रुसवा फुगवा

© वर्षा पाचारणे.
“त्याला माझ्या मनातलं मुळीच कळत नाही”… वर्षभरात साधा शनिवार वाडा दाखवला नाही, की सारसबाग”…या विचारात हिरमुसून तिने एका कागदावर नकळत मनातला सारा राग व्यक्त केला.
नकळत का होईना पण प्रेम पत्र लिहण्यासाठी म्हणून आणलेल्या त्या फिकट गुलाबी रंगाच्या कागदावर फक्त तक्रारीचे सुर उमटू लागले.
एखादा कागदाचा बोळा ‘त्याच्याबद्दल’ चांगलं लिहिलं गेलं, म्हणून बॉल सारखा फरशीवर पायापाशी लोळण घेत पडला होता… इतक्यात दारावरची बेल वाजली…

“आला आत्ताशी मित्रांची मैफिल सोडून”, असं म्हणत तिने दार उघडलं…
“हाय स्वीट हार्ट, अगं एकतर दिवसभर काम आणि रात्री शतपावलीसाठी म्हणून बोलवणारे हे माझे अवली मित्र”….”काय करू? मला कळत गं, की  तुला वेळ देत नाही मी जास्त”…. “पण रात्र मात्र आपलीच हं”… असं म्हणत तो तिला मिठीत घेणार तितक्यात त्याच्या पायाजवळ पडलेल्या त्या कागदाच्या बोळ्याकडे त्याचे लक्ष गेले….
“काय गं हा कचरा?”… “निदान झोपण्याआधी बेडरूम झाडून घ्यायची ना”… असं म्हणत त्याच्यातला मूळ स्वच्छता प्रेमी जागा झाला… ते दोन चार कागदाचे बोळे पाहून तो तिच्यावर चांगलाच वैतागला…

झालं!… म्हणजे आत्ता कुठे एकमेकांना वेळ द्यायची वेळ आली, तर क्षुल्लक कारण आडवं आलं…
ती गाल फुगवून दुसऱ्या कुशीवर वळत उगाच झोपल्याचे नाटक करत पडून राहिली… तिला वाटल तो तिची प्रेमाने समजूत घालत तिला पुन्हा मिठीत घेईल….पण छे… हा दमलेला पठ्ठ्या कधी झोपी गेला, त्याचे त्यालाही कळले नाही…
दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला तरीही दोघांमधला अबोला काही गेला नाही… मग दुपारी आईला फोनवर सगळी हकीकत इत्यंभूत सांगत ‘नवरा कसा सतत चुकतो’, हे दाखवणे तिने सोडले नाही….

आईने तिला समजावले,”हे बघ, नवीनच लग्न झालं आहे तुमचं… अगं असले रुसवे फुगवे व्हायचेच…पण म्हणून कुणी अबोला धरतं का?… आमच्या वेळेस तर फोन पण नव्हते…मग मी माहेरी गेले होते बाळंतपणासाठी, तेव्हा तुझे बाबा मात्र दर आठवड्याला पत्र पाठवायचे… ती पत्र नंतर जुन्या गोड आठवणी म्हणून जपून ठेवली आहेत मी अजून”… “तसेच तू  पण समजुतीने वाग”…
आता आईने देखील आपली बाजू घेतली नाही म्हटल्यावर, तिने रागावून फोन कट केला… मग एका पाकिटात कालचे रात्रीचे लिहिलेले सगळे तक्रारींचे कागद त्या पाकिटात घालून ती जवळच्या पत्रपेटीत टाकून आली…

आता अबोला थोडा थोडा करत चार दिवसात पूर्णपणे विरघळला होता… प्रेमाची मिठी एकमेकांना अलगद सावरत होती… आधी दोन दिवस पत्र कधी एकदा घरी त्याच्या हातात मिळतंय याची वाट पाहणारी ‘ती’  आता पत्र कुठेतरी गहाळ व्हावं, म्हणून प्रार्थना करू लागली…  ‘आपण उगाचच त्याच्याबद्दल पत्रात एवढं काही लिहिलं’ असच तिला राहून राहून वाटू लागलं…
आणि नेमकं गुरुवारी त्याच्या सुट्टीच्या दिवशी पत्र बरोब्बर घरच्या पत्त्यावर येऊन पडलं… त्या दिवशी ती नेमकीच दुपारी भाजी आणायला गेलेली असताना त्याने ते पत्र घेतलं आणि वाचलं…

