पाऊलखुणा

©समीर खान
नोमान मंजिलच्या चिंचोळ्या गल्लीतल्या जागेत लोकांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली होती. वार्‍याच्या वेगाने बातमी पसरली होती. तशी गर्दी वाढत होती. माझा निष्प्राण देह येण्यास अजून अवधी होता. त्या काळापुरताच मी माझ्या प्राणप्रिय “नोमान मंजिल” जवळ थबकलो होतो.
प्राणहरण करतानाच भयंकर दोन दुत मला सोबत खेचून घेऊन जात होते आणि ईथे मला काही वेळ सोडत ते दिसेनासे झालेत. कदाचित शेवटचा काही अवधी देत असावेत. यानंतर काहीच दिसणार नाही. सर्व आलेत. काही येताहेत.
पण… तो? येईल का? नाही येणार बहुतेक.. पण मग… तशी बातमी “त्याच्या” पर्यंत पण पोहोचली असेलच .

“हॅलो ऽऽ समीर, हा सुन.. जल्दी से “नोमान मंजिल आ जा.. “
“पर भाई ,पता है ना ,मै फुफी के यहाँ नही जाता. “
“हाँ, सब पता है…आपसी रंजिशे और बाते है और ये बाते और… जावेद भाई नही रहे… ” 
“क्या ऽऽऽऽऽ???” समीर जोरात किंचाळलाच. 

काॅल कट झाला. फुफीच्या घरून फोन होता. जावेद.. समीरचा आतेभाऊ, अचानक हार्ट अॅटॅक ने अवघ्या ३८ वयातच अल्ला ला प्यारा झाला होता. तसा  समीर काही वेळ सुन्न झाला होता.
त्याने डोळे गच्च मिटून घेतले तर डोक्यातील विचारांच्या ज्वाळांची धग डोळयांपर्यत जाणवत होती. एक खोल ऊसासा सोडत तो जाण्यास निघला.
अर्ध्या दिवसाची रजा सांगत त्याने काॅल कट केला व लॅपटॉप बॅगेत कोंबत विचारातच तो पार्किंग एरियात आला आणि कारकडे वळला. चावी लावत कारचा दरवाजा उघडला व बाजूच्या सीटवर बॅग ठेऊन रोजच्याच सफाईने कार त्याने पार्किंग मधून काढली.

कारचा AC फुल्ल होता तरी कानामागून घामाची धार घरंगळत थेट मानेपर्यंत आली तसा तो काहीसा चिडचिडला आणि कारचा वेग वाढवला तसा डोक्यांतील विचारांचा वेगही तितकाच वाढला होता.
तो थेट वयाच्या अकराव्या वर्षांत जाऊन पोहोचला. “नोमान मंजिल” चिंचोळ्या गल्लीत ईमारत असूनही त्यावरची अक्षरे ठळक रस्त्यावरूनच दिसत होती. त्याने गाडी रस्त्याच्या बाजूलाच पार्क केली आणि ती अक्षरे वाचतच खाली ऊतरला.  

 मी जावेद.. जावेद नोमान खान. समीरचा आतेभाऊ. आता मी या जगात नाहीये. काही वेळातच माझ्या नश्वर शरीराचं अंतिम संस्कार होईल आणि हा आत्मा स्वर्गात की नरकात? माहित नाही मला. काहीच माहीत नाही. पुर्ण आयुष्यात मी अनेक कामं केलीत. काही चांगली काही वाईट तर एक अपराध ही घडलाय माझ्याकडून.
समीर.. मी समीरला… आला, तो आला.. अजूनही तितकाच कातिल दिसतोय समीर. गोरापान, मोठाले मासोळी डोळे, आता तर हलक्याश्या दाढीत अजून खुलून दिसतोय. पण… हे मी काय करतोय? तेच जे ईतक्या वर्षांपूर्वी केले होते? काही वेळातच दोन्ही दुत पुन्हा हजर होतील आणि या आत्ता केलेल्या कृत्याचाही मला हिशोब द्यावा लागेल. 

मंजिलमधल्या तिन्ही भावंडांची गडबड वाढली होती.पहिल्या मजल्यावर हाॅल पुर्ण रिकामा करून ठेवला होता. खाली पाणी तापवण्यासाठी मोठी चुल मांडली गेली होती. मोटरी लावून मोठे दोन ड्रम भरून ठेवलेले होते. सर्व नातलग जमा होत होते. आत बायकांचे रडण्याचे आवाज वाढले होते. कुणीतरी अॅम्ब्युलेंस येण्याची वर्दी दिली तशी मंजिलमधली लगबग वाढली होती. समीर आता पुरूषांच्या गर्दीत तिथे सामावून गेला होता. 
” मौलाना आ गये क्या? ” वयस्कर चाचाजींनी सर्वांना भानावर आणण्यासाठी आवाज दिला. 
“सब तैय्यारी हो गयी क्या?अन्वर ,अकबर जाओ जाके निचे का ईंतेजाम देखो. सब औरतो को यहाँ ऊपर हाॅल मे ठहराओ और ख्याल रहे कोई भी निचे ना आए.. “चाचा बसल्या जागेवरूनच सर्व व्यवस्था लावत होते. डोळे पुसत दोघेही खाली ऊतरले. 

