© वर्षा पाचारणे.
“वृंदा, त्या कर्म करंट्याने जे करायचं होतं ते झालं करून .. त्याच्यासाठी आयुष्य बरबाद करून कुढत, रडत बसू न्हगं”..
आई पोट तिडिकेने लेकीला समजावण्याचा प्रयत्न करत होती.. दीड वर्षापूर्वीच लग्न झालेली वृंदा एक दिवस अचानक माहेरी परतली, ती अनेक शारीरिक जखमांसोबत मानसिक आघात सहन करूनच.
पदरी २ महिन्याची तान्ही लेक. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात रस्ता सापडेल तिकडे निघावं, नाहीतर जीव द्यावा, या विचारात ती तिच्याही नकळत शेवटी माहेरच्याच दारात येऊन बसली..
माहेर म्हणजे तरी कोण… एक जिवाभावाची आई अन् पत्र्याचं अर्धमुर्ध तुटलेलं छप्पर… बाप तर ती लहान असतानाच दारूच्या आहारी जाऊन वारला होता.
मोठ्या कष्टाने आईने लेकीला वाढवले होते. आणि ‘आज त्याच आईवर पुन्हा या वयात ओझं बनून रहायचं का?’, असा विचार वृंदाच्या मनात येत होता पण कुशीत निवांत निजलेल्या लेकीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून आत्महत्या करण्याचे धाडस काही केल्या होत नव्हते.
आई देवापुढे दिवा लावून नुकतीच पिठलं भाकरी करायच्या तयारीत असताना वृंदाचा ‘आईsss’, म्हणून आवाज कानावर पडताच आईने दाराकडे पाहिले.
वृंदाचे डोळे रडून लालबुंद झाले होते. चेहरा मलूल झाला होता. अंगात त्राण नसल्यासारखे दिसत होते.
तिचं निरागस लेकरू नुकतंच झोपेतून जागं झाल्याने आता भुकेमुळे व्याकूळ होत रडू लागलं होतं.
“वृंदे, बाय आत्ता या येळेला रात्रीची तू कशी आली गं.. आणि तुझं डोळं येवढं लाल का झाल्यात.. त्या मुडद्याने परत हात उचलला व्हय तुझ्यावर… अग बोल ना पोरी काय झालं ते”… आई काळजीने व्याकूळ होत वृंदाला विचारत होती.
“आई, त्याचा मार मी कसातरी सहन करत होतेच गं संसार वाचवण्यासाठी… वाटायचं पदरी लेक असताना कधीतरी त्याला समज येईल, कधीतरी त्याच्यातला बाप जागा होईल”… एवढं बोलून वृंदा शांत झाली.
आईचा जीव मात्र टांगणीला लागला होता.. “अगं बोल ना पोरी काय झालं?”, म्हणून आई वृंदाचे डोळे आपल्या पदराने पुसू लागली. पण तिच्या स्वतःच्या डोळ्यांना मात्र लागलेल्या अश्रूधारा थांबता थांबत नव्हत्या.
“आई, लोक लई सांगायचे मला की त्याचं वागणं वंगाळ हाये, त्याचं बाहेर कुठल्या तरी बाई बरोबर कायबाय चालू हाय, पण मी दुर्लक्ष करत राहिले… पण त्यो त्या बयेला घरी घेऊन आला. सवताच समान घिऊन निघून बि गेला.. म्या लई गयावया केलं त्याच्यासमोर.. पण त्या बयेच्या पुढे त्याला काय बी दिसत नव्हता. मला लाथाडत ‘तुझा माझा काय बी संबंध न्हाय’, म्हणून तो कायमचा निघून गेला.
घराचं थकलेलं भाडं भरण्यासाठी पैसे नाय म्हणत तिच्यावर हजारो रुपये उधळून बसला… अन् मला आन लेकराला धक्के मारून हाकललं.. ‘काय करावं काय बी सूचना… वाटलं जीव द्यावा पण हिम्मत नाय झाली या लेकराला पोरक करण्याची… वाट फुटंल तिकडं जाऊ म्हणत शेवटी हितं तुझ्यापाशी आले’..
