नृत्यगामिनी  ( भाग 4 )

भाग 3 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे
‘किशोर सारख्या निष्पाप जीवाचं अपहरण का करावं कुणी?..आणि वंदना चा गोपी आणि जॉनच्या खुनाशी काय संबंध?’  ह्या विचारात संदीप  किशोरच्या आश्रम शाळेत पोहोचला .
चौकशीत लक्षात आले की किशोरला भेटायला एक व्यक्ती एक दोन वेळा येऊन गेली होती . किशोर त्याला दादा म्हणत होता . त्यानेच आपल्या जबाबदारीवर किशोर ला थोडं बाहेर फिरवून आणतो म्हणून सोबत नेले होते.
“तुम्ही त्या व्यक्तीला आधी बघितलं होतं? ” संदीपने  तिथल्या कर्मचाऱ्यास विचारले . 

“हो , तो किशोर च्या बहिणी बरोबर एकदा आला पण होता .”
म्हणजे हा तोच असणार..जो लग्न करावे म्हणून वंदनाच्या मागे लागला होता , आणि जीवनची म्हणजे तिच्या वडिलांची त्याला पूर्ण संमती होती हे वंदनाने त्याला सांगितले होते .
संदीप ला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता.
रजिस्टर मध्ये अपहरण कर्त्याने भलतेच नाव लिहिले होते ,  पण हा बबनच असणार ह्याची संदीप ला खात्री होती. 
ह्या लंपट बबन ला शोधणे ही संदीप साठी मामुली बाब होती . इ. संदीप स्वतःशीच हसला . 

सब इन्स्पेक्टर राणे आणि काळेंना संदीपने बोलावून घेतले होते . चेन्नई वरून तांबे आणि टीमला मोठे यश आले होते . आता निदान काही गोष्टींचा उलगडा होणार होता . शिवाय इं. संदीप ने आपले दोन हुशार माणसं बबन च्या घरावर पाळत ठेवायला पाठवले होते.
” मला बोलावल सर?” 
” ये , नृत्यगामीनी!”
” काय चेष्टा करताय माझी सर. मला वाटलं किशोर सापडला म्हणून सांगताय का .” 

” तुला कुणावर संशय आहे?”
” सर मी तुम्हाला सांगितलं होतं न ? त्या हरामखोर बबन विषयी? तो असू शकतो.” 
” yess !! हुशार आहेस. लगेच सापडेल तो . मुळीच काळजी करू नकोस….वंदना , तुझ्या आई वडिलांचं नाव सांग. “
” जीवन आणि गीता.  का विचारलत?” 

” तुला ग्रेट अभिनेत्री मेघना कुमारी माहितेय?..खरं तर त्यांना सगळे ‘नृत्यगामीनी’ म्हणत.”
” हो , माहितेय न सर . काही जण तर गमतीने म्हणतात की मी त्यांच्या सारखी दिसते . मला खूप भारी वाटतं मग.”
” का नाही दिसणार?  तुला सांगू ? दचकू  नकोस! तू तशी दिसतेस कारण तू त्यांचीच मुलगी आहेस .”
“………”
” वंदना ? काय झालं?”

तिचे डोळे भरले होते . ” सर , एक तर किशोर गायब आहे , वडील आजारी , मला घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत , आणि तुम्ही चेष्टा करताय. “
” नाही , चेष्टा नाही , तू खरंच मेघना कुमारी यांची मुलगी आहेस .” 
तिच्या साठी हा फार मोठा धक्का होता . ” आणि माझे वडील?” 
तिच्या प्रश्नाला संदीप उत्तर देणार इतक्यात  सब इन्स्पेक्टर राणेंनी काहीतरी  सांगितलं . संदीप ने फक्त मान हलवली .

” वंदना ,  बाबांच्या जवळ इतके पैसे मिळाले , तर तुला काय वाटलं ? ते कुठून आले असावेत?”
” सर , माझं डोकच चालत नाहीये . त्यांनी उधार घेतले का? कोण देणार दारुड्या आजारी माणसाला तीस हजार? …..एक सेकंद!….ओह! बबन नि दिले? ‘
“हो . आणि हे पैसे का दिले तुला माहितेय.”
” तुम्हाला काय वाटतं सर ? माझे वडील बबन कडून पैसे घेतील?..नो!…सर ते शेवटी माझे वडील आहेत!!”

