जाळं ( भाग 1)

  1. जाळं ( भाग 1)
  2. जाळं ( भाग 2)
  3. जाळं ( भाग 3)

© अपर्णा देशपांडे
जोना मेनन. चेन्नई मधील मोठी यशस्वी उद्योजिका . कुठलेही पाठबळ नसतांना खूप चिकाटी आणि सचोटीने तिने आपला व्यवसाय फक्त भारतातच नाही तर इतर काही देशातही वाढवला होता.
शूज इंडिस्ट्री मध्ये तिचे नाव आदराने घेतले जाई . तिच्या  ‘ BOOT ‘ ह्या कंपनीने तरुणांसाठी मस्त डिझाइन्स बाजारात आणले होते. तिच्या ब्रँड चे शूज वापरणं म्हणजे तरुणींमध्ये स्टाईल स्टेटमेंट झाले होते .
जोनाच्या प्रतिस्पर्धी कंपन्या खूप मागे पडल्या होत्या , इतका  तिने मार्केटवर कब्जा केला होता .

‘ your attention please ….’ दुबई च्या विमानाची  अनाउन्समेंट झाली .
सगळे सोपस्कार पूर्ण करून ती सेक्यूरिटी चेकसाठी रांगेत उभी राहिली . ही सगळी प्रक्रिया तिला फार कंटाळवाणी वाटे . खरं तर तिच्या चेन्नई ब्रँचचा जनरल मॅनेजर विकास राव तिच्या सोबत येणार होता .
पण ऐन वेळेवर साऊथ आफ्रिकेची एक मोठी कंसाईनमेंट आली . त्यामुळे आणखी दोघांना घेऊन ते दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचणार होते .
समोर  कुणीतरी विनाकारण सेक्युरिटी हेड शी हुज्जत घालत होतं . त्यामुळे थोडी रांग खोळंबली होती . लोक कधी शहाणे होणार, तिच्या मनात आलं .

तिचा नंबर आला , नेहेमी जाणारी ,सगळ्या स्टाफला चांगली ओळखणारी जोना , पण तिने तिथे कधीही आपल्या मोठेपणाचा गैरफायदा घेतला नाही .
” गुड इविनिंग मॅडम , परवाच तुम्ही टांझानिया वरून आलात न ?”
” हो आता कामच असं आहे .. ती हसली .
श्रीकांतचा तीन वेळा फोन येऊन गेला. तो गेल्या आठवड्या पासून एक मस्त टूर प्लॅन करतोय पण आपली अन त्याची सुट्टी एक येणे फार अवघड. पण ह्यावेळी जमवायचंच असं तिने ठरवलं.

श्रीकांत मेनन आणि जोनाने ठरवून स्वतःचे व्यवसाय स्वतंत्र ठेवले होते .
श्रीकांतची सिमेंट फॅक्टरी होती , भागीदारीत … यश टाकिया बरोबर .
तो व्यवसाय इतका यशस्वी ठरला की दोघांनी मिळून आणखी  एक दोन व्यवसाय सुरू केले . लिकर फॅक्टरी , बिल्डिंग मटेरियल सप्लाय …वगैरे .
प्रवासात जोना कुठेही वेळ न घालवता मस्तं झोप घेत असे कारण अलीकडे  ती एक दुर्मीळ गोष्ट झाली होती .
ती विमानातून उतरली , दुबई एअरपोर्ट वर  सामान घ्यायला जाणार इतक्यात तिथे एक पोलीस ऑफिसर आला .

” जोना मेनन ?”
” येस , “
” प्लीज कम !”
”  कुठे ? आणि माझे सामान ?”
” आम्ही तुमच्या पर्यंत पोचवतो . तुम्हाला इन्ट्रोगेशन रूम मध्ये यावे लागेल . “
” पण का ?”
असे म्हणे पर्यंत दोन महिला पोलीस ऑफिसर तिच्या दोन बाजूला येऊन थांबल्या होत्या .
तिला एका खोलीत नेण्यात आले.

” तुमची  बॅग दाखवा प्लिज. आणि पर्स पण .” ती महिला ऑफिसर म्हणाली .
पर्स मध्ये आक्षेपार्ह काहीच नव्हते . त्यांनी  केबिन बॅग रिकामी करायला सुरुवात केली . जोना शांत होती . का आपल्यावर संशय आला असेल ह्याचा विचार करत होती .
लिपस्टिक , नॅपकिन , बरंच काय काय आणि  एक पॅकेट ज्यात दोन पांढऱ्या पुड्या !!
ऑफिसर नि समाधानाने एकमेकांकडे बघितलं . जोना अवाक ! शॉक मध्ये !!
” अशक्य !! हे …हे माझं नाही !! कुणी कधी टाकलं , खरच मला …,ओ माय गॉड !! ..प्लिज विश्वास ठेवा . हे …कुणीतरी माझ्या फूड पॅक मध्ये टाकलंय . किंवा माझे पार्सल बदललंय .”

