कोवळ्या पोरीची शिकार

© वर्षा पाचारणे.
“आजही माझ्या अंगावर शहारे येत होते गं.. समोरच्या पाटलाच्या वाड्यात का कुणास ठाऊक काहीतरी विचित्र आहे असं सतत वाटतं”.. रमा तिच्या आजीला हे सारं सांगत असताना आजी देखील कावरी बावरी व्हायची.
वाड्यातले सत्य काय असेल याची आजीला बऱ्यापैकी कल्पना असल्याने आजी तो विषय रमापासून लांब ठेवत होती. रमाला मात्र या विषयात खोलात जाऊन नक्की काय घडतंय याची उत्सुकता लागली होती.
वाड्यात जाताना संकोचून जाणारी ती अनोळखी पोर येताना मात्र पार भेदरलेली असायची. डोळे गच्च पाणावलेले, नजर भिरभिरलेली आणि चेहरा भीतीने काळवंडलेला..

रमाला तिची ही अवस्था पाहून वाड्यात काहीतरी विचित्र आहे हे जाणवत असायचं. पण त्या मुलीशी ओळख वाढवून तिला सारं विचारावं असा विचार करूनही ती मुलगी मात्र नजरेला नजर न देताच घाईघाईने निघून जायची.
आज रमाने मनाशी पक्क केलं की काहीही करून त्या मुलीचं नाव, पत्ता शोधून काढायचा आणि तिच्याशी बोलून सारं काही जाणून घ्यायचं. आज रमा त्या मुलीच्या मागावर गेली. वाड्यातून ती मुलगी बाहेर पडली. रमा आपल्याकडे बोलायला येते हे पाहून ती झपाझप पावले टाकू लागली.”ए मुली, अगंssss एsss, थांब थोडीशी.. मी तुझ्याशी बोलते आहे ना… रोज मी तुझ्याशी बोलायचं प्रयत्न करते तर तू पळतेस काय अशी”, असं म्हणून रमाही तिच्या मागे धावू लागली. आणि थेट त्या मुलीच्या समोर जाऊन उभी राहिली.तिचा हात पकडून म्हणाली.

“मला पाहून धावतेस काय अशी?” “अग मला मैत्री करायची आहे तुझ्याशी.. मी गावात आल्यापासून माझी एकही मैत्रीण नाही. मी तुला रोज वाड्यात जाताना पाहते आणि तेव्हापासूनच तुझ्याशी मैत्री करावसं वाटलं मला”..रमाचं बोलणं ऐकून ती मुलगी रमाचा हात झटकून पुन्हा एकदा झपाझप चालू लागली.. आता मात्र रमाला तिचा थोडा रागच आला.. ‘एवढी का नाटकं करत असेल ही मुलगी.. एका मुलीने दुसऱ्या मुलीशी मैत्री करणे यात गैर काय आहे.. आणि माझ्या आजीला तरी चांगलीच ओळखते  की ही.. मग मला घाबरण्यासारखं एवढं काय आहे?”, असा विचार करत रमा रागारागाने घरी परतली..

“आजी, काय बावळट आहे गं ती मुलगी! मी तिला फक्त म्हटलं की, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, तर ती माझा हात झटकून पळत सुटली.. त्या वाड्यात पण अशीच बावळटसारखी वागत असेल आणि म्हणूनच ते पाटील तिला रोज ओरडत असतील.. आणि मग पुन्हा बाहेर येताना घाबरून, उगाचच रडत बाहेर पडायचं… याला काय अर्थ आहे!”
“हे बघ रमे, ज्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते त्या गोष्टीत बोलू नये.. काय माहिती आहे तुला त्या मुलीबद्दल? एवढीशी कवळी पोर ती!” “रोज कुठल्या परिस्थितीतून जात असेल याची कल्पना तरी आहे का तुला? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला अशी वागू नकोस.. आधीच ती पोर भेदरलेली.. त्यात तू तिचा पाठलाग करून आणखी तिची भीती वाढवू नकोस.. सुट्टीसाठी आली आहेस तर सुट्टीची मजा घे आणि जा पुन्हा आनंदाने मुंबईला तुझ्या घरी.. उगाच तू गेल्यानंतर मला इथे माझ्या मागे काही कटकटी नकोतच”.

आजीचं असं बोलणं ऐकून रमाला आणखीनच राग आला..
“आजीss, तू पण मला असं बोलणार असशील, तर मी आजच जाते ना निघून मुंबईला.. अगं सुट्टीसाठी आले मी, तर तू मला हुसकायला लागली आहेस”, असं म्हणून रमा नाक फुरगटुन बसली.
आजी हसली आणि म्हणाली ,”अगं वेडाबाई, तुला हुसकायला नाही बसले मी इथे, पण ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावचा रस्ता विचारायचा कशाला?.. शिकली सवरलेली पोर तू.. तुला या म्हातारीच्या बोलण्याचा रागच येणार.. अग पोरी पण त्या लेकराला फक्त एक पांगळी आई आहे.. बाप तिच्या लहानपणीच वारला.. तेव्हापासून पाटलीणबाईने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवलं..  पण पाटलीणबाई गेल्यापासून वाड्यातली परिस्थितीच बदलली.. पाटलाच्या अंगाखांद्यावर खेळलेली लेक आज भयाण आयुष्य जगते आहे”.. एवढे बोलून आजीने डोळ्याला पदर लावला आणि विषय बदलत ती स्वयंपाक घरात गेली..