” हो वंदना . तुझं लग्न बबनशीच लावण्यासाठी त्यांनी हे पैसे घेतले . तुझे वडील असं करू शकत नाही . पण जीवन करू शकतो….”
” म्हणजे?”
”  म्हणजे तेच !  तू  जीवनची मुलगी नाहीस !!” 
वंदना हमसून हमसून रडू लागली.
एका स्त्री पोलीस कॉन्स्टेबल ने तिला शांत केले. 
” हे सगळं कसं समजलं सर?” ती सावरली होती. 

” गोपी ला आलेल्या काही फोन्स पैकी एक फोन होता , कमलाकर चा . त्याने सगळं सांगितलं. “
” कोण कमलाकर?” तिने विचारले .
” आत्ता  त्याला इथे मुंबईत आणल्या जातंय . तेव्हा सगळा उलगडा होईल.”
” पण  मग गोपी सरांचा खुनी कोण?”
” लवकरच आम्ही सगळी उकल करू . काळजी नको करुस , त्या हरामखोर बबन ला आत्ता ताब्यात घेऊ आपण .किशोर ला काही होणार नाही . तुला सोबत सिक्युरिटी देऊ का ?”

” नाही सर , मी मॅनेज करेन.” 
सध्या  शूटिंग स्थगित केलं असल्याने  ती घरी जायला निघाली . रिक्षातून तिने झिया ला फोन लावला .
मीटर सुरू करण्यासाठी चालकाने हात मागे घेतला , आणि वंदना चमकली .
त्याच्या हातावर भाजल्याच्या ची खूण होती !! …..त्या चहा वाल्याच्या हातावर होती तशीच !! ..
ती रिक्षातून उडी मारणार इतक्यात  अजून एक राकट माणूस रिक्षात चढला होता !! 
******

एका पत्र्याच्या खोलीत बबनने किशोर ला बंद करून ठेवले होते . 
खूप सहज पाळत ठेवून इं संदीपनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या . वंदना त्याला अजिबात दाद देत नव्हती . पैसे घेऊन जीवन देखील लक्ष देत नव्हता म्हणून वंदना ला नामोहरम करून लग्नाला तयार करण्यासाठी त्याने हे केलं होतं . 
संदीप किशोर ला घेऊन वंदनाच्या घरी पोहोचला . 
” बाबा ! ” त्याने धावत जाऊन जीवन ला मिठी मारली. काही मिनिटात तो शेजारी खेळायला गेला. बाहेर एक कॉन्स्टेबल उभा होता.

आता संदीपनी जीवन चा ताबा घेतला. 
समोर खुर्ची टाकून बसत म्हणाला ,
”  का आणि किती पैसे घेतलेस बबन कडून ?” 
” मी?…न..नाही…” 
दुसऱ्या सेकंदाला तो  भेलकांडून खाली पडला होता .
” बोल लवकर!! “

“चाळीस हजार .  वंदू चं लग्न त्याच्याशी लावून द्यायला.” 
” वंदना कुठाय?”
” शूटिंग ला गेलीये.”  पुन्हा तो धडपडत खाली पडला . ह्यावेळेस संदीपचा हात जबरदस्त चालला होता . 
” आज शूटिंग नाहीये . लवकर बोल !! कुठाय ती?…कुठे लपवलीये तिला?”
आता मात्र जीवनचा चेहरा बदलला .

