बोनस

© धनश्री दाबके
कुलकर्ण्यांकडे गेला आठवडाभर लग्नाची धामधूम सुरु होती. आदित्यचं, म्हणजे सरु आणि विनयच्या एकुलत्या एक मुलाचं, लग्न होतं. सरुच्या दोन्ही भावजया मदतीला पंधरा दिवस आधीच आलेल्या होत्या. 
आदित्य आणि शिल्पाचा जोडा अगदी एकमेकांना अनुरुप होता. शिल्पा बरोबर भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मनापासून रंगलेल्या आदित्यला पाहिले की सरुला खूप भरुन यायचे. आदित्यला असा बोहल्यावर चढतांना पाहायला मिळतंय ह्यासाठी ती मनोमन देवाचे सारखे आभार मानायची. 
तिच्या या मनस्थितीची व हळवेपणाची विनयला पुरेपुर कल्पना होती. तिचं स्वतःला विसरुन आदित्यच्या लग्नाची तयारी करणं त्याला सुखावायचंही आणि काळजीतही टाकायचं.

म्हणूनच त्याने आदित्यच्या लग्नाची तारीख पक्की केल्यापासूनच सरुच्या वहिन्यांना आधीपासून मदतीला पाठवा असं दोन्ही मेव्हण्यांना सांगून ठेवलं होतं आणि त्याही दोघी आनंदाने त्यासाठी तयार झाल्या होत्या. तरीही विनय डोळ्यात तेल घालून सरुची काळजी घेत होता. तिला सक्तीने विश्रांती घ्यायला लावत होता. गेल्या एक दोन महिन्यांपासूनच खरेदी, निमंत्रणे, केळवणं सुरु होती.ह्या आठवड्यात व्याहीभोजन, मेंदी, हळद, ग्रहमख सगळं अगदी साग्रसंगीत आणि उत्साहात पार पडलं आणि लग्नाचा दिवस आता उद्यावर येऊन ठेपला.
शिल्पा त्याच शहरातली असल्याने लग्नाचा हॉल घरापासून जवळच होता. पहाटे उठून सगळी मंडळी तयार झाली.

निळ्या रंगाची भरजरी चेन्नई सिल्क, हातात पाटल्या, बांगड्या, जुन्या स्टाईलचे घसघशीत तोडे, गळ्यात गोठ व लग्नासाठी खास बनवून घेतलेला बकुळी हार घालून खांद्यापर्यंतचे केस आज फ्रेंच रोलमधे बांधलेली सरु वरमाईच्या विशेष थाटात अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. 
ती, विनय आणि आदित्य आधी देवाच्या पाया पडले आणि मग काकूंच्या. काकूंच्या हार घातलेल्या हसऱ्या फोटोसमोर सरु थांबली. तिच्या मनात विचारांची गर्दी जमली. 
काकू आज तुमच्यामुळे मला हा आनंदाचा दिवस दिसतोय. तुमच्या भक्कम आधारामुळे मी इतक्या मोठ्या जीवघेण्या दुखण्यातून बाहेर पडले.

तुम्ही नसतात तर मी आदित्यचं लग्नच काय पण कदाचित मुंजही पाहू शकले नसते. पण तुम्ही भेटलात आणि आम्ही ती कठीण परिस्थिती निभावून नेऊ शकलो.
भरुन आलेले डोळे पुसून सरु गाडीत जाऊन बसली आणि तिचे मन तिला २५ वर्ष मागे घेऊन गेले.
विनय अगदी छोट्या गावातल्या गरीब आईवडलांचा थोरला लेक. वडलांनी कसाबसा त्याला बारावी पर्यंत शिकवला आणि विनयच्या आजोबांच्या मित्राच्या मुंबईत राहाणाऱ्या मुलाकडे म्हणजे काकांकडे विनयसाठी गळ घातली. 

काकाही त्याच गावातून अनेक वर्षांपूर्वी धडपड करुन नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेले आणि दिवसरात्र कष्ट करत गरीबीतून वर येत आता मुंबईत सेटल झालेले. विनयमधे काकांनी स्वतःलाच पाहिले आणि त्याला आपल्याकडे आणला.  सुरवातीला शहरातल्या राहाणीमानाला बुजलेला विनय हळूहळू इथल्या भरधाव जीवनाला सरावला. काकांनी त्याच्यासाठी एका  लहानशा फर्ममधे शब्द टाकला आणि विनयची नोकरी सुरु झाली. 

