पहिल्या-वहील्या दिवाळीच्या आठवणीचा मनोदीप….!!!

© अनुजा धारिया शेठ
पूनम आणि पंकज यांची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. लग्न झाले पण नोकरीसाठी म्हणून ते शहरात रहात होते. सण-वार असले की गावी येणे व्हायचं. गावात त्यांच्या घराण्याला खूप मान होता.खूप ऐकून होती ती, त्यांचे घर आणि दिवाळी यांचे एक वेगळेच नाते होते. दिवाळीत घराचा कोपरा न् कोपरा उजळून जायचा. खूप साऱ्या पणत्या होत्या त्यांच्याकडे. आता हे सारे बघायला मिळेल म्हणून खूप उत्सुक होती ती.दिवाळी ८ दिवसावर आली होती आणि त्यांची तयारी सुरू होती. घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने काहीतरी भेट वस्तू घेतली होती. आणि सासऱ्यांना आवडतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या. पंकजला सुद्धा तिने हे काहीच सांगितलं नव्हते. सगळ्यांना खूप छान सरप्राईज देऊ असे तिने ठरवले.

इकडे सासूबाईंची पण लगबग सुरू होती. साफसफाई, दळणं, फराळ, सूनबाईंना साडी, छोटासा दागिना. घरची लक्ष्मी कशी दागिन्यांनी मढलेली हवी सणावाराला. सासऱ्यांचा आदेशच होता तसा.
पहिली दिवाळी असल्यामुळे चार दिवस आधीच सुट्टी टाकून या, असे सांगितलं होते बाबांनी. त्यामुळे पूनम आणि पंकज लवकरच गावी यायला निघाले.
प्रवास तसा लांबचा होता. गावी येईपर्यंत संध्याकाळ झाली. वाडा लाईटींगने चकाकत होता आणि माणसांची ये-जा एवढी होती की लग्नघरच वाटत होते. पूनम सर्व बघतच बसली.

सर्व तयारी अगदी जय्यत होती. फराळाचे वास सुटले होते. अगदी राजवाडा. जे तिने ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी जोरदार तयारी होती.
अण्णा म्हणजे तिचे सासरे जवळच कोठेतरी बाहेर गेले होते. सासूबाईनी त्यांना आराम करायला सांगितला आणि त्या पुढची तयारी करायला गेल्या.
दिवाळीला चार दिवस होते पण इथे तर तिला दिवाळी आल्यासारखीच वाटत होती.थोडा आराम झाल्यावर ती बाहेर पडली तर त्यांच्याकडे कामाला असलेली रक्माला पणत्या धुवताना तिने बघितले. खूप वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या होत्या… काही जुन्या झाल्यामुळे काळ्या पडल्या होत्या. पूनमने तें बघितल आणि सासूबाईना शोधत ती किचनमध्ये गेली.तिथे तिने बघितल तर काय? फराळ म्हणजे एवढा होता की.. अबबं..!! लग्न मंडपात असल्यासारखे वाटले तिला.

“एवढा फराळ !!” पूनम म्हणाली.
सासूबाई म्हणाल्या, “सांगतें तुम्हाला सर्व. पण आधी तुम्ही मला सांगा प्रवास कसा झाला? आराम करायचा असेल तर करा थोडावेळ अजून.”
तिने नाही म्हंटल्यावर त्या म्हणाल्या, “पूनम दिवाळी आहे त्यामुळे साडी नेसावी लागेल, तुम्हाला जमेल ना !! मी दागिने देते तुमचे लग्नातले तें पण घाला.”
सासूबाई सर्वांनाच अहो जाहो म्हणायच्या. त्यांना सवयच होती तशी.

