गुपित ( भाग 2)

भाग १ इथे वाचा

” मुकुंदा…. म…. नु… ” अगदीच अस्पष्ट असे शब्द माई बोलत होत्या. 
इतकावेळ माधवाची आठवण काढणारी माई अचानक मनुआत्या चं नाव घेताना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. 
” मामी, आई निघाली होती आमच्यासोबतच पण अजून कशी आली नाही, येईलच. मी फोन करते ड्रायव्हर ला. ” मनुआत्याची मुलगी माईंना समजावत बोलली. 

अगदी बालपणी माधवाच्या बारस्याच्या वेळी अप्पांना वेगळ्या खोलीत घेऊन जाणारी व काहीतरी गुढ वार्ता करणारी, माधवाची सावली बनून वावरणारी, अगदी मावशीला क्षुल्लक माधवाचा दुपट्टा बदलण्यासही मनाई करणारी व पाहुण्यांनी पाहुण्यासारखं रहावं असं बजावणारी, सतत माई वर अघोषित सत्ता गाजवणारी, ती आल्यावर माईला रडण्याची मुभा ही न देणारी, घरातल्या प्रत्येक प्रसंगात पुढे असणारी, पैसेवाल्या सासरचा तोरा मिरवणारी, सोन्याच्या बांगड्या घालणारी,रेशमी शेला पांघरणारी, अगदी गरजेपुरतं बोलणारी व जास्तकरून डोळ्यांच्या ईशार्यातच बोलणारी अप्पांची सर्वात लाडकी व विश्वासू, तिच्याशिवाय घरातले पानही हलू न देणारी, माईला सर्व अधिकार असले तरी मनुआत्या आल्यावर आपसूकच माईला दटवून ठेवणारी , काहीशी गुढ दगडी घारे डोळे असणारी अशी ही ‘मनुआत्या’ माईला शेवटच्या क्षणी का आठवली असावी असा प्रश्न मुकुंदासहीत इतर जणांना ही पडला. 

“मनुआजी आली….. ” या आवाजाने मुकुंदांची तंद्री भंगली व ते पटकन उठून बाहेर आले. इतरही सर्व जण त्यांच्यासाठी पटापट ऊठून ऊभे राहीले. 
शरीर थकले असले तरी तेच करारी, दगडी घारे डोळे, तीच चाल, तोच पेहराव व तसाच दरारा वागवत मनुआत्या कारमधून खाली ऊतरत होत्या. त्यांना आधार देण्यासाठी मुकुंदा पुढे झाले. खाली ऊतरताच त्यांचा चरणस्पर्श घेतला. मुकुंदाला हुंदका दाटून आला. डोक्यावर हात फिरवत मनुआत्याने मुकुंदाची गळाभेट घेतली. क्षणभर आपल्या भावास ‘अप्पाला’भेटल्याचा भास त्यांना झाला व त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. 
” वहीनी कशीये मुकुंदा? “

“सारखा माधवच्या नावाचा जप लावलाय… ” मुकुंदाचे शब्द पुरे होण्याच्या आत माधवही त्याच कारमधून खाली ऊतरताना पाहून आनंद,आश्चर्याचे,पश्चातापचे भरते मुकुंदांला आले.
नेहमीच्या सवयीनं आत्यानं डोळ्यानेच ईशारा करत आत चलण्यास सांगितले. 
माईला पाहून टप टप मनुआत्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते.
“पहा कशी मगरीचे अश्रू ढाळतीये.. ” बायकांमध्ये खुसपूस आवाजात चर्चा सुरू झाली. 
“मा……. ध………….. ” माईंना आता शब्द ही फुटत नव्हते. आवाज धुसर झाला होता. कुणाला काहीच कळेना की, माई आत्याला माधवाचे का विचारत आहे? 

मनुआत्याने पुढे होऊन चमचाभर गंगाजल माईला पाजले व मुकुंदाला माधवास आत आणण्याचा ईशारा केला.
मुकुंदाने माधवास आत आणताच त्यास पाहून फक्त माईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.त्यास डोळे भरून पाहत व त्याच्या तोंडावरून हात फिरवत माईने माधवला कवटाळले.
उपस्थित सर्वांना भावनावेग अनावर झाला. माधव माईच्या दोन्ही पायावर डोकं ठेवून रडू लागला.
माईने मनुआत्या कडे पाहून फक्त हात जोडले व प्राण सोडला. पुढील सर्व सोपस्कार, अंत्यविधी झाले. 

