©कांचन सातपुते ‘हिरण्या’
हुरहूर लावणारी संध्याकाळ खरी तर कातरवेळ. पण वैदेही साठी अशा कितीतरी कातरवेळांनंतर आजची संध्याकाळ उद्याच्या सुखाची चाहूल घेऊन आली होती. अनेक वर्षांपासून हे सगळं पाहत होता तिचा सुखदुःखातला सोबती गुलमोहर. हातातल्या डायरीला वैदेहीच्या आसवांचा अभिषेक झाला होता.
तिच्या मनातल्या सगळ्या शंका, भीती, एकटेपणा, सगळं सगळं वाहून चाललं होतं त्यात. वैदेहीचं मन १७-१८ वर्षं मागे धावत निघालं होतं. अन एकाक्षणी ते थांबलं.
भर उन्हात गुलमोहराखाली टिपरी पाणीचा खेळ रंगायचा. लंगडी घालताना वैदेहीचा तोल जाऊन तिचं पाऊल जमिनीवर टेकणार इतक्यात राघव तिला सावरायचा.
मग चिडलेली वृंदा आणि आदिनाथ रागानं आंब्याच्या झाडाकडे जायचे पण हिरमुसल्या वैदेहीला लांबून पाहून हातात चार पाच कैऱ्या घेऊन ती जोडगोळी परत हजर. आणि मग पुन्हा त्या गुलमोहराच्या सावलीतच त्यांची अंगत पंगत बसायची.
अल्लड अवखळ बालपण ते! तिथं वाईटाचा मागमूसही नव्हता. आईवडील शेतावर गेले की दिवसभर हि चौकडी अशीच खेळायला, हुंदडायला मोकळी.
संध्याकाळी दिवेलागणीला मात्र आईवडील घरी परतायच्या वेळी पोरं आपापल्या घरी पळायची.
वैदेही मोठी तर आदिनाथ धाकटा. त्यांच्या घराला लागून एका बाजूला राघवचं अन दुसरीकडे वृंदाचं घर होतं. खाऊन पिऊन सुखी अशी वारकरी पंथाची माणसं होते त्यांचे आईवडील. दमून भागून आल्यावर पोरांना चार घास खायला घालून त्यांना आंजारत गोंजारत शांत निजायची. रात्रीही या सगळ्यांचा राखणदारच व्हायचा तो गुलमोहर.
बघता बघता बालपण सरलं. मुलं वयात आली. मैत्री दिवसागणिक घट्ट होत होती तशा वाढत्या वयानुसार अजूनही काही भावना त्यांच्या मनात उमलायला लागल्या होत्या. वृंदाच्या मनात आदिनाथ बद्दल काहीतरी होतं तर राघव वैदेहीला त्याची जोडीदार म्हणून पाहू लागला होता. पण हे फक्त त्यांच्या मनातच होतं. गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. राघव आणि वैदेही चांगल्या गुणांनी बारावीची परीक्षा पास झाले आणि वृंदा आदिनाथ दहावीची.
वैदेही अन राघव दोघंच बसले होते गुलमोहराखाली. “वैदेही, दोन दिवसांनी मी मुंबईला जाणार दिनकर काकांकडे. बाबांचं तसं त्यांच्याशी बोलणं हि झालंय. ४-५ वर्षं तरी मला आता तिकडेच राहावं लागणार. तसा अधून मधून येत जाईन मी. पण आता रोजचं भेटणं नसणार आपलं. खूप आठवण येईन गं तुमची सगळ्यांची. रोज फोन करत जाईन मी. नाहीतर तू पण का नाही येत माझ्याबरोबर तिकडं शिकायला??”
वैदेही हसली, “आपण दोघेही तिकडं गेलो तर इकडे आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायला कोणी नको का रे? तसंही मी तालुक्याच्या ठिकाणी अंगणवाडी शिक्षिकेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलाय आता.”
अजून खूप काही बोलायचं होतं दोघांना पण उशीर झाला होता. राघवला सकाळी तालुक्याला जाऊन मग मुंबईची गाडी होती.