अकबर आणि अन्वरने माझं कलेवर अॅम्ब्युलेंस मधून ऊतरवलं. त्यांच्या अश्रूंचे काही थेंब माझ्या शरीरावरही पडलेत. पण मी खरच या लायकीचा आहे का? आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक चुकांवर ते दोघे मी सर्वात लहान भाऊ म्हणून पांघरुण घालत आलेत मग ती त्या एरियात केलेली भाईगीरी असो की अवैध धंदे. 
अॅम्ब्युलेंस मधला तो निष्प्राण देह ऊतरवताना सर्व उपस्थित समुदाय गहिवरला. तसा समीर भानावर आला. नजर वर करत त्याने कटाक्ष टाकला. भक्कम काळी काया, मजबूत खांदे, सहा फुटी ते शरीर ,निर्जिव असले तरी तितकेच आणि तसेच अजूनही धडकी भरवत होते . 
मला पाहून समीरच्या चेहर्‍यावर अजूनही भितीदायक भाव आलेत. पंधरा वर्षे लोटली “त्या ” घटनेला. पण? तो अकरा वर्षांचा होता आणि मी बावीस.

खरं सांगतो समीर, मला त्या वयात काहीच समजत नव्हतं. तितकं कधी डोकं चाललंच नाही रे माझं. पण नियती बघ, मी अवघ्या ३७ व्या वर्षीच ईथली यात्रा संपवली. ती पण कशी? पाणी पण नाही भेटले रे. फक्त एक जोरात असहनीय कळ छातीत आली आणि.. कदाचित त्या दिवशीही तुला अशीच कळ …
मौलाना आले तसे त्या देहास आंघोळीसाठी ऊभारलेल्या पांढर्‍या शुभ्र कपड्याच्या आडोशास नेण्यात आले. 
” आऊजबिल्लाही मिन्नशैतवान निर्रजिम.. बिस्मिल्लाह हिर्रहमान निर्रहिम….. ” पवित्र मंत्रांच्या जयघोषात अखेरची आंघोळ घातली जात होती. लोबानच्या धुराने सर्वत्र अंधुकतेसोबतच सुवासाचा अतिरेक झाला होता. त्यात सुरमा, अत्तर, ऊटणं, कापुर यांचाही सुगंध मिसळत एक वेगळाच दर्प व्यापला जात होता तसंतसं समीरला तिथे थांबणे अशक्य होत होते.

सर्वांची नजर चुकवत तो हळूच तिथून जवळच पण मोकळया ठिकाणी आला. थंड हवेची झुळूक त्यास सुखावून गेली. आणि तो त्या झाडाखाली पारावर बसला. बसल्या बसल्या त्यास तो त्याच्या बालपणात डोकवत होता. 
” भाई हम यहाँ क्यो आए है? सब तो वहाँ शादी मे है, मुझे नही जाना यहाँ ऊपर.. देखो वहाँ शादी मे सब खेल खेल रहे है. मुझे भी खेलना है. ” अवघ्या अकरा वर्षांचा समीर निरागसपणे जावेदला विचारत होता. 
” तुम्हे पता है समीर, एक नया खेल खेलनेवाले है हम, तुम्हे बहोत मजा आएगा. “
“हाँ, पर सिर्फ हम दोनो ही क्यो? सब को भी लो ना साथ मे.. “

 “नही समीर, ये खेल सिर्फ दो लोग खिलते है.. ” समीरवरची जावेदची पकड आता घट्ट झाली होती. काहीसा ओढतच त्याने “नोमान मंजिलच्या ” पहिल्या मजल्यावर समीरला आणले आणि दार आतून बंद केले. घाबरलेला समीर आता रडू लागला होता. सुरेख, सुंदर परींच्या, जिन्नच्या सुरम्य कथा तो जावेदकडून ऐकत असे. त्यास त्याच्या या गोष्टी खुप आवडत. काळा,धिप्पाड सहा फुटी जावेद बावीशीतला होता. तर गोरापान तितकाच सुंदर समीर अकरा वर्षांचा कोवळा मुलगा होता. जावेद समीरचा आतेभाऊ म्हणून कुणी शंका घेण्याचं काही कारणंच नव्हतं. 

