©सौ.वैशाली प्रदीप जोशी
“अं… हं…. नको… नको…. स्लीवलेस नको, चार इंचाच्या बाह्या असूच देत” आश्लेषानं टेलरला सांगितलं तसा अवनीचा चेहरा पडला.
“मला स्लीवलेस शिवायचंय पण…”अवनी पुटपुटली खरी पण तो आवाज तिच्या स्वतःपर्यंतच पोचला नाही तर टेलरपर्यंत कसा पोचणार? आश्लेषानेच घागरा-चोळी शिवण्याबाबत सूचना दिल्या आणि दोघी बहिणी घरी परतल्या.
“आई, ही स्लीवलेस शिवायचं म्हणत होती… पण हिचे दंड बघ ना शरीराच्या मानाने किती बेढब आहेत… शोभेल तरी का हिला ! मी बाह्या शिवायला सांगितल्या चार इंचाच्या” घरी येताच पाण्याचा घोट घशाखाली घालत आश्लेषानं सगळी हकीकत ऐकवली.
अवनी आणि आश्लेषा दोघी बहिणी… अवनी मोठी तर आश्लेषा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान!
मोठी असल्याने अवनी जात्याच बुजरी तर आश्लेषा दबंग… आपलं तेच खरं करणारी… शेंडेफळ म्हणून सगळ्यांचीच लाडकी!आश्लेषाला लहानपणापासून नटण्यामुरडण्याची प्रचंड आवड! जात्याच सुंदर आणि स्वभावात असलेल्या आत्मविश्वासामुळे तिचे मूळचे सौंदर्य अजूनच खुलून दिसे.हयाउलट अवनी दिसायला सावळी, हडकुळी, मध्यम बांध्याची! त्यात राहण्या-वागण्याची अजिबात फिकीर नाही.अंगात कफनीवजा ढगळ कुडता आणि जीन्सची पॅन्ट आणि केसांचा मेस्सी बन हा तिचा अवतार!
मात्र आश्लेषाची सौंदर्यदृष्टी अफलातून होती…त्यामुळे कुणी काय घालावं, कुणाला कुठला रंग खुलून दिसेल ह्याबाबतीत घरात तिचा निर्णय अंतिम !घरचे-शेजारचे, नातेवाईक-परिचित मित्र-मैत्रिणी सगळे आश्लेषाची खूप तारीफ करत…. आणि नकळत अवनीशी तुलनादेखील. त्यामुळे आश्लेषा कशी “स्मार्ट” आणि अवनी कशी “बावळट” हे सिद्ध करूनच दोघींविषयीच्या चर्चेची सांगता होई!
तर ह्या भगिनींच्या आतेबहिणीचं मैथिलीचं लग्न ठरलंय त्यासाठीच सगळी तयारी चाललेली…
हे बघ, मैथिलीच्या लग्नात काही “स्थळं” बघायचीत आपल्याला…. तेव्हा अवनीची सगळी तयारी तुमच्या नजरेखालून जाऊ द्या” बाबांनी आईला सांगितलं तेव्हा अवनी लाजून चूर झाली.”ती सगळी जबाबदारी आश्लेषालाच देते ना! तिला सगळं छान कळतं… अवनीला काय छान दिसेल… तिच्या चपला, पर्स, कपडे…!” आई ही कामं आश्लेषावर सोपवून निर्धास्त झाली.
आश्लेषा देखील खूष होती… तिला खूप सारं शॉपिंग करायला मिळणार होतं… पण अवनी मात्र जराशी खट्टू झाली.
अवनीने लग्नासाठी म्हणून तयार केलेल्या साड्या, ड्रेसेस आश्लेषाने लग्गेच रिजेक्ट केले….सुटकेसमधल्या तिच्या मोरपंखी रंगाच्या ड्रेसची जागा आता फिकट गुलाबी साडीने घेतली तर लाल रंगाच्या साडीऐवजी मोतीया रंगाचा घागरा-चोली सामावला.
“आई, मला नाही आवडत गं असले फिके रंग… मला ताईच्या लग्नात माझ्या आवडीप्रमाणे कपडे घालू दे ना!” अवनी आईजवळ कुरकुरली.
“छे गं! सावळ्या रंगाला असे गडद रंगाचे कपडे शोभत नाहीत… हे बघ मी सिलेक्ट केलेले आऊटफिट्स किती क्लासी आहेत”… आश्लेषानं तिच्या वर्णावर बोट ठेवत आपल्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं, अन् नेहमीप्रमाणे अवनीने मुकाट्यानं ते कबूलही केलं.
लाडक्या मैथिलीताईच्या लग्नासाठी दोघी बहिणी पंधरा दिवस आधीच आतेघरी डेरेदाखल झाल्या.
