©कांचन सातपुते ‘हिरण्या’
“वेणू, आवर ना पटकन, बाबा केव्हाचा गाडी काढून तुझी वाट पाहतोय. तिकडे शाळेत प्रार्थना सुरु व्हायची. वर्गाबाहेर उभं करतात ना मग . “वेणूच्या दोन घट्ट वेण्या घालताना वसुधा बोलत होती. वेणूने पटकन पाण्याची बाटली, भाजीपोळीचा डबा सॅकमध्ये ठेवला.
जाता जाता एकदम आईच्या गळ्यात हात टाकून, “सॉरी आई, उद्यापासून लवकर उठणार, नक्की!”
पटकन बाबाच्या मागे गाडीवर बसून शाळेत गेली. वसुधाही पटपट आवरत होती. आज तिला तिच्या विद्यार्थिनींना एक वेगळा विषय सोपा करून समजवायचा होता.
” विक्रम मी बाकीचं आवरलंय. नाश्ता करून घ्या आई, बाबा आणि तू . आता मलाही निघायला हवं.”
“अगं वसुधा, घेऊ आम्ही सगळं. किती काळजी करतेस?” आई म्हणाल्या.
वसुधा बोलतच राहिली, ” दुपारी आल्यावर मी बाकीचं बघेन. आई तुम्ही काही दगदग करू नका. विक्रम तू आणि बाबा दुकानात निघताना आईंना दार आतून नीट लावून घ्यायला सांग. हल्ली सुनीतालासुद्धा यायला उशीर होतो आपल्याकडे. शेजारच्या बंगल्यातल्या कुलकर्णी काकूंकडे पोळ्या केल्यावर ती आपल्याकडे येते.”
“अगं हो हो वसू! किती सूचना देतेस ? तू सावकाश जा .”
पण विक्रम असं बोलला तेव्हा वसुधा गेटबाहेर निघाली होती.
वाचकांनो ,विक्रमचं स्वतःचं औषधालय . वसुधाचं स्थळ त्याला सांगून आलं तेव्हा तिच्या आई बाबांनी अटच घातली ,” लग्नानंतरही तिला शिक्षिकेची नोकरी करून द्यावी.”
विक्रमला तर वसुधा आवडलीच पण त्याच्या आई बाबांनाही वसू आवडली. कारण तिच्या बोलण्यातून तिचे विचार कळले तेव्हा, ” ही मुलगी आपल्या घराचं कल्याणच करेल!” असा विश्वास त्यांना वाटला. खरंच खूप वेगळी होती वसू!
माप आओलांडून सासरी आली आणि काही दिवसांतच सर्वांना आपलंसं केलं तिने.
वर्षभरातच त्यांच्या घरात एक नवीन माणूस आलं . वसुधा गोंडस मुलीची आई झाली. अन् घरात आनंदी आनंद झाला. सगळ्यांनी मिळून बाळाचं नाव ‘वेणू’ ठेवलं. काही दिवसांच्या सुट्टीनंतर वसुधा पुन्हा कामावर रुजू झाली.
हाडाची शिक्षिका होती ना आणि तिच्या अनेक विद्यार्थिनींची ती आईही होती!
शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त मुलींना काही समस्या असतील तर खंबीरपणे पण सहज हाताळणाऱ्या बाई म्हणजे ‘वसुधा सावर्डेकर’.
बघताबघता वेणू सातवीत गेली . वाढत्या वयाबरोबर हळूहळू शारीरिक आणि मानसिक बदल तिच्यात होत होते. वसुधा तिला येता जाता, सहज गप्पा मारता मारता महत्वाच्या काही गोष्टी सांगत असायची.
आज शाळेतही मुलींना या वयात होणारे बदल, वेगवेगळ्या माणसांच्या स्पर्शातील फरक या गोष्टी समजवताना आधी बुजलेल्या मुलींनी हळूहळू वसुधाला अनेक प्रश्न विचारले. काही जणींनी नंतर तिच्याकडे येऊन जरा घाबरतच आलेले अनुभव सांगितले. वसुधाने मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्या आई वडिलांनाही भेटायचं ठरवलं.
जेवणं आटोपली होती. आई बाबा झोपायला गेले. विक्रम बाहेर टीव्ही बघत होता. वेणू आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती. तिच्या केसांतून हात फिरवत वसू आज शाळेत मुलींना जे समजावलं तेच तिलाही सांगत होती.
नंतर वसुधा एक कविता वाचू लागली.
सुनो द्रौपदी वस्त्र संभालो
अब गोविंद न आयेंगे…
आईचा हात घट्ट पकडून वेणू तशीच झोपली.
सगळ्यांचा रोजचा दिनक्रम चालू होता पण वसुधाच्या नजरेतून वेणूचं बदललेले वागणे सुटले नव्हते.
विक्रमलाही तसं वसुधाने सांगितलं. तर तो म्हणाला, “काही नसेल गं, तिला काही टेन्शन किंवा त्रास असता तर ती गप्प बसली असती का?”