“ए आजीsss, पण म्हणजे नक्की काय झाले तिच्या आयुष्यात.. पूर्ण  सांग तरी मला”.
पण गावच्या गोष्टी कितीही विचित्र असल्या तरी त्या रमाला सांगून काही उपयोग नव्हता.. चार दिवसासाठी आलेली पाहुणी, पण उगाच जाताना तिच्या मागे नसत्या भानगडी लागू नयेत म्हणून रमाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजीने तोंडातून एक शब्दही काढला नाही.. रमा मात्र दोन दिवस त्याच गोष्टीचा विचार करत राहीली..

शेवटी आज ती त्या मुलीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर उभी राहीली. ‘आज मी न चिडता तिच्याशी शांतपणे बोलेल’, असा विचार करून रमा मुद्दाम ती मुलगी येताना दिसूनही लक्ष न दिल्यासारखी चालू लागली.. ती मुलगी रमाच्या हळुवारपणे जवळ आली आणि म्हणाली ,
“ताई, मला माफ कर. त्या दिवशी तू माझ्याशी बोलायला आलीस, पण मी मात्र तुझा हात झटकून पळाले.. घरी जाऊन ही गोष्ट जेव्हा मी आईला सांगितली तेव्हा तिला खूप वाईट वाटले.. तुझ्या आजीला खूप मानते माझी आई.. अगदी स्वतःच्या आई इतकंच”..
ती स्वतः बोलायला आली हे पाहून रमाला मनातल्या मनात खूप आनंद झाला पण तसं तिने चेहऱ्यावर मात्र दिसू दिले नाही..

“अच्छा! काय नाव तुझं?
“अबोली”
“अरे वा! छान नाव आहे की तुझं.. आणि अगदी नावाप्रमाणेच अबोल वाटतेस मला तू”, असं म्हणून रमा छानस हसली.. त्याबरोबरच ती मुलगीही जराशी मोकळेपणाने बोलू लागली..
“ताई, उद्या मी माझ्या अंगणातल्या झाडाचं चाफ्याचं फुल आणून देईल तुला”.. असं म्हणून ती जाऊ लागली.
“अगं, थांब की थोडा वेळ. गप्पा मारूयात”, असं म्हणून रमाने तिचा हात पकडताच अबोली कळवळली..

“आईsss, गं”, म्हणून जोरात विव्हळली..
त्याबरोबर रमा घाबरली. “बापरे! काय झालं गं?”
असं म्हणत तिने अबोलीचा हात पाहिला तर त्यावर चटका दिल्याची मोठी खूण दिसत होती. तिचा हात पूर्ण लाल काळा झाला होता..
“बापरे! अबोली कसं भाजलं हे?”, म्हणून रमाने त्यावर हळुवार फुंकर घातली. दोन मिनिट घरी चल फक्त, मी तुला त्यावर मलम लावून देते”, म्हणून रमा तिला सोबत येण्याचा आग्रह करू लागली.

रमाने प्रेमाने केलेल्या चौकशीमुळे अबोलीचे डोळे पाणावले. पाटलीणबाई गेल्यापासून आज पहिल्यांदाच तिची इतक्या मायेने कुणीतरी विचारपूस केली होती.
“ताई, नको घरी जाऊन लेप लावेल मग बरं वाटेल बघ”..असं म्हणत ती घाईघाईने निघून गेली.आता जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत अबोलीला भेटत राहायचं, हे रमाने मनाशी पक्क ठरवलं. हळूहळू दोघींची चांगलीच गट्टी जमली. परंतु कितीही गप्पा झाल्या तरी पाटलांच्या वाड्याचा विषय निघताच अबोली कावरी बावरी व्हायची.. आई बद्दल काही विचारताच तिचे डोळे पाणावायचे. पण तोंडातून शब्द म्हणून काही निघत नसे.

एक दिवस संध्याकाळी आजी आणि शेजारच्या रखमा काकूंचं बोलणं नकळतच रमाच्या कानावर पडलं. रखमा आजीला सांगत होती.
“मावशी, काल त्या अबोलीला पाटलाच्या पोरानी तिच्या घरनं मारून झोडून रात्री वाड्यावर आणलं.. रात्रभर पोरीच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. या खिडकीतून पाहिलं.. असली वंगाळ कृत्य करताना देव जीव का घेत नसंल असल्या नराधमांचा.. कवळी पोर ती .. पार एखाद्या कळीला कुस्करून टाकावं तसं तिचं आयुष्य करून टाकलं बघा”. हे ऐकून रमाच्या काळजात धस्स झालं. ती पुढे कान देऊन ऐकू लागली. रखमा पुढे सांगत होती.

