जाणीव

© वैशाली देवरे
“अगं ये रिना बाहेर ये गं..”
तशी रिना बाहेर आली..चेहेऱ्यावर जरा नाराजी जाणवत होती.काय करेल तीही कालपर्यंत नणंदा व भाचरांनी भरलेले घर अचानक रिकामं झालं होतं. त्यांच्या आदर सत्कारात व नणंदाच्या सोबत मज्जा मस्तीत दिवस कसे संपले कळलच नाही तिला..पण आता शांत घरात मनातली खंत व तो एकांकीपणा जाणवू लागला होता. सासुबाईंच्या लक्षात ही गोष्ट आली होती म्हणूनच त्यांनी तिला बाहेर बोलावलं होतं.
“काय हो आई …काही काम आहे का??”

“नाही गं ..म्हटल एकटीच बसली आहेस त्यापेक्षा आमच्या सोबत गप्पा मार जरा “
जरा चेहेऱ्यावर आनंदाचा भाव आणत ती शांत बसली ..पण मन मात्र माहेरी रेगांळत होतं तिचं.. आईची व तिच्या प्रत्येक गोष्टीची आठवण येत होती.
“काय गं रिना काही झालं का?”
सासुबाईंनी विचारलं तिने फक्त मानेनेच नकार दिला. पण त्यांना तिच्या भरल्या डोळ्यांनी तिच्या त्या वेदनेची व भावनांची जाणिव झालेली होतीच…शेवटी बाईच मन बाई नाही समजणार तर कोण बर समजेल…

सासुबाई उठल्या व तिच्याजवळ गेल्या इतक्या वेळ दाबुन ठेवलेला हुदका अचानक उसळी घेत …घळाघळा पापण्यांचा तट तोडून वाहु लागला होता…
“आई~~~~~”अशी आर्त हाक तिने दिली होती.
ती आई नसली तरी ह्या ‘आई’च्या काळजाच्या आरपार त्या हाकेने कब्जा केला होता.
“रड बेटा रड …हो मोकळी …मला वाटलच होत गं …हसरी खेळती परी अशी अचानक का गुमसुन झाली. बाबा म्हटलेच बघं…एकटी रडत तर नाही बसली ना हि रीनू..”

“हो आई ….आठवण येतेय हो मला खुपच आईची..”
रिनाचे शब्द फुटत नव्हते पण भावनांचा व अश्रूंचा पुर धो -धो वाहत होता …सासुबाईच्या मांडीवर डोकं ठेवून तिने अश्रूचा पुर वाहिला होता..
“पोरी शांत हो गं…मी आहे ना तुझी आई…शांत हो बेटा..”
गहिवरलेली रिना थांबता थांबत नव्हती…
“पोरी आई ती आई गं…नाही होऊ शकत तुझी आई पण प्रयत्न तर करेल गं…”

रिनाने सासुबाईला कवटाळलं…”आई~~~”
“हो मग तु नाही का झालीस माझी मुलगी …”
रिनाला जरा हायस वाटलं…
“रिना दर दिवाळीत बघते मी तुला …लग्न झाल्यापासून आनंदाने सगळी तयारी करते.घर आवरणं ,रोषणाई, नितुच्या आवडीच सगळच बनवते.मेघराजही येतो दिवाळीत तु त्याचही सगळं करतेस राणी. त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडू तु कधी बनवले नव्हते तरी खास शिकलीस. नितुसाठी कडबोळे शिकलीस. खास माझ्या साऱ्या संस्कारांना आपलसं केलंस बघ.माझ्या हाताची चव ही खास करून मुलांना आवडायची पण मला सांधीवाताचा त्रास सुरू झाला व तु हक्काने घरदार व सगळ्या जबाबदाऱ्यांना

