सर्व सुखी

© धनश्री दाबके
किक मारून मारून अजय घामाघूम झाला पण त्याची स्कूटर काही चालू होईना. वरून प्रमिला आणि किरण त्याला पाहात होते. पण त्यांची नजर चुकवत अजय प्रयत्न करतच राहिला. काही वेळाने किरण खाली आला आणि म्हणाला, “बाबा, आईने संतोष काकांना फोन केलाय. ते येतीलच तुम्हाला न्यायला.”
बरं म्हणून अजयने स्कूटर जागेवर लावली आणि गेटवर जाऊन उभा राहिला. ही साX स्कूटर ! नेमकी वेळेवर बंद पडते. आता परत संतोष मला, तू वहीनींमुळे माझ्याबरोबर येतोयस, म्हणत लेक्चर देणार !

हिला किती वेळा सांगितलंय की त्याला बोलावत जाऊ नको म्हणून. पण ही सुद्धा अजिबात ऐकत नाही. त्या स्कूटरसारखीच. तशी स्कूटरची बिचारीची काहीच चूक नाही म्हणा.. आयुष्यभर इमाने इतबारे सेवा केलीये तिने..तीही थकलीये आता.. प्रमिला नवीन स्कूटर घे म्हणून कधीची मागे लागलीये..पण….
इतक्यात संतोष आला.”अरे काय रे अजय. तुला म्हंटलं रोज माझ्याबरोबर जात येत जा..पण नाही..”
“अरे रोज कुठे रे तुला उलटं यायला लावायचं” म्हणत अजय मागच्या सीटवर बसला.

संतोषच्या पार्क अव्हेन्यू परफ्युमचा मंद वास अजयला आला. कधीपासून अजयला स्वतःसाठी हे ‘जरा भारीतलं’ परफ्यूम घ्यायचं होतं. पण ही साधी इच्छाही काहीनाकाही खर्च उभे राहिल्याने मागे राहून जात होती. कधी आई अण्णांचे औषधपाणी तर कधी किरणच्या कसल्या न कसल्या तरी फीज.. तर कधी प्रमिलाच्या माहेरच्या, मैत्रीणींच्या समारंभांचे आहेर, तर कधी घरातल्या लहानसहान दुरुस्त्या.. यादी न संपणारी होती..
या संतोषचं बरंय, राजा राणी दोघांचाच संसार, मुक्त आयुष्य, ना कसल्या जबाबदाऱ्या ना पैशाची चिंता..ऑफिसमधे पगारही चांगला, नाही म्हंटलं तरी माझ्यापेक्षा दोन लेव्हल वरचा.

अजयला संतोषच्या भाग्याचा हेवा वाटतच होता इतक्यात संतोष म्हणाला, “अरे मग त्यात काय? पाच सात मिनिटं तर लागतात मला इथे यायला. तेवढं तर मी करूच शकतो की.. आणि माझं काय रे, सध्याही मी एकटाच आहे! समीरा परत भांडून माहेरी गेलीये.”
“हो? कधी?”
“झाले चार दिवस”
“मग बोलला नाहीस ते? आता काय केलंस तू?”
“नेहमी नेहमी काय सांगायचं रे! तुझी स्कूटर आणि माझी बायको.. दोघीही सारख्याच.. बिघडलेल्या.”
“सेम पिंच. सगळ्याच सारख्या”

“अरे काही विशेष नाही रे.. मी फक्त तिच्या आधीपासून ठरलेल्या मैत्रीणींच्या फॅमिली गेट टूगेदरला गेलो नाही..”
“बास? इतकंच ?”
“अरे हो बाबा.. इतकंच..खरंतर तिच्या कॉलेज फ्रेड्सशी माझं फारसं जमत नाही. म्हणजे मला कंटाळा येतो अशा पार्ट्यांचा. तरीही समीरासाठी यावेळी मी जायचं ठरवलं होतं…पण खरंच नाही जमलं मला यार..नेमकी त्याच दिवशी आपली मोठी ऑर्डर होती आणि मॅंडमला नाही जमत रे अजून एकटीने हॅंडल करायला, त्यांना मदत लागते. म्हणून त्या पार्टीला जाण्यापेक्षा मला मॅडम सोबत असणं जास्त महत्वाचं वाटलं.. आता सांग यात माझं काय चुकलं?