सर्व व्यवस्थितरित्या पार पडले असले तरी व माईची अखेरची माधवाला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली असली तरी माधव अचानक आला कसा? कुणाबरोबर आला? मनुआत्याच्या पाठोपाठच कसा आला?
माईने मनुआत्याची आठवण शेवटच्या क्षणी का काढली? माईने मनुआत्या कडे पाहून हात का जोडले? ते ही आयुष्यभर माईचा ईतका छळ मांडला असताना? असे कित्येक प्रश्न जमलेल्या सर्वच आप्तांना पडले होते. पण मनुआत्या समोर हे प्रश्न विचारण्याची बिशाद कुणाचीच नव्हती.

माधवाला मनुआत्या सोबत कारमध्ये आलेला मुकुंदाशिवाय कुणीच पाहीलं नव्हतं. या प्रश्नांची उत्तरे मामा, मावशी सहीत नयनालाही हवी होती. मुकुंदाला ते सर्व आत्याला विचार म्हणून भाग पाडत होते पण मुकुंदा अगदी शांत व खोल पाण्यात तळाशी बुडल्यागत शांत बसून होते.
त्यांना अशा सत्याचा ऊलगडा झाला होता की जे सत्य माई, अप्पा, मनुआत्या नंतर मुकुंदाला आज कळालं होतं. एक असं गुपित जे या तिघांनी आयुष्यभर जपलं होतं व ते मुकुंदालाही मरणापर्यंत जपावं लागणार होतं.
काय होतं ते सत्य?
अगदी माधवाला घराबाहेर काढतानाही याची कल्पना कशी आली नाही याचं मुकुंदांना स्वतःचंच नवल वाटत होतं. 

“दादा तू विचार तरी… “
“मी कुणालाही काहीही विचारणार नाही आणि कुणी विचारायचा प्रयत्न केला तरी मी त्यास तसं करू देणार नाही. बास. यापुढे एक शब्दही नको. ” म्हणत मुकुंदा आत ऊठून गेले. 
तिसर्‍या दिवशी मनुआत्या जाण्यास निघाली. माधवं त्याच दिवशी निघून गेला होता. मुकुंदा व मनुआत्या मध्ये मूक संवाद चालला होता.
मुकुंदाच्या डोळ्यातून अश्रू पडत होते व मनुआत्याचा हात हातात घेऊन घट्ट पकडला होता.
आज मनुआत्याची मुकुंदाच्या नजरेत ऊंची कितीतरी पटीने वाढली होती.

या घरासाठी तिने काय केले हे कुणासही कळणार नव्हते. ऊलट कितीतरी लांछन तीने आपल्या स्वतःवर घेऊनही धीरोदात्त पणे ती ऊभी होती.
परत एकदा मनुआत्याच्या पायावर मुकुंदा वाकला व चरणावर अश्रूंचा अभिषेक पडला.
तिनेही त्याची पाठ थोपटत डोळ्यानेच विश्वास देत गाडीत बसून निघून गेली. 
तिच्या गेलेल्या गाडीकडे पहात कितीतरी वेळ मुकुंदा तिथेच ऊभे राहीले. घडलेल्या घटना अगदी बालपणापासून ते आतापर्यंत सरसर सरकू लागल्या.

सर्वांसमोर वाईट असणारी मनुआत्याने या घरासाठी जे केलं होतं ते ही कुणासही खबर लागू न देता ते खुप मोठा ऊपकार होता ज्याची ऊतराई होण्यासारखी नव्हती. 
” काढ मुकुंदा, या हरामखोराला काढ घरातून बाहेर.. नाहीतर मी याला जिता सोडणार न्हाई.. ” आप्पा संतापाने लालबुंद झाले होते. 
” पण आप्पा… “
” तू काढतोय का मी काढू? “मुकुंदाने माधवास हाताला धरत बाहेर काढले.

माधवं कुठल्यातरी नाटकात स्री भुमिका करतोय व ते कळल्यामुळे ते त्यास बाहेर काढताहेत इतकीच माहिती मुकुंदाला होती. माधवच्या पायात आताही पैंजण वाजत होते.
नक्कीच अप्पांनी याला स्री वेशात पाहीले असणार. म्हणूनच इतके रागावले असणार. नंतर नक्कीच आपण त्यास परत आणू अप्पांचा राग शांत झाल्यावर असं विचार करून मुकुंदा शांत होते. याआधी ही एकदोनदा माधवास स्रीवेशात पाहून मुकुंदा हैराण झाले होते. मात्र माई बोलली की तो नाटकात भुमिका करतोय म्हणून काही वाटले नव्हते.

