विसर्जन

©अपर्णा देशपांडे
कण्हत कण्हतच कमला उठली, चादरीची घडी घातली आणि बाजूला एक नजर टाकली. सखाराम त्याच्या नेहमीच्या पध्दतीने अस्ताव्यस्त झोपला होता, आपला सगळा पुरुषार्थ तिच्यावर गाजवून !
काल तर तिची काहीही चूक नव्हती. किलोभर डाळ नीट मोजून गिऱ्हाईकाकडे दिली होती . त्याच्याच हातून पिशवी सुटली . तेव्हढे कारण पुरेसे होते सखारामला . सरळ अर्धा किलोचे माप उचलून फेकून मारले तिला.

तिच्या खांद्याला लागले ते वजन . तो माणूस बिचारा मध्ये पडला तर त्याला ही शिव्या घातल्या सखारामने . हे नेहमीचेच झाले होते . त्याच्या डबक्या एवढया शेवाळलेल्या जगात काहीही बिनसले की सगळा राग तो कमलावर काढे . मग त्याची भरपाई बिचारीला द्यावी लागे .
बिना बापाची पोर कमला , अतिशय गरीब स्वभावाची . शिकायची , वाचायची खूप आवड होती कमलाला . पण तिच्यात इतकी हिम्मतच नव्हती की आपल्या मनातलं बोलून दाखवेल .सतराव्या वर्षीच तिचे लग्न सखारामशी लावले गेले . गरीब गाय , निमूट गेली , ह्या गोठ्यातून त्या गोठ्यात !!

पण ह्या नव्या गोठ्याचा मालक हा असा जनावर होता .
दुकानात असणारी वर्तमानपत्राची रद्दी हे तिच्यासाठी एकमेव सुखाची गोष्ट होती .
सखाराम दुपारची झोप घ्यायला गेला की ती आधाशासारखी वाचत असे . तेवढीच शब्दांची सोबत . ते शब्द फुंकर घालीत तिच्या भाजलेल्या मनावर .

शाळेत असतांना तिच्या निबंधांचे खूप कौतुक करत असत बाई . तीला आवड होती लिहिण्याची , आणि अक्षरही सुरेख होतं . सरस्वती प्रसन्न होती तिच्यावर , नशीबच रुसले होते फक्त !
लग्नानंतरही एकदा तिने असाच काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता .
दुकानातल्या एका कळकट वहीत तिने मनातील विचार लिहून काढले होते , पण लगेच नवऱ्याच्या भीतीने पानं फाडून टाकले होते. 
ती आत स्वयपाक करत असतांना रागाने बेभान सखाराम आत आला होता .
” जास्त माज चढलाय का तुला ? अशाने उद्या प्रेमपत्र लिहिशील एखाद्या *****ला . ” म्हणत तिला काही कळायच्या आत त्याने तिला लाथा घालायला सुरुवात केली.

ती वेडीवाकडी जाऊन पडली …….कोपऱ्यातील खलबत्त्यावर डोके आपटले आणि भळभळून रक्त आले होते . तिला बिचारीला लक्षातच आले नाही की तिने वहितून फाडलेले कागद कुणाच्या हातात पडले असतील . आपण काही लिहिल्याचे सखारामला समजले आणि तो चिडला इतकेच उमगले तिला .
त्या संध्याकाळी पलीकडच्या कॉलनीतले काळे सर दुकानात आले होते . पायाशी पडलेल्या कागदावर त्यांची नजर गेली होती . इतके सुंदर मोत्यासारखे अक्षर , आणि तितकेच सुंदर लिखाण . त्यात ‘आई पणाची भीती ‘ ह्यावर लिहिले होते . 
आशय , भाषा , आणि एकूणच लेखनशैली खूपच प्रभावी होती . शाळेत मराठीच्या पाठ्यक्रमात ह्या विषयावर कविता होती . आजच्या आई पुढील आव्हानं लिहिली होती तिने .

” अरे सखाराम , कुणी लिहिलंय हे ? फारच सुरेख रे !! ” ते सर सहज बोलून गेले होते ….त्यांना काय माहीत की असे बोलून आपण त्या लेखिकेला किती अडचणीत टाकतोय ते . त्या नंतर दोन दिवस कण्हत होती ती .
तिच्या तालुक्यात महिलांसाठी वेगवेगळ्या योजना चालू होत्या , ज्यात अत्यल्प व्याजदरावर व्यवसासाठी कर्ज मिळणार होते .
” आज माझ्यासोबत चल , ते सांगतील त्या कागदावर सह्या करून लगेच वापस येऊ . दहा हजार कर्ज मिळणारेय तुझ्या नावावर . दुकानात नवीन माल आणून टाकू .” दात काढून हसत तो म्हणाला . त्याचे डोळे लालसेने चमकत होते .
त्या दिवशी पहिल्यांदा ती नवऱ्या बरोबर बाहेर पडली होती . गाडी अतिशय वेगात चालवत होता तो .

