जाळं ( भाग 2)

  1. जाळं ( भाग 1)
  2. जाळं ( भाग 2)
  3. जाळं ( भाग 3)

© अपर्णा देशपांडे
भाग 1 इथे वाचा
जोना मधील कार्यक्षम उद्योजिका जागी झाली .
” विकास , श्रीकांतच्या मित्रांकडे चौकशी करा. फक्त साहेब तिथे आहेत का इतकच बघा , जास्त काही सांगू नका “
” येस मॅडम “
” आणि  ताबडतोब आपल्या काँसुलेट मध्ये जा . मला बेल मिळणं आवश्यक आहे .  बेल जरी मिळाली तरी आत्ताच मला आता दुबई सोडत येणार नाही . त्यामुळे आपली डील पूर्ण करून टाकू . या तुम्ही .”
दुपारी तिला न्यायाधीशांसमोर उभे केले होते . सगळी प्रश्नावली पुन्हा विचारून झाली . तिनेही तितक्याच सफाईने आणि प्रामाणिक पणे उत्तरे दिली .

विकास राव काँसुलेट मध्ये गेले होते …त्याचा परिणाम म्हणजे रशीद झुबेन स्वतः कोर्टात आले होते .
भारत एमिरेट्स संबंध , व्यवसाय आणि जोना चे  योगदान ह्यावर ते बोलले . त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिला बेल मिळाली . आता आपले निरपराधित्व तिला सिद्ध करावे लागणार होते .
एडव्होकेट सरीन यांनी बेलची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली .
सध्यातरी जोना मुक्त होती. कितीतरी तासांचे ओझे थोड्या काळा करता का होईना उतरले होते .

ती आधी क्वादील रोड वरील हॉटेल ब्लु शोअर मध्ये गेली. एव्हाना भारतात बातमी गेली असणार .उगाच डोक्याला त्रास नको म्हणून तिने T. V च ऑन केला नाही .
आधी गरम पाण्याने स्नान केले . रूम सर्व्हिस द्वारे जेवणाची  ऑर्डर दिली , आणि शांत डोळे मिटून बसली . गेल्या तीस तासात खूप काही घडून गेले होते . कोणी आणि का केले असावे हे …
तिला श्रीकांत ची काळजी वाटत होती . त्याच्या जीवाचे काही ………….
नाही नाही , तिने वाईट विचार झटकून दिले आणि जेवायला सुरुवात केली .

थोड्याच वेळात प्रकाश सरीन येणार होते  . तिने तीन लाखाचा चेक सही करुन ठेवला .
“मॅडम , दुबई पोलीस आता भारतातील इन्व्हेस्टीगेशन सुरू करणार. म्हणजे भारतीय क्राईम ब्रँच आता हा सगळा तपास करणार  . मी देखील माझा माणूस पाठवतोय . पण मला हे सांगा , की व्यवसायात  तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत  ज्यांना तुमच्या नसण्याचा फायदा होईल ?”
सगळा इतिहास तिच्या डोळ्यासमोर आला …ती सांगू लागली .
जोना  स्वतःची कंपनी सुरू करण्या आधी आपल्या वडिलांना मदत करीत होती .

तिच्या वडिलांचा लेदरच्या वस्तू बनविण्याचा मोठ्ठा व्यवसाय होता. आपल्या मुलीने एक अतिशय यशस्वी उद्योजिका बनावे हे त्यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ते जागा शोधत होते.
त्याच वेळेत चेन्नई मधील दोन दिग्गज व्यावसायिक जगन शेट्टी आणि शिव कुमार यांनी  गावाला लागून तीन एकर जागेवर  बेकायदेशीर कब्जा केला होता . जोना च्या वडिलांनी मूळ मालकाच्या बाजूने केस केली, जिकली आणि मग ती जागा जोनाच्या वडिलांना विकत मिळाली .
मालकांनी ती शेट्टीला विकायला नकार दिला.

तेव्हापासून ते दोघे जोनावर अतिशय नाराज होते शिवाय ते दोघेही शूज इंडस्ट्री चालवत . भारतात त्यांचे मोठे नाव होते .
जोना ची कंपनी येईपर्यंत त्यांना कुणी मोठा प्रतिस्पर्धी च नव्हता. आपली मोनोपॉली हिने मोडून काढली ह्याचा त्यांना फार सल होता .
मग वैध अवैध मार्गाने तिला त्रास देणे सुरू झाले .
तिला मिळालेले बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट पळव , तर कधी तिचे माणसं जास्त लालूच देऊन आपल्याकडे वळव असे अशोभनीय मार्ग ते वापरू लागले .
एकदा तर इटली वरून येणारा कच्च्या मालाचा पुर्ण कार्गो कंटेनर त्यांनी खोटे कागदपत्रे दाखवून पळवून नेला होता .
म्हणतात ना की …….
बेईमानी का धंदा बडी इमानदारिसे होता है ।
त्याप्रमाणे शेट्टी आणि शिव ने बऱ्याच लोकांचे इमान विकत घेतले होते.

