© सौ. प्रतिभा परांजपे
वकील मनोहर स्टडी मध्ये बसून केस चा अभ्यास करत होते.
सुलभाताईंनी, त्यांच्या बायकोने, दुधाचा ग्लास त्यांच्यासमोर ठेवला तशी त्यांनी घड्याळात पाहिले. साडेदहा वाजले होते.
“तू झोप ,उद्या सकाळी आठपर्यंत ड्रायव्हर येईलच. तुझी बॅग तयार झाली?” त्यांनी सुलभाला विचारले.
“बॅग म्हणजे काय हो चार कपडे तर ठेवायचे. पण —‘मी जर कार घेऊन गेले तर तुम्हाला”
“अगं नाही, खरंतर मी ही आलो असतो पण काय न– ही केस जरा.”
‘काय आहे केस’?
“हेच ग पैसा, वाटेकरी बहिण भाऊ भांडताते, बहिणीला वाटा हवाय, भाऊ नाही म्हणत़ो म्हणून चालली आहे. कोण जिंकेल वाटतय?आता कायदा बदलला आहे, म्हणून मुलींना ही वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळतो.”
“अरे वा छान. फार वेळ जागरण नका करू मी नसले तरी,” म्हणत सुलभाताई झोपायला गेल्या.
सकाळी निघताना सुलभाताईंनी भावजय उषाला फोन केला,
“आत्ता आठ वाजतात आहे,पाच तास म्हणजे एक वाजेपर्यंत मी नाशिकला पोहोचेन, पण तू जेवायला थांबू नको मी वाटेत जेवेन.
बरं, तू संध्याकाळच्या बस ने निघत आहेस ना?”
“हो -हो- ,ताई या आरामात” म्हणत फोन कट झाला.
सुलभाताईंना कधी एकदा नाशिकला पोहोचते असे वाटत होते.
बाबांना पाहून ही बरेच दिवस झाले होते. आत्ता जर उषाने तिची अडचण सांगितली नसती तर—
कारमध्ये बसल्याबसल्या सुलभाताई भूतकाळात पोचल्या.
सुलभा बीएच्या दुसऱ्या वर्षात होती तेव्हा तिची ओळख मनोहर शी झाली. मनोहर बीए फायनल ला होते. त्यांना एल.एल.बी करायचे होते.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले दोघांनाही समजले नाही.
सुलभा चे घराणे बरेच श्रीमंत तर मनोहर साधारण परिस्थितीतले त्यामुळे बाबांना पटणार नाही याचा दोघांना अंदाज होता.
मनोहरचे लॉ पूर्ण होताच, सुलभाने बाबांशी मनोहर बद्दल बोलणं केलं पण बाबांच्या मते ‘वकील म्हणजे अर्धे दिवस रिकामटेकडे’ – असे त्यांचे विचार असल्याने ते तयार नव्हते.
त्यामुळे काही पर्याय नाही असे पाहून सुलभा व मनोहर नीकोर्ट मॅरेज केले.
साधारण परिस्थितीतही सुखाने संसार करायची तयारी असल्याने सुलभा व मनोहर सुखात होते.
पुढे मनोहर ने बार कौन्सिल रजिस्ट्रेशन केले व पुण्यामध्ये जाऊन प्रॅक्टिस सुरू केली.
दोन मुलींच्या जन्मा बरोबरच मनोहर ची प्रॅक्टिस वाढू लागली. त्यांचा जम हळूहळू बसू लागला व काही वर्षातच ते नावाजलेले वकील म्हणून लोक त्यांना मान देऊ लागले.
सुलभा चे माहेर येणे कमी होते.
आई जरी जावयावर खूश असली तरी बाबा मात्र अजूनही नाराज होते.
पण बाबांच्या पुतण्या नी पैतृक संपत्ती वरून जेव्हा भांडण सुरू केले तेव्हा मात्र मनोहर ने आपली वकिली पणाला लावून बाबांना न्याय मिळवून दिला.
या घटनेन त्यांना जावयाचा मान मिळवून दिला पण तरीही बाबा तिच्या घरी कधीच आले नाही.
“मॅडम,’ येथे जवळच एक छान हॉटेल आहे आपण फ्रेश होऊन घेऊ ,जेवण ही छान असते” ड्रायव्हर च्या आवाजाने सुलभाताईंची तंद्री भंग पावली.
दोन वाजेपर्यंत सुलभाताई नाशिक ला पोहोचल्या.
