नृत्यगामिनी ( भाग 2)

भाग १ इथे वाचा
© अपर्णा देशपांडे
दिग्दर्शक चंद्रकुमार , निर्माते वर्मा , नायक निखिल कुमार ,  गोपी सरांची सहाय्यक झिया , निर्मला आणि सेट वरील सगळेच आवाक झाले होते . मेकअप मन जॉन थरथरत उभा होता . वंदना तर प्रचंड घाबरली होती .
मध्यभागी गोपी सरांचा देह  जमिनीवर  पालथा पडलेला होता .  वर्माजी चट्कन पुढे झाले , त्यांनी गोपी सरांचा श्वास बघितला . श्वास बंद झालेला  पाहून त्यांनी वर बघून फक्त मान हलवली .
स्टुडिओ चे मालक प्रेमजींनी  ताबडतोब पोलीसांना फोन केला . 

काही मिनिटातच इंस्पेक्टर  संदीप नारायण आणि त्याचे सहकारी तिथे हजर झाले .
इन्स्पेक्टर संदीप हा एक तरुण , चाणाक्ष  आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होता. सोबत सबइस्पेक्टर राणे होते . त्यांनी आधी तिथली सगळी गर्दी हटवली . परवानगी शिवाय कुणीही स्टुडिओ सोडून जाऊ नये अशी सूचना देण्यात आली होती. 
पोलीस विभागातील फोटोग्राफर , तंत्रज्ञ , यांनी परिस्थिती चा ताबा घेतला .   
इं. संदीप ने बारकाईने तपासणी केली . 

गोपी सरांना कुणीतरी जवळून गोळी घातली होती . त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीत  असलेला जॉन धावत तिथे आला होता ;  त्यामुळे सगळ्यात आधी  त्यानेच  गोपी सरांना खाली पडलेलं बघितलं होतं .  
वंदनाला प्रचंड मानसिक धक्का बसला होता . सगळं सुरळीत सुरू असतांना , इतकी मोठी संधी मिळाली असतांना हे काय भयानक घडलं?.. गोपी सरांशी कुणाचं वैर? .. 
ती  विमनस्क अवस्थेत एक कोपऱ्यात बसली होती . शेजारी निखिल कुमार निवांत पेपर वाचत बसला होता .

वंदनाला आश्चर्य वाटले . अर्ध्या तासापूर्वी घटना घडली , मृतदेह अजून इथेच पडलाय , सगळे प्रचंड हादरले आहेत ;  आणि  हा  माणूस इतका.. शांत कसा राहू शकतो? 
” सर , तुम्हाला झालेल्या घटनेचा धक्का नाही बसला? वाईट नाही वाटलं? ” 
” धक्का जरूर बसला , पण वाईट नाही वाटलं .. कारण मी नंतर सांगेन. ”  निखिल म्हणाला . तिला ते थोडं गूढच वाटलं . 
तपास पथकाने बोटांचे ठसे , पडलेले काडतूस आणखी एक दोन वस्तू ताब्यात घेतल्या .  गोपी सरांच्या खिशातला  मोबाईल त्याच्या खिशातच असल्याने त्यातून बरीच माहिती मिळणार होती .

स्टुडिओ चे मालक  प्रेमजी आपली बदनामी होऊ नये म्हणून खुनाची बातमी पेपर मध्ये न देण्या बाबत विनंती करत होते . 
इं. संदीप नि चौकशी सुरू केली .
जॉन ला गोपी सरांच्या ओरडण्याचा आवाज आला , पण पिस्तूलाचा आवाज आला नव्हता . त्याने कुणाला पळून जातांनाही पाहिलं नव्हतं . तिथे एक मोठी खिडकी असल्याने मारेकरी तिथूनच पळून गेला असणार असे त्याचे मत होते. 
” जॉन , तू ह्या शेजारच्या खोलीत काय करत होतास? “

” सर हा वेशभूषा आणि केशभूषा विभाग आहे. मी कपड्यांच्या घड्या घालत होतो .”
संदीप ने सुरक्षा अधिकाऱ्याला बोलावलं . 
” तू सकाळ पासून इथे ड्युटीवर आहेस? “
” हो साहेब.”
” ह्या खोलीची खिडकी तुला बाहेरून दिसते?” 

