नृत्यगामिनी ( भाग 3 )

भाग 1 इथे वाचा
भाग 2 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे 
कपाटातील पैसे पाहून वंदना खरं तर घाबरली होती . दारूच्या आहारी गेलेला आपला आजारी बाप कुठल्याही थराला जाऊ शकतो , त्या अंमलाखाली सगळी नीतिमत्ता शून्य असते , ह्याची तिला चांगलीच जाणीव होती. 
त्या रिक्षेवाल्याने दिलेली धमकी आणि  आता हे पैसे याचा काही संबंध असू शकतो का याचाही विचार ती करत होती .
बरीच रात्र झाली होती , आणि सकाळी पुन्हा स्टुडिओ ला जाणे भाग होते . ती झोपायच्या तयारीत असतांना निखीलकुमार चा फोन आला.

” बोला सर .” 
” काल आपल्या शूटिंग च्या वेळी तुझे जॉन शी काही बोलणे झाले होते का?”
” जॉन शी ?.. नाही .. हा s , त्याने मला  माझे  पुढच्या दृश्याचे कपडे  आणून दिले होते. ..का विचारताय?”
” त्याचा खून झालाय .”
” काय??”  ती जोरात ओरडली.
” हो ,मला वर्माजींनी सांगितलं.” 

निखिल ने तिला काळजी घेण्यास सांगितलं , आणि वंदनाला प्रचंड दडपण आलं . चोवीस तासांच्या आत दोन खून? ..आणि आपल्याला देखील धमकी मिळालीय .  बधिर अवस्थेत ती बसली असतांना  अचानक बाहेर पाऊलांचा आवाज  आला आणि खिडकी वर काळी सावली  दिसली .
*******    
इं. संदीप ने जास्तीचे तपास पथक कामाला लावले होते . एक पथक चेन्नई ला रवाना झाले होते . तिथून गोपींना तीन चार क्रमांकावरून  फोन येत होते , अगदी खुनाच्या वेळेपर्यंत . 

दोन जण व्यापारी तेजा सिंग कडे चौकशी साठी गेले होते , कारण गोपींनीं तेजाकडून मोठी रक्कम उचलली होती .
जॉन चा  आणि गोपींचा खून अगदी सारख्याच पद्धतीने झाला  होता . जवळून गोळ्या घालून . 
” राणे , आपल्या आर्टिस्ट ला आज स्टुडिओ मध्ये पाठवा . त्या चहा आणणाऱ्या मुलाच्या हातांचे ठसे आपल्याकडे रेकॉर्ड मध्ये नाहीत , म्हणजे नवा गडी दिसतोय . त्याचं स्केच बनवा . जातो कुठं , लगेच आवळू त्याला .” 
” सर , दोन्ही खून एकाच रिव्हॉल्वर ने करण्यात आले आहेत , म्हणजे गोपीच्या मारेकऱ्याला  जॉन नि  नक्कीच पाहिलं आणि ओळखलं असणार. त्यामुळेच जीव गमावला असणार त्याने .” 

 सबइन्स्पेक्टर काळे आले होते.
” बोला काळे.”
” सर , तेजा कडून गोपींनी दहा लाख कर्ज घेतलं होतं. त्यांना  ‘ गोपी डान्स अकॅडमी’  च्या इमारतीचा विस्तार करायचा होता . पण त्यातले सहा लाखाचे कर्ज त्यांनी फेडले होते , आणि त्यांच्या पत्नीचं सोनं देखील हमी म्हणून ठेवलं होतं .”
” हम्म . मला वाटतच होतं की हे नक्कीच खूनाचं कारण नसणार …..त्या अभिनेत्री महिमाचं काय?…सगळ्यांसमोर धमकी दिली होती बाईने .” 

” सर , महिमा मॅडम शी आम्ही सविस्तर बोललो .  नृत्यगामीनी  च्या प्रमुख भूमिकेसाठी  त्यांच्या ऐवजी नवीन मुलगी ..कुणी वंदना आहे , तिला घेतल्याने ती चिडली होती , पण तिचा राग गोपी पेक्षा  दिग्दर्शक चंद्रकुमार वर जास्त होता . त्यांचा ह्याच्यात  काही हात असेल असं वाटत तर नाही .” 
” ठीक आहे , पण नजर ठेवा . चला , सकाळी लवकर स्टुडिओ मध्ये जाऊ . 
हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही काळे . ”  गोपी च्या खुनामागे नेमका हेतू अजून लक्षात येत नव्हता , आणि हीच बाब इं. संदीप ला टोचत होती .

