जाळं ( भाग 3)

  1. जाळं ( भाग 1)
  2. जाळं ( भाग 2)
  3. जाळं ( भाग 3)

© अपर्णा देशपांडे
इन्स्पेक्टर रमणने सगळे पुरावे दुबईला पाठवले. पण हे कारस्थान नेमके कुणाचे हे समजले नव्हते. त्यांनी शेट्टी आणि शिवला शोधून भेटायचे ठरवले . म्हणून रेड्डी आणि रमण दोघे निघाले .
साऊथ चेन्नई मध्ये थोडं गावाबाहेर त्यांची फॅक्टरी होती . काम सुरू होते .
ऑफिस मध्ये काही लोक होते .
“येस इन्स्पेक्टर साहेब ? “
“मला शेट्टी साहेब किंवा शिव साहेबांशी बोलायचंय .
आतून शेट्टी बाहेर आला .

” या साहेब . काय तुम्ही आमच्या सगळ्या जागांवर सर्च मोहीम चालवलीय . अहो त्या श्रीकांत मेनन शी आमचं काही देणं घेणं नाही . आम्ही इथे आमच्याच परेशानीत आहोत . नवीन लफडं कुठं लावून घेऊ ? “
” आणि जोना मेनन ?”
” अरे ? आमचा काय संबंध !! “
” संबंध  तर आहेच .सरळ विचारतो . जोना मेनन तुमच्या प्रगतीच्या आड येतेय असं नाही वाटत तुम्हाला ?”
” नुसतं वाटण्यानी काय होणार ?”
” मॅडम ला ड्रग्स मध्ये कुणी अडकवलं ?”
” काय माहीत ! आम्ही तर सरळ न्युजच ऐकली ………जोना मेनन ला हेरॉईन तस्करी मध्ये अटक !!!…….” आणि तो खी खी हसायला लागला .
*****

इकडे  एअर पोर्ट सिक्युरिटी ऑफिसर ने माहिती काढली होती .बोपन्ना नेहेमी जेन्ट्स टॉयलेट्स साफ करायच्या ड्युटीवर असायचा . मग नेमकी त्याची ड्युटी बरोबर त्याच दिवशी कुणी बदलली ?
” तुमच्या लोकांच्या ड्युटी ठरलेल्या आहेत न ?”
” हो सर . ही बाब सुरक्षा संदर्भात महत्वाची आहे .त्यामुळे आम्ही कामगारांच्या कामाच्या जागा अशा वारंवार बदलत नाही . त्या दिवशी बोपन्ना ने चेक इन एरिया आपल्या मनाने घेतला सर . बदमाशी केली . मी नव्हते सांगितले .”
इन्स्पेक्टर रमणने  सबइनस्पेक्टरला बोपन्ना कडे पाठवले होते . त्यांचा फोन आला
” सर , गडबड झालीये सर !! बोपन्नाचा खून झालाय .”

” काय ???? “
” हो सर . मारेकरी पाठवून गोळ्या घातल्या आहेत नक्की .कारण गावठी पिस्तुल वापरलंय .”
” हे प्रकरण आणखी वाढतच जातंय ,संपायच्या ऐवजी .”
*********
इन्स्पेक्टर रेड्डी आणि इन्स्पेक्टर रमण ला कमिशनर साहेबांनी बोलावून कामाचा वेग वाढवायला सांगितले . उशीर झाल्यास पुन्हा एमिरेट्स कडून तगादा सुरू होईल .जोना अडचणीत येईल .
आठवडा झाला , श्रीकांत सापडला नाही …
”  काय रेड्डी ? श्रीकांत मेनन चे काय झाले पुढे ?”
रेड्डी ने सगळा रिपोर्ट सांगितला .