सुबीर सेठ आपल्यासाठी इतकं करत होते.. आता कंपनीला आपली गरज आहे तर आपणही समजून घ्यायला हवं ना..पण असो..मीही ठरवलंय आता.. हिच्या माहेरी जायचंच नाही यावेळी तिची मनधरणी करायला.. शांत झाली की येईल तीची तिच… तशी स्वभावाने वाईट नाहीये रे पण जरा मॅच्युरिटी लेव्हल कमी आहे! असो..सगळ्यांच्याच नशीबात वहीनींसारखी समजूतदार साथ नसते रे..” म्हणत संतोषने स्कूटरचा वेग वाढवला आणि अजयला दिवसभर काबाडकष्ट करत आपला संसार सावरण्यासाठी धडपडणारी, तरीही हसतमुखाने जगणारी प्रमिला आठवली.

तरीच आज डबा जास्त दिलाय म्हणाली प्रमिला.. म्हणजे समीराशी बोलणं झालं असणार.. खरंच या बायका ना अजब असतात..भांडल्या तरी काळजी करतातच नवऱ्यांची..
अर्ध्या तासात दोघं ऑफिसला पोचले. प्रमिलाने असं अचानक बोलावल्याने आज दोघांनाही थोडा उशीरच झाला होता.
इतक्यात, “अजय, आप जरा यहा आयेंगे?” म्हणून मॅडमचा फोन आला.
आज सकाळी सकाळीच काय नवीन ! असा विचार करत करतच अजय केबिनमध्ये गेला.

अतिशय ओढलेल्या चेहऱ्याने, डोक्याला हात लावून मॅडम email उघडून बसल्या होत्या. पाठीमागच्या भिंतीवर सुबीर सेठचा मोठा हसरा फोटो लावला होता. तो पाहून अजयला एकदम, ‘अरे ये ये अजय.. अपना स्टार अकाऊंटट’ म्हणून दिलखुलास हसणारे सुबीर सेठ आठवले. सुबीर सेठची बातच वेगळी होती. इतका भला माणूस होता तो.
अजयला सरांची खूप आठवण आली. जेमतेम बारावी पास केलेल्या अजयला केवळ त्याच्या सच्चेपणामुळे सुबीर सेठने त्यांच्या या लहानशा केबल टेस्टींग कंपनीत नोकरी दिली होती. आणि अजयनेही सेठने ठेवलेला तो विश्वास सार्थ ठरवला होता.
अतिशय हुशार आणि चाणाक्ष असलेले सुबीर सेठ इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते.

आधी सेठ एकट्यानेच युनिट सांभाळत होते. पण जस जसा त्यांच्या व्याप वाढायला लागला तस तशी त्यांना एका विश्वासू अकाऊंटटची गरज भासू लागली म्हणून त्यांनी अजयला कामावर ठेवले. मग हळूहळू एकाची दोन युनिट्स झाली आणि दोन्हीकडे स्वतः जातीने लक्ष देणं सेठला कठीण होऊ लागलं. म्हणून मग त्यांनी संतोषसारखा एक मेहनती आणि हुशार इंजिनिअर शोधला.
सेठ, अजय, संतोष आणि दोन्ही युनिटमधे काम करणारे सात आठ कामगार.. बसं इतकाच पसारा होता कंपनीचा. पण सगळे जण एका कुटुंबातले असल्यासारखे जोडले गेले होते. मन लावून काम करत होते. सगळा कारभार एकमेकांवरल्या विश्वासाने सुरळीत सुरू होता. हळूहळू मार्केटमध्ये सुबीर सेठचे नाव होत होते आणि मोठ मोठ्या ऑर्डर्स सुद्धा मिळत होत्या.