“अच्छा! म्हणजे मॅडमच्या खूपच तक्रारी आहेत की माझ्याबद्दल”… असं म्हणत तो हिरमुसला… ‘कधी फिरायला नेत नाही, गजरा आणत नाही, प्रेमाने चार शब्द बोलत नाही, कधी स्वतःच्या हाताने बायकोसाठी साधा चहा देखील करत नाही, सतत स्वच्छतेवर लेक्चर देतो’, या तक्रारी वाचून त्याला खरं तर मनातून खूप वाईट वाटलं… ‘
‘म्हणजे मी इतका वाईट नवरा आहे’, असा विचार करत असतानाच त्याला त्यादिवशी पायाजवळ सापडलेले कागदाचे बोळे आठवले… ‘तिने केलेला कचरा मी का उचलावा?’, म्हणून त्या दिवशी त्याने ते कागदाचे बोळे कपाटात एका कोपऱ्यात ठेवले होते…

आता त्या कागदांवर अजून काय लिहिलेले असणार या उत्सुकतेपोटी त्याने ते कागद पुन्हा नीट उलगडून निटनेटके करून वाचायला सुरुवात केली… त्यात तिने स्वतःच्या चुका लिहिल्या होत्या.. ती सतत चुकूनही तो तिच्यावर किती प्रेम करतो, हे लिहिताना तिच्या डोळ्यातले नकळत पडलेले दोन थेंब मात्र कागदावरच्या अक्षरांना थोडेसे आपल्या ओलाव्यात चिंब करुन गेले होते…
आता मात्र मगाचचा हिरमुसलेला त्याचा चेहरा तिच्या प्रेमासाठी पुन्हा आतुर झाला होता… ‘आधी केलेल्या चुका यापुढे करणार नाही’, असं मनाशी ठरवत त्याने आज तशाच फिकट गुलाबी रंगाच्या कागदावर ‘माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे… माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत’, असं लिहून तो कागद टीपॉयवर ठेवत ती येण्याची वाट पाहत बसला.

ती घरी येताच त्याने तिच्या हातात थंडगार पाण्याचा ग्लास देत तिच्या हातातून भाजीच्या पिशव्या घेतल्या… ती थोडीशी विसावल्यावर त्याने तिच्यासाठी मस्त वाफाळता चहा आणला… चहा बरोबर तिचे आवडते बिस्कीट सोबत देत तो म्हणाला ,”अगं, आज घरी एक पत्र आलं होतं”…
त्याने असं म्हणताच ती पटकन त्याला सॉरी म्हणणार तितक्यात त्याने स्वतः लिहिलेले पत्र तिच्या हातात टेकवले… त्या दोन प्रेमाच्या वाक्यांनी ती गहिवरली… इतके दिवस पत्राने मनातल्या मनात माजवलेलं काहूर आता अचानक शांत झालं होतं… आईसारखी तीही त्याचं ते ‘दोन वाक्यांच पत्र’ आता आयुष्यभर जपून ठेवणार होती…

वाचकहो, कधी कधी आपण केलेल्या तक्रारीच कालांतराने चुकीच्या वाटतात… आपण विनाकारण चिडचिड करतो हे देखील जाणवते…आणि पती पत्नीच्या नात्यात तर अश्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच..पण म्हणून वेळीच आपली चूक ओळखून समोरच्याचे फक्त दोष शोधण्यापेक्षा त्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या… म्हणजे रागाची सुसाट वेगाने सुटलेली गाडी वेळीच रुळावर येते…आणि मग संसाराचा गाडा न वाटता, सुखाचा रथ भासू लागतो… आणि अर्थातच ज्याचा शेवट गोड ते सारच गोड..
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!