अवनीचा आतेभाऊ मिहीर आणि त्याची मित्रगँग लग्नाच्या तयारीसाठी झटत होती… त्यातच एक आलोक… मिहीरचा खास दोस्त…. आलोकच्या सहवासात अवनी जरा सैलावली…दोघांची लगेच मैत्री झाली. गप्पा-टप्पा, हसणं-खिदळणं, खाणं-पिणं ह्यात दिवस मजेत सरू लागले.
“बाबा, ही अवनी त्या आलोकच्या जरा जास्तच जवळजवळ करतेय हं! त्याच्यासोबत हसते काय! खिदळते काय!! बावळट कुठली!! हिला वागण्याबोलण्याचं जराही सोयरसुतक नाही… हिला सांगा जरा…. तो आलोक काही बरा वाटत नाही मला…. नोकरी पण नाहीये त्याला आणि आपल्या जातीचा पण नाहीये… उद्या लोकं दहा तोंडांनी बोलतील आपल्यालाच… आपण परक्याच्या घरी आहोत… हिला जराही भान नको ?” आश्लेषानं आपलं मत दिलं.
अवनीनं तिचं आणि बाबांचं बोलणं ऐकलं… “पण तुलाही तर मित्र आहेतच ना!” मनात असूनही अवनी बोलू नाहीच शकली. त्यानंतर आलोकने लाख वेळा विचारूनही आणि मिहीरने मध्यस्थी करूनही अवनीने आपले ओठ घट्ट शिवून घेतले ते घेतलेच.
लग्नाच्या दोन दिवस आधी मैथिलीसोबत अवनी ब्युटीपार्लरमध्ये गेली. त्या ब्युटीशियनने अवनीलादेखील छानसा हेअरकट सुचवला अन् मैथिलीच्या आग्रहाखातर अवनीने आपले खांद्याच्या खालपर्यंत असलेले केस कापून स्टेपकट केला. आपलं बदललेलं रूप अवनी वारंवार आरश्यात न्याहाळत होती.
अपेक्षेप्रमाणे घरी आल्याबरोबर आश्लेषा तिच्यावर अक्षरशः किंचाळलीच- “शी! हे काय केलंस केसांचं… अगदी घाण दिसतंय… लांब केसच कसे छान वाटतात!”
“पण तुझा तर बॉयकट आहे ना आशू ! मिहीरनं, आतेभावाने रुजवात केली. “तुला तर छान दिसतोय गं”
“हो, मला आवडतो बॉयकट, पण हिने नाही करायचा हेअरकट… हिला नाही शोभत… मला नाही आवडत….माझ्याशी बरोबरी नाही करायची ” आश्लेषा ओरडत होती… किंचाळत होती.
लग्नासाठी म्हणून जमलेल्या पाहुण्यांसमोर आणखी तमाशा नको म्हणून अवनी आतल्या खोलीत निघून गेली. पण जेव्हा जेव्हा अवनी छोट्या केसांमध्ये दिसे, आश्लेषाचा स्वतःवरचा ताबा सुटत होता, ती अवनीला अद्वातद्वा बोलतच सुटली.
शेवटी अवनीने लग्नाच्या दिवशी केस मोकळे न सोडता अंबाड्यामध्ये गुंडाळले अन् आश्लेषाचा आत्मा शांत झाला.
मैथिलीच्या लग्नाहून सगळी मंडळी आपल्या गावी परतली. अवनी आणि आश्लेषादेखील आपल्या कॉलेज रुटीनमध्ये व्यस्त झाल्या.
एक दिवस आश्लेषा कॉलेजमधून घरी आली तर घरी एक तिशीची तरुणी आणि त्याच वयाचा एक मुलगा घरी सोफ्यावर बसलेले. घरात हे अनोळखी तरुण बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं.
इतक्यात आई एका ट्रेमध्ये सरबताचे ग्लास घेऊन हॉलमध्ये आली तसं आश्लेषाने आपली सॅक कॉर्नर रॅकवर ठेवत प्रश्नार्थक नजरेनं आईकडे बघितलं.
“अगं, माझ्या कॉलेजमधली मैत्रीण आहे ना मनीषा… तिची ही मुलगी…क्षितिजा आणि हा तिचा मित्र पियुष” आईने ओळख करून दिली.
“ह्या दोघांना एक कसलीशी डॉक्युमेंटरी बनवायची आहे त्यासाठी आलेत आपल्या शहरात. हॉटेल मध्ये राहणार म्हणत होते दोघंही… मी सांगितलंय आपल्याच घरी रहा म्हणून. आता पंधरा दिवस इथेच राहतील ही दोघं! पियुष वरच्या गेस्टरूम मध्ये राहील आणि क्षितिजाला तुझ्या खोलीत ऍडजस्ट करशील?”