श्रीकांत गायब झाल्याची तक्रार आल्या बरोबर  इन्स्पेक्टर रेड्डी आधी श्रीकांत च्या घरी गेले होते . त्यावेळी जोना दुबईत होती .
वॉचमन नि सांगितले की सकाळी  मॅडम दुबई ला गेल्या आणि  श्रीकांत सर कार घेऊन बाहेर पडले, ड्रायव्हर न घेताच .  ते संध्याकाळी येतील , लक्ष ठेवा असे सांगून गेले .
त्या नंतर ते आलेच नाहीत .
इन्स्पेक्टर रमण नि सांगितल्यावर त्यांची टीम तपास करत होती . त्यांना असे कळले की बोपन्ना च्या खुना आधी  त्याच्या घराभोवती एक व्यक्ती सारखी चकरा मारत होती . ती व्यक्ती म्हणजे एक कंत्राटी मारेकरी परम होता .
त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस घेऊन गेले . आता  जोना ला कोणी जाळ्यात अडकवलं ते स्पष्ट होणार होते . परम साक्षी होता .
**********

मध्यरात्री जोना ला जो धमकी चा फोन येऊन गेला , तो इन्स्पेक्टर रमण ने ट्रेस केला होता .
” मॅडम , नॉर्थ चेन्नई मधून आला होता तो कॉल . “
” वाटलंच होतं मला !!”
” आम्ही त्या भागात साध्या वेशात माणसं पाठवली आहेत . लवकरच माहिती मिळेल . ठीक आहे ,कळवतो .”
जोना ने मध्यरात्री चा  तो कॉल रेकॉर्ड केला होता .
तिने पुन्हा ते रेकॉर्डिंग ऑन केले .
” जोना मेनन , विल्लूपुरम ची …….
…………..”
मनाशी निश्चय करून तिने यश टाकिया ला फोन केला ,आणि ताबडतोब बोलावले .
यश आला .

” यश , मला काल धमकीचा फोन आला होता …..”
” what ?”
” हो …..” तिने सगळे सांगितले .
” मला माहितेय हे शेट्टी अन शिव चेच कारस्थान आहे . दीडशे एकर जमीन हवीय न ? दिली !! श्रीकांत पुढे मला कशाचीच किंमत नाही . “
” जोना , दीडशे एकर चे प्लॉटिंग केले तर आयुष्य भर पैसे मोजण्यात जातील . “
” जाऊ देत . मला माझा श्रीकांत हवा आहे यश !! “
” ठीक आहे . कसं करायचं ? पोलिसांना न सांगता ?”

” त्यांचा मला पुन्हा फोन आला तर मी पूर्ण जमीन सोडायला तयार आहे . सगळे कागद पत्र देऊन टाकीन ,पण माझ्या दोन अटी आहेत. मी माझी दीडशे एकर जमीन त्यांच्या नाही , तुझ्या नावाने करिन . “
” काय बोलतेस जोना ? तू शुद्धधीवर आहेस का ?”
” हो यश ! जमीन तुझी , आणि तुझ्या आणि श्रीकांत च्या तिन्ही इंडस्ट्रीज त्यांच्या !! “
” पण त्यावर श्रीकांत च्या सह्या लागतील ना !! “
”  माझ्या कडे श्रीकांत ची पॉवर ऑफ अटर्निं  आहे न . त्यांना आपण सांगू , हवं तर मी आत्ता करते सह्या . “

” पण तू हे मला का देणार ? “
” तू आणि श्रीकांत वेगळे नाहीत . इतकी मोठी जमीन आपल्याच कडे राहील . हे तुझ्या नावाचे बक्षीस पत्र !
मी सह्या केल्यात . तू वाच आणि सही करून टाक . आत्ताच ह्या बद्दल त्यांना काहीच बोलू नये . तीन कंपन्या मिळून किम्मत कितीतरी जास्त आहे , हे त्यांना पटवून  सांगायचे काम तुझे .
हे बघ . तुमची सिमेंट फॅक्टरी ची जमीन साठ एकर आहे , पण तुला माहितेय ती कंपनी चालवणं किती त्रासदायक झाले आहे .
लिकर फॅक्टरी तर सरकार जप्त करणार आहे , हो न? माहितेय मला . मग उगाच बुडीत धंदे पुढे ओढत नेण्यापेक्षा देऊन टाका , श्रीकांत मोकळा होईल .

