©शुभांगी मस्के
“घर की मुर्गी दाल बराबर”.. म्हणतात ते काही खोटं नाही. आपलं घरातलं महत्व इतरांना दाखवून देण्यासाठी, तरी निदान कधीतरी आजारी पडावं, असं वाटतं का हो तुम्हाला?
आणि मग फणफणलेल्या तापामध्ये, झोपून रहा.. आम्ही आमचं बघतो, असा आग्रह धरत असताना, जड पडलेलं डोकं, अंगातली कणकण, तोंडाची गेलेली चव.. मग वाटतं दहा काम परवडली, पण हा आराम नको.
तुमच्या बाबतीत ही झालं असेल ना असं कधीतरी?
कथेतली रिया ही तशीच बरं का… चला तर मग भेटूयात रियाला..
रिया मँडम! दुपारचं जेवण झाल्यानंतर छान झोपेत गुडूप झाल्या होत्या.
“अगं रिया, दोन वाजलेत, ठाकतील.” घरातली आवराआवर करताना, पडदे, सोफे कव्हर झटकता झटकता, रियाच्या आईची बडबड सुरु होती..
“आई काय गं हे! छान झोपतेय, पण तुला नाही ना बघवत.. झोपेतून उठवणं म्हणजे पाप गं पाप”, डोळे मिचमिचत रिया बोलली.।सुट्टीच्या दिवशी दिवसभर, छान… निवांत झोपता यायला हवं… सकाळी उशिरा उठता यायला हवं.. माहेर कसं का असेना, सासुरवाडी अशी माझ्या मनासारखी माझ्या झोपेवर प्रेम करणारी, मिळू दे रे देवा.”
अंगावरचं पांघरुण बाजूला सारून, रिया जांभया देत उठली.
आत्ता तुम्हाला कळलचं असेलच की रियाला बघायला मुलगा आणि मुलाकडेचे पाहूणे येणार आहेत ते..
चहापोह्याच्या कार्यक्रमाचं फलितच झालं म्हणायचं.. बघायला आलेल्या नितीशने, बघता क्षणी रियाला पसंत केलं…
एकुलता एक मुलगा होता, बहिणी आपआपल्या घरी सुखी होत्या.. घरदार चांगलचं होत, धुमधडाक्यात रिया नितीशचं लग्न झालं आणि रियाने सासरचा उंबरठा ओलांडला.
घरात सासू सासरे, रिया नितीश.. येणारे जाणारे असायचे, सासूबाई असल्यामुळे, फार काही भार रियावर पडत नव्हता.
चूलबूली रिया जशी माहेरी सर्वांची लाडकी होती तशी सासरी सर्वांची लाडकी झाली. लग्नाआधी नोकरी करायची. तिथेच कन्टिन्यु करायचं रियाने ठरवलं. सासरीही कुणाची ना नव्हतीच.
तसं सगळचं बरं चाललं होतं, आणि चार सहा महिन्यात रियाला बाळाची चाहूल लागली..
दोन जुळी बाळ, पोटात वाढतायतं कळल्यावर घरातले सगळेच खूप पझेसिव्ह झाले. काळजी घ्यायला हवी ह्या हेतूने… काळाची गरज म्हणून की काय, सर्वांनी रियाला फोर्सफुली नोकरी सोडायला भाग पाडलं.
सासूबाई छान काळजी घेत होत्याच, तिचे डोहाळे ही आवडीने पुरवित होत्या.. उशिरा उठणे, थोडी थोडकी आपली काम आटोपली,की नंतर हक्काची झोप.. बेड रेस्टच्या नावावर, दिवस रात्र.. घोडे विकून झोपण्यालं सुखं कुणाच्या ही आडकाठी शिवायं अनुभवता येवू लागलं होतं..
तस सगळचं बरं चाललं होतं. आठव्या महिन्यात जरासे कॉम्पलिकेशन्स आले आणि रियाचं धाबं दणाणलं.
खरं तर झोपेवर नितांत प्रेम असलेल्या रियाची आता मात्र झोप उडाली.
बाळांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं लागत होतं.. रियाही सतत झोपून झोपून कंटाळली होती.. आता रिया बाळांची आतुरतेने वाट बघू लागली, कधी एकदा बाळांना कुशीत घेते, त्यांना दोन हातांच्या झोपाळ्यात जोजवते असं रियाला झालं होतं.।
कोडकौतुकात, थोड्या खट्ट्या मिठ्ठ्या अनुभवात नऊ महिने सरले आणि रियाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. पर्णवी आणि गौरवी..
बाळंतपणानंतरचे, सुरवातीचे दिवस म्हणजे खरी कसोटी होती. सासूबाईं, रीयाची आई, नणंदा, घरातल्या सर्वांनीच बाळांबरोबर बाळंतीणीची ही तेवढीच काळजी घेतली.
रियाच्या खाण्यापिण्याकडे सर्व जातीने लक्ष देत होते, तिला जास्तीत जास्त आराम मिळवून देण्यासाठी, आपआपल्या परीने सगळेच प्रयत्नशील होते.
एकीची सु .. दुसरीची शी.. एकीचं खाणपिण करता करता दुसरीची झोपेची तर दुसरीची उठण्याची तर पहलीची खाण्यापिण्याची वेळ व्हायची..
कधी दोघी ही विनाकारणचं.. पाठोपाठ रडायला लागायच्या. एकाच वेळी दोघीही, निवांत झोपल्यात असे क्षण तसे पाहाता वाट्याला कमीच यायचे. कितीही नाही म्हटलं तरी परिणाम रियावर व्हायचा.
लेकींच्या वेळा सांभाळता सांभाळता, दुपारची काय पण, रात्रीची झोपही आता दुरापास्त झाली होती..
चार सहा महिने झाले, हळूहळू दोघींचा सगळाच भार रियावर आला.. “झोपायला मिळतयं तर झोपा गं बाळ्यांनो”, “तुम्ही ही झोपा आणि मलाही झोपू द्या”. “झोपेएवढं सुख नाही ह्या जगात”, पाळण्यात जोजवताना रिया स्वत:च पुटपुटायची.
आई झोपेतून उठवायची तेव्हा कित्ती जोरात चिडायचे तिच्यावर तेव्हा आई म्हणायची.. लेकरंबाळ झाल्यावर असचं झोपेवरचं प्रेम अबाधित ठेवता आलं तर बघ, तुझी लेकरं तुला झोपेतून उठवतील तेव्हा, अशीच चिडचिड कर हो लेकरांवर…
आता, रियाला आईचं बोलणं आठवायचं.
नितिश ऑफिसचं कारण सांगून, आजीआजोबा ह्या वयात जागरण सोसत नाही ह्या कारणाने, जागरण टाळायचे.. खरचं आई होण सोप्प नसतचं ह्याची जाणिव तिला व्हायची..
पर्णवी आणि गौरवी मोठ्या होत होत्या.. हळूहळू शाळेत जायला लागल्या.
मुलींच्या शाळा, अभ्यास, स्कूल अँक्टिव्हीटीज, खेळ, त्यांच खाणपिण, नव-याचं ऑफिस.. आले गेले, घरकाम, सन समारंभ त्यातल्या त्यात सासूसास-यांची दुखणीखुपणी, दवाखाना, औषधपाणी, ह्यात रिया एवढी गुरफटली की नोकरीसाठी कधी वेळच काढू शकली नाही.
घर एके घर! हे एकचं समिकरण झालं होतं आता रियासाठी.
एरवी, घरात जीव ओतणाारी रिया, आज शांत पांघरुण घेवून निवांत झोपलेली होती. रोज दरवाजा उघडणा-या आईला असं झोपलेलं पाहून, आई! आई! हाका देत, दोघीही बेडरुममध्ये शिरल्या.
पर्णवीने आईच्या अंगावरचं, हळूच पांघरुण काढलं. तशी रिया जोरात चिडली.
“जरा डोळा लागला की तुमचं चालू होतं.. दिवसभर काम करुन अंगाची हाड तुटायची वेळ आलीय… थोडा वेळ पडले तर तुम्हाला नाही ना बघवत.