” लपवली?  म्हणजे वंदू गायब आहे? साहेब , शप्पथ सांगतो , मला नाही माहीत. “
” हा राजन कुमार कोण आहे?..शिस्तीत उत्तर द्यायचं . आम्हाला सगळं समजलंय !! ”  हे नाव ऐकून
जीवन चा चेहरा पांढरा पडला .
” तुम्हला कोणी सांगितलं? “
” जास्त बडबड नाही. बक !!! ”  संदीप ओरडला .
” राजन कुमार हा संतोष कुमार साहेबांचा मुलगा . लै मोठे श्रीमंत साहेब होते संतोष कुमार ……”
जीवन ला आपल्या वैयक्तीक ताब्यात घेऊन  संदीप ने किशोर ला पुन्हा आश्रम शाळेत नेऊन पोचवलं.  
*********

वंदना ला घेऊन ती रिक्षा एका निर्जन पडक्या घराजवळ थांबली. 
तिचे तोंड बांधले होते . फक्त रिक्षावाला तिला घेऊन आत गेला . दुसरा अरदांड माणूस बाहेरच थांबला.
आत एका मोडक्या खुर्चीत एक तगडा तरुण बसला होता . बाजूला आणखी दोन जण .  त्याच्या कडे काही कागदपत्र होते . 
” ओहह !!  वंदना !! फार त्रास झाला तुला शोधायला ! बरेच वर्ष लागले !”
” कोण तू? ..मला इथे का आणलं?”

” हे बघ माझी तुझी बिलकुल दुश्मनी नाही . तू फक्त ह्या कागदांवर सह्या कर . आम्ही तुला मोकळं करतो .” 
वंदना ला किंचित कल्पना आली , की हेच तेच लोक आहेत , आपल्याला धमकावणारे. 
” तुम्ही मारलं गोपी सरांना? आणि माझ्यावर पाळत ठेवत होता …”
” हे बघ , तू फक्त ह्या कागदांवर सह्या कर .  आणि हो !! तू नृत्यगामीनी ची भूमिका करायची नाहीस . नाहीतर…”
” कशाचे कागद? कोण तुम्ही? मी तुमचं का ऐकावं? ”  ती म्हणाली , आणि एक जोरदार फटका बसला तिच्या मानेवर .

ती पडली , आणि तोंडातून रक्त यायला लागलं.  
तो तावातावाने तिच्या कडे गेला . तिचे केस धरून दात खाऊन ओरडला , 
” बऱ्या बोलाने सही कर , नाहीतर ..”
” त्या कागद पत्रात काय आहे हे सांग मला !! मग मी करेन सही ! ” 
” तू अशी नाही ऐकणार ! ये रे लाखन आत !! हिला वर पाठवू हिच्या गोपी सरांकडे!! ”  आणि सगळे हसले .
लाखन रिव्हॉल्वर घेऊन सरसावला , आणि बाहेर थांबलेला अरदांड म्हणजे साध्या वेशातील पोलीस ऑफिसर वेगात आत आला .

” खबरदार कुणी जागचे हलाल  तर. पाठीमागून इं. संदीप , सबइन्स्पेक्टर राणे आणि पोलीस पथक आले होते. त्यांनी वेगात हालचाली केल्या . पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना बेड्या घालून बांधून ठेवले .
 ” राजन कुमार ! तुझा खेळ खलास!! राणे , ते पेपर्स ताब्यात घ्या. ”  संदीप ने  बाकी सगळ्यांना पोलीस व्हॅन मध्ये घालून रवाना केले. हे सगळं सहन न होऊन वंदना एका कोपऱ्यात डोकं धरून बसली होती . 
******”

“वंदना , हे बघ कोण आलेत. ” संदीप म्हणाला . 
ते एक साधे कपडे घातलेले साठीतील गृहस्थ होते . ते पुढे झाले , मायेने वंदनाच्या डोक्यावरून हात फिरवला . 
जीवन उठून उभा राहिला .
” कमलाकर? तू?…इतक्या  वर्षांनी? “
” सर हे कोण?  मला मारायला निघालेला तो माणूस कोण? ” वंदना खूप गोंधळात पडली होती. 
” आता सगळा खुलासा हे कमलाकर करतील… सांगा कमलाकर , आणि करा सगळा खुलासा . ”  संदीप म्हणाला , तसे सगळेच सावरून बसले. वंदना चा जीव  सगळा कानात गोळा झाला  होता . 