“ओह येस… व्हाय नॉट? हॅलो, मी आश्लेषा … ह्या घरातलं शेंडेफळ!” तिने ने आपल्या सिग्नेचर नर्मविनोदी स्टाईलने उत्स्फूर्तपणे स्वतःची ओळख करून दिली. “यू कॅन कॉल मी ऍश” क्षितिजाचं राहणीमान, कपडे, हेअरस्टाईल एटिकेट्स, स्मार्टनेस ह्यामुळे ती प्रभावित झालीच होती.
आश्लेषाला अश्याच स्मार्ट मुली आवडत. “आणि ही तर फारच मस्त आहे बुवा… हिच्याशी मैत्री केली तर फ्रेंड सर्कल मध्ये वजन वाढेल माझं” तिच्या मनाने कौल दिला.
“फ्रेंड्स?” तिनं क्षितिजासमोर हँडशेकसाठी हात पुढे केला. क्षितिजाने देखील तिच्या हातात हात सोपवत फ्रेंडशिप स्वीकारली आणि पियुषने देखील.
क्षितिजा आणि पियुषचं डॉक्युमेंटरीचं काम जोरात सुरु होतं. क्षितिजा आश्लेषाच्या रूम मध्ये रहात असल्याने ती लॅपटॉप उघडून बसली की आश्लेषा त्यात डोकावत असे. तिलाही ह्यात आता इंटरेस्ट येऊ लागलेला…..
त्या दिवशी क्षितिजा आणि पियुष हॉलमध्ये विचारक्रांत बसले होते.
“हॅलो क्षिती, काय करताय गं… आपल्या डॉक्युमेंटरीचं कुठपर्यंत आलं? कधी होणार फायनल?” बाहेरून आलेल्या आश्लेषाने उत्सुकतेने विचारलं.
” पियुषलाच विचार ” क्षितिजाने उदासपणे लॅपटॉपमधून मान वर केली.
तिने अपेक्षेने पियुषकडे बघितलं.
“अरे यार, आमचा स्क्रिप्ट रायटर आजारी पडलाय अचानक. परवापर्यंत स्क्रिप्ट तयार व्हायला हवं आहे नाहीतर डेडलाईन चुकणार! क्लायंटला पुढच्या आठवड्यात सगळं फायनल करतो म्हणून शब्द दिलाय मी. एरव्ही मीच लिहितो सगळं पण ह्यावेळेस एडिटिंग, कॅप्शनिंग, बाकीचे इश्यूज… खूप लोड आहे यार” हाताची मूठ कपाळावर आपटत पियुषने व्यथा मांडली.
“ओह् शीट” आश्लेषा त्यांच्यामध्ये सामील झाली.
“ए, मी लिहून बघू का स्क्रिप्ट… म्हणजे तुमचा कन्टेन्ट लक्षात आलाय माझ्या. तुमच्या चर्चा ऐकते ना मी नेहमी ” हा आवाज अवनीचा होता.
” अगं बाई, हे स्क्रिप्ट आहे डॉक्युमेंटरीचं… तुमच्या कॉलेजचा निबंध नाही काई ” नेहमीप्रमाणे आश्लेषाने अवनीला वेडावलं तसं अवनी हिरमुसली.
“येस येस, व्हाय नॉट! आणि व्हॉइस ओव्हर पण तूच कर, किती गोड आवाज आहे हिचा… व्हॉट से क्षिती?” पियुषने अवनीला प्रोत्साहन दिलं तसं आश्लेषा दुखावली.
“म्हणजे मला पण लिहिता येतं हं छान… मीच लिहू शकते ” आश्लेषा प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली.
“मग दोघीही लिहा ना! बघूया काय फायनल करायचं ते ” क्षितिजा बोलली अन् दोघी बहिणी कामाला लागल्या.
तिसरे दिवशी दोघींनी आपलं स्क्रिप्ट पियुषसमोर ठेवलं.
हा पियुष म्हणजे पियुष बेणारे… सोशल मीडियावरचा गाजलेला ब्लॉगर! “माझी लेखणी” ह्या सुप्रसिद्ध वेबसाईटवर लेखन करत असे. अतिशय हुशार, भाषा, व्याकरण आणि शुद्धलेखनाबद्दल तितकाच आग्रही!
“माझं वाच ना आधी ” आश्लेषाने हातातलं प्रिंटआऊट पियुषला सोपवलं. पियुष त्याचा फेव्हरेट लाल पेन ओठात धरून वाचू लागला.
जसं जसं पियुष पान पलटवू लागला तसा आश्लेषाच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला.
पूर्ण वाचून झाल्यावर पियुषने आश्लेषाला कागद परत केले. आपल्या लेखनावर सगळीकडे लाल पेनाने केलेल्या खुणा पाहून तिला रडूच कोसळलं.