 आपलस केलसं गं.कधी मुलीचा हेवा नाही केलास. मेघराजला कधी जबाबदारीच्या तराजूत नाही तोललंस. आजवर आम्हा दोघांची आजारपणं एकटीने पार पाडलीस पण चेहेऱ्यावर कधी दाखवलं नाहिस बघं.. न कधी मेघराज व त्याच्या बायकोकडून अपेक्षा केली …पण सणावाराला सारा परिवार एकत्र आणण्यासाठी झटलीस गं…”
“आई..”
रिना बोलू लागली तस सासुबाईंनी थांबवलं..
“बोलू दे मला, ….पोरी तु गृहलक्ष्मी बनुन आलीस तुझ्या आईचे छान संस्कार घेऊन …तुझ वागणं बघितलं कि वाटतं किती धन्य असेल ती माउली जीने ह्या पोरीला परिपूर्ण घडवलं. आपल्या घराच गोकुळ तुझ्यामुळेच झालंय गं रिनू..”


बोलता बोलता त्यांच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या …तोवर सूर्यास्त झाला होता. घरात सार शांत झालं होतं ..मुलं काका सोबत दोन दिवस गेली होती. सकाळचा स्वयंपाक भरपूर पडला होता.
दोघीही मोकळ्या झाल्या दोन घास कसेतरी खाऊन. सासुबाई रिनाजवळ किचनमध्ये आल्या.
“रिना बेटा झोपायच्या आधी ती तेलाची वाटी गरम करून माझ्या खोलीत ये गं..”
“हो आई ..”  म्हणतं तिने पटपट कामे आवरली व ती सासुबाईंच्या खोलीत गेली.
“आई चला तेल लावू ना डोक्याला..”

“हो बेटा पण माझ्या नाही गं तुझ्या डोक्याला लावायचं..ती चटई घे बस खाली मी बसते बेडवर.”
“आई, काय हे…राहु देत …मी लावते माझी माझी…”
“अगं बस गं मी एकलयं तुझं बोलणं नितुसोबतच परवा…पण थोडस आवघडली होती गं…कसं तुझ्या आईची जागा घेणार मी पण प्रयत्न करते. जरा मलाही बर वाटेल व तुलाही.  ह्यावेळच तुझ माहेरपण व आईपण मी पूर्ण करेल. सुरवात थोडी उशिरा का असेना..”
रिनाच्या चेहेरा खुलला होता …तिने पटदिशी चटई टाकली व तेलाची वाटी सासुआईच्या हातात दिली…

खरंतर त्यांनाही जाणिव झाली होतीच ना. आपल्या मुलीला ह्या चार दिवसात आईहूनही जास्त माया  रिनानेच तर लावली होती.
नितु आईला म्हणालीही होती, “आई किती गं ग्रेट वहिनीची आई. वहिनीनेही तशीच मालिश केली. इतकी शांतता लाभली म्हणुन सांगू. वर्षभराचा सगळा थकवा गेला बघ.व आई वहिनी ह्यावर्षी येथेच होती म्हणून तुला काही करायची गरजच पडली नाही बघं. मनसोक्त माझं माहेरपण जपलं तिने.  आई आजून हवी होती गं तिला ..लाडकी लेक होती ना गं तिची..”.

सासुआईने ,हातात तेलाची वाटी घेतली,”रिनू तुझ्या आईसारखी नाही करू शकणार माँलिश पण करते हं बेटा ..”
रिनाचे डोळे भरून आले ,”आई तुम्ही येवढ करता तेच खुप आहे माझ्यासाठी..”
सासुबाईंनी डोक्याची माँलिश सुरू केली ..रिनाला जणु आईचाच हात डोक्यावरून फिरतो कि काय असा भास होत होता.सासुचा कजाग हात मायेने,ममतेने व जाणिवेने तिच्या केसा केसातुन फिरत होता ..डोक्यातील विचारांचे चक्र शांत होत होते.भावनांनी व विचारांनी जड झालेला मेंदू तेलाने,मायेच्या हाताने जरा शांत झोप घेऊ लागला होता. सोबत आईच्या आठवणींचे गाठोडे ती सासूबाईंपुढे सोडत होती. त्यामुळे आईचे पैलू सासुबाईंना कळत होते.