कंपनीला पुढच्या टप्प्यावर न्यायचे प्लॅन्स आखले जात होते आणि अचानक त्या सगळ्याला ब्रेक लागला. हसत खेळत काम करत असतांना युनिटमधेच सुबीर सरांना ॲटॅक आला आणि त्यांनी कायमसाठी एक्झिट घेतली.
खूप चिकाटीने आणि तितक्याच तल्लिनतेने उभारलेला पत्त्यांचा बंगला एका क्षणात कोसळावा तशी सगळी स्वप्नं क्षणार्धात भंगली. कामकाज काही काळाकरता ठप्प झालं. दोन लहानग्यांकडे पाहून मॅडमने स्वतःला सावरलं आणि युनिट्स चालवायला घेतली. पण त्यात अनंत अडचणी आल्या. आर्थिक नुकसानही बरंच झालं. कसेबसे मॅनेज करून अजय आणि संतोषने कामगारांचे पगार दिले. पण त्यांचे स्वतःचे पगार मात्र थांबले. तरीही ते आहे त्या परिस्थितीत काम तसेच रेटत राहिले. आणि हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण गाडी परत ट्रॅकवरून धावू लागली.

पण हा मधला काळ तिनही कुटुंबांना खूप जड गेला. प्रमिलाने तिच्या ऑर्डर्स वाढवल्या. समीरानेही जमेल तितके हातपाय हलवले. सगळ्यांनी एकत्र राहून हा वाईट पॅच निभावून नेला.
आताही मॅडमकडे पाहून अजयला कसं तरीच वाटलं. कशी होती ही बाई वर्षभरापूर्वी ! आनंदी, सुखी, सगळ्यांची काळजी घेणारी. उशीरापर्यंत काम असलं तर जातीने स्वतः येऊन सगळ्यांच्या जेवणाची सोय करणारी. प्रमिला आणि समीरालाही तितकाच जीव लावणारी, प्रमिलाच्या आईच्या शेवटच्या दुखण्यात किती मदत केली होती मॅडमने. प्रमिलाला दु:खातून सावरायला, समीराला तिच्या गायनॅक ट्रीटमेंटसाठी तयार करायला मॅडमच तर होत्या. मोठ्या बहीणीसारखा आधार दिला त्यांनी.. कशा कशात कमी ठेवली नाही आणि आज याच मॅडमना इतरांचा आधार लागतोय.. नियती.. का आणि कशी तू इतकी निष्ठूर होतेस ग?

दोन मिनिटांत अजयच्या डोळ्यांसमोरून मॅडमची विविध रूपं येऊन गेली. त्यांच्या आत्ताच्या या रूपाकडे बघून त्याला सुबीर सरांची परत तीव्रतेने आठवण आली.
त्यांच्या फोटोकडे बघत तो तसाच उभा राहिला.
“अजय, ये देखो ना..पवन इंडस्ट्रीजके अकाऊंटट का email आया है की हमारे invoice में टॅक्स गलत लगाया है जरा देखो तो.. उनके ऑडीटरने कुछ ऑब्जेक्शन लिया है..इसलीये पेमेंट होल्ड पर है..ये पेमेंट तो आना ही चाहीये समय पर..अगर ये पेमेंट रूक गया तो बडी दिक्कत होंगी..अभी तुम सबका पेमेंट भी तो रिलीज करना है इस हफ्ते..”

“आप टेंशन मत लो मॅडम.. मैं अभी उनसे बात करके सब निपटा लेता हूँ.. dont worry. कुछ misundestanding हुआ है.. i will check” म्हणत अजय बाहेर आला.
मग पवन इंडस्ट्रीज मधे कॉल करून अजयने नेमका प्रॉब्लेम जाणून घेतला. त्यांच्या मॅनेजरशी बोलला. तो invoice क्लीअर करून घेतला आणि मॅडमना सांगायला गेला. अजयने हा इश्यू सोडवल्याचं ऐकल्यावर मॅडमच्या जीवात जीव आला. मग दिवस रोजच्या कामात भराभर निघून गेला आणि घरी जायची वेळ आली देखील.
आज स्कूटर नव्हती त्यामुळे जातांनाही संतोष बरोबरच जायचं असल्याने अजयने संतोषला कॉल केला. तर संतोष अजूनही दुसऱ्या युनिटमधे अडकला होता आणि त्याला बराच वेळ लागणार होता.

आता कसं जावं? रिक्षा, बस काय मिळेल ते घ्यावं असं म्हणून अजय टेबल आवरू लागला.
इतक्यात मॅडम येऊन म्हणाल्या, “अजय, एक बात बताना तो भूलही गयी.. वो हमारे सप्लायर है ना, मिस्टर गावडे, उनका कॉल आया था किसी काम से. तभी वो बता रहें थे की उन्हे हमने भेजा हुआ दिवाली हॅंपर बडा पसंद आया.. स्पेशली स्नॅक्स आयटम्स..तो वो पुछ रहें थे की हमारा दिवाली स्नॅक्स का सप्लायर कौन है? तो मैने प्रमिलाका नंबर दिया है उन्हे..शायद वो कॉल करेंगें ऑर्डर के लिये..”