कमलाकर सांगू लागले, “तीस एक वर्षांपूर्वी मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना कुमारी यांची भेट  प्रचंड श्रीमंत निर्माते  संतोष कुमार यांच्याशी झाली .  त्यांनी तिला तामिळ चित्रपट देऊ केले . मग मेघनाचा स्वीय सहायक कमलाकर म्हणजे मी , , मेकअपमन गीता , आणि गीताचा नवरा जीवन  ह्या तिघांसोबत ती चेन्नई ला गेली .   
तिथेही  तिचे चित्रपट खूप गाजले आणि तिने संतोशकुमारशी लग्न केलं .  मग मी सगळं घर सांभाळत त्यांच्यासोबतच  राहू लागलो. वर्षभरात त्यांना मुलगी झाली.. ती ही वंदना . त्यानंतर संतोष कुमारचे तिच्यातील स्वारस्य संपले .
त्यांचे आधीच एक लग्न झाले होते , एक मुलगा ही होता . ही गोष्ट मेघना पचवू शकली नाही , आणि तिने अंथरूण पकडले .

एकदा दवाखान्यात तिची भेट संतोषकुमारशी झाली . त्यांनी मेघनाकडे जाऊन आपली काही मालमत्ता  वंदनाच्या च्या नावावर  करण्याची तयारी दाखवली . तसे कागदपत्रही तयार केले . त्यांनी आपली करोडो ची मालमत्ता वंदनाच्या नावावर केली , आणि कागदपत्रे मॅडम कडे म्हणजे मेघना कुमारी कडे आणून दिले . मॅडमचा माझ्यावर अत्यंत विश्वास होता .
आपला अंत जवळ आला हे समजल्यावर त्यांनी आपली  मेकपमन गीता हिला बोलावले . गीता आणि जीवन जवळपास दहा वर्षं मॅडम सोबत होते . त्यांना मुलबाळ नसल्याने मॅडम नी वंदनाला गीताच्या स्वाधीन केले, तेव्हा ती फक्त सहा महिन्यांची होती” कमलाकर नी दीर्घ श्वास घेतला .

हे ऐकतांना वंदनाला गदगदून येत होते .  ” आई ला खूप वाईट वाटले असेल न मला असं देतांना? ” 
” हो . तुला जीवन गीता कडे देतांना त्यांनी खूप मोठी रक्कम , आपले दागिने , सगळं गीताला देऊन टाकले .
फक्त  कुमार साहेबांनी दिलेल्या प्रॉपर्टी चे पेपर्स माझ्याकडे दिले . आता गीता कुठे आहे?”
” गीताआई जिवंत असली असती तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती . पण ती देखील कॅन्सर ने गेली.” वंदना म्हणाली . 

” ओहह !  मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला . कुमार सरांनी त्यांची बाकी सगळी प्रॉपर्टी राजन कुमार च्या नावावर केली होती . त्यांनी आपल्या विल मध्ये लिहिले होते की जर वंदना चा अपघाती मृत्यू झाला , किंवा तिने स्वखुशीने  तिचा हिस्सा राजन ला दिला तरच तिच्या प्रॉपर्टी वर राजन चा हक्क असेल . नाही तर अठरा वर्षा नंतर वंदना त्या प्रॉपर्टी ची मालक असेल . ” 
” पण मग काका , गोपी सरांचा खून? ” 
” हम्म . मेघना मॅडम मुंबईत असतांना त्यांचे नृत्यदिग्दर्शक होते गोपी. मॅडम चा एक  चित्रपट खूप तुफान गाजला …

‘ नृत्यगामीनी ‘ !  तेव्हा गोपी सर त्यांच्या प्रेमात पडले . अतिशय जीवापाड प्रेम होतं त्यांचं . पण मॅडम कुमार साहेबांबरोबर  तिकडे दक्षिणेत निघून गेल्या , सोबत आम्ही तिघे पण गेलो …”
” म्हणूनच गोपी सरांचा ह्या  ‘रिमेक’  फिल्म मध्ये इतका जीव होता तर.  पण त्यांना कुणी मारले? आणि का ? “
” कुमार सरांचं विल वाचल्या नंतर राजन कुमार रागाने पागल झाला . तुला संपवून टाकण्या साठी त्याने तुझा शोध घ्यायला सुरुवात केली . त्याला कुठून तरी गोपी बद्दल कळालं . म्हणून मी आधीच गोपी सरांना फोन करून सगळं सांगितलं . त्यांना मी वंदना , जीवन आणि गीता बद्दल सांगितलं . …काही दिवसातच त्यांच्या लक्षात आलं की तूच मॅडम ची मुलगी आहेस , तशी दिसतेस आणि तितकीच सुंदर नृत्य करतेस . “