पूनम म्हणाली, “हो आई जमेल मला…. आता रक्माला मी पणत्या साफ़ करताना पाहिले, काही खुपच काळ्या झाल्यात, त्या टाकून मी काही नवीन आणल्या आहेत त्या लावायच्या का??”सासूबाई विचारात पडल्या, अण्णांना बाहेरून पणत्या आणलेल्या आवडत नसत, हे त्यांना माहित होते.त्यांनी हळूच पूनमला विचारले, “तुम्ही आणलेल्या पणत्यांबद्दल आधी काही बोलू नका… का? तें मी तुम्हाला नंतर सांगेन आणि हो आकाशकंदिलसुद्धा आणला असेल तर आधी काढू नका.”
पूनमचे मन खट्टु झाले… मी या घरची सून आहे, माझे पण घर आहे ना हे… तरी आई असे का बोलल्या? तिच्या मनात खूप विचार येत होते… रडूसुद्धा येत होते…. पण तिने शांत राहणे पसंत केले.

उद्या वसुबारस, गोमातेचे पूजन. त्यांच्या अंगणात खूप मोठा कार्यक्रम व्हायचा याचा… सगळ्या बायका यायच्या… सर्व तयारी सुरू होती.
अण्णा काही साधे फटाके घेऊन आले. फुलबाजी, चक्र, पाऊस आणि सासूबाईंनी फराळाच्या पुड्या घेतल्या. “या वर्षी सूनबाईंच्या हस्ते वाटप करूया” अण्णा म्हणाले.
पूनम आणि पंकज सुद्धा बरोबर गेले. कुठे जातोय? हे काही तिला माहित नव्हते आणि अण्णा असल्यामुळे ती शांत होती. गाडीत बसून निघाले. मागून जीप घेऊन ड्राईव्हर येत होता.
“मुक्तांगण” म्हणून एक संस्था आहे तिथे जातोय आपण एवढेच पंकज बोलला. पण कसली संस्था आहे ते तिला माहित नव्हते.

गाडी थांबली. सगळे उतरले आणि आत आले, तिथल्या सरांनी स्वागत केले.हे सर्व आत गेले. पूनम सर्व बघत होती. आतमध्ये बऱ्याच वस्तू होत्या शोभेच्या. खुप छान छान भिंती रंगवल्या होत्या.
एका हॉलमध्ये सर्व मुले बसली होती तिथे सगळ्यांना तें सर घेऊन आले. सर्व मुलांनी अण्णांचे स्वागत केले. जणू त्यांचे नातेच जोडले गेले होते त्यांच्याशी.
अण्णांनी सूनबाईंची ओळख करून दिली आणि या वर्षी फराळ आणि फटाके यांचे वाटप त्या करतील असे त्यांनी सांगितले.पूनम सर्व बघत होती.  काही मुले अंध होती तर काही मुक-बधीर. तिचे डोळे भरून आले अन् अण्णांविषयीचा आदर वाढला.

तिथून निघताना तिने बघितल तर काय याच मुलांनी बनवलेले कंदिल, आणि वेगवेगळ्या पणत्या अण्णा विकत घेत असत, आणि त्याच पणत्यांनी त्यांचा वाडा उजळून निघत असत.शिवाय याच वस्तू अण्णा स्वतः खरेदी करून आदिवासी पाड्यावर जाऊन भेट देत असत, जेणेकरून त्यांची दिवाळी सुद्धा साजरी होऊ शकेल.या वर्षी हे वाटप सुद्धा पूनमने केले. तिथल्या लोकांनी पूनमची ओटी भरून, जोडीची दृष्ट काढली.
अण्णांचे हे रूप बघून तिला तिच्या मनात आलेल्या विचारांची लाज वाटली.

सर्व घरी आले आणि पुढची तयारी करू लागले.अण्णांनी सासूबाईंना सांगितलं,  “सूनबाईंची पहिली दिवाळी आहे… त्यांना आपण आणलेली भेट द्या  आणि व्याह्यांकडे फराळ पाठवाल तेव्हा यातल्या पणत्या पाठवा. सून बाई तुम्ही पसंत करून पाठवा.”तिने मानेनेच हो म्हंटले.
खरंच अशी पण दिवाळी असते हे बघून तिला खूप छान वाटत होते.वसुबारस, धनतेरस, काली चौदस, लक्ष्मीपूजन, पाडवा सर्व अगदी छान झाले. पहिली दिवाळी असल्यामुळे जावई तिकडे जायला हवा पाडव्याला. म्हणून दुपारहून ते तयारी करत होते. माहेर तसे जवळ होते. तरी देखील पूनमचा पाय निघत नव्हता.तिने सर्वांना आणलेली भेट दिली. मोठ्या माणसांना नमस्कार करतानाच प्रत्येक व्यक्तीसाठी आठवणीने आणलेली भेट देत होती.. अण्णांना खूप कौतुक वाटत होते तिचे.अण्णा सासूबाईंना म्हणाले, “सूनबाईंनी अगदी वाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जीव लावलाय.”

