© कांचन सातपुते हिरण्या
“आई हे सगळं कुणाचं सामान हो ? हे दागिने , साड्या बेडवर होतं आत .”शलाका वंदनाताईंच्या समोर उभी .
” आवडलं ना तुला ? मला वाटलंच होतं . अगं तुझ्यासाठीच आणलेलं कधीच . सोहमचं आणि तुझं लग्न ठरलं तेव्हाच घेऊन ठेवलेलं एकेक . बस की शलाका . बघ हि चिंचपेटी , मोत्यांचे झुमके , बांगड्या अगदी खुलून दिसतील या बनारसी साडीवर .
हो ना शलाका ?”
“आई अहो सॉरी पण मी कधी घालणार हे सगळं? लग्नातल्या साड्या दागिन्यांचाच मला प्रश्न पडलाय आता कधी कपाटातून बाहेर येतील त्या वस्तू ? वर्षाकाठी कधीतरी काहीतरी घातलं जाणार , त्यापेक्षा हे सगळं तुम्हांलाच ठेवा ना . तुम्ही निदान वापराल तरी .”
दोन साड्यांच्या घड्या आणि दागिन्यांचा बॉक्स त्यांच्या मांडीवर ठेवून शलाका ऑफिसला निघाली .
” येते आई या सगळ्या गडबडीत उशिरच झाला जरा आज निघायला .”
वंदनाताईंच्या पाण्याने गच्च डडबबलेल्या डोळ्यांतले टपोरे थेंब साड्यांच्या घड्यांवर ओघळलेच . बाहेर गेलेले मोहनराव नेमकेच आले .”बघा ना , वस्तूंच्या मागच्या भावना तरी समजून घ्यायच्या होत्या , बरं वाटावं म्हणून तरी ठेवून घ्यायचं होतं आत्ता .मला काय माहित हिला नाही आवडत नाही तर मी आधीच घेऊन ठेवलं नसतं हे सगळं .माझंच चुकलं खरं . हि अशी होणार का हो आमच्या नात्याची सुरूवात.”
मोहनरावांनी वेळ निभावून नेण्यासाठी समजावलं बायकोला ,”नवी पिढी नवे विचार , शिवाय सासू सून म्हणाल्यावर आता हे असं होतच राहणार थोडंफार कधीतरी .आवडी निवडीचे मतभेद राहणारच गं , दोन पिढ्यांमधला फरक.”
” असं नका हो बोलू . मी काय भांडण काढणारी सासू आहे का ? नाहि तिला आवडलं पटलं तर ठिक आहे ना .”
वंदनाताईंनी त्या वस्तू लगेचच कपाटबंद केल्या आणि सुनेचे काय काय लाड करायचे याची यादीही मनात दडपून टाकली ..
वंदनाताई विचारात हरवल्या..
सोहमच्या लग्नानंतर घरातलं वातावरण बदलेल असं वाटलं मला छान मैत्रीण मिळेल . इतकी वर्षे एकटीच तर असायचे घरात .यांना काही आवड नव्हती आणि सोहम लहान असताना करायचा आई आई म्हणून पाठीपुढे .
जसा मोठा झाला तसं त्याचं विश्व तयार झालं . मित्र-मैत्रिणी मग कॉलेज , नोकरी .
त्यातूनच एक दिवस त्यानं शलाकाला घरी आणून सांगितलं ” आई मला शलाका आवडते आणि तिलाही मी . आता तुम्ही घरच्यांनी एकमेकांशी बोलून घ्या .”
किती बिनधास्त पिढी ही .शलाकाचे आई बाबासुद्धा सुविद्य , सुशिक्षित . सगळं कसं छान जुळून आलं पण मी विसरूनच गेले स्वतंत्र विचार करणारी ही पिढी .”
” सौभाग्यवती चहा मिळेल का कडक ?” मोहनरावांनी हाक दिली तशा विचारातून बाहेर आल्या वंदनाताई .
आता हळूहळू घरात प्रत्येकाची स्वतंत्र स्पेस तयार झाली .