.हे तिचे सगळे म्हणणे  एडव्होकेट सरीन यांनी नीट ऐकून घेतले .
” मॅडम , मग तर तुम्हाला सगळ्यात आधी यांचाच संशय यायला हवा होता .”
” बरोबर आहे तुमचं . पण हे लोक इतक्या खालच्या थराला जातील असे वाटलेच नव्हते. इतकी निच पातळी गाठली या लोकांनी !!! आता मला माझे पती श्रीकांत यांची काळजी वाटतेय .”
“तुम्ही इथून एक तक्रार नोंदवू शकता .माझा मित्र आहे चेन्नईत  adv . जयेश राघवन . तुम्ही ओळखता ?”
“हो एकदा भेटलो होतो काही कारणाने “
“आणखी तिथे जवळचे कोण नातेवाईक आहेत ? “
” माझे तीन एम्प्लॉयी इथे आहेत न , ते आज तिथे वापस जातच आहेत. ते करतील कम्पलेंट . आमच्या घराजवळच्या पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल . तशी माझी आई असते बंगलोरला ,पण तिला यातले काहीही कळू द्यायची माझी इच्छा नाही .तिथे मग लागेल तशी  adv. जयेश राघवन ची मदत घेता येईल . “
” ठीक आहे , येतो मी “

दुबई वरून भारतात  ह्या केससाठी काँस्युलेट कडून अर्ज आला होता . इन्स्पेक्टर  रमण तपास करत होते . श्रीकांत गायब झाल्याची तक्रार पण नोंदवली होती आणि सरळ सरळ शेट्टी आणि शिव वर आरोप केले होते .
इन्स्पेक्टर रमण चेन्नई विमानतळावर आले . आधी त्यांनी त्यादिवसाची CCTV फुटेज बघायला घेतली . एअरपोर्ट सेक्युरिटी चे पूर्ण सहकार्य होते . एक एक क्षणाचे चित्रण ते बारकाईने तपासत होते . ते पाहू लागले …
जोना रांगेत उभी होती ….तिने आपली बॅग काढली ….पार्सल त्यात टाकलं आणि बॉडी चेक साठी दुसऱ्या बाजूला गेली …… तिथून तिचे आपल्या बॅग कडे लक्ष होते . सिक्युरिटी ऑफिसर ने ते पॅकेट एक सेकंद बाहेर काढलं ….आणि त्याच क्षणाला जोना कापडी रुम मध्ये आत गेली .

त्यावेळी सिक्युरिटी ने ते पॅकेट आत बॅगेत टाकले नव्हते . ती बाहेर आली. तिची पर्स चेक करायची होती, ती तिने बेल्ट वर ठेवली आणि इन्स्पेक्टर नि तिथे स्क्रीन थांबवला .
ऑफिसरच्या शेजारी एक सफाई कामगार दिसत होता . त्याच्या कडे बॅटरी वर चालणारी छोटी ट्रॉली होती .खाली चाकं असलेली. त्यात एका बाजूला कचरा टाकायला मोठे कंटेनर आणि दुसऱ्या बाजूला सक्शन पाईप होता .
“आता पुढचा स्क्रीन दाखव ” रमण म्हणाले
” हा हा थांबव !! …हे बघ !! हा ऑफिसर दुसरी बॅग सरकवतोय आणि कामगाराचा हात बघ !! “
त्या कामगाराच्या हातात तसेच एक पॅकेट होते .