” चुप हो जा समीर, नही तो जिन्न आ जाएगा ” असं म्हणत त्याने त्यास जवळ ओढलं. काहीशा अंधारलेल्या खोलीत जावेदच त्यास जिन्नसमान भासत होता. जोरात ओरडून ही काही फायदा नव्हता कारण पुर्ण मंजिल शादी मध्ये गेली असल्याने रिकामीच होती.बाहेर आवाज जाऊ नये म्हणून रेडिओ मोठ्या आवाजात सुरू केला. असंही कोवळ्या अकरावर्षीय बालकाचं बावीशीतल्या धिप्पाड तरूणासमोर निभाव तो काय लागणार होता? एखाद्या नव्याकोर्या कापडास चुरगळावे तसं हवं तसं तो समीरला ओरबाडत होता. रडून रडून व जिवाच्या आकांताने ओरडून समीरचा आवाज बसला होता.

ईतकी भयंकर दहशद समीरने जिवनात कधीच अनुभवली नव्हती. जावेदचं कटाक्ष पडताच याचा थरकाप ऊडत होता. बर्याच धमक्या देत,दटावत या प्रकरणाची वाच्यता कुठे करायची नाही असं धमकावत काही झालंच नाही या सफाईने पुन्हा त्याने समीरला शादी मध्ये आणून सोडलं.
काही वेळातच समीर तापात फणफणला व त्याच्या घरचे त्यास घेऊन दवाखान्यात पळाले .मात्र जावेदने कसलाच पुरावा मागे सोडला नव्हता तर समीरची सांगण्याची हिम्मत नव्हती. “वायरल ताप ” असल्याचं निदान डाॅक्टरांनी केलं. 

सायरा बाजी चं लग्न होतं त्यादिवशी. तू मामूंबरोबर आलेला. काळ्या पठाणी सुट मध्ये तुला पाहिलं आणि पहातच राहिलो. पहिल्यांदा पांढर्‍या ओल्या कपड्यांमध्ये दिसलेला तू आणि आज या काळ्या . माझी कानशिले तापली. डोकं काम करेनासं झालं. मी तुझ्याकडे आलो. तुझा माझ्यावर पुर्ण विश्वास होता. कदाचित थोडा जास्तच. परींच्या, जिन्नच्या सुरम्य कथा मी तुला हाच विश्वास मिळवण्यासाठी सांगत असे. माझ्या मनात पाप त्याचदिवशी आलं होतं जेव्हा रंगपंचमीत तु तलम पांढर्‍या कपड्यात भिजला होता. नविन खेळाचं आमिष दाखवत मी तुला “नोमान मंजिल” मध्ये आणलं आणि… त्यानंतरही माझी हिंमत वाढली व मी अधेमधे तिथे तुमच्याकडे येत गेलो आणि तुला… 

अंत्यदर्शनासाठी आता “मय्यत” सवारून ठेवण्यात आली होती. लांबूनच समीर पहात होता. वयस्कर, जर्जर झालेल्या आत्याला दोघं तिघं धरून घेऊन आले. 
” अपना दुध बक्ष दो बडी बी… ” घोळक्यातून कुणीतरी सुचना केली. तरणा पोर जर आईसमोर तिच्याआधी वारला तर तिने आपलं दुध त्याला माफ करायचं. म्हणजेच मरणार्या कडून आईला काही त्रास झाला असेल तर तिने त्यास क्षमादान करायचे. थरथरत, रडत कापर्या आवाजात आपल्या लाडक्या लेकास बडी बी ने निरोप घेतला.
मागोमाग मलूल, निस्तेज, रडून रडून डोळे सुजलेली त्याची तरूण स्री व मुलगा धाय मोकलून रडू लागले.

“जनाजा”ऊचलण्याची तयारी झाली होती. अखेरच्या नमाजसाठी जनाजा मशीदीकडे नेण्यात येणार होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या कानात अजान देण्याची पद्धत असते. साधारणतः अजान नंतर नमाज पठण करतात. पण जन्मलेल्या बाळाला अजान ऐकवल्यानंतर नमाज नसते. त्यानं जिवन नमाज सारखं घालवावं हे अभिप्रेत असतं. तर अखेरच्या अंत्यविधी च्या नमाजला अजान नसते. 

 तु गर्दीत लांबूनच माझं दर्शन घेतलंस. जवळ ही आला नाहीस. त्याची आवश्यकता तुला वाटली नाही. ते ही बरोबरच आहे म्हणा. अम्मीला, माझा मुलगा, बायको, भाऊ, वहीनी सर्व नातलग यांना मी अखेरचं जवळून पाहिलं . पण तुला लांबूनच पहात होतो. कदाचित तुझं योग्यच होतं. एका अपराध्यास हिच योग्य शिक्षा होती. पण.. थोडं जास्तच मागणं आहे माझं. तुझ्याकडून क्षमादान हवयं मला. त्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. कयामतपर्यंत माझ्या आत्म्यास केलेल्या अपराधाच्या अग्नित रोज जळावं लागेल. केलेल्या कर्माची शिक्षा रोज भोगावी लागेल. तुला मी त्या दिवशी प्रताडित केले मला रोज प्रताडित व्हावं लागेल. 