मग वंदनाताई मोहनरावांनीही रोजचं रुटीन बदलून नवा दिनक्रम तयार केला .
शलाकानं स्वयंपाकाला , वरकामाला बाई लावली . त्यामुळं वंदनाताईंना कामांनाही सुट्टी मिळाली .
भाजी , फळं किराणा अगदी पिठांपासून सगळं घरपोच ऑनलाईन येऊ लागलं .
मग हे दोघंही सकाळी बागेत फेरफटका , घरी आले की देवपूजा , नाश्ता , पेपरवाचन असा अर्धा दिवस, दुपारी थोडी विश्रांती , संध्याकाळी जेष्ठ नागरिक संघात , हास्य क्लबमध्ये आणि रात्री घरी येऊन जेवण .
मोजकं बोलणं मग निद्रादेवीच्या आधीन होणं . असं भरगच्च वेळापत्रक तयार झालं .
वंदनाताई मात्र उशिरापर्यंत जाग्या राहायच्या विचारांत. ही कसली सुरुवात नव्या नात्यांची नव्या वळणांची .
पहिला दिवाळसण म्हणून शलाका माहेरी आली दोन-तीन दिवसांसाठी . वंदनाताईंनी येताना पाकिटात दहा हजार घालून तिच्या हातात ठेवले .
” तुला हवं ते घे गं शलाका तुझ्या आवडीचं,” म्हणून .
शलाकाच्या आईलाही हे जरा वेगळंच वाटलं , असे पाकिटात पैसे घालून देणं .
पहिला दिवाळी सण . साडी नाही , फराळ नाही .
मग दोन दिवसांत बोलता बोलता शलाकाकडूनच सगळा अंदाज आला त्यांना .
लेकीचं हे असं वागणं नवीन नव्हतं . लहानपणापासूनच परखड स्पष्ट बोलणं , बिनधास्त वागणं , समोरच्याचा मन दुखवण्याचा हेतू नसला तरी ते व्हायचंच आपोआप .
शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी तर कायम घरी यायच्या तिची तक्रार सांगत .
” शलाका , संध्याकाळी अरुणामावशी , जयाआत्त्या सुलाकाकू यायच्यात गं आज . तुझा पहिलाच दिवाळसण . त्यांच्या सुना पण यायच्यात .
आता तुझ्या सासरच्यांनी तर तुला साडी न घेता पैसे दिलेत पण नेसायला तर साडीच लागेल ना . माझी नवी बनारस आहे मोती कलरची ती नेस .”
” आई कशाला हवीय साडीच . मी पैठणी कुर्ता घालते की काल आणलेला .”
” नको ऐक जरा माझं .”
” बरं आणि जेवायचं काय ठरवलंय आई ? म्हणजे स्नॅक्स वगैरे का जेवण ?”
” त्याची काळजी नको करूस . मी अंगूर रबडी केलीये काल . सोरट्यांच्या अन्नपूर्णात पुलाव अळूवड्यांची ऑर्डर दिलीय . पुऱ्या आणि छोल्यांची भाजी करू आपण दोघी .”
“आई मी नाही हा . ऑर्डर दे पुर्यांची पण .”
” शलाका कधीतरी आवडीने करावं काहीतरी आपल्या माणसांसाठी . “
“आपली माणसं ?”
“अगं सोहम आणि तुझे सासू-सासरे पण यायचेत संध्याकाळी .”
” हे कधी ठरलं . सोहमचा फोन झाला सकाळी . मला काही बोलला नाही .”
“अगं सरप्राईज जायचं असेल त्याला .”
शलाकाच्या आत्या , काकू , मावशी सगळ्यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणून शलाकासाठी लहान मोठ्या भेटवस्तू आणल्या . शलाकाच्या आईनंही सगळ्यांना काही ना काही आणलं होतं .
“आमच्या शरयूला खूप आवडते साडी नेसायला ड्रेसपेक्षा . तिला तीन साड्या घेतल्या . खूप आवडल्या .” सुलाआत्त्या सांगत होती .