आणि तुला अख्खी दीडशे एकर जमीन मिळेल . नंतर आम्हाला त्यातले फक्त दहा एकर दिलेस तरी खूप आहे .  बाकी तूच ठेऊन घे.  श्रीकांत मला जॉईन होईल . आम्ही दोघे मिळून माझा व्यवसाय पुढे नेऊ . तू तयार असशील तर कोरियाचे सगळे काम तूच सांभाळ . बघ तुला कसे वाटते माझे प्रपोजल .”
” जोना , तू ,श्रीकांत मला फॅमिली सारखे आहात . उलट माझी ह्या सगळ्यातून सुटका होईल .मी सह्या करतो . आणि सरळ त्यांना  जाऊन भेटतो . तू प्लिज पोलिसात जाऊ नकोस बरं , श्रीकांत सुखरूप हवा आहे आपल्याला . “
*********** 

अपेक्षेप्रमाणे रात्री फोन आला . तिला यश बद्दल खात्री होती . त्याने आपले काम नक्कीच नीट केले असणार   .
तिने मन घट्ट करून फोन उचलला . रेकॉर्डिंग ऑन केले .
” जोना , तू स्वतः ला फार स्मार्ट समजते का ? ही कसली ऑफर दिलीस ? आम्हाला तीन कंपनी नकोत . आम्हाला ती जमीनच पाहिजे . तुझ्या त्या चमच्याला का पाठवलेस मध्ये बोलायला ?”
हा आवाज शिवकुमार चा होता . तिने पक्का ओळखला . खर्जातील हा आवाज त्याचाच .
” हे बघा , नीट ऐका . त्या जमिनीवर पाच कोटीचे कर्ज आहे . ती मी तुम्हाला दिली तरी तुम्हाला काहीच फायदा नाही . तुम्ही पुन्हा मला त्रास द्याल . पुन्हा तेच सूद नाट्य नको . त्यापेक्षा भरभराटीला आलेला सोन्यासारखा व्यवसाय मी तुम्हाला देतेय . ती सगळी मिळून सत्तर एकर जमीन आहे , आणि अगदी शहराजवळ . हाय वे ला लागून . हुशार असाल तर त्याची आजची किंमत कळेल तुम्हाला . दूरची पडीक दीडशे एकर काय घेऊन बसलात ? “

” आम्हाला आधी ते कागदपत्र पाहिजेत , मग श्रीकांत ला सोडू .”
” मी पागल वाटते का तुम्हाला ?
आमच्या कडून यश टाकिया हे पेपर्स घेऊन येईल , मी सह्या केल्या आहेत . तुम्ही तिकडून श्रीकांत ला सोडा .  त्यांच्या तीनही कंपनी तुमच्या हवाली करतोय . आम्ही आमचा शब्द पाळतोय , तुम्ही पण काही दगा फटका करणार नाही , असा शब्द द्या मला .”
” नाही !! नाही !! पेपर्स आम्ही तयार करतोय  मॅडम , आमचा विश्वासू वकील आहे . तुम्ही इथे , आमच्या समोर
सह्या करायच्या . “
” ठीक आहे . माझा नवरा मला सुखरूप वापस हवा आहे . कुठे यायचंय ? “