लेकीवर ओढवलेल्या संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे हे आईने त्याच दिवशी मनाशी पक्के केले.
महिनाभर कसातरी गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांची कुजबूज सुरू झाली.. ‘वृंदाला नवऱ्यानं टाकलं’, हा एकच विषय आजूबाजूच्या बायकांना चघळायला मिळाला. बायकांची ती सततची कुजबुज वृंदाला अक्षरशः नकोशी झाली होती.
आलेल्या परिस्थितीमुळे बसलेल्या मानसिक धक्क्याने उद्याचा दिवस कसा काढायचा हि सगळ्यात मोठी चिंता होती.
दिवसागणिक लेक मोठी व्हायला लागली. आईला देखील आता सांधेदुखीचा त्रास बळावल्यामुळे कामावर जाणं शक्य होईना..आईच्या ऐवजी कधी वृंदा कामावर जाई. पण आपल्या लेकीने ही असली धुण्याभांड्याची कामं करू नये असं तिला नेहमी वाटायचं. आज-काल परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने आई देखील सतत वृंदाकडे दुसऱ्या लग्नाचा विषय काढू लागली.
किमान वृंदाचं लग्न होऊन ती तरी पुढचं आयुष्य सुखात जगल हा एकच विचार आईच्या मनात सतत येत होता.
“वृंदे, हे बघ तू अजून तरणी ताठी हायेस.. असं आयुष्य काढायचं लई कठीण असतं बघ बाय.. माझ्यावरनच बघ की म्या कशी तुला सांभाळली.. कधी कसली हौस मौज नाय ना धड शिक्षणाचा तपास.. वाटलं होतं तुझं लग्न करून दिल्यावर माझी जबाबदारी संपली.. आता माझी लेक सुखाने संसार करल… पन तुझ्या नशिबात पुढं हे सगळं वाढून ठेवलं असल असं कधीबी वाटलं नव्हतं..
“आई, अगं लग्न म्हणजे काय खेळ हाय व्हय.. एकाशी न्हाय पटलं म्हणून दुसरीकडे जोडायला जायचं.. पदरी माझ्या लेकरू हाय हे विसरली का तू.. आणि मला आता परत तो संसार, लग्न यातलं काय बी नको बघ.. मला फकस्त माझ्या लेकराला दोन घास खायला घालता आले तरी पुरेसं हाय”..
पण थकलेली शारीरिक अवस्था आणि हालकीची आर्थिक परिस्थिती या सगळ्याच्या विचाराने आईचा मात्र आज पारा चढला..
“अगं असं म्हणून कुठे चालतं व्हय.. पोरीची काळजी करू नको, पोरीला मी सांभाळीन.. पण त्या सोपान काकांनी जे स्थळ आणलंय ते मनावर घे.. आयुष्याची चिंता मिटल बघ .. माझं बी आज काल लय गुडघं दुखत्यात, त्यात कामावर जायला होईना म्हणून तुला जायला लागतंय… हे असलं जगणं बघवत न्हाई बघ”,.. मग असं म्हणून आईने पदराला डोळे पुसले.
“आई, अगं मी आयुष्यभर कष्ट करायला तयार हाये. तुला आणि माझ्या लेकीला कसं पोसायचं याची जबाबदारी आता माझी हाय.. नवऱ्यानं सांभाळलं म्हणजेच जगता येतं असं वाटतं समाजाला.. पन लग्न टिकवायची जबाबदारी काय एकट्या बाईवर असती व्हय.. त्याला दुसरी भेटली अन् त्यो गेला तिच्या मागं.. माझा, पोरीचा थोडा बी इचार आला नाय त्याच्या डोसक्यात.. आणि होता तवर बी सारखा मारून झोडून तर काढत व्हता मला.. तुला वाटतं मी संसार थाटावा पण आता कशातच मन लागत नाय.. तुला एकदा सांगून ठेवते मी लगीन करणार न्हाई”.. असं म्हणून वृंदा दुसरीकडे तोंड करून शून्यात नजर लावून बसली.