” ह्या पेपरवर तुमची माहिती लिहा , साहेब येतील . तेच बोलतील तुमच्याशी . “
” मी इथे  ZOOP and ZAP कंपनी मध्ये जाण्यासाठी आले आहे . त्याचे MD अल- नवाबी माझे चांगले ओळखीचे आहेत . मी त्यांना कॉल करू का ? “
तिला परवानगी मिळाली .
तिने नवाबिंना सगळी हकीकत सांगितली . त्यांनाही खूप आश्चर्य वाटले.
नवाबी यांना जेव्हा कळाले की रहेमान ही केस हाताळणार ,तेव्हा त्यांनी सावधतेचा इशारा दिला .
” मॅडम , हा रहेमान एक नंबर चा नीच माणूस आहे .  मी चांगलं ओळखतो त्याला . भारत देशा बद्दल कमालीचा द्वेष  आहे त्याच्या मनात . मी एक चांगला भारतीय वकील पाठवतो तुमच्या साठी . “

तिने पटकन मोबाईल वरूनच श्रीकांत ला मेल करून टाकला ” In grt trouble .Help “
ड्रग आणि नोरकोटिकस डिपार्टमेंटचे सिनिअर ऑफिसर रहेमान यांनी त्यांना क्राईम ब्रँचला यायला सांगितले .
अल अबीद रस्त्यावरील क्राईम ब्रँच मध्ये तिला नेण्यात आले .
ती पुन्हा पुन्हा एकच सांगत होती . ” हे कुणीतरी माझ्या फूड पॅक मध्ये टाकलंय. आमच्या भारतीय सिक्युरिटी पास मधून हे सुटुच शकत नाही . कुणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.”

” मॅडम , आमचे कायदे तुम्हाला माहीत आहेत का ? ड्रग्स जवळ बाळगल्याबद्दल सुध्दा वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा असते .”
” सर , मी एक जबाबदार ,प्रतिष्ठित नागरिक आहे . ह्या आशा बेकायदेशीर मार्गाने मी का जाईन ?  मी हे असे काम का करिन ? तुम्ही प्लिज मला भारतीय एम्बेसीशी बोलू द्या , किंवा तुम्ही स्वतः बोला .
श्री. आदित्य सहानी दुबईतील , आय मिन U .A .E  मधील भारतीय  राजदूत आहेत . ते मला चांगलं ओळखतात . आमचं  दुबई मधील काँसुलेट आहे , तिथेही  आमचे रशीद झुबेन आहेत . मला त्यांच्याशी बोलायचंय प्लिज .”

” बास !! मी काय करावं हे मला शिकवू नका !! “………” उझमुल , ह्यांची टेस्ट घ्यायला सांगा शाझमी ला . आणि केस फाईल करा .”
हताश होऊन तिने भारतात श्रीकांत ला चौथ्यांदा फोन लावायचा प्रयत्न केला ….फोनच लागत नव्हता .
तिने नवाबी ला कॉल केला .
” मॅडम ,प्लिज मला पुन्हा पुन्हा फोन नका करू , हे मला पण अडकवतील .
इथले कायदे फार कडक आहेत . मी वकील देतोय न तुम्हाला .”
आता मात्र आपण फसलो ही तीव्र जाणीव तिला झाली .

तिने कुठल्या नशेचे सेवन केले आहे का हे तपासाला  शाझमी आली . ( एकूण तीन प्रकारचे ड्रग्स असतात क्लास A , B ,C . क्लास A मध्ये cocaine , LSD , heroin , crystal meth , majic mashrooms इत्यादी येतात . ह्या ड्रगस साठी सगळ्यात जास्त शिक्षा होते .भारतात सात वर्षे . जे ड्रग्स औषध म्हणूनच वापरण्या साठी असतात त्यांचे कायदे वेगळे आहेत )
” नाही सर , कुठलेही ड्रग नाही घेतलेत हिने .” शाझमी ने सांगितले.
” मी जोना मेनन आहे , BOOT कंपनी ची चीफ मॅनेजिंग डायरेक्टर . माझ्या चार देशात ब्रांचेस आहेत , तुमच्या कडे एक जॉईंट व्हेंचर करायचं म्हणून मी आलेय . तुमच्या FNC शी आमचे बोलणे झालेय , लीगल पेपर्स उद्याच दाखवते मी तुम्हाला .  ”  तिने बिचारीने नवाबीचा उल्लेख टाळला .

