तिच्यासाठी तो कायमच हळवा

© वर्षा पाचारणे.
पाच वर्षाच्या आपल्या लेकीला घेऊन योगेश आज पहिल्यांदाच व्हॅक्सिनेशनसाठी दवाखान्यात घेऊन गेला.. इतर वेळेला ऑफीसची सबब सांगून तो नेहमीच ही इंजेक्शन वारी कीर्तीच्या अंगावर ढकलायचा… याला कारणंही तसंच होतं…आपल्या एवढ्याश्या लेकीला असं इंजेक्शन देताना पाहणं, त्याला मुळीच सहन होण्यासारखं नव्हतं… जगासाठी कणखर असलेला बाबा त्याच्या चिमुरड्या प्राजक्तासाठी मात्र अतिशय हळवा होता… शेवटी आज मात्र कीर्ती आजारी असल्याने व्हॅक्सिनेशनची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती..

दवाखाना आधीच गर्दीने खच्चून भरला होता… त्यामुळे प्राजक्ताचा हात धरून योगेश एका कोपर्‍यात शांतपणे उभा होता.. डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडणारं प्रत्येक रडणारं मुल पाहून, त्याला आता अधिक दडपण येऊ लागलं होतं.. ‘प्राजक्ताने देखील अशीच रडारड केली, तर आपण तिला कसं समजावणार?’,
या विचारात असतानाच तो तिला म्हणाला ,”प्राजु बाळा, डॉक्टर काका तुला काही करणार नाही… फक्त मुंगी चावल्यासारखं छोटसं टुचू करणार”.. खेळण्याच्या नादात असलेली प्राजक्ता फक्त ‘हूं’ असं म्हणाली.

डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरताच तिथे लहान मुलांसाठी छान छान सॉफ्ट टॉईज ठेवलेले होते.. प्राजूसाठी तो दवाखाना काही नवीन नव्हता.. कारण ती प्रत्येक वेळेस आई बरोबर कधी सर्दी-खोकला झाला म्हणून किंवा कधी व्हॅक्सिनेशन आहे म्हणून, त्याच दवाखान्यात यायची.. आणि मुळातच हसरी असलेली प्राजु इंजेक्शनला सुद्धा कधीच घाबरत नव्हती.. डॉक्टरांनी तिला बेडवर कुशीवर झोपायला सांगताच, तिच्या आधी बाबाचेच डोळे गच्च पाणावले.

“प्राजू, डोळे मिटून घे बाळा”, असं म्हणताना अचानक पापणी लवत आज बाबांच्या डोळ्यातून टचकन पाणी पडले… त्यांच्याकडे पहात प्राजु म्हणाली ,”बाबा, तुम्ही का रडताय पण? तिने असं म्हणताच डॉक्टर आणि प्राजु दोघेही हसायला लागले.. इंजेक्शन देऊन झाल्यानंतर बाबांनी आपल्या चिमुरडीला घट्ट उराशी कवटाळले…

दवाखान्यातील ही गंमत प्राजूने घरी आल्याआल्या आईला सांगितली आणि दोघीही यावर खळखळून हसल्या.. मग काय बाबाही आपली स्वतःची बाजू सावरत म्हणाला ,”नाही काही, नेमकं त्याच वेळी माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, म्हणून पाणी आलं”… पण त्याच्या या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नव्हतं बरं का…
आज प्राजुच्या शाळेचा पहिला दिवस होता… ‘आज मला बाबाच शाळेत सोडायला येणार’, म्हणून प्राजूने हट्ट धरला.. लेकीच्या हट्टापुढे बाबांचे काही चालणार नव्हते… ‘ऑफिसला जाताना तिला आधी शाळेत सोडून मग पुढे जाईल’, असं म्हणत प्राजू आणि योगेश कीर्तीला बाय बाय करून निघून गेले… शाळेच्या गेटमधून आतमध्ये मुलांना जाताना पाहून पुन्हा बाबांचा जीव मात्र गलबलला.. एकीकडे आनंदाश्रू आणि एकीकडे लेक किती लवकर मोठी होते, या संमिश्र भावना नकळत डोळ्याच्या कडा पाणावत होत्या.. डोळ्यातली आसवं रुमालाने टिपत प्राजुला एक गोड पापा देत बाबांनी शाळेत पाठवलं, पण मनात मात्र जणू आभाळ दाटलं होतं…