तशी काकू म्हणाली ,” सुनीलाची सासू पण खूप हौशी आहे हो ताई . वस्तू घेणं तर आहेच पण जीवही खूप लावते .माझी तर काळजीच मिटली बाई .”
या सगळ्या गप्पा ऐकताना शलाकाचा उतरलेला चेहरा आईने बरोबर हेरला .
आई स्वयंपाकघरात गेली तशी शलाकाही मागं गेली .
“आई कधी येणारेत गं माझ्या घरचे .”
“अगं बाई ! तुझ्या घरचे लोक कधी येणार तुलाच माहीत .”
तेवढ्यात आत्या आली ,” शलाका , अगं तुझ्या घरचे आलेत . चल बाहेर .”
वंदनाताईंनी भरपूर फराळ , सुकामेवा असं काय काय आणलेलं शलाकाच्या हातात दिलं .
गप्पा जेवणं झाली पण नेहमी बडबडणारी शलाका आज तेवढी मोकळी नव्हती .
पाहुणे मंडळी गेल्यावर सोहम त्याचे आई-बाबा सुद्धा निघाले .
“आई मी पण घरी जाते गं यांच्याबरोबर .”
” का गं ,काही राहिलंय का ? मी देतो उद्या आणून .”
“नाही जे राहिलंय ते मलाच माहितीय कुठंय ते .”
आईने वंदनाताईंकडे बघितलं .
” अगं पण शलाका .”
” मी दोन दिवसांनी येईल आई .”
मंडळी घरी परतली . वंदनाताई आता आडव्या होणार तर बेडरूमच्या दारात शलाका .
“आई येऊ का?”
“शलाका, अगं काही हवंय का ?”
” आई सॉरी त्या दिवशी तुम्ही मला हौसेनं आणलेल्या साड्या दागिने मी घेतले नाहीत . तुम्हांला काय वाटेल याचा विचारच केला नाही. चुकलंच माझं .”
” अगं असं काही नाही . नवा संसार तुमचा .”
” नाही आई , यापुढे असं नाही होणार . मला त्या साड्या आणि दागिने हवेत . द्याल का .”
“अगं तुझंच तर आहे ते . कपाटात तसंच ठेवलंय बघ .”
” वंदनाताई तुमच्यासारखी सासू मिळाली हे माझ्या शलाकाचं भाग्यच . म्हणून वेळीच कान टोचले तिचे .”
शलाकाच्या आईने थोडं बोलून फोन ठेवला .
वंदनाताईंना घरात आता नवी वेगळी सुरुवात होतीये हे वाटत असतानाच मनात उगवू पाहणाऱ्या दुराव्याचा शेवट झाला आणि प्रेमाच्या नात्याची सुरुवात .
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते ‘हिरण्या’ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
लक्ष्य
जागर शक्तीचा
खूपच छान.
मुलींच्या आईकडून अशा प्रकारे शिकवण मिळणे ही आज काळाची गरज बनली आहे.तसेच सासू या नात्यानेही हळूहळू धीराने घ्यायला हवं.मान्य आहे काहीवेळा काहीच फरक पडत नाही.पण सकारात्मक विचार केला तर मानसिक त्रास तरी होणार नाही.
अगदी योग्य मॅम…थॅन्क्यु सो मच…
Kharech Aajachi Pidhi Aadhich Aahe……Kuthun Shiktat,Ase Vichar Yancha Dokyat Kase Yetat Mahit Nahi.
Aani Ho Kharech Mulincha Aai.Vadilani Velevarach Janiv Karun Dili Tar Khup Jast Problem Yenarach Nahit.
Halli Mulinche Aai Vadilach Mulina Vaeet Goshti Shikvitat …..Vegale Raha,Saglyana Tras De,Bati Tudun Tak ..Kam Nahi Karayache Navrya Barobar Ektech Rahiche,Ase Aane Goshti Sangun Sansarach Vibhakt Karun Taktat ..
Pan Baryach Muli Yala Avadhi Nakkich Aahet.
Sukhane Sansar Karatat
Nice,True Story.
थॅक्यु व्हेरी मच मॅम