“अगं, कवर हे पाठीवरचं कुबड घिऊन हिंडणार हायेस.. पदरी पोरगी हाय म्हणून अशी अडकून पडणार हायेस व्हय.. अगं पदरी पोर हाय हीच तर कमजोरी बनली आहे तुझी”.. त्यामुळं कुणाकडं लग्नासाठी शबूद बी टाकता येईना मला.”
“आई, तुला मी आणि माझी लेक लईच जड झाली असंल तर तसं सांग, निघून जाईल म्या हितनं.. पण माझ्या लेकीला काय बी बोलू नगंस.. अग तीच तर माझ्या जगण्याची ताकद हाय.. नायतर नवऱ्यानं घराबाहेर हाकललं तेव्हा कुठं तरी जीव दिला असता, तरी बी बातमी तुझ्या पतुर पोचली बी नसती.. माझ्या घरी गेली असती तर तिथं गेल्यावर शेजारी पाजाऱ्यांकडून कळलं असतं बघ तुला, की जावयाने लेकीला मारून मारून हाकललं”..
“आई, आज जे तू मला सांगतीस, ते इतक्या वर्षांपूर्वी स्वतःला बी समजावलं होतं का गं.. मी पण तुझ्या पाठीवरचं कुबडच बनले होते का गं.. माझ्यापायी तू अडकून पडून दुसरं लग्न नाय केलं वाटतं”.. “बोल की.. माझ्यात घुटमळत राहिलीस व्हय.. का बरं?.. अन तसं असंल तर तवाच माझा जीव का घेतला नाय.. म्हणजे तू बी सुटली असतीस आन मी बी.. ही पुढची असली नरकाची जिंदगी दोघींच्या बी नशीबी आली नसती”… एवढ्या वेळ गहिवरलेल्या मनात दाबून ठेवलेल्या अश्रूंचा बांध आता मोकळा होत होता.. इतके दिवसाची घुसमट शब्दांवाटे बाहेर पडत होती.
“पोरी, काळजीपोटीच बोलते गं तुझ्या.. पण खरं हाय तुझा बाप गेल्यानंतर फक्त तूच माझ्या जगण्याचं कारण ठरली.. दिवस रात्र फक्त माझ्या लेकीला जगवायचं, ह्या एका विचारानी मला जिवंत ठेवलं”.. ‘दुःख, आठवणी काय गंssss काळाबरोबर मागं पडत जातात.
पण मागं राहिलेल्या जगण्याचं कारण बनलेलं आपलं लेकरू हीच बाई माणसाची खरी शक्ती.. एकटीनं लेकराला वाढवायचं म्हणजे खायचं काम नाय.. आजवर मी तुझ्यासाठी जगले यापुढं मी तुमच्या दोघींसाठी जगल बघ.. काय वाट्टेल ते करायची येळ आली तरी करल पन तुझ्या डोळ्यांत परत लग्नच्या विषयानी पाणी येऊन देणार नाय बघ”, असं म्हणून आईने मायेनं वृंदाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं.
बाहेरून खेळून आलेली चिमुकली मुक्ता आई आणि आजी एकमेकांना मिठी मारत रडतायेत हे पाहून त्यांना येऊन घट्ट बिलगली.. प्रतिकूल परिस्थितीतही या तिघींसाठी या आत्ताच्या एकत्र असण्याच्या सुखापेक्षा आणखी दुसरं कुठलंही सुख मोठं नव्हतं.
वाचकहो,
आयुष्याच्या वाटेवर अनेक खाचखळगे असतील. जीवन हे काट्याकुट्यांनी भरलेलं असेलही, पण जवळ असलेल्या गोष्टीत सुख मानण्याची ताकद आणि राखेतून भरारी घेण्याची जिद्द ज्यांच्या ठायी असते अशा असामान्यांना मनापासून सलाम. आज समाजात नवऱ्यानं बायकोला सोडलं या विषयावर चर्चा करणारे, तोच तोच विषय चवीचवीने चघळणारे अनेक लोक मिळतील. पण ओढावलेल्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी, सामाजिक बदलांशी सामोरे जाताना जेव्हा ती महिला जिद्दीने तिच्या लेकरांना वाढवते अशा तमाम स्त्रियांच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
Khup chan Katha ahe…..nice written
Thank you so much