” मग तुम्ही एकटेच कसे आलात ?”
” आज माझ्यासोबत माझे सहकारी आमचे G M येणार होते , पण वेळेवर रहित झालं . “
उद्या तीन जण बाकी डॉक्युमेंटस घेऊन येणार आहेत  हे त्यांना  सांगितले तर हे लोक त्यांच्या ही मागे लागतील . आता निदान त्यांची मला मदत तर होईल असा विचार तिने केला .
“आज तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत . तुम्ही तुमचा वकील करू शकता . ” अतिशय रुक्षपणे रहेमान म्हणाला .
आपण  तेव्हाच  आधीच भारतीय दूतावासाशी संपर्क करून आदित्य सहानी किंवा रशीद झुबेन यांच्याशी बोलायला होते  असे तिला वाटले .

” एक ग्लास पाणी मिळेल का ? “
ती घटा घटा पाणी प्याली . आता नेमके काय करावे हा विचार करत असतानाच त्या दोन महिला पोलीस आल्या .
” चला आमच्या बरोबर .”
” माझे बाकी सामान ?”
” ते गाडीत टाकलंय आम्ही .”
” कुठे नेताय मला ?”
” ए s s चल मुकाट !!”
ईश्वरा ? ही काय वेळ आणलीस माझ्यावर ? मला ह्यातून आता तूच बाहेर काढ …….
ती गाडीत बसली .

तिला आता जमानत मिळेपर्यंत पोलीस कस्टडीत रहावे लागणार होते . शेवटी जोनाला पोलीस कस्टडीत जावे लागले . तिथे तिला शांतपणे विचार करायला वेळ मिळाला.
काय झालं नेमकं??
आपण सेक्युरिटी पास च्या रांगेत उभे होतो … हातात फूड पार्सल होतं. तिथे एक जण हुज्जत घालत होता . आपली बॅग पुढे गेली , तेव्हा कुणी पाकीट टाकलं का ? ……
नाही …..नाही ….तसं नाही झालं .नंतर मी माझी बॅग उचलली , पर्स घेतली , आणि पुढे गेले ….तेव्हा …मॅडम , तुमचे फूड पार्सल !!! कुणीतरी दोन पाऊलं पुढे येऊन पार्सल देत होता.

ते पॅकेट सिक्युरिटी चेकअप मधून गेले होते का ? …..कोण होता तो माणूस ? ….
त्यावेळेला हे इतकं फास्ट घडलं की तिने ते पॅकेट पटकन घेतलं होतं आणि विमानाच्या दिशेने निघाली होती .
झोप खूप येत असल्याने पार्सल उघडून बघीतलंच नव्हतं.
लॉकअप मध्ये ती सतत श्रीकांत चा विचार करत होती . त्याचा फोन आला असेल का ? मेल मिळाल्यावर त्याची अवस्था  काय झाली असेल ? तो नेमकं काय करेल ? अजूनही ती मनाने शांत होती.

संध्याकाळी तिला बाहेर आणण्यात आले . तिचे वकीलपत्र घेण्यासाठी एक फार मोठे नामांकित वकील प्रकाश सरीन आले होते. नवाबी ने किमान तेवढे तरी केले होते .
प्रकाश सरीन यांच्या व्यक्तिमत्वाने जोना प्रभावीत झाली होती . सरीन यांनी तिला अनेक प्रश्न विचारले .
” ते फूड पार्सल तुम्ही नेमक्या कोणत्या स्टॉल वर घेतलं होतं आठवतंय ?”
” हो . आतील वेटिंग लौंज मध्ये 
‘ tango ‘ कॉर्नर नावाच्या स्टॉल वर . “
” ते हातात घेऊन मग कुठे गेलात ? म्हणजे वॉशरूम किंवा …”

” नाही . सरळ सेक्युरिटी चेक च्या रांगेत उभी राहिले .”
” त्यावेळेला तुमच्या जवळ काय काय सामान होते ? “
” एका हातात पार्सल , एका हातात केबिन बॅग ,आणी खांद्याला पर्स .”
” भारतात महिलांना एका छोट्या कापड बंद विभागात बोलावतात …तिथे बॉडी चेकअप होते …तिथे केव्हा गेलात ? “
” हा s s , मी आधी हॅन्ड लगेज चेक इन च्या रांगेत उभी होते , पण मधेच लक्षात आले , आणि मग बॉडी स्कॅन साठी गेले .”