आईबाबांना नमस्कार करून आता राघव निघाला. अंगणात वैदेही, आदिनाथ, वृंदा आणि ‘गुलमोहर’ त्याची वाट पाहत होते. कोणी काहीच बोललं नाही. आदिनाथ राघवच्या वडिलांसोबत तालुक्यापर्यंत त्याला पोहचवायला जाणार होता. दिसेनासा होईपर्यंत पाठमोऱ्या राघवकडं वैदेही पाहत राहिली. मोठ्ठं वळण घेतलं होतं आयुष्याने.
काही वर्षांपूर्वी दिनकरराव गावावरून मुंबईला निघाले तेव्हा राघवच्या वडिलांनी त्यांना केलेली मदत ते विसरले नव्हते. मुंबईतील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांचं नाव होते. मैत्रीचा झरा मात्र अजूनही त्यांच्या मनात वाहता होता.
राघवच्या बाबांनी जेव्हा फोन करून त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी सांगितलं दिनकररावांनी, “त्याला लगेच पाठवून दे. पुढचं सगळं मी पाहतो.” असं म्हणून राघवच्या आईवडिलांची काळजीच मिटवली. अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवण्यापासून ते अगदी राघवला कुठं वसतिगृहात न ठेवता स्वतःच्या घरीच राहायला ठेवण्यापर्यंत सगळं स्वतःचं कर्तव्य समजूनच त्यांनी पार पाडलं.
दिनकररावांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात आणि मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी सुखात होती. भल्या मोठ्या बंगल्यात दिनकरराव आणि शारदाताई दोघेच नवरा बायको होते. राघवच्या येण्यामुळं पुन्हा एकदा घराला घरपण तर शारदाताईंना आईपण अनुभवायला मिळालं.
त्यांच्या प्रेमाच्या वागण्याने लाजरा बुजरा राघव आता त्यांच्या घरी आणि मुंबईत हि हळूहळू रुळत होता. त्याचं मन मात्र सारखं गावाकडं ओढ घ्यायचं. आईबाबा, आदिनाथ, वृंदा आणि गुलमोहराखाली उभी वैदेही त्याला सारखी डोळ्यासमोर दिसायची. पण आत्ता चांगलं शिक्षण घेतलं तर पुढं सुखाचा मार्ग आहे हे हि त्याला ठाऊक होतं. आता तो दिवस दिवस अभ्यास करायचा. गावाकडे घरी आणि वैदेहीला न चुकता फोन करायचा, अधून मधून आदिनाथशी बोलणं व्हायचं, सुट्टीमध्ये गावी यायचा.
वैदेही आणि वृंदा आता एकाच शाळेत शिक्षिका होत्या. तर आदिनाथने शेतीमध्येच पूर्ण लक्ष घातले होते. हा हा म्हणता ४ वर्षं सरली. राघवचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला.
पहिल्या पाच जणांच्या यादीत त्याचं नाव होतं. त्याने केलेल्या अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालं होतं. पण त्याचबरोबर दिनकरराव आणि शारदाताईंशिवाय त्यांचं हे यश अपूर्णच होतं. त्याने गावी फोनकरून हे सांगितल्यावर तिकडूनही आनंदाची बातमी कळली. आदिनाथ अन वृंदाचं लग्न होतं आठ दिवसांवर पण राघवच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून त्याला आधी कळवलं नव्हतं. शारदाताईंनी त्याच्याबरोबर सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्या,”पुढच्या वेळी आम्ही हि नक्की येऊ गावाला” असा निरोपही दिला.
वृंदा-आदिनाथचं लग्न अगदी जोरात पार पडलं. जिवाभावाची मैत्रीण आता वैदेहीची वहिनी म्हणून घरात आली होती. सगळं कसं अगदी मनासारखं घडत होतं.
