निर्मितीचा आनंद

©शुभांगी मस्के
धुळीने माखलेला, कळकटलेला पिहूचा फ्रॉक पाहून, सौम्याचा संताप संताप झाला. “कुठे जातेस गं कलमडायला.. मातीत लोळतेस की काय? पांढ-याचा काळा केलास, आता धूवायचा कुणी? कधी एकदाची मोठी होतेस कुणास ठाऊक!!!.” तोंडाचा पट्टा सुरु ठेवत सौम्या धुण्याच्या गोट्यावर पिहूचा फ्रॉक बदड बदड आपटत होती.
सर्फचा पांढरा फेसही काळा होऊन पाण्यात विलीन होत होता… एरवी फेस हातात घेवून फुंकायला आवडायचं पिहूला… पण आईच्या हातचा पाठीत एक दणका पडला.
आपल्या फ्रॉककडे बघत… आजपासून मी खेळणार नाही, मातीत लोळणार नाही, कपडे खराब करणार नाही म्हणत निरागस पिहू पायरीवर टपटप आसवे गाळीत बसली..

सोनेरी – चंदेरी दिवसातलं मनसोक्त हूंदडायचं, पिहूचं बालपण, मित्र-मैत्रिणींसोबत पाठशिवणी, लपाछपी खेळताना डाव देणा-याला ओंजळीत रेतीमाती घेवून त्यात दगड, काड्या टोचायच्या डोळ्यावर पट्टी बांधायची गोल फिरवायचं कुठेतरी नेवून ती ओंजळ रिती करायची आणि शोधायला सांगायचं, अचूक अंदाज घेवून… शोधल्यावर उड्या मारत साजरा केला जाणारा आनंद.
मातीचे दोन खड्डे करुन, त्यात एका खड्डयात काचा लपवायच्या, दूस-याने बिनचूक काचा शोधायच्या.. रेतीमातीत, विटांच्या लाल भुरक्यासोबत खेळताना पिहूला भानचं उरायचं नाही.. स्वच्छंदी खेळणारी पिहू आपलं अल्लड बालपण मनसोक्त जगत होती. 

दिवाळी असो की होळी.. रंग रांगोळीचे असो की गुलालाचे… रंगीबेरंगी रंग तिला मोहित करायचे.. जणू रमायची ती त्या रंगात आनंदाने न्हावून निघायची.. आकाशातल्या इंद्रधनुष्याचे रंग तिला भूरळ पाडायचे.. 
फुलपाखराप्रमाणे मनसोक्त जगायच्या दिवसात, एक दिवस अचानक ती सैरभैर झाली.
आजपर्यत चिखलात बिनधास्त स्लीपर घालून फटफट चालताना चिखलाचे उडलेले डाग, उगाचच काड्या करायच्या नादात सायकलच्या चैनच्या तर कधी कुलपात टाकलेल्या ऑईलचे लोट, ग्रीसचे हात अनेकदा फ्रॉकला पुसलेले आठवले…
कधीकाळी ड्रॉईंग करताना फदकल मारुन बसल्यावर हिरव्या निळ्या, पिवळ्या रंगांचं मिश्रित काळं पाणीही मस्तीच्या ओघात फ्रॉकवर सांडवलं होतं तिने… 

पिहूचं खेळणं सौम्याला अनेकदा किळसवाणं वाटायचं, तिला कंटाळा यायचा.. पाठीवर धपाटा देत अनेकदा सौम्या तिला रागवायची.
“खेळू दे गं!!”.. बालपण परत येत नाही, ती नाही खेळणार तर आपण खेळणार का? एकदा बालपण सरलं की जबाबदा-या पटकन मोठ्ठ करतात.. “कुछ दाग अच्छे होते है।” पिहूच्या अवताराला बघून सौम्याचा रागराग झाला की, मम्मीच्या रागावण्यावर पप्पांच्या शब्दांचं पांघरुण पडायचं आणि कपड्यांवर डागांचं साम्राज्य फैलवण्याची पिहूला जणू मुभाच मिळायची… 

आजचा डाग मात्र…. पिहूचं मन विचलित करुन गेला.
शाळेत इतरवेळी बिनधास्तपणे बागडणारी पिहू वर्गातल्या कलकलाटात, मधल्या सुट्टीत गप्प गप्प होती.. कुणाला सांगू? काय करु? काय झालं असेल? एक ना अनेक प्रश्नांनी लहानग्या जीवाला भंडावून सोडलं.. 
आजपर्यत कुठल्याचं डागांची चिंता न करणा-या पिहूच्या इवल्याशा जिवाला कपड्यावरच्या या डागामुळे काही क्षणात अनेक अनुत्तरीत प्रश्न पडले? 
मधल्या सुट्टीत हूंदडणारं, कानात हवा शिरल्यासारखं इकडून तिकडे सैरभेर होत, वेगवेगळ्या खेळात रमणारं पाचवीतलं छोटसं कोकरू आज गप्प गप्प वर्गात एकटचं बसलं होतं.