” एक्साटली !!! तेव्हा सामान कुठे होते ? “
” अ s s , हा s तेव्हा मी ते पार्सल माझ्या बॅग मध्ये टाकलं , बॅग रोलर बेल्ट वर ठेवली , आणि फक्त पर्स घेऊन  स्कॅनिंग ला गेले .”
” इथेच !! इथेच तुमचे पार्सल बदलले मॅडम !! तुम्ही विमानकडे जातांना असे कसे ते पॅकेट सुटे कुणी हातात दिले ? तुम्ही तर बॅगेत टाकले होते न ?”
” त्यांनी ते उघडून बघितले होते . बाहेर काढून . माझं लक्ष होतं . “
” मग आत टाकलं पुन्हा ?”
” माहीत नाही , मला पर्स पण ठेव्हायची होती  बेल्ट वर .”
” ह्याच चार पाच मिनिटात हे घडलय नक्की .”

” पण तिथे पूर्ण एअरपोर्ट सिक्युरिटी चे कितीतरी जवान उभे असतात .  “
” त्या फूड स्टॉल वाल्याकडे जावं लागेल . तिथेच गडबड आहे नक्की . कारण सगळे पॅकेट्स वरून सारखेच दिसतात याचा फायदा घेतलाय . होऊ शकतं की कुणी  अथोरिटी पैकी यात सामील आहे .”
” मला एक सांगा , त्या दोन पाकिटांची एकूण किंमत किती असेल ?”
” ते ….साधारण वीस लाख .”
” फक्त ? थोडं ऑड नाही वाटत ? म्हणजे फक्त एव्हढ्या वजनाच्या पॅकेट्स ची तस्करी का करेल कोणी ? एक दोन कोटी असेल तर समजू शकतो . ….आणि मीच का ? …..माझ्यावर कुणी जास्त संशय घेणार नाही असे वाटले असेल का ?”

” हो ही शंका मला ही आलीये . तस्करी करायचीच तर मग मोठ्या रकमेची का नाही ? ….का …तुम्हाला अडकवण्या साठी हे जाळं आहे ?”
” मला आता तीच शंका येतीये सरीन सर . हे मला अडकवण्यासाठीच केलं गेलं असणार .”
” उद्या तुम्हाला कोर्टात न्यायाधीशांना आपली बाजू मांडायला जायचंय . त्यानंतर पुढचे ठरेल . तुमच्या विरुद्ध इथले पोलीस किती स्ट्रॉंग केस उभी करतात ते बघावे लागेल .”
” सरीन सर ,तुमच्या फीस ची काळजी करू नका . “
” ….आधी मला तुम्हाला यातून बाहेर काढू द्या . मग घेईनच मी फीस .” ते प्रसन्न हसले .

जोना आपल्या नवीन शंके विषयी विचार करू लागली . खरच इतक्या कमी रकमेसाठी कुणी एवढी जोखीम का घेईल ? कोण आहे असं ज्याला आपल्या ला अडकवून फायदा होईल ?
सकाळी तिला कोर्टासमोर नेणार म्हणून गाडी तयार ठेवली होती .
तेथील महिला पोलीस ने सांगितले की तिला भेटायला भारतातून कुणीतरी आलंय  .
……श्रीकांत ! तोच आला असणार …
पण श्रीकांत नाही तर तिचे जनरल मॅनेजर विकास राव आले  होते .

” मॅडम ,आम्ही तिघे म्हणजे मी , केविन आणि सिद्धरामन आलो आहोत . ZOOP and ZAP  च्या एम्प्लॉयी नि आम्हाला एअरपोर्टवरच तुमच्याबद्दल सांगितलं . हे कसं घडलं मॅडम ? तुम्ही काळजी करू नका .आम्ही आलोय न , आजच वकीलातीत जाऊन भेटतो .”
” श्रीकांत सरांना मी मेल केला होता , त्यांच्याकडून काहीच निरोप नाही ?”
” नाही मॅडम , उलट यश टाकिया सरांचा मला फोन होता …
” काय …काय फोन होता ? ..लवकर बोला मिस्टर विकास.
” ते म्हणताएत , की काल पासून श्रीकांत सर भेटले नाहीत  आणी  त्यांचा फोन पण  लागत नाहीये .”
(क्रमशः)
भाग 2 इथे वाचा
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!