पण फक्त बारावीपर्यंतच्या शिक्षणावर इथे तग धरता नाही येणार हे ओळखून विनयने नोकरी करता करता अभ्यास सुरु केला. खूप मेहेनत घेऊन नोकरी सांभाळून त्याने पदवी मिळवली.
काका काकू दोघांनीही विनयला जीव लावला. 
त्याचे गुण ओळखून त्याला सतत पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. पदवी घेतल्यावर मात्र विनयने मागे वळून पाहिले नाही.

काकांच्या घराजवळच त्याने एक लहानसा फ्लॅट भाड्याने घेतला. आईने मग विनयच्या मागे लग्नाचा तगादा लावला आणि विनयचे त्याच्याच गावातल्या सरुशी लग्न झाले.
सरु स्वभावाने खूप लाघवी असल्याने पटकन तिने काका काकूंना आपलेसे केले.त्यांनी विनयला केलेल्या मदतीची जाण तिने ठेवली. इथे शहरी जीवनात रुळतांना, नविन संसार मांडताना सरुला काकूंची खूप मदत झाली. 
काकू फारशा शिकलेल्या नव्हत्या पण घर सांभाळण्यात आणि व्यवहारात मात्र हुशार होत्या. त्यांच्या हाताखाली सरु चांगलीच तयार झाली. 

वर्षभरात सरुला आदित्यच्या आगमनाची चाहूल लागली. घरात आनंद पसरला. काकूंनी गर्भारपणात सरुला खूप जपले. आईच्या मायेने तिचे डोहाळे पुरवले. 
बघता बघता काळ सरकला आणि आदित्यच्या बाललीला घरात सुरु झाल्या. आदित्य दोन अडीच वर्षांचा झाला. एक दिवस आंघोळ करतांना सरुला तिच्या डाव्या स्तनात थोडा ताठरपणा जाणवला. आधी तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
पण थोड्या दिवसांत तिला हाताला एक छोटी गाठ लागली. मग मात्र सरु घाबरली. तिने लगेच ती गाठ डॉक्टर मॅडमना दाखविली. सुरवातीला मॅडमनी औषधांचा काही उपयोग होतोय का ते पाहिले पण त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी सरुला स्पेशालिस्टकडे पाठवले आणि एक दुष्टचक्र सुरु झाले.

विविध प्रकारच्या टेस्ट झाल्या. बायोप्सी केली गेली आणि ज्या निष्कर्षाला मन घाबरत होते तोच खरा ठरला. सरुला पहिल्या स्टेजचा कॅन्सर डीटेक्ट झाला.
सरु आणि विनय मुळापासून हादरले. आता कसं होणार, काय होणार ह्या विचारांनी दोघं हवालदिल झाले. 
लहानग्या आदित्यकडे बघून तर दोघांचाही धीर सुटला. डॉक्टरांनी विनयला आणि सरुला ही जस्ट सुरुवात आहे, सरु पूर्ण बरी होऊ शकते फक्त तुम्ही मनाने खंबीर राहा असं खूप समजावले.
डॉक्टरांकडून दोघं थेट काका काकूंकडे गेले आणि सरुचं इतक्या वेळ कसंबसं धरुन ठेवलेलं उसनं अवसान गळून पडलं. 

काकूंच्या गळ्यात पडून सरु खूप रडली. तिची ही अवस्था पाहून सगळेच खूप अस्वस्थ झाले पण नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही. 
जे समोर मांडलेले असेल त्याला तोंड देत राहाणे हाच एक पर्याय आपल्या हातात उरतो. 
आपल्या आईला रडतांना पाहून भेदरलेला लहानगा आदित्यही रडायला लागला. आता आपणही जर धीर सोडला तर सरु अजूनच कोसळेल हे ओळखून काकूंनी सरुचे डोळे पुसले.
ह्या छोट्या आदित्यकडे बघ. तुला ह्याच्यासाठी बरं व्हायचंय. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला न घाबरता सामोरं जायचंय. आम्ही दोघं आहोतच. तुम्ही फक्त ट्रीटमेंटकडे लक्ष द्या. 