पिहूचं कशातच मन लागत नव्हतं.. “पिहू काय झालं तुला? ताप आला का? टिफिन नाही खाल्लास तू!” पिहूची मैत्रिण कृपा हिने काळजीच्या सुरात विचारलं…
“काही नाही झालं मला!” म्हणताना, अवखळपणे पिहू उभी राहीली,  पिहू तुझ्या ड्रेसवर हा डाग? वर्गातल्या पिहूसारख्याच निरागस एका चिमनीने आश्चर्य कारक नजरेने तेवढ्याच प्रश्नार्थक नजरेने पिहूकडे पाहात विचारलं.. 
“माहीती नाही, काय झालं? मला पण नाही माहीती, इजा ही झाली नाही.” म्हणत रडवेल्या पिहूने, डेस्कवर बसून हळूच डोक टेकवलं..

पिहूच्या कपड्यावरच्या डागाकडे पाहून गप्प बसणा-या… कुजबूज करणा-या… तिला आधार देवू पाहणा-या… या डागाची जराशी पुसट कल्पना असणा-या ही… वर्गात एक दोघी होत्या… त्यांचं पिहूकडे बघत आपआपसात मधमाशांसारखं गुणगुणनं चालू होतं… 
या डागाबद्दल किंवा या विषयावर उघडपणे काही बोलायचं नसतं एवढं मात्र सगळ्यांनाच माहीती असावं.. 
मधली सुट्टी संपली, काळे मॅडम वर्गात आल्या.. वर्गातल्या मुलींची पिहूकडे बघून कुजबूज सुरु होतीच..  

मॅडम पिहूला, आज काहीतरी होतय? वर्गात मागून कुठून तरी आवाज आला..
टेबलवर डोक ठेवून, मनात रेंगाळत असलेल्या घोळासकट चेह-यावरचे भाव लपवू पाहणारी पिहू डेस्कवर डोक ठेवून निपचित पडली होती… तिचा चेहरा मलूल पडला होता..
गोंधळली तर ती होतीच.
बाळा इकडे ये!…. काय झालं? हे विचारायची काळे मॅडमला गरजच पडली नाही.
जवळ जावून तिच्या डोक्यावरुन हळूच हात फिरवत, काळे मँडमनी पिहूला जवळ घेतलं.

गोंधळलेल्या पिहूने वर्गात सगळीकडे शुन्य नजरेने बघत काळे मॅडमला क्षणात कवटाळून घेतलं आणि पिहूच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली… 
मॅडम पिहूला आपल्यासोबत बाहेर घेवून गेल्या. मॅडम पिहूला कुठे घेवून गेल्या असतील? वॉशरुमकडे, की स्टाफरुममध्ये… पिहूच्या मैत्रिणी आपआपसात कुजबूजायला लागल्या..   
पिहूला, घरी लवकर जायचं का मॅडमने विचारलं.. आई घ्यायला येईपर्यंत वर्गात की रेस्ट रुममध्ये थांबणार, अतिशय मृदु भाषेत, पिहूला विचारण्यात आलं.

स्वभावाने थोडाशा स्ट्रिक्ट असलेल्या काळे मॅडम आज पिहूला प्रेमाने कनवाळत होत्या, कुरवाळत होत्या, पोट, पाठ दुखतंय का याची चौकशी करत होत्या.. 
मधल्या सुट्टीत निर्धास्तपणे हूंदडून, धुळीने माखलेल्या घामेजलेल्या,  पिहूकडे पाहून “डर्टी गर्ल” म्हणणा-या काळे मॅडम… कळकटलेल्या हातांकडे बघून धुवून येण्यासाठी वॉशबेसीनकडे पाठवणा-या आणि नंतर हायजिनवर पारायण सुनावणा-या काळे मँडम,  आज पिहूच्या ड्रेसवरच्या डागाला पाहून थोड्या विचलित झाल्या..
डोक्यावरुन, मायेने हळूवार हात फिरवताना आज पिहूला त्यांच्यात आईचा स्पर्श जाणवला… 

“पिहू!! बाळा मोठी झालीस तू आज!! , तरी तुझं बालपण या डागाने गमवू नकोस… खूप खेळ!! अगदी पहिले सारखी… खेळ बरं… धुळीने हातपाय माखुन, वर्गात आलीस तरी चालेल, काळे मॅडमने पिहूच्या डोक्यावरुन पुन्हा प्रेमाने हात फिरवला. 
मँडम, पिहूला वर्गात घेवून आल्या. काळे मॅडमने वर्गातल्या सर्व मुलांना दहा मिनिटांसाठी बाहेर खेळायला पाठवलं… मुला-मुलींच्या शरीरात होणा-या बदलांविषयी मुलींशी आज काळे मॅडम भरभरुन बोलल्या.. 
लहान लहान करताना, बालपण जपताना अगदीच एखादी मुलगी पाचवीतच कशी पटकन मोठी होऊन जाते हे सांगताना त्यांना गहिवरून आलं.. 