आता प्राजु आठवीत गेली होती… “अहो, ऐकलं का?.. प्राजू मोठी झाली बरं!” असं आईने म्हणताच त्या वाक्यातला अर्थ बाबांनी हेरला.. अंगाखांद्यावर खेळणारी चिमुरडी नकळत किती मोठी होतात, याचा हा आणखी वेगळा अनुभव होता… आता प्राजू बाबांपेक्षा आईकडे जास्ती मनमोकळ्या गप्पा मारू लागली होती.. नववी-दहावीत गेल्यानंतर बोलकी, बडबडी असलेली प्राजु आता त्यामानाने थोडी अबोल झाली होती.. तरीही संध्याकाळी जेवताना मात्र तिची बडबड सतत चालू असायची.

बाबांपासून कधीही कुठलीही गोष्ट न लपवणारी प्राजू आज मात्र कॉलेज संपल्यावर एका मित्राबरोबर रस्त्याने जाताना दिसताच बाबांचा मात्र चांगलाच पारा चढला… कारण आज कॉलेजमध्ये रोज डे होता.. हातात गुलाबाचे फुल आणि अनोळखी मुलाबरोबर हसत-खेळत गप्पा मारत चाललेली प्राजु पाहून बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.. घरी जाऊन त्यांनी हा सारा प्रकार प्राजूचा आईला सांगितला..

“अहो, तुम्ही समजताय, तसं काही नसेल कदाचित… आपण दुपारी प्राजु घरी आली की बोलूया तिच्याशी… पण काही समजण्याच्या आधीच तिला ओरडू नका बरं”… बाबांचा रौद्र रूप पाहून आईने काकुळतीला येत बाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला… “आज काल आपल्या सारखं काही नाही राहिलं.. आजकाल मुलामुलींना कॉलेजमध्ये भरपूर मित्र-मैत्रिणी असतात.. तसाच हा मुलगाही तिचा फक्त मित्रच असेल हे समजून का नाही घेत तुम्ही?”… असं म्हणत आईने दोन पिढ्यांमधील अंतर दाखवून विषय वेगळ्या अनुषंगाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला… पण बाबांच्या डोळ्यासमोरून आपली लेक कुठल्या परक्या मुलाबरोबर फिरतानाचे चित्र मात्र काही केल्या जाईना…
थोड्याच वेळात प्राजू छान मूडमध्ये घरी आली… एरवी घरी नसलेले बाबा आज सोफ्यावर बसून पेपर वाचताना पाहताच प्राजु लाडीगोडीत बाबांशेजारी जाऊन बसली..

“काय हे बाबा, मला माहित असतं तुम्ही घरी आहात, तर तुम्हालाच बोलावलं नसतं का आज मला कॉलेजमधून घ्यायला?”… “आणि मग येताना मस्तपैकी कोपऱ्यावरच्या राजश्री वडेवाल्यांकडून गरमागरम बटाटेवडे नसते का आणले सगळ्यांसाठी?” असं म्हणत बाबांकडून उत्तराची अपेक्षा करत प्राजू बाबांकडे पाहू लागली..
“अगं प्राजु, आज मी तुझ्या कॉलेज जवळ कामानिमित्त गेले होते, तेव्हा तू दिसली होतीस मला रस्त्यात”… तुम्ही मित्र-मैत्रिणी आज काही बाहेर फिरायला वगैरे गेला होतात की काय?”, असं म्हणत बाबांच्या मनातले विचार आईने स्वतः पटकन बोलून दाखवले… कारण बाबांचा रागाचा पारा आणखी चढला असता, तर घरातलं वातावरण बिघडायला वेळ लागला नसता..

“हो गं आई, आज खरं तर कॉलेजमध्ये ‘रोझ डे’ होता. पण मला आणि आमच्या ग्रुपमधल्या निशांतला हे असले प्रेम प्रकरण आणि प्रेम प्रदर्शनाचे दिवस अजिबातच आवडत नाहीत”.. “आमच्या कॉलेजमध्ये या वयात अभ्यासाला महत्त्व देण्यापेक्षा आजकाल मुलं या गोष्टींकडे जास्त रमतात बघ”..
“अच्छा, कोण गं निशांत म्हणजे आपल्या घरी वगैरे आला होता का कधी याआधी?” असं म्हणत आईने आणखी थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.. मायलेकींच्या स्वयंपाक घरात चाललेल्या गप्पांकडे बाबांचे हॉल मधून अगदी बारीक लक्ष होते.. आपली मुलगी आपल्यापासून खोटं बोलून काहीतरी लपवते की काय अशी शंका असलेले बाबा त्या दृष्टीने साऱ्या गप्पा ऐकत होते..