आई आई आई.. कशी ग चैन नाही पडतं तुम्हाला माझ्याशिवाय.. आठवीतल्या पोरी तुम्ही, लहान आहात का आत्ता.
अंगअंग दुखतय, डोकं तडतडतयं, रियाच्या डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली… रिया डोकं बांधुन झोपली होती..
आईला असं अवेळी झोपलेलं कधीच बघितलं नव्हतं, पर्णवी आणि गौरवीला कळेचना, काय झालं? दोघी ही एकमेकींच्या तोंडाकडे अपराधिक नजरेने बघू लागल्या..
गोळी खाललीस का? गरम पाण्याची पिशवी? वैगेरे वगैरे, क्रोसिन घेतलीय मी, लेकींची प्रश्नोत्तरी सुरु झाली, तशी ती पुन्हा चिडली, निवांत पडू द्या थोडं, उपकार होतील…
रियाचे कटू शब्द लेकिंच्या जिव्हारी लागले. Sorry आई, तू झोप.. पर्णवीने रियाच्या अंगावर पांघरुन सरकवलं… रुमबाहेर जाताना, दोघींनी बेडरुमचा दरवाजा हळूच बंद केला.
“काय गं काय झालं? कशाला चिडली तुमची आई? मार्क बिर्क कमी मिळालेत की काय?” सोफ्यात वाती वळत असलेली आजी पुटपुटली.
आजीच्या बोलण्यावर, काहीच न बोलता दोघीही आपल्या रुममध्ये गेल्या, फ्रेश झाल्या. दोघींनी, आपआपल्या ताटात जेवण वाढून आणलं.. शहाण्या बाळा सारख्या, TV चा आवाज हळू करुन गपगुमान जेवल्या ही.
“चार वाजले, तरी बाईसाहेबांची झोप झालीच नाही का अजून..दिवावातीच्या वेळी चहा देते की काय?” घड्याळाकडे, नजर फिरवत सासूबाई पुटपुटल्या.
“अगं आज्जी, बरं नाही आईला.. डोकं बांधुन झोपलीय ती.. मी करुन देते चहा हवं तर,” पर्णवी आजीला बोलली.
“नको नको… तुझ्या हातचा चहा म्हणजे गढूळ पाणी नुसतं… दोन घोट प्यावा पण, चवीचा.. जा तुम्ही अभ्यासाला बसा.” म्हणत आजीनेच चहा बनवला, आप्पांना दिला.
रियाच्या हातची चव नाही ह्या चहाला, पहिल्याच घोटात आप्पांनी नाकमुरडा मारला. आजींना आप्पांचा राग आला होता.
“घे गं बाई चहा.. दिवस पहा कसे आलेत.. सुनेने सासूला चहा द्यायचा तर सासूचं चहा आणून देते.” बोलता बोलता सासूबाईंनी रियाच्या अंगावरचं पांघरुन खाली सरकवलं.
रिया, डोळे घट्ट मिटून पडली होती. गाढ झोपलीय. सासूबाई पुटपुटल्या, तसे रियाने डोळे उघडून बघितलं..
“झोप नाही हो आई… फणफणलयं अंग, उठलं तरी गरगरतयं, उठण्याचा प्रयत्न केला तोल गेला मघाशी.” रियाने गांभिर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
“बी पी लो झालं असेल. डोकं दुखतयं तर बाम लावायची ना गं, दुखायचं थांबलं असतं.. रात्री क्रोसिन घे”, सासूबाई बोलल्या.
रियाने हलकेच मान डोलावली.
चहा पिवून थोडं बरं वाटत होतं, तशी रिया उठली.
रियाला बघताच आप्पा बोलले..” घोडभर चहा पाज बाई तुझ्या हातचा. हिच्या हातच्या गढूळ पाण्याला चवच नव्हती, मज्जा नाही आली” आप्पांनी चहाचं फर्मान सोडलं.
पर्णवी आणि गौरवी आप्पांच्या बोलण्यावर आजीकडे बघून जोरात हसल्या.