”  नॉर्थ चेन्नई मध्ये मगलपट्टी रोड ला लागून एक गोदाम आहे . तिथे आज  रात्री या मॅडम . यश टाकिया शिवाय दुसरं कोणी नको . काय न मॅडम , आधी पासूनच तुम्ही आमच्या जमिनीच्या मागे  लागला नसता तर आम्ही आज कुठल्या कुठे पोहोचलो असतो .”
” किती वाजता यायचं ?”
” या रात्री दहा ला . आमचे माणसं आहेत बरं का  आजूबाजूला , म्हणजे पोलीस वगैरे भानगड झाली तर श्रीकांत साहेबां …”
” मी येते म्हणाले न !! येते मी .”
   फोन चे  रेकॉर्डिंग पूर्ण झाले होते .
तिला शेट्टी आणि शिवकुमार चा जराही भरवसा नव्हता . ऐन वेळेवर आणखी काही डिमांड करतील म्हणून तिने काही रक्कम एका ब्रिफकेस मध्ये भरली . ती गाडीच्या डिक्कीत स्टेपनी  खाली  ठेवली .

रात्री नऊ ला ठरल्याप्रमाणे यश आला . ” जोना , ते विल्लूपुरम जमिनीचे पेपर्स सोबत नको घेउस . तो शेट्टी फार हरामी माणूस आहे . कधी ही पालटेल . एकदा श्रीकांत मिळाला की बस . आम्ही दोघे तुलाच जॉईन होते बघ . “
” मी पण जरा बॅकफूटवर जाईन मग ,  थोडा आराम करिन , तुम्हीच करा कारभार .” त्याही तणावाच्या वतावरणात दोघे हसले .
**********
इन्स्पेक्टर रेड्डी आणि रमण यांनी बोपन्ना चा मारेकरी परम याचा कबुलीजबाब कमिशनर साहेबांच्या कानावर टाकला आणि मगलपट्टी ला जाण्याची तयारी केली . प्रशक्षित पोलीस दल सोबत घेतले .
********
यश आणि जोना मगलपट्टी गोदामाजवळ गेले . आजूबाजूला अंधार होता . फक्त गोदामात मंद लाईट होता .

जोना ला वाटले , कितीही प्रॉपर्टी गेली तरी चालेल , श्रीकांत वापस मिळाला पाहिजे . 
” आधी ह्या पेपर्स वर सह्या !!! “
” मला वाचावं लागेल , मग सही करते . पण श्रीकांत ला समोर आणा . “
” ए यश , तू आहेस न मधला चमचा , तुला माहिती आहेत न कागदपत्र ? “
” हो शिव , पण जोनाला नुसतं दाखवायला काय हरकत ? “
त्याने यश जवळ पेपर्स दिले .

जोनाने बघितले . वरती सिमेंट फॅक्टरी चे लिकर फॅक्टरी चे फोटोस होते .
खाली बाकी कायदेशीर बाबींचे पेपर्स होते .
” श्रीकांत ला आणा प्लिज , मी लगेच सह्या करते .”
रेड्डीच्या माणसाने श्रीकांत ला बाहेर आणले . काही क्षण तिला गहिवरले , पण लगेच सावरून तिने पेपर्स वर सह्या करून ते यश जवळ दिले .
यश रेड्डी पर्यंत पोहोचे पर्यंत श्रीकांत जोना पर्यंत पोहोचला .
तिने पटकन त्याचा हात धरला …..धावत गाडी पकडली …..यश पण वापस फिरला ….. तो पोहोचायच्या आत ….तिने गाडी सुरू केली ….गाडीच्या लाईट्स मध्ये पोलिसांची  कुमक दिसली ….त्यांनी ताबडतोब सगळी कडून घेरले होते ….आणि तुफान वेगात जोनाची गाडी तिथून हायवे कडे गेली .