मातीच्या डागाइतकेच हे ही डाग तेवढेच नैसर्गिक आणि आपल्या आयुष्यात आवश्यक आहेत.. घाबरुन जायचं नाही… काळे मॅडमचं ते रुप आज आकाशासारखं स्वच्छ, मायेच्या, जिव्हाळ्याचा रंगात झळाळून निघालं होतं…
आजपर्यंत अभ्यासा व्यतिरिक्त कधिही काहीही न बोलणा-या, अभ्यास एके अभ्यासच्या पावित्रात असणा-या, चुकांवर रागावणा-या, पेपरमधल्या मार्कांवरुन हुशार बुद्धु म्हणत, परिक्षण करणा-या काळे मॅडम मनाने कित्ती हळव्या, प्रेमळ आहेत पिहूला जाणवलं..
काळे मॅडमने सांगितल्या प्रमाणे,  आपल्याला काहीही झालं नाही. हा आपल्या स्कर्टवर पडलेला डाग अगदीच नॉर्मल आहे, आणि आता आपल्याला नेहमीप्रमाणेचं मस्त मला हवं तसं खेळायला मिळणार, म्हणून पिहूच्या चेह-यावर थोडसं का होईना पण हसू दरवळलं.. 

पांढ-या स्कर्टवरचा स्वेटरने झाकलेला तो डाग.. निर्मितीचा, सृजणाचा आधार होता… निसर्गाच्या सुंदर कलाकृतीचा स्त्री म्हणून जगण्याच्या वाटचालीचा उंबरठा होता…. तारुण्याच्या उंबरठ्यावर पडलेल्या पहिल्या पावलाचाही… पण ते पाऊल पिहूच्या आयुष्यात जरासं लवकर पडलं होतं… 
सौम्या पिहूला घरी घेवून जायला, नेहमीपेक्षा जरा लवकरच आली होती. सगळा वर्गच पिहूकडे कुतुहलदायक नजरेने बघत होता. 
घरी, आल्या आल्या, सौम्याने पिहूला जवळ घेतलं.. आजपर्यंत बार्बी डॉल, माझं लाडाचं कोकरू, माझी परी, माझं फुलपाखरु, म्हणत जवळ घेणारी… कपड्यांवरच्या डागांना बघून चिडणारी, ओरडणारी सौम्यातली आई, आज पिहूला मैत्रिणीसारखी भासली… 

सौम्याने, पिहूला घरी आल्यावर न्हावूमाखू घातलं. कपाटात ठेवलेलं एका पाकिटातलं पॅड पिहूच्या हातावर ठेवून सगळं सगळं छान, तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं. 
आज सौम्या तिच्यातलीच होऊन दोन समजूतीच्या गोष्टी पिहूला सांगू पहात होती… बसण्या-उठण्याबद्दल सांगताना, त्या दिवसात स्वत:ची काळजी, स्वच्छता पिहूला कशाचही दडपण न येवू देता कशी आवश्यक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत होती… 
“थोडं तुझं थोडं माझं”…म्हणत ऐकवत आणि ऐकूनही घेत होती… जबाबदारीने वागण्याबाबत छोटे छोटे सल्लेही देत होती… आज पिहूचं कशात मन लागत नसलं तरी, बाहेर मैत्रिणींबरोबर खेळणं ती मिस करत होती. पिहूचं सगळं लक्ष बाहेर खेळायला जाण्याकडे, घड्याळाच्या फिरणा-या काट्यांकडे होतं… 

पिहूच्या मनातली चलबिचल सौम्याने ओळखली. बाळा आज घरीच खेळूया का? उद्या जावू या हवं तर बाहेर खेळायला. बोलण्यामागची चिंता मात्र चेह-यावर सौम्याने काही केल्या दिसू दिली नव्हती… पिहूने शहाण्या बाळासारखं, होकारार्थी मान डोलावली. 
“लाल लाल चुनरी सितारोंवाली, जिसें ओढकर आयी मॉ शेरावाली… मॉ शेरावाली!!” दूरच्या मंदिरात लाऊडस्पीकर वर वाजत असलेलं गाणं, इकडे पिहू गुणगुणत होती… 
लाल रंगाच्या फ्रॉकवर, भरजरी लाल ओढणी अडकवून मनसोक्त भातुकलीत रमलेल्या, तिच्या बाहूलीची आई झालेल्या पिहूला…. you are a big girl today” म्हणत  सौम्या तिच्या गोडूलीचं बालपण निरंतर जपण्याचं वचन देत कौतुकाने न्याहाळत होती.

देवी आई माझ्या पिहूच्या आयुष्यात नवरंगाची उधळण होऊ दे… चार दिवस लेकीतल्या अल्लड रूपाला जपायचयं म्हणत, सौम्याने आवाजाच्या दिशेने खिडकीतूनच देवीला वाकून नमस्कार केला.
पिहूच्या रुपातली कुमारी कन्या आज बाहेर खेळायला न जाता घरात बसून थाटात आपली भातुकली मिरवत होती.
आज पिहू आणि मैत्रिणींच्या टीमसोबत.. निर्मीतीचा सोहळा साजरा करण्यासाठी सौम्याही भातुकलीत रमली.
नवरात्रातल्या मंगलमय वातावरणात, सोहळं-ओवळ्याच्या पलिकडे तिच्या गोडूलीचं बालपण जपण्यासाठी.
*********
समाप्त
©शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!