“पुढचा फुटेज बघू !”
त्याने क्षणात पाईप बेल्ट च्या खालच्या बाजूने आत टाकला आणि पॅकेट बदलले.
“हे बघ , खरे फूड पॅकेट चेक केल्यावर हे दुसरे पॅकेट त्याने खालून बसून बदललंय !!! Yessss !!! त्याच्या चेहेऱ्याला झूम कर .  ह्याला ओळ्खतोस ?”
” सर मी कॅमेरा कंट्रोल रूम मधेच असतो .मला  बाकी स्टाफ फारसा माहीत नाही , पण आमच्या सर्विस प्रोवायडर कंपनी चे लोक आहेत न!”
 “त्यांच्या मॅनेजर ला बोलाव . “

“सर , मला बोलावलत ? “
” हा तुमचा कामगार आहे न ? “
” हो सर , बोपन्ना !! तोच आहे हा .”
” ताबडतोब बोलवा त्याला .”
तो येई पर्यंत इन्स्पेक्टर रमण Tango ‘ फूड कॉर्नर वर गेले .
” एक रिकामे पार्सलचे पॅकेट मिळेल का ? “
” रिकामे ? नेमकं काय हवंय ? “
” सांगितले ना पार्सल चे फक्त पॅकेट ,म्हणजे नुसता पॅकिंग बॉक्स हवाय . “
” सॉरी सर , तसा आम्ही देत नाही .”
” असं ? मग बोपन्ना ला कसा दिला ? “

” सर , स्टाफ चे लोक कधी कधी त्यांचे फूड ठेवायला मागतात ,तर दिला असेल ,पण क्वचितच .आमचं नुकसान होतं न सर , कारण जवळपास वीस रुपयाला एक बॉक्स पडतो . खूप चांगली क्वालिटी आहे ना सर .”
” मी सांगेन तेव्हा हे सांगण्यासाठी यावे लागेल तुला .कुणाचा जीव वाचू शकतो .”
” हो सर नक्की .”
इन्स्पेक्टर मग पुन्हा कॅमेरा रूम मध्ये गेले . सर्व्हिस कंपनीचा मॅनेजर आला होता .
” सर , बोपन्ना गेले तीन दिवस कामावरच आलेला नाहीये .”
” वाटलंच मला .पत्ता द्या त्याचा . पळायला बघतोय साला !! “
त्यांनी ताबडतोब सब इन्स्पेक्टर फोन करून  त्या कामगाराचा पत्ता दिला.

मग त्यांनी पूर्ण अर्धा तासाचे रेकॉर्डिंग कॉपी करून घेतले आणि ते पुन्हा सेक्युरिटी चेक पाशी गेले .
“ऑफिसर, आपण आपल्या स्टाफ वर किती भरवसा करतो, काही सेकंद ह्या बेल्टवरचे तुमचे लक्ष इकडे तिकडे झाले की बघा हे काय करतात . त्या दोन सेकंदात जोना मॅडम चे अख्खे आयुष्य पणाला लागले .  “
“ही वाटतीये तितकी साधी गोष्ट नाही इन्स्पेक्टर साहेब . त्या कामगारा जवळ ते हेरॉईनचे पॅकेट इथ पर्यंत आलेच कसे ? इथे  आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होत असते . हा कोणत्या मार्गाने आत आला हेही आम्ही तपासू .आमच्या साठी हा अलार्म आहे .” सिक्युरिटी ऑफिसर म्हणाले.
“त्यांनी आपल्या कॅमेरा अँगलचा नीट अभ्यास केलाय आधीच . बरोबर त्याच अँगल मध्ये खाली बसून शिताफीने पॅकेट बदललंय . “

इतका पुरावा सध्या तरी जोनाला सोडवायला पुरेसा होता . बाकी तपास तर करायचाच होता , पण आधी आपला नागरिक  आपल्या देशात वापस येणे आवश्यक होते . शेवटी जोना मेनन ही एक आंतरराष्ट्रीय किर्तीची व्यक्ती होती .भारताचे नाव उंचावणारी .
इतक्यात इन्स्पेक्टर रेड्डी चा फोन आला .
” रमण , तुझ्याकडे जोना मेनन ची केस आहे न ?”
” हो . का ? “
” तिचा नवरा श्रीकांत मेनन गायब झाल्याची तक्रार आलीये , आणि आरोप  आहे प्रसिद्ध बिझनेसमन जगन शेट्टी आणि शिवकुमार  वर !!”
” हो , कळालय . पूर्ण माहिती आहे  मला . तुम्ही त्यांच्या कंपनीच्या गोडाऊन चे  सर्च वोरेंट घ्या . तिथे असू शकतो तो .”