” नाही साहेब . मी समोरच्या दरवाजापाशी असतो.” 
” पण ह्या खोलीत येण्यासाठी एक तर समोरचा दरवाजा किंवा ही खिडकी हे दोनच मार्ग आहेत . कुणी अनोळखी व्यक्ती आत आली होती का?”
” अं s , हा , आज चहा घेऊन येणारा पोरगा नवीन कुणीतरी होता .” 
” तो  चहा देऊन केव्हा वापस गेला?” 
” तो s s ”  त्याने ओठांचा चंबू करत आठवायला सुरुवात केली . 

 ” तांबे , पहा बरं कुणी चहा वाला इथे आहे का?”  
नंतर इं . संदीप ने  आपला मोर्चा दिग्दर्शक चंद्रकुमार यांच्याकडे वळवला . 
” सांगा सर , गोपी सरांचं  कुणाशी वैर वगैरे…”
” नाही साहेब , वैर तर नाही , पण त्यांची खूप उधारी बाकी होती. त्यांनी तेजा सिंग ह्या व्यापाऱ्याकडून काही लाख उचलले होते व्याजावर. तो प्रचंड मागे लागला होता पैसे वापस करा म्हणून. शेवटी गुंडच तो..”
” पण  मग खून करून वापस मिळणार का  ते पैसे?”  इं. संदीप ला हे कारण पटत नव्हते. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असं त्याचं अनुमान होतं .

हवालदार तांबे आले होते..
“सर , चहाची किटली आणि कप इथेच आहेत टेबलावर. त्यावरचे ठसे घेतलेत . पण चहा वाला गायब आहे. “
इं. संदीप ने बरोबर आहे , असे दर्शवत मान हलवली . त्याचा अंदाज सहसा चुकत नसे . 
त्याने आणखीन काही  जणांची जबानी घेतली , आणि सगळ्यांना जाण्यास परवानगी  देऊन आणि बॉडी पोस्टमार्टेम साठी हलवली .” तांबे , समोरच्या टपरीवर जाऊन ही किटली आणि कप जमा करून खोलात चौकशी करा .”  इं. संदीप च्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते .

गोपी सर नसतांना आपलं काय होणार .. ‘नृत्यागामीनी’  साठी चंद्र कुमार पुन्हा महिमालाच बोलावतील का.. असा विचार करत आपल्याच नादात वंदना घरी चालली होती .
बस स्टॉप पर्यंत जातांना अचानक मागून एक रिक्षा भरधाव आली . आणि तिच्या अगदी जवळ येऊन करकचून ब्रेक लागून थांबली.
एकदम घाबरून ती रस्त्याच्या कडेला सरकली ; तसा रिक्षा ड्रायव्हर बाहेर तोंड काढून हळूच बोलला , ”  मॅडम आता गोपी नंतर तुमचा नंबर लावायचा नसल एकदम चुप्प बसायचं. कसं? ” आणि घाणेरडं हसून त्याने रिक्षा भरधाव हाकली . 

तिला काहीच बोध झाला नाही . हा कोण माणूस? ..मला गप्प रहायला का सांगतोय? ..गोपी सरांच्या खुनाशी माझा काय संबंध? नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला . 
बस मध्ये बसल्यावर तिने निखिल कुमार ला फोन केला .
” सर , मला भीती वाटतेय. आत्ता एक जण मला धमकी देऊन गेला.”
” तुला?..तुझा काय संबंध?”

” तेच तर.”
” उद्या इन्स्पेक्टर आपल्या चौकशीला नक्की येणार . तेव्हा हे जरूर सांग . घाबरू नकोस.”  निखिल ने तिला धीर देत म्हटलं. त्या भीतीच्या छायेतच ती घरी पोहोचली. 
” कुठं होतीस इतका वेळ?” दारुच्या नशेत जीवन खेकसला .
” कुठं असणार? कुणीतरी  पैसे तर कमवावे लागतील न? किशोरची फीस भरावी लागेल , घराचं भाडं , शिवाय…”
तिचं बोलणं पूर्ण होण्या आधीच जीवन ओरडला , “चूप !! जास्त बोलू नकोस!

