नृत्यगामिनी ( भाग 1 )

© अपर्णा देशपांडे
“लाईट्स , कॅमेरा ,  ॲक्शन !! ” दिग्दर्शक  चंद्रकुमार यांनी म्हटलं आणि चित्रपटातील पुढच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू झाले .
कॅमेरा सगळ्या कोनातून फिरत होता . अनुभवी चंद्रकुमार आवश्यक त्या सूचना देत होते आणि पाच मिनिटात त्यांना हवा तसा सीन चित्रित झाला . 
त्यानंतर ची जबाबदारी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक गोपी यांची होती . त्यांनी आपल्या सहदिग्दर्शिका झिया हिला हाक मारली .
” झिया , सेट लावून झालाय . मुली तयार आहेत ? ” 
” हा मास्टरजी , बस एक पाच मिनिटात तुम्हाला बोलावते , जरा मेकअप बाकी आहे . ” 
” जलदी करो .” 

” बस झालंच .” झिया म्हणाली , पण वंदना यायची बाकी होती . तिच्या ऐवजी दुसरी कुणी मिळलीही असती लगेच , पण झियाला तिची अडचण माहिती होती .
शिवाय वंदना एक अतिशय उत्तम नर्तकी होती . नुसतंच फिल्मी नाही तर भरतनाट्यम आणि कथ्थक मध्येही पारंगत . 
इतक्यात वंदना धापा टाकत आली 
” सॉरी झिया , बाबांचे  एक्सरेज डॉ .ला दाखवायचे होते . डॉक्टरांची वाट पाहून शेवटी निघून आले .”
” ठीक आहे , चल  लवकर . ” झियाने दंभाळून घेतलं. 

पाचच मिनिटात वंदना तयार होऊन आली .  तीस मुलीच्या घोळक्यात सगळ्यात समोर वंदना होती . 
गाणे सुरू झाले . झियाने क्लिप दिली , गोपी सरांनी कॅमेरा तयार ठेवला आणि सुरेख लयबद्ध हालचाल करत वंदना आणि ग्रुप चे नृत्य सुरू झाले .
” कट !!” व्हेरी गुड !! गोपी सर म्हणाले . आता मॅडम येतील , पुढचा शॉट परत त्यांच्या सोबत होईल . 
सगळ्या मुली तशा वेशात दोन तास ताटकळत बसल्या होत्या . सिनेमाची मुख्य अभिनेत्री महिमा आलीच नाही .

वंदनाचा जीव टांगणीला लागला होता . छोट्या किशोरला ती दामुकाकांच्या रहिवासी आश्रम शाळेत भरती करून आली होती . त्याला जाड पांघरून पाठवायचा निरोप आला होता , थंडी वाढत होती . तिला तिथे जायचे होते .
शिवाय डॉक्टर  आपल्या आजारी बाबांना पुढे काय ट्रिटमेंट सांगतात ह्याचीही तिला काळजी होतीच . त्यामुळे आज तिला लवकर सुट्टी हवी होती .
झिया तिला समजावून घेत होती , वंदना सगळं सांभाळून M . A आर्ट्स करतेय ह्याचे तिला कौतुक होते .
पण मास्टर गोपींना उशीर खपत नसे . आताही ते चिडले होते .
” ये गाना हम हिरोईन के बगैर ही शूट करेंगे .” त्याने चिडून झिया ला बोलावले .

 ” मास्टर , हे मॅडम चं सोलो गाणं आपण वेगळं शूट करायचं का ? ग्रुप डान्स मागुन टाकू .” झिया चाचरतच म्हणाली . 
” नाही , नाही !! तसलं कोंप्रोमाईझ मी नसतो करत . अर्ध गाणं आपण दुसरी डमी हिरोईन घेऊन शूट करून टाकू . जास्त पाठमोरी दाखवू . आपल्या वेळेला काही किंमत आहे की नाही ,? ” मास्टरजी म्हणाले .
” तुझ्या ग्रुप मधून आण बरं एखादी डान्सर .”