उषा वाट पाहत होती, घरात उषा व बाबा दोघंच होते अशोक टूर वर गेला होता.
बाबा खूपच अशक्त दिसत होते सुलभा नि नमस्कार करताच ‘कसे आहेत जावईबापू’ म्हणत सगळी चौकशी केली .
उषा संध्याकाळच्या गाडीने माहेरी गेली तिची आई गंभीर आजारी होती ती उषाची सारखी आठवण काढत होती.
दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर गाडी घेऊन परत गेला.
चार-सहा दिवस सुलभा व बाबा दोघच होते.
आई गेल्यापासून बाबा एकदमच कोलमडून गेले होते. त्यांचा तो कडकपणा तो रुबाब सगळं सगळं आई सोबत जळून गेलं.
बाबांचं एकटं राहणं कठीण होत होतं.
उषा व अशोक नोकरी सांभाळून जमेल तशी बाबांची देखभाल करत पण त्यांना वेळ देणं त्यांना जमत नव्हते त्यामुळे एकटेपणाने मनावरही परिणाम झालेला वाटत होता.
सुलभाच्या येण्याने बाबांची तब्येत व मन थोडं सावरलं होतं.
आपण जावई व मुलीशी कठोरपणे वागलो याची खंत त्यांच्या बोलण्यातून सारखी जाणवत होती.
चार सहा दिवसांनी अशोक परत आला उषाला यायला अजून चार दिवस होते.
“ताई, तुला किती दिवसाची परमिशन आहे राहायची ?” अशोक ने हसत हसत विचारले.
“कां-रे कंटाळलास का माझ्या हातचं जेऊन’? येतेच आहे उषा दोन दिवसाने.”
“नाही ग– मनोहरराव एकटे आहेत न.”
दोन दिवसांनी उषा परत आली, आईची तब्येत आता बरीच सावरली आहे असे म्हणाली.
सुलभाने मनोहर रावांना कळवले त्यांनी उद्या गाडी घेऊन मी स्वतः येतो असे कळवले.
रात्री जेवणानंतर सुलभा, बाबा, उषा व अशोक चौघेजण गप्पा मारत होते सुलभाने विषय काढला,
“अशोक मलाही तुझ्या संपत्तीत वाटा हवा आहे”
“संपत्ती??? ” ताई तुला तर सर्वच माहित आहे, माझा बिजनेस बुडाला तेव्हा कर्ज फेडायला बरीच जमीन विकली गेली हे घरच फक्त आता आहे .आईचे दागिनेही तिच्या आजारपणात विकले गेले. आणि आता तू संपत्तीत वाटा मागायला म्हणून आली आहेस का? आणि भाऊजी वकील म्हणून त्यांनाही बोलावणे केले”.
“नाही कसे, तुझी संपत्ती फक्त घरच नाहीये.”
“अजून काय आहे’? अशोक ने चिडून विचारले.
“अरे सांगते सांगते पण आधी वचन दे नाही म्हणणार नाही.”
अशोक ने उषा कडे पाहिले तिला ही काही कळेना.
“बाबांना माझ्यासोबत पाठवशील कायमचं .मला ही त्यांची सेवा करायची आहे. बघ नाही म्हणू नकोमाझा हिस्सा मला हवाय”. हसत हसत सुलभाताई म्हणाल्या.
“अरे बापरे ! मी घाबरलोच होतो, पण बाबा ते तयार—-.”
“मी बोलले, आणि तुझे भाऊजींची पण हीच इच्छा आहे. नाही म्हणू नको.”
“वकिलाची बायको शोभता हो ताई तुम्ही, अगदी कायद्याच्या गोष्टी करून घाबरवलेच”. उषा हसत म्हणाली.
अशोक ने बाबांकडे पाहिले त्यांनी मान हलवून होकार दिला.
दोन दिवसांनी मनोहर गाडी घेऊन आले.
तोपर्यंत सुलभाने बाबांची समजूत काढली, अशोक व ऊषाला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली तेव्हा बाबा मनाने तयार झाले.
निघताना अशोक व उषा दोघं पाया पडून म्हणाले “ताई ‘आमचाही अर्धा वाटा आहे हं.”…
“हो- हो ,तुम्ही केव्हाही या बाबांना भेटायला,” असे म्हणत मनोहर रावांनी गाडी सुरू केली.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
Khup chan
Heart Touching
Mla tar ashru ch aale dolyat…
Thank you so much mam !