“अगं नाही, तुला नाही का म्हणाले होते मी, की तो कॉलेजचा टॉपर विद्यार्थी आहे.. त्याला या नसते उपद्व्यापांमध्ये काही रस नसतो आणि मला देखील अभ्यासात त्याची मदत होते… त्यामुळेच तर आम्हाला कॉलेजमध्ये भाई-बहन म्हणून चिडवतात सगळे”… तिचं बोलणं ऐकून आईला हसूच आवरेना..
‘भाई बहन?’… ‘हा काय प्रकार आहे?’ असं आईने विचारतात प्राजु म्हणाली ,”अगं सुरुवातीला जेव्हा आम्ही अभ्यासासाठी एकमेकांशी गप्पा मारायचो, तेव्हा मुलांना आमच्यात काहीतरी सुरू आहे असं वाटू लागलं”… “आणि मग त्यावरून चिडवणं, टोमणे मारणं सुरू झालं”.. “पण मग नेमकं तेव्हा रक्षाबंधन असल्याने निशांतनेच मला सांगितलं ,”तू सगळ्यांसमोर मला राखी बांध, म्हणजे यांची तोंडं आपोआप बंद होतील”… ‘आणि मग काय! मी निशांतला राखी बांधताच बोलणाऱ्यांची तोंड मात्र अगदी बघण्यासारखी झाली होती”, असं म्हणुन प्राजुने आईला टाळी दिली आणि दोघीही खळखळून हसल्या…

“अगं आई, पण बाबांचं काय डोकं वगैरे दुखतंय का आज?”… “कारण मी कॉलेजवरून आल्यापासून ते माझ्याबरोबर एकंही शब्द बोलले नाहीत. काही झालंय का गं?”
“नाही गं, असंच पेपर वाचत बसलेत ते… त्यांना एवढा चहा नेऊन दे”, असं म्हणत आईने प्राजूच्या हातात चहाचा कप दिला. प्राजूने बाबांना चहा देताच बाबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले..
बाबांचे पाणावलेले डोळे पाहून प्राजुला मात्र काहीच सुचेना. ती पटकन आईकडे गेली आणि म्हणाली ,”एक आई, इकडे ये ना.. बाबांना खरंच काही होतंय का?”….”अगं ते रडताएत”… असं म्हणत प्राजू देखील स्वतःच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा ओढणीच्या कोपऱ्याने टिपू लागली.. बाप लेकीचं हे अनोखं नातं पाहून आईला देखिल गहिवरून आलं..

आईने हळूच बाबांना नजरेने खुणावलं… ‘झाला प्रकार आपण किती संशयी नजरेने पहात होतो’, या विचाराने बाबा मनातल्या मनात खजील झाले. लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले ,”अगं काही नाही बाळा, सकाळ पासून थोडं डोकं दुखत होतं… पण तुझ्या या कॉलेजच्या गप्पांमुळे आता मला खूप छान वाटतंय”, असं म्हणत बाबांनी डोळे पुसत एक छानसं स्मितहास्य केलं… नव्या पिढीच्या या कॉलेज तरुणीने हा ‘आसू आणि हसूचा’ क्षण मात्र तितक्यात आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवला बरं का!

मुलगा, भाऊ, नवरा या सार्‍या नात्यांपेक्षा एक पुरुष जेव्हा बाबांच्या भूमिकेत शिरतो, त्यावेळेस त्याच्या लेकीसाठी त्याच्या मनात एक वेगळाच हळवा कोपरा नकळत निर्माण होत असतो… त्या कोपऱ्याला जराही धक्का लावू न देता, तो आयुष्यभर ते सुख मनातल्या मनात
जपत असतो… कधी व्यक्त होऊन, तर कधी अव्यक्तपणे ते प्रेम जगत असतो… अशा या बाबांच्या, कधी दिसलेल्या, कधी अदृश्य अशा आसवांची, ही नात्यांची गोडी वाढवणारी कहाणी सुफळ संपूर्ण..
समाप्त
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!