वंदना एकटीच काळजी करत बसली होती . चार वर्षांपूर्वी आई गेल्यापासून तिच्यावरच घराची सगळी जबाबदारी येऊन पडली होती. वडील आधीच दारुडे , त्यात त्यांना प्रचंड खोकला झालेला . त्यांचे एक्सरे डॉ दामलेंकडे ठेऊन ती आली होती . त्यावरून ते पुढची ट्रीटमेंट ठरवणार होते .
लवकर इथून निघावं आणि किशोर साठी आधी आश्रमात जावं मग डॉ कडे असे तिला वाटत होते . इतक्यात झिया आली . 
” वंदना , महिमा मॅडम साठी डमी सिन करायचाय . चल .”
” मी ? खरंच ? ” 

” तिच्यापेक्षा तू कितीतरी चांगली नाचते ग बाई !! पण शेवटी ती हिरॉईनए ना !! ” 
प्रचंड उत्साहात वंदना उठली , पण लगेच दोन पाऊले मागे सरकली .
” नाही दीदी . मला आश्रमात जायचंय , डॉक्टर कडे जायचंय .”
” वेडी आहेस का वंदना ? अशी संधी मिळायसाठी आयुष्यभर वाट बघतात मुली !! तुला आयती मिळतेय तर घालवू नकोस !!” वंदनाला कळत होते त्या संधीचे महत्त्व , पण वेळच अशी होती . तिने निर्मला ला हाक मारली .

” निर्मू , प्लिज किशोर च्या आश्रमात फोन लाव न माझ्या मोबाईल वरून . म्हणावं रात्र झाली तरी मी आज येउन जातेच . ” निर्मला ने पटकन तिचा फोन घेतला . मागील पाच सहा वर्षांपासून दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या . 
” कुठे जायचंय नेमकं ? ” पाठीमागून निखिल कुमार ने विचारलं . 
” सर , तुम्ही ? तुम्ही केव्हा आलात ? ” झिया ने विचारलं .
वंदना मात्र पुतळ्या सारखी उभी होती .

” बोल ना कुठे जायचंय ? ” 
” ते …सिव्हिल लाईन… रोड ला ” वंदू चाचरत म्हणाली . 
” मी तिकडेच जातोय . मी ऐकलं बोलणं , मी नेऊन देतो ब्लॅंकेट . …..अग बोल  न !” 
” वंदू , दे सरांकडे ब्लॅंकेट , आश्रमाचा पत्ता दे , कॉन्टॅक्ट दे आणि चल लवकर  सर रागावतील .”   झिया ओरडली तशी वंदना पटकन गेली , ब्लॅंकेट आणि आश्रमाचा फोन नंबर निखिल कुमार कडे दिले  , आणि थँक्स म्हणून  पळाली . 

चंद्रकुमार , नृत्य दिग्दर्शक गोपी आणि झिया समोर बसले होते . |
गाणे सुरू झाले , तसे वंदना ने भान हरपून नाचायला सुरुवात केली . सेमिक्लासिकल नृत्य , लयबध्द हालचाली , सुंदर मौखिक अभिनय , ह्यामुळे गोपी सर खुपच प्रभावित झाले .
अचानक उठून म्हणाले ,” ह्येच !! ह्येच आपले हिरोईन !! ” 
एकदम गाणे थांबले . वंदना थांबली .
अतिशय शांतता पसरली .

” सर , ते…फक्त …एक गाण्यापूरते हिला आपण घेतलंय . आधीचे भरपूर शूट झालंय . ” चंद्रकुमार ने खुलासा केला .
” पिक्चर चे नाव नृत्यगामीनी आहे न ? मग ह्ये मुलगी चे डान्स अप्रतिम आहे . तुमची हिरोईन आठ आठ दिवस गायबी असते . ह्येलाच घेऊन टाक .”  आपल्या मोडक्या मराठीत त्यांनी जणू वंदनाचे नशीबच लिहिले .
” मला विचार करून , प्रोड्युसर शी बोलून ठरवावे लागेल सर . “
” न्हाई न्हाई , ह्येच हिरोईन करू .” गोपी सर पुन्हा तेच म्हणाले .

वंदना चे मन थाऱ्यावर नव्हते . अचानक आलेलं हे वळण .|
” काय वंदना , करशील नृत्यागामीनी ? ” चंद्र सरांनी विचारले तसा क्षणभर ही विचार न करता वंदनाने होकार दिला . 
” ठीक आहे , बघू . इतकं सोपं नाहीये हिरोईन बदलणं . …चला , पॅक अप !!” चंद्रकुमार थोडे काळजीत पडले होते .