‘पोरगं तर पोरगं, बाप पण तितकाच नालायक.. त्यातली कुठलीबी गोष्ट बाहेर गेली तर जे तुझ्याबरोबर झालं ते तुझ्या आईबरोबर करायला वेळ लागायचं नाही, असं म्हणत होता मेला”.. वाड्याबाहेरच नोकरांच्या खोलीत राहणारी रखमा रडता रडता आजीला सांगत होती.. थोडा वेळ बसून रखमा निघून गेली.
तिचं बोलणं ऐकून आजी पण निःशब्द झाली होती.. गावात फक्त पाटलाचंच राज्य चालत असल्याने पोलीस, कायदा त्याचं काहीच बिघडवू शकत नव्हता.. इन मीन शंभर लोकांच्या त्या गावात पाटलासारखा दैत्य वाटेल तशी मनमानी करून थैमान घालत होता. गावातल्या पोरी बाळींवर वाईट नजर टाकत होता.. आणि त्यात अबोली सारख्या परिस्थितीने गांजलेल्या मुली म्हणजे तर त्याच्यासाठी अगदी हक्काचा सावज.

रखमा निघून गेली पण आजीचं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं. ‘आपली नातही तरणीताठी असल्याने तिला लवकरात लवकर गावातून पाठवून दिलं पाहिजे’, हा एकच विचार आजीच्या मनात येत होता आणि त्यामुळेच तिने  ‘उद्या सकाळच्या एसटीने रमाला पाठवून देत आहे’, असा स्वतःच्या लेकीला म्हणजेच रमाच्या आईला फोन केला.
रोजच्या प्रमाणे रमा अबोलीच्या वाटेवर आजही थांबून राहिली पण अबोली मात्र आज आलीच नाही.. तिच्या घरचा पत्ता विचारूनही आजीने पत्ता दिलाच नाही.

पण संध्याकाळी पुन्हा एकदा रखमा धावत पळत आजीकडे आली आणि म्हणाली, “जी गोष्ट अबोलीच्या आईबरोबर झाली तीच आज त्या येवढ्याशा पोरीबरोबर झाली मावशी.. ही गोष्ट पोलिसांना सांगन अशी धमकी देताच अबोलीला जीव जाईपतुर मारहाण करून तिच्या दोन्ही पायांना इतकी दुखापत केली कि ती आता आयुष्यात पुन्हा कधीबी चालू शकणार नाही.. आई सारखीच ती आता आयुष्यभर पांगळ्या अवस्थेत पडून राहणार’.. लय वर्षापूर्वी तिच्या आईला पण अशाच नरक यातना देऊन त्यानी तिला पांगळी केली आणि आता ही पोर.. आणि परत पाटील गावाच्या भल्यासाठी किती झटतो हे दाखवण्यासाठी त्या दोघींचा आयुष्यभराचा खर्च करणार अशी घोषणा करून मोकळा झाला’..

रमा सुन्न होऊन विचारात गुरफटली. ‘म्हणजे असलं नरकाचं जीवन देऊन पुन्हा त्या दोघींना पोसल्याचं पुण्य मिळेल अशा विकृत विचारांनी ग्रासलेला पाटील पुन्हा एकदा नव्याने सावज शोधायला मोकळा होणार’.. आवाज उठवणारे कोणीच नसल्याने असल्या नराधमांचा अंत कधी होईल हा प्रश्न मात्र अनुत्तरीत होता.
यातली कुठलीही गोष्ट रमाने ऐकली आहे, हे मात्र तिने आजीला तीळमात्रही जाणवून दिले नाही. कारण तिच्या डोक्यात आता पुढची चक्र सुरू झाली होती.

रमाला आजीने दुसऱ्या दिवशी पहाटेच्या एसटीने मुंबईला पाठवून दिले. संपूर्ण प्रवासात रमा मात्र अबोलीचा चेहरा आठवून हमसून हमसून रडत होती.. मुंबईला गेल्यानंतर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ती नक्कीच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार होती.आता तिच्यासाठी एकच ध्येय होतं, ते म्हणजे अबोलीला शक्य तितका न्याय मिळवून देणं..
वाचकहो,
ही कथा काल्पनिक असली, तरी समाजात अनेकदा सत्तेचा पदाचा वापर करून अनेक लेकी बाळींबरोबर असे भयानक प्रकार घडत असतात. अनेकदा त्यांचा आवाज दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात.. आणि मग हेच नराधम उजळ माथ्याने समाजात फिरत समाजाच्या भल्यासाठी कसे झटत आहेत, हे दाखवण्यासाठी श्रीमंतीचा वापर करतात.. अशा विकृतींचा अंत करण्यासाठी वेळीच परिस्थिती विरुद्ध आवाज उठवणे हा एकच प्रभावी उपाय ठरू शकतो..
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!