वंदना चा भीतीने थरकाप झाला होता . खिडकी च्या काचेवर स्पष्ट काळी आकृती दिसत होती . तावदानाला पडलेल्या मोठ्या छिद्रातून कुणीतरी आत बघतय हे तिच्या लक्षात आल्या बरोबर तिने लोळण घेत स्वतःला पलंगाखाली भिंतीशी  चिटकून घेतले . तिचा श्वास जड झाला होता . 
काही सेकंदात पावलांचा आवाज खिडकी पासून दूर जातांना ऐकू आला.
ती पलंगाखालून बाहेर आली तर पूर्ण घामाने ओली झाली होती . जीवन मात्र 

अजूनही गाढ झोपेतच होता. का कोण जाणे पण वंदनाला निखिल कुमारला फोन करावासा वाटत नव्हता .
तिच्याजवळ  इं. संदीप चा संपर्क क्रमांकही नव्हता , कारण हे प्रकरण आपल्यापर्यंत येईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते . 
गेल्या काही तासात आपल्या भोवती इतक्या वेगात  प्रचंड भयानक घटना का घडल्या असाव्यात या विचाराने ती पार हादरून गेली होती.
उद्या सकाळी स्टुडिओ मध्ये पोलीस आले की आधी आपण त्यांना हे सांगू असे मनाशी ठरवत ती झोपी गेली . 

सकाळी दहा वाजता ती स्टुडिओ मध्ये पोहोचली तेव्हा सब इन्स्पेक्टर  राणे हे झिया , निर्मला आणि तेथील स्पॉट बॉय यांची चौकशी करत होते .  त्यांच्या सांगण्यानुसार जॉन ने काही दिवसांपूर्वीच घरात बऱ्याच महागड्या वस्तूंची खरेदी केली होती आणि इं. संदीपनी देखील रात्री जॉनच्या घरी ही बाब  त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती . 
फोन आला की गोपी सर मेकअप रूम मध्ये जातात हे तिथे सर्वांनाच माहीत होते . अर्थातच जॉन ही हे माहिती असणार . 

इं. संदीप च्या हातात चहा घेऊन आलेल्या  संशयित मारेकऱ्याचे रेखाचित्र होते .
बारीक दाढी , कपाळावर खोक , आणि दाट केस . त्यांच्या चित्रकाराने मिळालेल्या वर्णनानुसार अतिशय व्यवस्थित चेहरा रेखाटला होता . ते रेखाचित्र त्याने ताबडतोब  आपल्या डिजिटल लॅब ला पाठवले .
तोपर्यंत वंदना आली होती .
दिग्दर्शकचंद्रकुमार आणि वर्मा डोकं धरून बसले होते . 

ती सरळ इं. संदीप कडे गेली . तिच्या नजरेवरूनच संदीप ला तिची चलबिचल लक्षात आली . तिला वेगळ्या खोलीत चौकशी साठी बसवण्यात आलं . 
तिने एक दमात जे काही घडलं  ते सांगितलं.
संदीप चे डोळे चमकले . काहीतरी धागे हातात येण्याची शक्यता होती . 
” वंदना , गोपी सर हे  एक माणूस म्हणून कसे होते?” 

” सर , ते अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व  होतं . कधीही कुणाला दुखवत नसत.” 
” पण निखिल कुमार तर म्हणे की ते स्त्री कलाकार किंवा नृत्यांगनांना  नीट वागवत नसत?” 
” सर , फक्त महिमा बाबतीत ते थोडे नाराज असत कारण ती कधीच वेळ पाळत नसे . तीच्या मुळे त्यांचा खूप वेळ वाया जात असे .”
” आणि जॉन ?”

” अं s , तो जास्त कुणाशी बोलत नसे , पण त्याला महागड्या वस्तूंची फार आवड किंवा ओढ होती .”
” जसं ?” 
” जसं s , महागडा फोन , बाईक , कपडे .. असं . “
” त्याचं गोपीशी काही भांडण..”
” नाही सर , उलट तो काम नसेल तेव्हा सतत त्यांच्या सोबतच असायचा. ” 

चेन्नई ला चौकशी साठी गेलेल्या तांबेंच्या  पोलीस पथकाला काही अत्यंत महत्वाची माहिती मिळली होती . ह्या केसमधील एक  सशक्त कडी . 
गोपी सरांना खुनापूर्वी संध्याकाळी पाच वीस ला जो फोन आला होता , तो एका सार्वजनिक फोन वरून करण्यात आला होता . त्या व्यतिरिक्त आणखी दोन क्रमांका पैकी एक फोन तेथील एका उच्चभ्रू  वस्तीतून केल्या गेला होता . पथक अजून तपास करतच होते . 

इं संदीप , सब इन्स्पेक्टर राणे हे स्टुडिओ ची बारकाईने पाहणी करत असतांनाच वंदना धावत आली . 
ती कमालीची घाबरलेली होती. रडतच म्हणाली , 
” सर , सर , माझ्या छोट्या भावाचं त्याच्या आश्रम शाळेतून अपहरण झालंय !!”
(क्रमशः)
भाग 4 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे.
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!