” वाढ लवकर जेवायला !!! ” बाबा ओरडले तशी वंदना एकदम भानावर आली .
काल जे घडले ते स्वप्न होते का ? का माझ्या मनाचे खेळ ..तिने गरम भांड्याला हात लावला .चटका बसला तसा तिने पटकन हात मागे घेतला . 
आई गेल्यावर आपणच आई झालो घराच्या . बाबा तर नशेतच असतात , किशोर तिकडे शाळेतच रमलाय . मग मी स्वतःला का मागे ओढू ?..खरंच मला घेतील ते ? महिमा किती प्रसिद्ध नटी आहे , मी तिच्या पासंगालाही  पुरत नाही ….मग मला का घेतील हे?.

आपल्या सारख्या हजारो मुली येतात वेड्या आशेने ..आपल्याला निदान समूहात ‘ एक्सट्रा डान्सर ‘ ,म्हणून का होईना , काम तर मिळाले . नाहीतर काय केलं असतं आपण ? त्या घाणेरड्या नामदेव शी लग्न करणार होतो का ? तिला त्या विचारानेच किळस आली. दुसऱ्या दिवशी  सकाळी सेटवर खूप धांदल सुरू होती .
निखिल कुमारचा एक  प्रसंग चित्रित होणार होता . वंदना पोहोचली .
धावत धावत झिया आली . वंदनाला तिने मेकअप रूममध्ये नेले .

प्रोड्युसर  श्याम वर्मा बसले होते. नृत्यागामीनी वर चर्चा सुरू होती . वर्माजींना काळजी वाटत होती .
” ते ठीक आहे , पण ह्यानंतर महिमा मॅडम माझे कुठलेच प्रोजेक्ट घेणार नाही , त्याचं काय ? ” 
इतक्यात झिया वंदनाला घेऊन आली …
सगळे नुसते बघतच बसले ..तिला पाहून निखिल पण मागून येऊन बसला होता  
” अरे माझी गामीनी !!! ” गोपी अत्यंत खुश होऊन म्हणाले . वंदनाने संपुर्ण नृत्यांगना ची वेशभूषा केली होती आणि ती अत्यंत सुंदर दिसत होती . 

निखिल तर आश्चर्य चकित झाला होता . 
” वाह !! वाह !! ही तर महिमा पेक्षा सुंदर दिसतेय !! ” वर्मा म्हणाले , आणि चांद्रकुमार नि लगेच पुढचा सिन करायला बोलावले . 
भव्य सेट , उत्तम कथानक , खूप मोठे लोक , ह्यात तिला थोडं अवघडल्या सारखं वाटलं , पण पाचच मिनिटात शॉट ओके झाला. सगळेच कामात असतांना अचानक महिमा आली आणि  सेट वर कुजबुज सुरू झाली . ताड ताड पाऊले टाकत ती आत आली. झिया ने वंदनाला डोळ्यानेच गप्प रहा असे खुणावले .

” वाह !! चंद्र जी , तुमची पण कमाल आहे . चार दिवस काय मी नाही आले  तुम्ही तर मलाच धोका देताय .”
” चार दिवस नाही महीमा , आता दहा  दिवस झाले . तुझा तो असिस्टंट रतन फोन उचलत नाही , तू रीस्पॉंड करत नाही , घरी माणूस पाठवला …तिथेही कुणी नाही . मग आणखी काय करायचं ? तुझ्याकडून कुठलीच हालचाल नाही . इथे आमचं किती नुकसान होतंय ..सगळी टीम हजर असते , स्टुडियोचं भाडं …..
” असं ? माझ्या नावावर जेव्हा चित्रपट चालतात तेव्हा ? मग करोडो कमवायला मजा येते ना?…..मला चार दिवसाचा हिशोब सांगताएत !!! मी हे मुळीच सहन करणार नाही , सांगून ठेवते. ह्याचे परिणाम वाईट होतील ” असे म्हणून तणतणत महिमा निघून गेली .

काही क्षण सगळे शांत होते , पण लगेच वर्मा म्हणाले ,” चलो , चलो पुढच्या शॉट ची तयारी करा ” आणि वातावरण बदलले .
पुढचे दृश्य हे निखिल कुमार आणि वंदना यांचे प्रेम दाखवणारे होते . 
चंद्र कुमार दृश्य  समजावून सांगत असतांनाच जोरात आवाज झाला.
सगळ्यांनी चमकून तिकडे बघितलं .
काहीजण धावत पुढे गेले .
आत मेकअप च्या खोलीत गोपी सर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
*******
(क्रमशः)
भाग 2 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

4 thoughts on “नृत्यगामिनी ( भाग 1 )”

Leave a Comment

error: Content is protected !!