त्याचा असा परीणाम होईल याचा विचारही कुणी केला नव्हता.
मात्र माधवास बाहेर काढताना नेमकं काही बोलता आलं नाही याची खंतही होती.
माईंचही काही ऐकून घेण्यास अप्पा तयार नव्हते.
माई रडून विनवत होती.
इतर कोणी घरात नव्हतं. त्यामुळे आत काय घडतयं हे कुणासही माहीत नव्हतं. 

” याद राख मुकुंदा, या खोलीत काय घडलयं हे कुणाला समजता कामा नये. कुणी जर विचारलच तर शेतीच्या पैशात फेरफार केली असं सांग. “
“पण आप्पा, ऐकून तरी घ्या.. “
” मला काहीही ऐकून घ्यायचं न्हाई. खबरदार जर पुन्हा या घरात त्याचं नाव काढाल तर.. “
” व्हय अप्पा .”
अगदी कालपरवा घडल्यासारखा पूर्ण प्रसंग मुकुंदाला आठवला. व आता गाडीतून ऊतरतानाचे माधवचे पाय ही आठवले !!

होय, भरगच्च पैंजण! जे गडबडीत तो काढण्याचे विसरला होता. जे आत येण्यापूर्वी त्याने ते काढून ठेवले होते.
अप्पांच्या वेळी अचानक वेळेवर ऊगवणारा माधव केवळ मनुआत्या मुळेच येऊ शकला होता जसं तो आता आला होता. म्हणून तर माईने नेमकी मनुआत्याची आठवण शेवटच्या क्षणी काढली होती.
म्हणजे माईला सर्व ठावूक होतं की माधवचा सांभाळ मनुआत्या करत आहे.
मावशीला माधवचा दुपट्टा बदलू न देणारी मनुआत्या, बारश्याच्या दिवशी गुढ वार्ता करणारी मनुआत्या का असं करत होती याचा ऊलगडा त्या माधवच्या पायातल्या पैंजणाने केला होता.

एक एक घटना जोडत पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत होतं. प्रत्येक घटनेत मनुआत्या सावलीसारखी माधवाच्या मागे होती. अप्पाशी काय गुढ वार्ता करत होती? दुपट्टा बदलण्यासाठी मावशीला तीने का रोखले होते? इतर भावंडाप्रमाणे माईला माधवापासून का विलग केले होते?
माई कणखर स्री असूनही मनुआत्याला तिची मूक संमती का होती?
माधवाची आंघोळ ही कुणाला दिसू नये याची खबरदारी का घेतली जायची?
याचं उत्तर त्या माधवाच्या पायात गडबडीने राहीलेल्या पैंजणांनी कधीच दिला होता.

माधवं किन्नर होता!! अर्धनारीनटेश्वर!! शिवाचं असं रूप जे या समाजात सहजी स्विकारलं जात नाही. अशा बालकास किन्नरांना सोपवून मोकळे होतात लोक व आपल्या घराण्याच्या कलंकास धूवून टाकतात.
अप्पाही बहुतेक तेच करणार होते जे मनुआत्याने करू दिले नाही.
माधवाची सावली बनून व माईला माधवापासून तुटकच ठेऊन व प्रसंगी सर्व लांछन आपल्यावर घेऊन मनुआत्या राहत होती.
आईची माया नकळत या गुपिताला कुठे ऊघड करु नये यासाठी माईला सतत मनुआत्याने दटवत ठेवले.

त्याच माईची अखेरची ईच्छा मनुआत्यानेच पुरी केली व माधव केवळ तुझाच आहे याचा प्रत्यय ही आणून दिला.
केवळ याचमुळे माईने मनुआत्या ला हात जोडले.
सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी लख्ख सुर्यप्रकाशाप्रमाणे चमकत होती.
सर्व अंधकार हटून सत्याच्या लख्ख प्रकाशात मनुआत्याचं व्यक्तित्व चमकत होतं.
तरीही अप्पा, माई प्रमाणेच आपल्यासोबतच हे ‘गुपित’ विरलं जाईल हे मुकुंदाने मनोमन ठरवलं. मुकुंदांचा ह्रदय समाधानाने भरून आले होते. 
(काही गुपितं ही शेवटपर्यंत गुपितच राहतात पण ह्या गुपितांना गुपित ठेवण्यासाठी ते गुपित सांभाळणाऱ्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागते.) 
©समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!