घालमेल

© धनश्री दाबके
अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही.‘ खरंच, किती अचूक शब्दात सत्य मांडलय खांडेकरांनी. नीता मनात म्हणाली.
आज नीता बऱ्याच वर्षांनी अमृतवेल हे तिचं आवडतं पुस्तक वाचत बसली होती. गेल्याच महिन्यात दादांनी ते तिला दिले होते.
दादांना वाचनाची भयंकर आवड आणि  खांडेकर त्यांचे आवडते लेखक. त्यामुळे दादांकडे खांडेकरांची आणि इतरही नावाजलेल्या लेखकांची एक से एक भारी पुस्तकं होती.
मागच्याच महिन्यात दादांनी नीता आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्याकडच्या सगळ्या पुस्तकांचे वाटप केले होते.

हल्ली थकवा यायला लागलाय. वाचनही कमी झालय. केव्हाही बोलावणे येईल मला आता. तर माझ्या ह्या संपदेची काळजी घ्या तुम्ही सगळेजण असे म्हणून दादांनी त्यांची बरीचशी पुस्तकं नीताला दिली.
आणि “बरका नीताबाई, मला आत्ता काहीही झालेले नाही तेव्हा उगीच काळजी करत राहू नकोस. कधीतरी हे पुस्तकांचे वाटप करायचेच होते ते आज केले इतकचं. तुझा शंकेखोरपणा चांगलाच परिचयाचा आहे माझ्या. म्हणून मुद्दाम सांगतोय तुला. तेव्हा उगीच तुझ्या मनात कुठलीही शंका येऊ देऊ नको.” हे ही बजावायला विसरले नव्हते दादा.
आज त्या पुस्तकातली लेकीची वाट बघणाऱ्या आईवडलांच्या जीवाची घालमेल वाचून नीताला गेल्याच आठवड्यात तिच्या  शंकेखोर मनाने घातलेला गोंधळ आठवला.

नीता दादांची एकुलती एक लेक. नुकतीच वयाच्या पाचव्या दशकात प्रवेश केलीली नीता दोन मुलं आणि नवऱ्या बरोबर बऱ्याच वर्षांपासून पुण्यात सेटल्ड होती आणि दादा आईच्या माघारी एकटेच दादरला राहात होते.
आईला जाऊन आता चार वर्ष होत आली होती पण खूप प्रयत्न करुनही नीताला दादांना आपल्या बरोबर रहायला आणणे जमले नव्हते. कारण दादांना त्यांचे घर, ज्यात नीताच्या आईच्या आठवणी नांदत होत्या ते सोडायचे नव्हते.
तसेच आपण कोणावर अवलंबून नाही, आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वतंत्र आहोत हे मानसिक समाधानच दादांना आता फिट ठेवत होते.

आपण आजारी पडून कोणाला आपला त्रास होऊ नये म्हणून दादा स्वतःचे खाणेपिणे, औषधपाणी अगदी नेमाने जपत होते. खूप वेळा सांगूनही दादा ऐकेनात मग नीताचाही नाईलाज झाला आणि मनाविरुद्ध दादांनी इथे येण्यापेक्षा ते तिथे त्यांच्या घरी स्वतःला जपून राहिलेले बरे असा विचार करुन तिने दादांचा निर्णय मान्य करुन टाकला.
पण ती रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळेला दादांना न चुकता फोन करून त्यांची खुशाली कंन्फर्म करायची. आणि दादाही प्रॉम्प्टली तिच्या कॉल्स आणि whatsapp मेसेजसना उत्तरं द्यायचे.
कारण  आपण जरा जरी फोनआड झालो तर नीता लगेचच भलभलत्या शंका घेत इथे यायलाही कमी करणार नाही ह्याची दादांना कल्पना होती.

नीताला लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीत बऱ्यावाईट खरंतर बऱ्याचदा वाईटच शंका काढायची सवय होती.
म्हणजे साधा जरी कोणाला घरी यायला उशीर झाला तरी तिला येणाऱ्याला  रिक्षा मिळाली नसेल किंवा वाटेत ट्रॅफीक लागला असेल असे न वाटता डायरेक्ट ॲक्सिडेंट तर नसेल ना झाला असंच वाटायचं. आणि जरी असं काही वाटलं तरी ते वाटलेलं मनातून हुसकावून लावायचे सोडून ती त्याचाच विचार करत बसायची, उलटसुलट विचारांनी स्वतःची पराकोटीची घालमेल करुन घ्यायची. ‘अगं नेहमी चांगले घडेल असाच विचार करावा ग नीता !’ असं आई आणि दादांनी कितीही वेळा सांगितलं तरी नीता आपली तिच्याच धुंदीत असायची.
तिच्या मुलांच्या आणि नवऱ्याच्या बाबतीत तर नीता अगदी सोप्या सरळ गोष्टींचीही नको इतकी काळजी करत बसायची.

तर अशा ह्या वाईटसाईट शंका घेत सतत काळजी करत बसणाऱ्या नीताने गेल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे संध्याकाळी दादांच्या अपडेट साठी फोन केला जो त्यांनी उचलला नाही.   
तिने लगेच whatsapp वर मेसेज टाकला. ज्यालाही लगेच रिप्लाय नाही.
दादा टॉयलेट मधे वगैरे असतील असा विचार करुन १५/ २० मिनिटे वाट बघून तिने परत फोन केला. परत तेच झाले.
फोन चार्जिंगला लावून विसरले असतील म्हणून मग तिने लॅंडलाईन वर केला ज्यालाही उत्तर नाही.  
अजून थोडा वेळ ती परत परत कॉल करत राहिली ज्यांना दादांनी रिप्लाय दिला नाही आणि मग मात्र नीताचा पेशन्स संपला. 
काय झालं असेल नक्की?

