चांगली साडी घे.”
आईने सांगितले होतेच आणि मधुरालाही प्रत्येकासाठी काहीतरी छान गिफ्ट घ्यायची इच्छा होतीच. त्यामुळे तिचा सासूबाईंसाठी साडी, धाकट्या नणंदेसाठी छानसा ड्रेस आणि सासऱ्यांना जुनी गाणी ऐकायची खूप आवड असल्याने त्यांच्यासाठी iPod किंवा Walkman घ्यायचा मनसुबा होता.
म्हणजे एकंदरीतच आज ज्वेलर्सच्या, electronics वस्तूंच्या आणि कपड्यांच्या अशा सगळ्याच दुकानांची वारी करत साग्रसंगीत खरेदीचा बेत होता ज्यासाठी दोघांनी हाफ डे टाकला होता.
ठरलेल्या वेळेवर मंदार आला आणि दोघं खरदीसाठी निघाले.
सिल्कच्या झब्ब्यापासून सुरुवात झाली. झब्बा आणि त्याचे दुकान आधीच ठरवलेले असल्याने ती खरेदी त्यामानाने पटकन आटोपली.
मग मंदार मधुराला पेठ्यांकडे घेऊन गेला. आत्ताच तर इतके दागिने घेतलेत. अगदी ऑफिसला जातांना ड्रेसवर घालायचे छोटे मंगळसूत्रही नुकतच घेऊन झालंय. मग आता काय बरं घेणार हा असा विचार मधुरा करत असतानांच मंदारने डायमंड रिंग्स बघायच्या आहेत असं त्यांना रिसिव्ह करायला आलेल्या दुकानातल्या त्या सुंदरीला सांगितलं आणि मधुरा हरखून गेली. पण लगेच तिच्या मनात खर्चाचा विचार आला.
“अरे.. कशाला एवढा खर्च आत्ताच तर झालेत सगळे दागिने” असं मधुरा म्हणत राहिली पण मंदारने तिचे काही ऐकलच नाही. “मी आधीपासून प्लॅन करून ह्या डायमंड रिंगसाठी पैसे बाजूला ठेवलेत ग. तू नको टेंशन घेऊ. तू फक्त तुला आवडेल ती रिंग सिलेक्ट कर. Its my dream, बायको” मंदारने असं म्हंटल्यावर मात्र मधुराच्या मनातला खर्चाचा विचार पळून गेला आणि ती आनंदाने रिंग्ज बघायला लागली.
पेठ्यांकडच्या कोल्ड ड्रींकचा आस्वाद घेत घेत दोघांनी एक सुंदर रिंग पसंत केली. मग ती स्पेशल डायमंड रिंग तितक्याच स्पेशल गिफ्ट बॉक्समधे थाटात मधुराच्या पर्समध्ये जाऊन बसली.
तसंही लग्न जितकं नविन तितकी खरेदी जास्त आनंददायी असते. त्यात ही रिंगची खरेदी दोघांच्या मनाप्रमाणे झाल्याने दोघं तरंगतच पुढच्या दुकानात निघाले.
मंदारला आपल्या बहिणीचा चॉईस अगदी परफेक्ट माहिती होता. कुठला रंग आणि स्टाईल तिला आवडेल तसंच तिच्याकडे कुठल्या कुठल्या रंगांचे आणि लेटेस्ट स्टाईलचे ड्रेसेस आहेत तेही त्याच्या लक्षात होते. त्यामुळे मधुराला नणंदेसाठी नविनच आलेल्या ट्रेंडचा रॉयल ब्ल्यू कलरचा लॉन्ग टॉप आणि त्यावर जाणारी लेगिंग्ज घ्यायलाही वेळ लागला नाही.
मग जवळच्याच एका हॉटेलमध्ये टी ब्रेक झाला. चहा आणि स्नॅक्स घेऊन दोघं ताजेतवाने झाले आणि उत्साहाने साड्यांच्या दुकानात शिरले.