इकडे दुबईत रहेमान चिडला होता . त्याला वाटलं त्यापेक्षा फारच लवकर सगळी उकल करून टाकली भारतीय पोलीस ऑफिसर ने !! शिवाय राजदूतांचे प्रेशर !! इतर कुणी असता तर सरळ जेल मध्ये घातला असता आणि गोळ्या घातल्या असत्या . आपल्या इथल्या कडक नियमांचा त्याला प्रचंड गर्व होता .
तो हॉटेल ब्लु शोअर मध्ये गेला . त्याला नाईलाजाने तिला मोकळं करणं भाग होतं . सध्या तरी सगळे पुरावे तिच्या बाजूने होते ,  आणी मग कोर्टाची ऑर्डरच होती .
” चला मॅडम , तुमच्या केस मध्ये काही दम राहिला नाही , आम्ही सोडतोय तुम्हाला . पण एक सांगतो, आमच्या इथून सुटणे सोपे नाही, तुम्ही फार नशीबवान निघाला . आम्ही तर  सरळ ..”……….त्याने गोळी झाडल्याचा अभिनय केला !!

तिने दीर्घ श्वास घेतला . गेले तीन दिवस तिला आयुष्य भराची शिकवण देऊन गेले. थोड्या गाफीलपणाची केवढी मोठी किंमत !!!!
तिने ताबडतोब  adv. सरीनला फोन केला .
“Thank you so much !!  तुम्ही माझे आयुष्य वाचवलेत .मला आजच नावाबींना भेटायचंय आणि पहाटेची फ्लाईट पकडायचीये . “
“तिकीट बुक करू का ?”
“माझी असिस्टंट करेल , थँक्स !!”
 ती हाडाची व्यावसायिक होती . अशाही परिस्थितीत ती  ZOOP and ZAP मध्ये गेली . तिची फक्त सही बाकी होती . रजिस्ट्रार तिथे आले होते .
जोना च्या खात्यात आणखी एक कंपनी पार्टनरशिप मध्ये जमा झाली . आपल्या देशाला आणखी काही लाख डॉलर्स कमावून देणार होती ती !!

पहाटे ती एअर इंडिया च्या विमानात बसली  . काय सुटकेची भावना होती  !! केवढ्या मोठ्या संकटातून सहज सुटली होती ती !
आता तिला जाळ्यात अडकवणाऱ्याना शोधणे हे तिचं मिशन होतं !!
चेन्नई एअरपोर्टवर तिला घ्यायला विकास राव आणि यश टाकिया आले होते . यश ने तिला प्रेमाने जवळ घेतले .
तिच्या भावनिक स्थितीची त्याला कल्पना होती .
” श्रीकांतची काही खबर ?” तिने विचारले .
” रात्री आपल्या तक्रारी नुसार पोलिसांनी शेट्टी आणि शिव यांची चौकशी केली . त्यांचे फार्म हाऊस , गोडाऊन्स ,आणि राहते घर देखील तपासले . पण कुठलाही धागा हाती लागला नाही . ” यश माहिती देत होता.

“इन्स्पेक्टर रेड्डीकडे आहे न केस ? कमिशनर साहेब पण लक्ष घालताएत .”
” हो. एकदम शिस्तीचा आणि कडक ऑफिसर आहे मॅडम ” ….विकास
” हम्मम . ” तिला कल्पना आली होती की प्रकरण इतके सोपे नाही .
दुपारी ती पोलीस स्टेशन मध्ये गेली . बारकाईने सगळी माहिती इन्स्पेक्टर रेड्डी ना दिली.
हाय प्रोफाईल केस असल्याने कमिशनर साहेबांनी मिडीयाला दूर ठेवावे अशी विनंती इं.रेड्डी नी केली होती.
केस योग्य ऑफिसरच्या हातात आहे किमान याचे तिला समाधान वाटले .

मध्य रात्री ती आपल्या घरात झोपली असतांना फोन वाजला.
बाहेर सुरक्षा शिपाई उभा होता . त्यामुळे तिला फारशी भीती नव्हती .
” हॅलो “
” जोना मेनन , विल्लूपुरम ची दीडशे एकर ची जमीन सोडून दे .त्यावर ची केस मागे घे . ताबडतोब !! नाहीतर नवरा गमावून बसशील . पोलिसांना  आणि हा , त्या रेड्डीला सांगशील तर उद्या नवऱ्याचे तुकडे मिळतील दारात पडलेले . “
” कोण बोलतंय ? अरे हिम्मत असेल तर समोर या ना . भिकच मागायचिये तर देते न ! करोड रुपयांची भीक देते , हे असे छुपे वार का करताय भ्याड कुठले !!” ती संतापाने ओरडली.
पलीकडून फोन केव्हाच ठेवल्या गेला होता.
  ( क्रमशः)
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!