राघवच्या आईवडिलांनी त्याला ,”आता पुढं काय करायचं ठरवलंस?” असं विचारलं तेव्हा, “काही दिवस दिनकर काकांच्या कंपनीत अनुभवासाठी काम करणार मग गावी येऊन काहीतरी सुरु करावं असं माझ्या मनात आहे, पण मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचीय .मी वैदेहीशिवाय दुसऱ्या कोणाचाच कधीच विचार केला नाही. तिच्या आईबाबांकडे तुम्ही बोलून बघा. फक्त त्यांना एक दीड वर्ष थांबायला सांगाल का?” त्याच्या आईवडिलांना तर वैदेही आधीपासूनच आवडत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच राघव आईबाबांसोबत वैदेहीच्या घरी आला. ती शाळेत गेली होती. तिच्या आईवडिलांकडे त्यांनी वैदेहीचा हात राघवसाठी मागितला. त्यांनाही खूप आनंद झाला. काही दिवस थांबायला ते आनंदाने तयार झाले. त्यांनाही मुलांचं सुखंच हवं होतं.
संध्याकाळी घरी आल्यावर वैदेहीला हि गोष्ट समजली तेव्हा तिने वरवर दखवलं नाही तरी तिच्या मनात चांदणं फुललं होतं. ती धावतच गुलमोहराला सांगायला आली तेव्हा राघव तिथे आधीच होता हे सांगायला नकोच! ते दोघं त्यादिवशी काही न बोलताही डोळ्यांनीच बरंच काही बोलले. राघव उद्या मुंबईला निघणार होता. पुन्हा एकदा वैदेहीला त्याला निरोप द्यायचा होता. पण आता हा विरह काही काळापुरताच आहे असं ती स्वतःला समजावत होती. राघव मुंबईला गेला पण यावेळी तिच्या मनाला हुरहूर लागली होती. का? ते तिलाही ठाऊक नव्हते. कारण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी दडलं होतं.
राघव दिनकररावांसोबत कारखान्यात जाऊ लागला. कामाचा अनुभव घेताना तो नवीन कल्पनाही सुचवू लागला.एक दिवस त्याने दिनकररावांना सांगितलं, “काका, माझ्या मनात आपल्या गावाकडंही असा एखादा कारखाना असावा असं आहे. गावाकडच्या तरुणांनाही नोकऱ्या मिळतील त्यामुळं” राघवच्या या विचारांचं दिनकररावांना खूप कौतुक अन अभिमान वाटला. त्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा होता.
पण त्यादिवशी अघटित घडलं. कारखान्यात काही तांत्रिक दुरुस्तीची कामे चालू होती. राघव तिथून जात असताना अचानक आगीचा लोळ निघाला आणि राघवच्या अंगावर आला.
काही क्षणात घडलेल्या या प्रकाराने दिनकरराव अन घाबरलेले कर्मचारी वेदनांनी विव्हळणाऱ्या राघवला घेऊन हॉस्पिटल ला गेले. शारदाताई नको म्हणत होत्या पण दिनकररावांनी राघवच्या आईवडिलांना ताबडतोब बोलवून घेतलं. आपल्या एकुलत्या एक मुलाला त्या अवस्थेत पाहून त्याच्या आईने तर आक्रोशच केला. डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली .
काही दिवसांनी राघव घरी आला. दिनकररावांनी तर त्याला फुलासारखं जपलं होतं. त्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग बराच भाजला होता. पुढील उपचारांसाठी दिनकरराव त्याला परदेशात घेऊन जाणार होते.
जवळजवळ दोन महिने झाले राघवचा एकही फोन नाही. त्याचे आईवडीलहि मुंबईला. वैदेहीला काहीच सुचत नव्हतं. शेवटी वृंदाने आदिनाथला मुंबईला जाऊन यायला सांगितलं. तिकडे गेल्यावर आदिनाथला झालेल्या प्रकाराने धक्काच बसला. राघवला भेटल्यावर तर तो डोळ्यातलं पाणी रोखू शकला नाही.