अण्णांना नमस्कार केला पण तिने त्याच्यासाठी आणलेले कंदिल, नवीन डिझाइनच्या पणत्या हे सर्व ते करत असलेल्या कामगिरीपुढे फिके होते.आता तिला भीती वाटत होती… अण्णा काय बोलतील?
पण तिने ठरवले, सर्व खरे बोलायचे. तिने अण्णांना सर्व सांगितलं, त्या वस्तू दाखवल्या आणि त्याचबरोबर तिने सर्वांसमोर सांगितल, “अण्णा मला माफ करा, मला यातले काहीच माहिती नव्हते म्हणून मी हे सर्व आणले, पण पुढच्या वर्षीपासुन हे कंदिल आणि पणत्या शहरात सर्वांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात मनोदिप वाढवणारी दिवाळी साजरी करायला मला जास्त आवडेल…!!”

याशिवाय मला एक कल्पना सुचली आहे. अण्णा खूप कौतुकाने सूनबाईंचे बोलणे ऐकत होते. ते म्हणाले बोला ना.पूनम म्हणाली, “मध्ये एकदा मी पेपरमध्ये वाचले होते एका ठिकाणी माणूसकीची भिंत बांधण्यात आली… आपण पण असे काही केले तर?”अण्णा म्हणाले म्हणजे?
पूनम म्हणाली, “अशी जागा जिथे आपल्याला नको आहेत अशा वस्तू पण चांगल्या स्थितीतल्या आपण ठेवायच्या म्हणजे ज्याला गरज असेल अशी कोणतीही गरीब व्यक्ती ती घेऊन जाऊ शकेल. तें नेहमीच उघडे राहील, त्याला दरवाजा, कुलूप काहीच लावायच नाही.”
अण्णांना खूप कौतुक वाटले पूनमचे !! त्यांचे डोळे भरून आले… आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे सूनबाई…!! असे ऐकताच तिला खूप आनंद झाला.. त्यांना नमस्कार करून ती बोलली, “तुमच्या कडूनच शिकले अण्णा… माझा खारीचा वाटा आहे हा.”

“तुम्ही दिवाळीची खूप छान भेट दिलीत आम्हाला…!!!” अण्णा म्हणाले. लवकरच आपण याचे उदघाटन तुमच्या हस्ते करू.
पूनमला सुद्धा खूप छान वाटत होते ही दिवाळी खरच मनोदिप वाढवणारी होती.
भाऊबीजेसाठी ती माहेरी गेली. पहिली दिवाळी म्हणून असल्यामुळे योग्य तो मान-पान झाला. तिचं मन मात्र वाड्यात अडकल होते.
अण्णांनी ती परत येईपर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे माणूसकीची भिंत उभी केली..
ती सासरी आल्यावर तिच्या हस्ते या भिंतीचे उद्घाटन केले. ही दिवाळी खरच आयुष्यभर मानवतेचा दीप तेवत ठेवणारी म्हणून लक्षात राहिली. पहिल्या-वहील्या दिवाळीच्या आठवणींचा मनोदीप मात्र नेहमीच तिला आनंद आणि एक वेगळेच समाधान देऊन जाते.
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी माझी लेखणी फेसबुक पेज फॉलो करा

1 thought on “पहिल्या-वहील्या दिवाळीच्या आठवणीचा मनोदीप….!!!”

Leave a Comment

error: Content is protected !!