” पण खून कोणी केला?” 
“सांगतो . राजन नि दोन वेगळ्या सिम कार्ड वरून गोपींना फोन केले . कसंही करून वंदूला प्रसिद्धी झोतात नका येऊ देऊ , तिचा पत्ता आम्हाला द्या , तुम्हला मोठी रक्कम मिळेल .. असे आमिष दिले . पण गोपी सरांनी उलट त्याला धमकी दिली की ते सगळं पोलिसात सांगतील …..म्हणून .”
” पण जॉन?..त्याला का मारलं?” 
” तुझी सगळी माहिती जॉन नी राजन ला पुरवली . तोच गोपीवर नजर ठेवून होता . राजन ने  त्याला मोठी रक्कम दिली , पण त्याची लालसा वाढतच  गेली . वंदू ची दीडशे दोनशे कोटींची मालमत्ता राजन ला मिळणार हे समजल्यावर तर तो आणखीनच हावरट झाला होता . वारंवार धमकी देत होता .”   कमलाकर ला इतकं सगळं बोलून दम लागला होता . 

जीवन नी त्याला पाणी दीलं आणि वंदनाला म्हणाला,  “वंदू , मी तुझी माफी मागतो . बबन सारख्या माणसाशी पैसे घेऊन तुझं लग्न लावायला निघालो होतो.”  वंदना ने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
मग संदीप पुढे सरसावला .
” गोपींच्या आणि जॉन च्या खुनात इथल्या कुणा मारेकऱ्याचा हात आहे हे आमच्या लक्षात आले होते . आम्ही चहा घेऊन  स्टुडिओत येणाऱ्या माणसाच्या शोधात होतो . आमच्या कडे त्याचे रेखाचित्र होते . शिवाय तू आम्हला रिक्षावाल्याने धमकी दिल्याचे सांगितले  आणि  तेव्हा पासून आमचे माणसं त्याच्या शोधात होते . 

त्या दिवशी खोटी दाढी लावून स्टुडिओत आला होता हरामखोर !  तुझ्या घरी रात्री तो रिक्षावाला लाखनच आला होता . आमचा माणूस तिथे ही पाळत ठेवूनच होता ,  कारण आम्हाला तुझ्या जीवाची काळजी होती .”
” म्हणजे काल रिक्षात माझ्या शेजारी…..”
” तो आमचाच माणूस होता , त्याने लाखन शी मुद्दाम मैत्री केली होती.”
वंदना उठली . तिचे डोळे वाहात होते . तिने कमलाकर यांना वाकून नमस्कार केला . त्यांनी तिच्या हातात संतोष कुमार यांच्या सहीचे प्रॉपर्टी चे कागदपत्र ठेवले . वंदना आता करोडोंची मालकीण झाली होती.

 ” काय मग मॅडम ? आता काय करणार? “
” आधी माझ्या किशोर ला आश्रमातून माझ्याजवळ आणून घेणार. बिचारा तिथे रहातोय गेली दोन वर्ष.”
तिला चंद्रकुमार चा फोन आला होता .
” वंदना , उद्या पासून शूटिंग सुरू करायचय. आणि हो , तूच असणार आहेस नृत्यगामीनी !!!! ” 
वंदू नी कृतद्यतेने नमस्कार करून ,  भरल्या डोळ्याने  इं.संदीप आणि सगळ्या पोलीस स्टाफ कडे बघितलं . 
आणखी एका केसचा इतक्या कमी वेळात तपास केल्याचे समाधान इं. संदीप च्या चेहऱ्यावर झळकत होते.
( समाप्त)
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!