आदित्यला सांभाळायची जबाबदारी आता माझी असा धीर काकूंनी दिला आणि सरुची लढाई सुरु झाली.
औषधपाणी, ऑपरेशन, केमोथेरपी, त्यासाठी सारखं सारखं दवाखान्यात भरती होणं, केमोमुळे होणारी केसगळती, खाण्यापिण्याची पथ्ये ही सगळी साखळी सरुने निर्धाराने पार केली. 
शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत सरु आणि विनयचा कस लागत होता.
इतकी महागडी ट्रीटमेंट विनयच्या सेविग्जमधून होणं शक्यच नव्हतं. काका आणि इतर नातेवाईकांकडून मदत घेऊन, कर्ज घेऊन, ओव्हरटाईम करुन विनयने कसबसे पैसे उभे केले.

पण नशीबाचा फेरा अजून पूर्ण झाला नव्हता. ह्या सगळ्यातून जरा सावरतेय असं वाटेपर्यंत सरुला परत त्याच स्तनात दुसरी गाठ आली. मग मात्र डॉक्टरांनी breast amputation चा निर्णय घेतला आणि सरु मनाने पार खचली. 
मी काही ह्यातून आता वाचणार नाही असा विचार तिच्या मनात रुतला. मला आता परत ही ट्रीटमेंट आणि इतका खर्च नकोय. माझं जे काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे एकदाचं असा तिने आग्रह धरला. 
तिच्या या हतबलतेच्या हट्टाने विनय अजूनच खचला.

पण काकू मात्र ठामपणे दोघांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. काकूंनी कधी प्रेमाने, कधी रागाने तर कधी कायमस्वरूपी न बोलण्याची धमकी देत सरुला ट्रीटमेंटसाठी तयार केले आणि परत एकदा सरुने अतिशय कठीण उपचारांची साखळी पूर्ण केली. 
नशीबाने विनयचे बॉस खूप चांगले होते. त्यांनी कंपनीच्या नियमांनुसार शक्य तेवढी आर्थिक मदत तर केलीच पण त्या व्यतिरिक्त स्वतःच्या खिशातूनही सढळपणे मदत करुन विनयची ही कठीण वेळ सावरली.
Breast amputation नंतर गेलेला आत्मविश्वास मोठ्या प्रयत्नांनी सरुने परत मिळवला आणि नॉर्मल आयुष्य जगू लागली.

पण तरीही आता आपण पूर्ण बरे झालो आहोत का?  हा जीवघेणा आजार परत डोकं वर काढेल का? अशी सततची टांगती तलवार सरुच्या मनावर होतीच. 
कॅन्सरमधुन बरी झाले तरी माझे आयुष्य फार नसणार असं वाटत राहिल्याने सरु त्यानंतरची सगळी वर्ष आलेला प्रत्येक दिवस बोनस मानूनच जगत राहिली. 
स्वतःच्या पथ्यपाण्याची आणि तब्येतीची काळजी घेत सरुने विनयची सोबत आणि आदित्यचे मोठे होणे अगदी मनापासून भरभरून अनुभवले.
कॅन्सरला निर्धाराने हरवून आनंदाने जगणाऱ्या सरुच्या धीरासाठी सगळे जण तिचे नेहमी कौतुक करत असत. तिची पाठ थोपटत असत. 

पण सरु मात्र त्याचे पूर्ण क्रेडीट तिच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या काकूंना आणि काकूंसारख्या खंबीर माऊलीला तिच्या जीवनात स्थान देणाऱ्या ईश्वराला देत असे.
या आठवणींच्या आवर्तनात आपण हॉलवर कधी पोहोचलो ते सरुला समजलेच नाही. तिचा रडवेला चेहरा पाहून आदित्य म्हणाला ” आई, रिलॅक्स. मी सासरी नाही चाललोय. शिल्पा आपल्याकडे येणारे. तिचा रडण्याचा कोटाही तूच पूर्ण करणार आहेस का?”
आदित्यच्या बोलण्यामुळे सगळ्यांमधे हशा पिकला. हसत हसत सरु गाडीतून उतरली आणि आपल्या लेकाच्या लग्नाचा बार उडवायला सज्ज झाली.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार

Leave a Comment

error: Content is protected !!