राघव ने एक निर्णय घेतला होता, “आदिनाथ मी अमेरिकेला चाललोय दिनकर काकांसोबत. कधी परत येईन मला माहित नाही. मला असं वाटतंय वैदेहीने माझ्यासाठी थांबू नये. माझ्या या जखमा पूर्ण बऱ्या होतील कि नाही सांगता येत नाही.” काळजावर दगड ठेवून तो हे सर्व बोलत होता. आई बाबांनाही, “काळजी करू नका. आदिनाथ आहे तुमची काळजी घ्यायला. मी नक्की परत येईन.”
आदिनाथ बरोबर आईवडिलांना कसंबसं समजावून गावी पाठवून दिलं. आदिनाथने खूप धैर्य एकवटून वैदेहीला सगळं सांगितलं. त्याक्षणाला वैदेही जणू पाषाण मूर्ती झाली. तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. राघवने आदिनाथकडून त्याच्या अपघाताबद्दल वैदेहीला काहीही न सांगण्याचं वचन घेतलं होतं. त्याला माहित होतं वैदेहीचं त्याच्यावर कित्ती प्रेम आहे. ती हे सहन करू शकणार नाही असे त्याला वाटले.
वैदेही सावरली खरी पण आता ती पहिल्यासारखी राहिली नव्हती. सकाळी लवकर शाळेत जाऊन मुलांना योगासनं शिकवायची, दिवसभर शाळेत अन संध्याकाळी गावातल्या मंदिरात संस्कारवर्ग. स्वतःला पूर्ण गुंतवून घेतलं होतं तिनं. घरी आल्यानंतरही एकटीच गुलमोहराजवळ जाऊन बसायची. त्याला विचारत रहायची, “का गेला रे राघव आपल्याला सोडून?”
जवळ जवळ दीड वर्षं लोटलं राघवच्या अपघाताला. त्याकाळात वैदेहीला बरीच स्थळं येऊन गेली. पण तिच्या मूक नकारामुळे घरातलेही आता तिला काही बोलत नव्हते. इतर कोणाशी नसला तरी आदिनाथशी राघव फोनवरून संपर्कात होता. वैदेहीच्या अवस्थेविषयी वेळोवेळी तो राघवला सांगत होता. अमेरिकेत उपचार घेऊन राघवच्या चेहऱ्यावरच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या व त्याचा चेहरा आता बऱ्यापैकी पूर्ववत झाला होता. पण त्याचंच मन आता त्याला खात होतं. वैदेहीला तो समजू शकला नाही. ती अजूनही तिकडं त्याची वाट पहात होती.
आज सकाळी अचानक वैदेहीच्या नावाने एक पार्सल आलं होतं. त्यात एक डायरी होती. त्यावर राघवचं नाव होतं. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. इतक्यात आदिनाथ आला. “फक्त एकदा ते वाच, तुझा सगळा गैरसमज दूर होईल.” ती दुपारीच शाळेतून घरी आली. डायरी घेऊन गुलमोहराखाली बसली. जशी जशी एक एक पान वाचत होती तसा तसा तिला राघव आल्याचा भास होत होता.
डायरीतली शेवटची ओळ होती ‘आपली भेट पुन्हा या गुलमोहराखालीच व्हायची होती वैदेही, फक्त ती निश्चित वेळ यायची होती.’
एकटक मावळतीकडं जात असलेल्या वैदेहीला शेजारी कोणीतरी येऊन बसलंय हे कळलं हि नाही. तिने मान वळवली. तिचा राघव होता तो. ‘वैदेहीचा राघव!’ “हेच ओळखलं होतंस का राघव तू माझ्या प्रेमाला.” त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेली वैदेही त्याला विचारत होती.
आयुष्याच्या वैशाख वणव्यात होरपळलेल्या त्या वैदेही राघववर तो गुलमोहर वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर त्याच्या लालबुंद पाकळ्यांची अक्षतफुलं उधळत होता!
समाप्त
***********
©कांचन सातपुते ‘हिरण्या’
सदर कथा लेखिका कांचन सातपुते (हिरण्या) यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.