आता सासूबाईंची साडी हा खरेदीचा महत्वाचा टप्पा होता. इथेही मंदार मदतीला आलाच. आई खूप बारिक असल्याने अंगावर चापून चोपून बसणाऱ्या सॉफ्ट सिल्कच्या साड्या शक्यतो नाही घेत तर तिला जरा फुलणाऱ्या टेक्सरची साडी लागते ही टीप त्याने दिली. त्यानुसार मधुराचं साड्या बघणे सुरु झाले.
दोन तीन दुकानं झाल्यावर चौथ्या दुकानातली एक गढवाल दोघांच्या पसंतीस उतरली.
ती फायनल झाल्यावर मंदारने दुकानदाराला साधारण ह्याच रेंजमधली अजून एक साडी दाखवा असं सांगितलं. अजून एक साडी दाखवा म्हंटल्यावर दुकानदारने उत्साहाने प्रश्नमंजुषा सुरू केली, “साहेब मॅडमसाठी का? नाही म्हणजे त्यांना सुट होणारा कलर काढतो, म्हणून विचारलं.”
त्यावर मंदार म्हणाला “नाही मॅडमसाठी नाही. आत्ता ही घेतली ना तशीच, थोड्या सिनिअर मॅडमसाठी दाखवा अजून एक”
मधुराला कळेना ही अजून एक साडी कोणासाठी घ्यायचीये ते. ती जरा बुचकळ्यात पडली पण तिने लगेच काही विचारलं नाही.
इतक्यात मंदार म्हणाला, “तुझ्या आईला कुठला रंग आवडेल ते सांग आणि त्यांच्याकडे नसेल अशा टाईपची एक झकास साडी घेऊन टाक”
“अरे, माझ्या पण आईला साडी घ्यायची? पण पहिल्या दिवाळीत तर जावयाचा आणि सासरच्यांचा थाट करायची पद्धत असते रे.” मधुरा आश्चर्याने म्हणाली.
“अगं हो तेच तर करतोय. माझ्याही सासरच्यांचा मान नको का ठेवायला आपण? जसे तुला तुझे सासूसासरे महत्वाचे तसेच मला माझे. तेव्हा शॉपिंग तो उनके लिये भी बनता है माय डीअर. आईंना एक साडी आणि तुझ्या बाबांसाठी एक घड्याळ घेऊया. इथेच ह्याच रोडवर पुढे टायटनचे दुकान आहे तिथून.” मंदारने त्याच्या मनातला बेत सांगितला.
” आणि हो माझे आईबाबा काही म्हणणार नाहीत हा. उलट त्यांना आनंदच होईल मी आठवणीने तुझ्या आईबाबांसाठी केलेल्या या खरेदीमुळे. तेव्हा पटकन एक झकास साडी घेऊन टाक.” असं म्हणून त्याने अजूनच आश्वस्त केलं मधुराला.
आपल्या सारखाच हाही त्याच्या सासू सासऱ्यांचा एवढा विचार करतोय. माझ्या आनंदा इतकीच त्यांच्याही आनंदाची काळजी घेतोय ह्या विचाराने मधुराचे डोळे भरुन आले.
नवऱ्यांनी माहेरच्या लोकांबद्दल दाखवलेल्या अनास्थेचे अनेक किस्से मधुराने तिच्या मैत्रीणींकडून ऐकले होते. पण मंदारचे हे तिच्या स्त्रीमनाला जपणारे वागणे, पाहून माझा नवरा नक्कीच इतरांपेक्षा वेगळा आहे या विचाराने तिच्या अंगावर मूठभर मास चढले. तसा तर हा सतत मनात असतोच पण आज मात्र अजूनच खोलवर घुसला मनात, कायमसाठी. ते ही अगदी सहज. ह्या विचाराने मधुरा खुदकन हसली आणि प्रसन्न मनाने साड्या बघायला लागली.
समाप्त
**********
© धनश्री दाबके
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.