शी: काय ही भाषा… काय हा मजकूर…अगदी घाण लिहिलंय ” पियुष करवादला तशी आश्लेषा रडकुंडीला आली.
“पण बाबांना दाखवलंय मी हे. ते तर छान लिहिलंय म्हणाले” आश्लेषाने मुद्दा धरून ठेवला.
आपली मेहनत वाया गेली म्हणून ती आधीच निराश झालेली. अश्या नकाराची सवय कधीच नव्हती तिला.
“ए, बघ.. किती भारी लिहिलंय अवनीने… व्वा !!! लव्हली यार!” क्षितिजा जवळजवळ चित्कारलीच.
पियुषने अवनीचं स्क्रीप्ट वाचलं तसा तो ही एकदम खूष झाला.
“ह्या पियुष बेणारेला कॉम्पिटीटर आली फायनली” त्यानं अवनीच्या खांद्यावर थाप मारत शाबासकी दिली तसा
आश्लेषाचा चेहरा आणखी उतरला.
अवनीचं स्क्रिप्ट फायनल करून, तिला अश्याच स्क्रीप्ट लिहिण्यासाठी आमंत्रित करून आणि आईबाबांचा निरोप घेऊन पियुष आणि क्षितिजा गावी जायला निघाले.
अगं, प्रत्येकाचा पिंड निराळा, आवडीनिवडी निराळ्या, छंद निराळे!” हाताची पाच बोटं सारखी नसतात तर तुम्ही बहिणी कश्या सारख्या असणार? ” बाबा अवनी आणि आश्लेषाला समजावत होते.
“मी हिचं कधी वाईट नाही चिंतलं… अवनीला व्यवहाराची समज जरा कमी आहे म्हणून मी जपत होते तिला. तिथे लग्नात तो आलोक किती मुलींसोबत फ्लर्ट करत होता ते स्वतः पाहिलंय मी..म्हणून बोलले ना हिला त्याच्याशी जास्त संबंध ठेवू नकोस म्हणून… काय वाईट केलं मी!” आश्लेषा डोळे पुसत होती. “पण अश्याप्रकारे झिडकारून वागलं-बोललं तर किती वाईट वाटतं हे आता कळलंय मला”
“पण अवनीला जपण्याच्या नादात अती निर्बंध घालतेस गं तू तिच्यावर कधी कधी…अगं तिलाही वाटतं ना आपल्या आवडीने कपडे घालावेत, हेअरस्टाईल करावी… नसेल शोभत तिला… पण म्हणून काय तिनं आवडीचे कपडे घालायचेच नाहीत का? तिनं तुझं ऐकलं नाही तर किती आकांडतांडव करतेस गं तू ?
प्रत्येकात काही ना काही कमतरता असतेच ना! आणि रूप -रंग काय आपल्या हातात असतो? ती सावळी आहे त्यात तिचा काय दोष? मला सांग इथे परफेक्ट कोण आहे?? मग तुझ्यात जी कमतरता आहे त्यावरून तुला कुणी सारखं-सारखं बोललं तर कसं वाटेल सांग बरं?” आईने आश्लेषाच्या पाठीवरून हात फिरवला.
“अगं, पण आशू, तू सांगितलंस तर मी पण ऐकते ना तुझं… कधी नाही बोललेय का मी तुला! तू सुंदर आहेस, स्मार्ट आहेस, तू लहान आहेस माझ्यापेक्षा पण तुला समजतं -चांगलं काय वाईट काय..” अवनीदेखील आश्लेषाच्या शेजारी येऊन बसली. ” तू माझ्यासाठी उत्तम तेच करणार ह्याची खात्री आहे मला. तिने हलकेच आश्लेषाचे डोळे पुसले.
“आणि तू अभ्यासात माझ्यापेक्षा हुशार आहेस त्यामुळे मला कॉलेजच्या प्रोजेक्ट सबमिशनला नक्की मदत करणार ह्याची मला खात्री आहे” आश्लेषाने अवनीला प्रेमभराने जवळ घेतलं.
“हो ना! माझ्या दोन्ही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात निपुण आहेत. एकमेकींच्या विरुद्ध नाहीत तर एकमेकींना पूरक आहेत दोघी.” आईने पुस्ती जोडली.
“तर काय! ह्या दोघी मिळून एक सॉलिड टीम बनतात की नाही ते बघच! बाबांनी आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
इकडे आईने क्षितिजाला आपलं मिशन पूर्ण झाल्याचा व्हाट्सअप मेसेज केला. क्षितिजाने अंगठा उंचावत तिला दाद दिली अन् पियुषसह परतीच्या गाडीत बसली.
समाप्त
©सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
Sunder Aahe…..Aani Aajcha Kalathi perfect Aahe …Thanks ..
Good Wishes.
Thank you so much