आईच गुणगाणं करत डोक्यात मुरणार्या तेलागत सासु सुनेच्या नात्याची वेगळीच विण नात्यात मुरत होती. बोलता बोलताच ती सासुबाईंच्या मांडींवर झोपी गेली.
डोक्यावर होत फिरवत त्याही म्हणाल्या,” पोरी जपलेल्या तुझ्या भावनांची तर जाणिव झाली गं मला ..लाडकी तुही लेक त्या माउलीची…पण आज ती संपली आणि तुझं माहेर संपलं गं. पण तरी  तु  ह्या घरी आनंद फुलवलास. आईच्या जाण्याचं इतकं कठिण दुःख ह्या आनंदाच्या क्षणी किती दाबलस गं तु. न हु का चु करत परिवारासाठी डोळ्याआड केलस सारं. पण तुझ्या दु:खाने नाही पाडलसं कोणाच्या आनंदात विरजण …उलट तु माझी जागा घेतलीस.नितुचं माहेरपण तुला करतांना बघून वाटलं देवा आताही उचललं तरी मी सुखाने येईल बघं तुझ्याबरोबर….कारण माझी गृहलक्ष्मी मला मिळाली …प्रेमळ,माझी सावलीच जणु गुणाची खाण अशी…”

शांत असा रिनाचा चेहेरा बघून त्यांनाही बर वाटलं पण …तिच्या माहेरपणाची कमी कशी भरणार होत्या त्या…कितीही केलं तर भावाची ती हलकी का असेना साडी बाईला जिवापाड प्रिय असते हे कस बरं सागणार होत्या त्या रिनाच्या भावाला…आईनंतर इतक्या गुणवान बहिणीला कस बर विसरला असेल तो भाऊ? त्याही चिंतेतच होत्या पण बदलती मानसिकता डोळ्यासमोर येत होती. एका हाताची बोटे सारखी नसतात तसंच  या दोघांच असावं म्हणतं त्यांनी हळूच चटईवर ऊशी ठेवत रिनाला आडवं केलं. आपली शाल आंगावर घातली…मायेच्या उबेने व समाधानाने ती झोपी गेलेली होती.

जाग आली तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता.सासुबाईंच्या रूममध्ये चटईवर झोपलेली रिना लगबगिने बाहेर आली …तर नविन सरप्राईज तिच्यासाठी समोर होतं. सासुबाई किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या व निल बॅगा भरण्यात व्यस्त होता.  रिना जरा आवघडलीच होती.पण सासुबाई म्हणाल्या,”तुझा गाढ डोळा लागला होता बघ. आज माणसेही कमीच होती …म्हटलं ह्या आठ दिवसात खुपच थकलीस तु …मग जरा पडू द्यावं…आणि आवर लवकर. निल आणि तु दोन दिवस फिरून या बरं!…हे  तुझ्या नविन आई वडिलांकडून तुला माहेरपण”

रिना आनंदातच आवरायला गेली.  तिने केलेल्या गोष्टींची,  तिच्या संस्कारांची जाण कोणी नाही पण तिच्या माणसांनी घेतली हे काय कमी होत तिला.
तिने हात जोडले व म्हणाली,”आई तु आजूनही आहेस गं जवळ आणि नको काळजी करूस माहेर मिळालं हं तुझ्या परिला …सुखात आहे त… तु निश्चिंत रहा.”
खरंच आईवडिल गेल्यावर पारखं होणारं माहेर व न स्विकारणारं सासर स्त्रीला आतुन पोखरून टाकतं पण जर तिच्या जाणिवेची दखल घेतली गेली तर घराघरात तिला जो आनंद मिळेल तो आतुलनियच नाही का???…सासरी जर माहेरपण होत असेल तर तीलाही त्या बदललेल्या नात्यांची चिंता थोडीच सतावेल बरं. ती खुश असली तर घर खुश…मग का तिच्याच घरात तिला माहेरपणाची कमी भासावी?? जर घरीच माहेरपण लाभलं तर तीला होणारा आनंद किती बर गोड असेल…कल्पनेनेच मन फुललेना सगळ्यांचे….चला तर जाणिवेने बदलूया व सुनेला माहेरपणाची उब देऊया…!!!
© वैशाली देवरे
सदर कथा लेखिका वैशाली देवरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!