यश ओरडत होता …जोना …हा धोका आहे …मी मदत केली तुझी ….
********
श्रीकांत ला खूप आश्चर्य वाटले . जोना .?.. यश ? त्याला सोडून तू …त्याला घेऊन जाऊ न !! “
” त्यानेच  तुला पळवून शेट्टीच्या गोडाऊन वर नेले होते तुला .”
” what ? मास्क लावलेले दोन जण होते ते …… हे …तू ..कसे ….?”
” मला मध्यरात्री फोन आला . आवाज बदलून येत होता ,पण फोन मधून  मागे पक्षांचा आवाज होता ,तेच पक्षी जे यश नि त्याच्या मागील बागेत ठेवलेत . आणि फक्त यशच वेल्लूपुरम ला विल्लूपुरम म्हणतो . हे मला माहितेय .
” विश्वास नाही बसत ,की यश हे असे ..  ओह गॉड !! .”
*******

आता  यश ,शेट्टी आणि शिव पोलिसांच्या ताब्यात होते . सगळे रेकॉर्डिंग , राघवन  आणि परम होतेच पुरावा म्हणून .
यश कडून जोनाने सह्या घेतल्या तेव्हा ते दीडशे एकर चे पेपर्स न्हवतेच !!! ते पेपर्स होते …ज्यात लिहिले होते की श्रीकांत सोबत त्याची पार्टनरशिप काढून आता पूर्ण प्रॉपर्टी श्रीकांत ची एकट्याची आहे .
यश उरलं सुरलं घालवून बसला होता .
तो सगळा डबघाईला आलेला व्यवसाय जोनाने शिव शेट्टीला दिला होता .आणी ……….
त्यांच्या संपुर्ण व्यवसायात जोनाची अर्धी भागेदारी !!!!!!!

त्याचे काय झाले …शेट्टी आणि शिव ने adv . राघवन कडून सगळे पेपर्स तयार करवून घेतले होते . तो त्यांचा विश्वासु वकील होता . त्यामुळे  त्यांनी न वाचताच सह्या केल्या होत्या . त्यात  राघवन ने त्यांच्या व्यवसायात 50 टक्के जोनाची भागेदारी लिहिली होती !!! कारण ……अडव्होकेट जयेश राघवनला (दुबईच्या प्रकाश सरीन चे मित्र )  जोना कडून  एक करोडची भेट मिळाली होती .
शेट्टी आणि शिवकुमार जोना पुढे कधीच जिंकले नाहीत . त्यांनी श्रीकांत च्या अतिशय जवळच्या मित्राला  खोटी आशा दाखवून फितूर केले .
यश ने फोन करून श्रीकांतला एका निर्जन ठिकाणी  बोलावले आणि दोन जणांच्या मदतीने आपल्या फार्म हाऊस वर  बंदिस्त केले . त्या बदल्यात त्याला दीडशे एकर पैकी काही हिस्सा मिळणार होता .

जोना ही अतिशय बुद्धिमान आणि मुत्सद्दी उद्योजिका होती .
तिने adv . राघवन ला एक कोटी देऊन आपल्या कडे केले . तिला आता काट्याने काटा काढायचा होता . श्रीकांत ला त्याचे जुने व्यवसाय नकोच होते . ते विकून टाकूया असे तो अनेकदा बोलला होता .
शेट्टी आणि शिव ने जेव्हा ती जमीन मागितली , तेव्हाच तिने ठरवले की ह्या जमिनीवर श्रीकांत ला हवी तशी मोठ्ठी ऑटोमोबाईल कंपनी काढायची .
यश ला अद्दल घडवायची ,आणि शेट्टी शिव चा 50 टक्के बिझनेस वर आपण कब्जा करायचा .
तिने पाच कोटीचे खोटे कर्ज सांगून दीडशे एकर जमीन वाचवली ….नको असलेला व्यवसाय देऊन बदल्यात प्रचंड मोठया व्यवसायात 50 टक्के भागीदारी  मिळवली ..यश कडून सगळाच व्यवसाय काढून घेतला आणि वरून तिघांनाही जेल मध्ये पाठवायची तयारी केली .
त्यांनी टाकलेल्या जाळ्यात त्यांनाच अडकवून ती आता मोकळी होती. 
नव्या जोमाने श्रीकांत बरोबर नवीन उद्योगात  उतरून जगावर राज्य करायला !!!!!
( समाप्त )
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!