थोड्या महिन्यांपूर्वी दादांना व्हर्टीगोचा त्रास झाला होता. आज परत तर नसेल झाला? किंवा अजून काही सिरियस मॅटर तर नसेल ना ह्या विचारांनी नीता हैराण झाली.
मग तिने शेजारच्या देसाई काकांना फोन लावला तर ते ही संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. कदाचित देसाई काका गावाला गेले असतील असा विचार करून मग तिने वरच्या मजल्यावरच्या नितीनला कॉल केला तर तो सहकुटुंब थिएटरमधे मूव्ही बघत होता.
मग नीताने मुद्दाम त्याला काही न सांगता सहज कॉल केला होता असे भासवत फोन ठेवून दिला.
शेवटी उगीच लोकांना फोन करत बसण्यापेक्षा सरळ प्रत्यक्षच जाऊन पहावे म्हणून नीताने नवऱ्याला भरीला पाडून गाडी काढायला लावली आणि दोघं दादरच्या दिशेने निघाले सुद्धा.

प्रवासातही ती दर पाच दहा मिनिटांनी परत परत फोन लावतच होती. अशा घालमेलीत साधारण एक सव्वा तास गेला. लोणावळा आलं आणि विचार कर करुन नीताच्या डोळ्यांना धारा लागल्या.
त्याच सुमारास इकडे दादांनी त्यांचा फोन पाहिला. त्यावरचे नीताचे असंख्य मिस्ड कॉल्स बघुनच दादा तिची काय अवस्था झाली असेल ते समजून चुकले.
त्यांनी घाईघाईने नीताला कॉल केला.
तिने तो उचलला आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला.

दादा म्हणाले,”मी ठीक आहे. सांगतो सगळं. तू पहिले शांत हो. आणि कुठे आहेस ते सांग. इकडे यायला तर नाही ना निघालीस?”
तिने आम्ही  लोणावळ्यापर्यंत आलोय म्हंटल्यावर त्यांनी आधी जावईबापूंना गाडी साईडला घ्यायला लावली.
नीताही जराशी शांत झाली.
मग दादांनी सांगितलं की आज अचानक संध्याकाळी गावावरुन त्यांचा नातू म्हणजे नीताचा भाचा बायकोला व सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आला. तसं ते दोघं एक दिवसाची ट्रिप प्लॅन करुन फक्त बाळाला सिद्धिविनायकाच्या पायावर घालायला मुंबईत आले होते. पण दुपारी परतीच्या वेळी त्यांची गाडी खराब झाली. दुरुस्तीसाठी वेळ लागणार होता म्हणून मग ते आज दादांकडे मुक्कामासाठी आले होते.

ते अचानक आल्याने दादा त्यांच्या जेवणाची, झोपण्याची सोय पहात होते. त्यात दिवसभर प्रवासाने चिडचिडे झालेले बाळ संध्याकाळी खूप रडून रडून झोपले होते. कुठल्याही आवाजाने बाळाची झोप मोडायला नको म्हणून मग तिघांनी त्यांचे मोबाईल्स आणि घरच्या फोनची रिंगही सायलंटवर करून टाकली होती.
दादांनी नीताला कळवायचे असे ठरवलेही होते पण गडबडीत ते विसरुन गेले आणि हा सगळा पुढचा गोंधळ घडला.
तेव्हा आता माझी काळजी करु नकोस आणि उद्या ऑफिसचा दिवस आहे तेव्हा आता शांत मनाने सुखरुप घरी जा असे म्हणून दादांनी फोन ठेवला.

एकदा सगळा उलगडा झाल्यावर आणि नीता थंड झाल्यावर मग तिचा नवऱ्याने सुचवले आता आपण इथेच जेवूयात.
नीतालाही भूक लागली होतीच. त्यांनी घरी मुलांना कळवले आणि दोघं रेस्टॉरंटमधे जेवायला बसले.
नीताला मनातून खूप गिल्टी वाटायला लागले. आपण ह्याला ऑफिसमधून आल्याआल्या गाडी काढायला लावली. त्याचा भुकेचाही विचार नाही केला.
तिने त्याबद्दल सॉरी म्हणताच तिचा हात हातात घेत तो हसून म्हणाला ” no worries बायको. मला समजते तुझी घालमेल आणि तुला येणाऱ्या शंकांचे कारणही. त्या शंका जरी जीवघेण्या असल्या तरी त्यांचा उगम तुझ्या आमच्यावरच्या अतीव प्रेमातच असतो ना? शंकांचा उद्देश महत्वाचा.

मगाशी मी तुला थोड्यावेळ थांबू असं म्हणणार होतो होतो पण त्याचं काय आहे ना की मी कितीही समजावले असते तरी तुम तो तुम हो. तेव्हा म्हंटलं चला आज अचानक सासरेबुवांचे दर्शन घ्यावे.
शेवटी तुझ्या घालमेलीचे निराकरण महत्वाचे. नाही का? आणि आजच्या गोंधळाची सांगता तर आपल्या आवडत्या लोणावळ्याच्या डिनर मधे झाली की. नाहीतर इतर वेळी फक्त दोघांनाच असा चान्स कुठे मिळतो? सो बी हॅपी ॲन्ड एंजॉय”आज नीताला हे सगळे आठवून हसू येत होते.
तेवढ्यात तिचे घडाळ्याकडे लक्ष गेले आणि पहाते तर काय लेकाची क्लासहून येण्याची वेळ टळून गेलेली. अजून कसा आला नाही हा असे म्हणत नीता गॅलेरीत उभी राहिली आणि सुरु झाली एक नविन घालमेल.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार

Leave a Comment

error: Content is protected !!