ती वेगाला घाबरते हे त्याला माहित होते , पण असुरी आनंदात तो आणखीनच बेफाम होतो हे ओळखून होती कमला . तिनेही निग्रहाने घट्ट डोळे मिटून घेतले ,पण त्याला अवाक्षर बोलली नाही .
गावकऱ्यांची मदत करायला , अर्ज भरून द्यायला काळे सर उपस्थिती होते .
” अरे , तू कमला न ? काय अप्रतिम लिहिलं होतंस तू !! आणखी काय काय लिहितेस ? ” सरांनी तर सहज विचारले , पण कमला ची वाचाच बसली . तिला समजले नाही ते असे का म्हणाले .आता घरी जाण्याची तिची हिम्मत होईना . अर्ज भरून होइपर्यंत सखाराम नुसता धुमसत होता . ती वारंवार त्याच्याकडे बघत होती.

त्या रात्री सखाराम मधील जनावर पेटून उठले होते ….. अर्वाच्य भाषेत तिला शिवीगाळ …मारहाण….तिचे दुबळे स्पष्टीकरण … मेलेली नजर …
कमला ला परतीचा मार्ग नव्हता . गलितगात्र आई आणि गरीब भाऊ हेच काय तिचे आपले …… असून नसल्यासारखे . त्यामुळे मुकाट अत्याचार सहन करत ती तिथेच राहून होती . आपला जन्म फक्त त्यासाठीच झालाय का असे तिला वाटे . काळोखात एक उजेडाची तिरीप यावी आणि तिने प्रकाशाचा दिलासा द्यावा असे तिच्यासाठी वाचन होते .
वर्तमानपत्रात येणारे मोठ्यांचे लेख ती वाचत असे . जगातल्या स्त्रियांच्या यशाच्या कथा , घडामोडी तिला दिलासा देत .

सरकार कडून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तिच्या नावाने बँकेत जमा झाली होती . त्या मुळे का होईना , तिचे बँकेत खाते निघाले होते . त्यातून आपला काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करावा असे तिला खूप वाटत होते , पण तिने बोलून दाखवले नाही . सखाराम मात्र अतिशय गुर्मीत होता .
” शहराला जाऊन ठोक मध्ये सामान घ्यायचंय . चल तुही …” तिने पापणी देखील हलवली नाही .
” नसशील येत तर मर !! फक्त ह्यावर सही कर , बस !! ” त्याने पैसे काढायचे चलन पुढे केले . अनिच्छेने तिने सही केली . तुच्छ हसत त्याने गाडी काढली .

तिला शेजारच्या शीतल ने सावरकरांचे चरित्र आणून दिले होते . चोरून चोरून ते वाचत होती ती . कणकेच्या डब्यामागे पुस्तक लपवून ठेवलं होतं .
सखाराम बाहेर गेल्यावर थोडावेळ का होईना , ती ते मनसोक्त वाचणार होती .
स्वातंत्र्यवीर सावरकर ….काय तेजस्वी , जाज्वल्य व्यक्तिमत्त्व !! ती अतिशयच प्रेरित झाली होती . अधून मधून दुकानात कुणी आलं तर तेव्हढं सामान द्यायचं आणि पुन्हा डोकं पुस्तकात . आज अनेक महिन्यांनंतर अशी निवांत वेळ आली होती . ती पूर्णपणे पुस्तकात गुंतली असतांना शेजारचा दीपक धावत आला .
” काकी , काकी , लवकर चला !! काकांचा .. .. अपघात ….”

तिच्या हातून पुस्तक गळून पडले . दार ओढून ती धावत सुटली ….बेभान ….
गर्दी बाजूला सारत ती आत पोहोचली . सखाराम चा निष्प्राण देह अस्ताव्यस्त पडला होता . त्याच्या बेफाम वेगाचा बळी ठरला होता तो .
” कसा का असेना , तुझ्या कपाळाचं कुंकू होतं ग ! ” आकांत करत आई म्हणाली . कमला मात्र नुसतीच कोपऱ्यात नजर लावून सुन्न बसली होती .
अस्थी विसर्जनासाठी तिचा भाऊ थांबला होता . तिने सोबत जाण्याचा हट्ट केला . कलश स्वतःच्या हातात घेऊन तिने विसर्जनासाठी रक्षा पाण्यात टाकली . राखे सोबत तीन चार नट बोल्ट पण विसर्जित केले ……तिने काढून ठेवलेले…. मोटरसायकलच्या चाकाचे !!!
समाप्त
*********
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

4 thoughts on “विसर्जन”

Leave a Comment

error: Content is protected !!