किती पैसे पाहिजेत तुला? दहा हजार? वीस हजार? मी देतो ! मी! समजलं?.. हे बघ . माझ्याकडे आहेत पैसे ..तुला काय वाटतं? ..”  असं बरळत तो कपाटाकडे गेला .
पण त्याला इतकी भयानक चढली होती , की  तो मधेच तोल जाऊन पडला , आणि तिथेच झोपी गेला.  
वंदना ला  आपल्या स्वतःची कीव येत होती . तिची आई  तिच्या जन्मानंतरच   वारली  म्हणून बापाने दुसरं लग्न केलं . ती सावत्र आई अतिशय  शौकीन आणि नखरेल होती . तिने वंदनाचा छळ नाही केला , पण कधी लक्ष्य पण नाही दिलं . 

किशोर च्या जन्मानंतर  त्याला वंदनाच्या भरवशावर सोडून ती कुणाबरोबर  पळून गेली होती . 
आता इतक्या मेहनतीने वंदनाच्या वाट्याला ‘ नृत्यागामीनी’  ची संधी येत असतानाच हे असं  सगळं घडलं होतं .
वडीलांपाशी बसलेल्या वंदनाला अचानक त्यांनी उल्लेख केलेल्या पैशाची आठवण आली . लगेच उठून तिने कपाट उघडलं . त्यात कोऱ्या नोटांचं बंडल होतं . 
‘चक्क तीस हजार?.. इतके पैसे बापूकडे कसे आले?.. बिडी साठी आपल्याकडून पैसे मागणाऱ्या माणसाकडे इतके पैसे? ‘   ती  खूप भांबावून गेली होती . ही कुठल्यातरी अमंगळाची चाहूल असावी असे वाटली तिला .

रात्री उशिरापर्यंत इं.संदीप आणि सगळी टीम पोलीस स्टेशनमध्येच होते. इं. संदीप विचार करत होता . 
फिल्म स्टुडिओ समोरील चहावाल्या कडून काही वेगळंच सत्य समजलं होतं . खून झाला त्या दिवशी चहाची टपरी बंद होती , आणि त्याच्याकडून चहा गेलाच नव्हता . त्या दिवशी टपरी बंद  असणार आहे हे खुन्याला माहीत होतं तर..
सबइंस्पेक्टर राणे आले होते .
” सर , आम्ही गोपी च्या घरी जाऊन आलो . त्यांचे कुटुंबीय इथे रहात नाहीत. ते  हैदराबाद ला असतात .गोपी इथे एकटेच एका फ्लॅट मध्ये रहात होते. 

आज त्यांचा मुलगा आणि सून आले आहेत , बॉडी त्यांच्या ताब्यात देण्यात येईल .”
” राणे , गोपी च्या कॉल लिस्ट मध्ये जो एक नंबर वारंवार दिसतोय , त्याची माहिती काढलीये न? . “
” हो सर , आणखी  एक  मुद्दा सर……” 
सबइन्स्पेक्टर राणेंनी तपासातील काही धागेदोरे  संदीप च्या लक्षात आणून दिले. 
संदीप  मिळालेल्या माहाती वरून सगळा घटनाक्रम जुळवत होता .

संध्याकाळी पाच ला शूटिंग सुरू असताना चहा वाला आला होता . एकीकडे काहीजण चहा घेत असतांनाच  गोपी सरांना एक फोन आला.
आवाजाचा त्रास नको म्हणून ते फोन घेऊन आत मेकअप रूम मध्ये गेले…त्याच वेळात तिथे मारेकरी आला , त्याने  जवळून गोळी झाडली , गोपी ओरडले , पलीकडच्या खोलीतून जॉन धावत आला , तोपर्यंत मारेकरी पसार झाला होता . 
” सर , गोपींना  संध्याकाळी चेन्नई वरून फोन आला होता. आपली टीम उद्याच पहाटे जाईल तिकडे .”

” राणे , फोन येणं , गोपींनी आत जाणं , आणि मारेकऱ्याने तयार रहाणं ह्यात संगती आहे. कुणीतरी असा आहे , ज्याला हे पक्क माहितेय की फोन आल्यावर गोपी सर सहसा तिकडेच जातात. ह्या जॉन वर लक्ष ठेवा .” 
इं. संदीप चा फोन वाजला .
” हां बोला तांबे ….काय?..नो! “
” काय झालं सर?”
” जॉन चा खून झालाय.” 
*******
(क्रमशः)
भाग 3 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!