कलमये शहादत.. ची हाळी भरत जनाजा ऊचलला गेला. ला ई ला हा ईल्लाहो म्हणत गर्दी मार्गक्रमण करत कब्रिस्तानातल्या मशिदीत पोहोचले. सर्वांनी पाण्याने वुजू करत “अखेरच्या नमाजसाठी ” ऊभे राहीले. मौलानाने नमाजची पद्धत सांगतानाच एक महत्त्वाची आणि अखेरची रसम सर्वांना समजावली. जनाजा समोर ठेवत मागे ऊभे रहात नमाजसाठी सफं (रांगा) तयार करायच्या. त्यात अंत्यविधीत सामिल सर्वच लोक येतात आणि मृत माणसाच्या संपूर्ण जिवनात त्याच्याकडून कुणाबाबतीत काही वाईट घडले असेल त्या चुकीसाठी त्याने तिथेच मोठ्या मनाने माफ करत क्षमादान द्यायचे. यानेच त्या मृतात्म्याला मुक्ति मिळेल अन्यथा नाही. 

तु माझ्या अंत्ययात्रेत सामिल झालास. मी पहात होतो. काही वेळातच जनाजा कब्रिस्तानातल्या मशिदीत येताच तेच दोन देवदुत हजर झालेत. एक काळ्या कपड्यात आगीचं धगधगतं आसुड घेऊन तर एक श्वेतवस्रांमध्ये जपमाळ घेऊन. माझी मोक्षप्राप्ती आता फक्त नी फक्त तुझ्याच हाती आहे समीर.. मी कितीही जिवाच्या आकांताने तुला ओरडत असलो तरी ते तुला ऐकू जाणार नाही. पण.. मला माझ्या पापांची शिक्षा याच जन्मी अकाल मृत्यू होऊन भेटलीये. मला क्षमा कर समीर.. मी यास पात्र नाही तरीही… 

जड पावलांनी त्या नमाजमध्ये सामिल होत ” मै समीर हयात खान.. मरहूम जावेद को अपना गुनाह माफ करता हुँ..माफ करता हुँ……. ” मनातल्या मनात बोलला आणि दोन टपोरे अश्रू तरळून गेले. झाले गेले गंगेला मिळाले. माणुस असेपर्यंतच असतो अबोला, राग, व्देष, प्रेम, आपुलकी, माया, तिरस्कार मात्र तो जाताच आपल्यासोबतच हे सर्व घेऊन जातो तर मागे ठेवतो त्याच्या “पाऊलखुणा ” .ज्या त्या आयुष्यभर आपली सोबत करतात. 
काळ्या कपड्यातला धगधगता आसूड ऊगारणारा देवदूत अंतर्धान पावला. तर श्वेत वस्त्रातला देवदूत जवळ येत मला घेऊन जाऊ लागला अनंताच्या प्रवासासाठी. दूर उजळ ऊजेडात. ज्यास मी पात्र नव्हतो. जे आज समीर तू केलंस कदाचित मी तुझ्या जागी असलो असतो तर मला हे शक्य झाले नसते.. कधीच नाही.

मी तुला जिवंत असताना खोल अंधाराच्या गर्तेत ढकलले मात्र तु मला ऊजेडाचा रस्ता दाखवला. तु अजूनही त्या अंधारास कधी कधी घाबरून जातो आणि मी तुला त्या गर्तेत लोटणारा.. प्रकाशाकडे जातोय. केवळ तुझ्याचमुळे .सुवासित फुल जसं स्वतः चुरगळून ही ईतरांच्या हाती सुगंध सोडतो तसंच मी माझ्या पश्चातापासहीत तुझा हा सुगंध सोबत घेऊन जात आहे. लांब… खूप लांब…तु जरी मला माफ केलंस तरी मी केलेल्या कृत्याच्या “पाऊलखुणा ” तुझा आजन्म पाठलाग करीत राहतील. तुला या जन्मीच काय येणार्‍या कुठल्याच जन्मी कोणताही जावेद न भेटो हीच प्रार्थना मी करेन… आमेन.. अल्ला हाफिज… 
समाप्त. 
( आपल्या समाजाची एक काळी बाजू ही पण आहे की स्रियांप्रमाणेच पुरूषांवरही अत्याचार होतात. फरक ईतकाच की हा प्रकार म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा असतो आणि हे करणारे परिवारातीलच जवळचे लोकं असतात.जे खूप निंदनीय आहे.  सदर कथा अशाच सत्यघटनेवर आधारित असून पात्रांची नावं बदलली आहेत. )
©समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!