“अच्छा thank you मॅडम..वैसे भी प्रमिला तो हमेशा तय्यार ही रहती है, देखते है.. चलो मे निकलता हूँ..” असं म्हणून अजय बाहेर पडला.
इतक्यात प्रमिलाचा फोन आला, ” अरे.. एक गावडे म्हणून आहेत. त्यांना म्हणे तुमच्या कंपनीने दिवाळीत दिलेले फराळाचे पदार्थ खूप आवडलेत.. खास करून चकल्या.. आणि तुमची आपले पारंपरिक पदार्थ दिवाळी गिफ्ट म्हणून देण्याची आयडीया सुद्धा भावलीये खूप. आता ख्रिसमससाठी होममेड केक, चकल्या आणि अजून काहीतरी चटपटीत स्नॅक्सचे हॅंपर बनवून देऊ शकाल का असं विचारत होते ते.”

“मग तू काय सांगितलंस?”
“मी सांगितलं हो जमेल की का नाही जमणार? एक सॅंपल हॅंपर करून देते. खाऊन बघा. आवडलं तर पुढचं बघू आणि कॉस्टिंगही वर्क आऊट करून सांगते असं म्हणाले. ते बरं म्हणालेत. आता चकली आणि इतर स्नॅक्सचा काही प्रश्नच नाहीये आपला.. पण केकसाठी बघते कोणी मैत्रीण करू शकेल का ते? नाहीतर मॅडमना विचारते त्यांना कोणी माहिती आहे का ते. सगळं जुळून आलं तर बरं होईल रे..मोठी ऑर्डर मिळेल..नवीन वर्षाची सुरवात जरा चांगली होईल. म्हणजे नक्की किती पैसे येतील माहीत नाही पण जर चांगले आले ना तर पहिले तुझी स्कूटर घेऊन टाकू आपण.”

“अगं काय तू. अजून कशात काही नाही आणि स्कूटर वगैरे.. ते बघू आपण नंतर..मी निघतोय आता. संतोष नाहीये इथे. म्हणून बसने येतोय. उशीर होईल थोडा. “
अजयला प्रमिलाच्या आशावादाने हसूच आलं. अजून सॅंपलही तयार नाही आणि बाईसाहेब निघाल्या स्कूटर घ्यायला..खरंच किती छोटी छोटी स्वप्नं असतात माणसाची पण तीही पूर्ण होत नाहीत. पैसा नाही तिथेही दु:ख आणि पैसा आहे तिथेही दु:खच..

मूलबाळ होत नाही म्हणून झुरणारे संतोष समीरा, सुबीर सरांच्या मागे संसाराचा गाडा ओढणाऱ्या मॅंडम आणि लहानसहान गोष्टींसाठी झगडत राहाणारे आपले कुटुंब..खरंच जगी सर्वसुखी कोणी नाहीच..प्रत्येकाच्या पायात नियतीने अडचणींचे साप सोडलेले आहेत आणि मेहनतीच्या शिड्याही लावल्या आहेत. आपण प्रामाणिकपणे आणि एकमेकांना मदत करत आपल्या वाट्याचा खेळ खेळत राहायचा आणि एक दिवस निरोप घ्यायचा..सुबीर सेठसारखा..

विचार करत करत अजय घरी आला. घरभर प्रमिलाने दिलेल्या झणझणीत फोडणीचा सुवास पसरला होता. देव्हाऱ्यातल्या देवासमोर मंद समई तेवत होती. किरण आजी आजोबांबरोबर मनाचे श्लोक म्हणत होता..
जनीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ||
किती अचूक आहेत समर्थांचा प्रश्न आणि त्यांनी पुढच्याच चरणात दिलेले उत्तरही..
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें | तयासारिखे भोंगणें प्राप्त झालें ||
असा विचार करत दिवसभराची मरगळ झटून अजय नव्याने आयुष्याचा खेळ खेळायला तयार झाला.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार

Leave a Comment

error: Content is protected !!