“तुमची तलफ भागवली, तरी नाव नाही. म्हणून तर इच्छा होत नाही काही करायची, तुमच्यामुळे, सगळा कारभार सुनेच्या हाती द्यावा लागला,” आजी आप्पांवर जोरात खेकसल्या.
रियाने, आप्पांसाठी चहाचं अंधण ठेवलं,तिला पुन्हा गरगरलं.. पर्णवी जवळचं होती उभी.. तिने सावरलं, तिला खूर्चीत बसवलं.
“आराम कर गं आई, अंग तापलयं तुझं.”
सायंकाळी, नितीश घरी आला तसा रियाला डॉक्टरकडे घेवून गेला.
डॉक्टरांनी व्हायरलचं आहे म्हणून सांगितलं, बी पी लो झालं होतं.. कोरोनाचा धोका अजून टळला नव्हताच. ताप जायेस्तोवर, फार कुणाच्या संपर्कात येवू नका म्हणून डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं.
आजीने मस्त खिचडीसोबत पिठलं बनवलं होतं… दोघी नाती मदतीला होत्याच.
घरी आल्यावर, तोंडाला चव नव्हतीच तरी रियाने कसेबसे चार घास पोटात ढकलले… औषध घेवून झोपली तशी, तिच्या अंगात थंडीची शिरशिरी चढली..
दूस-या दिवशी, वेळेत जाग आलीच नाही, डोळे उघडून बघावं वाटतचं नव्हतं… सकाळची सगळी काम आपआपल्या परीने, सर्वांनी उरकली होती.
शांत झोपलेल्या रियाला नितिशने दूरुनचं आवाज दिला… “चहा बिस्किट खावून घे, नाश्ता करुन घे, औषध वेळेत घे.. अंघोळ करु नको. रुममध्ये एकटी असलीस तरी, आम्ही आहोत बाहेर.. झोपून रहा शांत. तशी ही म्हणतेस ना, “कधीतरी आराम द्या मला”, घे हवा तेवढा आराम करुन घे, आता,” नितीश जाता जाता बोलला.
आत रुममध्ये झोपलेल्या रियाच्या कानावर बाहेर, ह्या त्या कामात बिझी असलेल्याचे आवाज हळूहळू, शांत झाले.
नितीश ऑफिसला निघून गेला होता.. मुली ही शाळेत गेल्या.. रियाला जेवण ही रुममध्येच दिल होतं. आप्पा सासूबाई ही जेवन आटोपून आपल्या रुममध्ये वामकुक्षीसाठी गेले.
दोन दिवसांसाठी माहेरी, जाण्याच्या नावावर.. कुणकुण करणा-याचं, आपल्या वाचून काहीच अडतं नाही, ह्याची जाणिव क्षणभर मन दुखवून गेली.
दुखणं अंगावर काढत, झोपेत स्वत:च कन्हणं तिच्या कानावर पडत होतं. दिवसभर झोपल्या झोपून, अंग आखडून गेलं होतं.. डोळ्यावर झापड होतीच, तरी आता तिला बरं वाटू लागलं होतं.
रुममधल्या रुममध्ये तीला आत्ता कंटाळा आला होता. तिने आईला फोन लावला.. आत्ता आहे निवांत वेळ तर झोपून घे छान.. “झोपा काढता येईलं असं सासरं हवं होतं ना तुला”.. पलीकडून आई, ऐकू येईल एवढ्याजोरात पुटपुटली.
काय गं आई, हसतेस माझ्यावर, “कधी एकदाची बाहेर पडते ह्या सगळ्यातून असं वाटतयं”, कंटाळा आलाय आत्ता ह्या झोपेचा! आरामच हराम वाटी लागलाय बघ, रियाच्या बोलण्यावर आई मंद मंद हसत होती.
काय खरयं ना मैत्रीणिंनो.. होतं ना असं.. कोरोना काळात तर ह्याची प्रचिती आलीच असेल बहुतेकांना, पण एरव्ही साधासा ताप आला तरी.. दिवसभर न संपणारी काम पुरवली एकदाची, पण नकोच हा ताप आणि नकोच ती झोप.. आराम हराम है! असं वाटतच असेल ना तुम्हाला, कथेतल्या रियासारखं.
©शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.