आज वसुधा शाळेतून एक तास लवकर निघाली. त्या वेळेत वेणू शाळेतून घरी आलेली असायची.
जरा लेकी बरोबर बसून निवांत गप्पा माराव्या असं तिने ठरवलं. जाता जाता वेणूच्या अन् आई बाबांच्या आवडीचं चॉकलेट आईस्क्रीमही घेतलं.
बाहेर गेट उघडलेलं होतं अन् घराचा दरवाजाही. वसुधा जरा घाईनेच घरात आली. जे पाहिलं त्याने तिच्या अंगाचा भडकाच उडाला.
रोज दुपारी जेवणाचा डबा नेण्यासाठी घरी येणारा त्यांच्या औषधाच्या दुकानात काम करणारा अखिल वेणूचा हात धरून तिला जवळ ओढत होता.
एका आईच्या नजरेला तो प्रकार लगेचच लक्षात आला. वसुधा विजेसारखी धावली आणि तिने त्याला ओढून एक दोन नाही तर चांगल्या पाच सहा थोबाडीत ठेऊन दिल्या.
वेणू घाबरून ओरडलीच! बावचळलेला अखिल दरवाज्यात जाऊन उभा राहिला. बाहेरचा गोंधळ ऐकून आत जेवणाचा डबा भरणाऱ्या आई बाहेर आल्या.
“अगं वसू, तू आज लवकर कशी? आणि आवाज कसला हा?” वेणू आईला बिलगून रडत होती , “आई, मी तुला किती दिवसांपासून हेच सांगायचा प्रयत्न करत होते पण माझा धीरच होत नव्हता गं. बाबा बऱ्याचदा दुकानात गर्दी असते म्हणून याला पाठवतो मला शाळेतून आणायला.
आणि मी नको म्हणत असताना सुद्धा हा मला आईस्क्रीम, रोज वेगवेगळे पेन घेऊन द्यायचा. आणि काहीतरी विचित्र बोलायचा.” वसुधाला भरून आलं.
“आईवर विश्वास होता ना गं बाळा तुझा. तुझ्या गप्प राहण्यामुळं केवढं मोठं संकट आलं असतं या घरावर तुला माहितीये का?” ती पुन्हा त्याच्यावर धावली, “पोलिसातच देते तुला आता.” पण तोपर्यंत त्याने पळ काढला होता.
एकीकडं वसुधाच्या हातातलं आईस्क्रीम पाघळून फरशीवर गळत होतं अन दुसरीकडे तिचं मन मेणासारखं पाघळून तिच्या लेकीला धीर देत होतं.
” खंबीर वसुधाने पोलीस चौकीत जाऊन तक्रार केली. पण या प्रकारामुळे आता आपली बदनामी होणार या भितीने विक्रम आणि त्याचे आई बाबा जरा गप्प गप्पच होते. त्याने वसुधा जास्तच दुखावली गेली.
मध्ये आठ दहा दिवस गेले.
रविवार असल्यामुळे सगळे निवांतच होते. नाश्त्याला एकत्र बसलेले, पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. इतक्यात शेजारच्या कुलकर्णींचा विजय वर्तमानपत्र घेऊन आला, “विक्रम काका, बघा पेपरमध्ये तुमच्या दुकानातील अखिलचा फोटो आलाय. आणि बातमी बघा – एका अल्पवयीन मुलीला पळवून न्यायचा त्याचा बेत होता पण पोलिसांनी रेल्वे स्टेशनलाच ताब्यात घेतलं त्याला.” सगळेच हादरले ती बातमी ऐकून.
काय अघटित घडलं असतं? त्यांचं लाडकं लेकरू किती मोठ्या संकटात सापडलं असतं? हे कळाल्यामुळे त्या तिघांनी आता वसुधाची माफी मागितली.
वसुधाच्या मनात मात्र राहून राहून एकच विचार येत होता, ‘त्या दिवशी जर मी खंबीर राहिले नसते तर…’ पण आता तिला हेही कळालं की आता वेणुला अन् बाकीच्याही मुलींना आई बाबांच्या सुरक्षा कवचाबरोबर समाजात निर्भीडपणे वावरण्यासाठी आता तयार करायला हवंच.
बऱ्याच दिवसांनी या दृष्ट लागलेल्या घरावरचं एका वादळाचं सावट दूर झालं होतं. पण आता दिवसेंदिवस जास्तीत जास्त सावध व्हायचं होतं.
मांडीवर डोकं ठेऊन पडलेल्या वेणुला आज वसुधा एक नवी कविता ऐकवत होती-
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो
अब गोविंद ना आयेंगे
छोडो मेहेंदी खड्ग संभालो
खुद हि आपना चीर बचालो
द्युत बिछाये बैठे शकुनी
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो
अब गोविंद ना आयेंगे.
©कांचन सातपुते ‘हिरण्या’
सदर कथा लेखिका कांचन सातपुते ‘हिरण्या’ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.