भरतील का हे शब्दांचे घाव 

© कांचन सातपुते हिरण्या
“रताळ्याचा असा गोड शिरा ? आमच्याकडं कुणीच नाही खात . सुरेखा मला न विचारता कसा काय केलास गं ? चव ना धव त्याला .” सासूबाई म्हणाल्या तशा नवरात्रीत फराळासाठी आलेल्या बायका एकमेकींकडे बघून खुसफूसल्या .
सुरेखाला खूप लाजल्यासारखं झालं आणि वाईटही वाटलं .परकेपणाच्या जाणीवेनं डोळे भरून आले तिचे .
नंतर सगळ्यांना आवडला शिरा पण सासूबाईंचं खोचक बोलणं सुरेखाच्या मनात खोलवर रुतलं . 

पहिलंच नवरात्र लग्नानंतरचं . तिनं आवडीने केलेली कुठलीच गोष्ट सासूबाईंना पटतच नव्हती .
यावेळी तर सगळ्यांसमोर बोलल्यानं ती खूप खूप दुखावली .
” सुरेखा छान झालीय गं खीर .”
सासूबाईंना खीर भरवताना विचारात हरवलेली सुरेखा त्यांच्या बोलण्यानं भानावर आली .तांदळाची कोमट खीर पोटात गेली तसं पोट भरल्यानं चेहऱ्यावर टवटवी आली त्यांच्या .

“आता बरं वाटतंय ना आई ?  दुपारी आमसूल गुळाचं वरण करेल त्यात पोळी कुस्करून भरवेल .” हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर अजिबात वैताग कंटाळा नव्हता .
तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना अगदी स्पष्ट दिसत होती .
ती उठणार तोच सासूबाईंनी हळूच तिच्या हातावर हात ठेवला .
” काय झालं ? आई काही हवंय का तुम्हांला ?

” काही नाही गं . बस जरा इथं .अजून काय मागणार मी तूझ्याकडं ? एवढं भरभरून देतीयेस . मनापासून करतीयेस माझं सगळं . मलाच माझी लाज वाटतीय आता .
दुसरी कोणी असती तर कधीच वेगळा संसार थाटला असता गं . मला एकटीला टाकून गेली असती .”
“आई असं नका बोलू सारखं सारखं . कशाला त्या आठवणी . सुरेखा असं म्हणाली खरी पण..
एकदा सासूबाई एका नातेवाईकांना सांगताना तिनं ऐकलं होतं , माझा आकाश किती देखणा किती स्थळं येत होती पण त्याला हि आवडली मग आपण तरी काय करणार ना .
जरा म्हणून चपळाई नाही अंगात हिच्या .हळूबाई आहे नुसती . कसं होणार आमचं कुणास ठाऊक .”

सततचं हे असं बोलणं ऐकून सुरेखाचा आत्मविश्वास पार हरवून गेला . दिवस दिवस स्वतःतच हरवलेली असायची . पुन्हा त्यावरूनसुध्दा बोलणी बसत तिला . 
“बोलू दे गं मला सुरेखा . नाही तर अचानक देवाचं बोलावणं आलं तर ही सल मनात ठेवूनच जाईन गं मी . जेव्हा तुला या घरात प्रेम आधार मिळायला हवा होता तेव्हा सारखं माझं टोचून बोलणं ..”
बोलता बोलता त्यांना धाप लागली .

” पाणी घ्या तूम्ही आणि पडा बरं शांत.”
तिनं पाणी देऊन त्यांना हळूच झोपवलं पण त्यांचं बडबडणं चालूच होतं .
“तुला दिलेल्या शब्दांच्या जखमा कधीच भरून येणार नाहीत गं सुरेखा माहितीये मला . तेव्हा तूला जीव लावला असता तर आत्ता माझं मन असं झुरलं नसतं . देवानं त्याचीच शिक्षा दिलीय मला हे दुखणं देऊन .आता मला दुसरं काही नाही निदान तुझ्याशी बोलून मन मोकळं करून दे . मी तूम्हांला सगळ्यांनाच खूप त्रास दिलाय गं . हे मला समजून घेत राहिले .आकाश आई म्हणून कधी उलटून बोलला नाही , आणि तू तर खूप सोसलंस . मला माफ कर सुरेखा .”

सुरेखानं भाजी फोडणीला टाकून पोळ्या करायला घेतल्या .सासूबाईंना जसं आता मागचं सगळं आठवत होतं तसं तिच्याही डोळ्यांसमोर येतच होत्या की मागच्या काटेरी आठवणी .
कितीतरी वेळा आमटीत मीठ कमी , भाजीला तिखट तेल कमी , पोळीच करपली म्हणून जेवत्या ताटावरून उठावं लागायचं सुरेखाला .
सारखं बोलल्यामूळं तिच्याकडून गडबडून आणखी काहितरी चुकायचं .

चूक दाखवल्याचं नाही पण तुसडेपणानं बोलणं खूप जिव्हारी लागायचं तिच्या .
हे सगळं तिच्या माहेरी कळालं तेव्हा तिचे वडील भाऊ म्हणाले होते , आम्ही बोलून बघू का त्यांच्याशी ?
पण आत्ता नको , अगदीच वेळ पडली तर मी स्वतः तुम्हांला बोलवेन असं सांगितलं तिनं . 
आकाशनं तर कितीतरी वेळा आईला समजावण्याचा प्रयत्न केला , 

“आई नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग . आपण सोल्युशन काढू काहीतरी .” पण ठोस कारण कुठं होतं त्याच्या आईकडं सांगायला . 
स्वभावच खाष्ट आणि विक्षिप्त , शिवाय सासुपणा गाजवण्याचा पोकळ अहंकार . त्यामुळं आकाश आणि त्याच्या वडिलांचं काही चालत नव्हतं त्यांच्यापुढे.
खरं तर त्यांच्या त्रास देण्याला काही कारणही नव्हतं पण मीपणा ठासून भरलेला .मी म्हणेल तसंच व्हायला हवं हा हेका . त्यांच्या अशा वागण्यानं घरातलं वातावरण सतत गढुळलेलंच असायचं .

कधी सुट्टीच्या दिवशी आकाश सुरेखाला फिरायला घेऊन निघाला की ,”लवकर या आणि बाहेर काही खाऊन येऊ नका .तूमच्या वाटचं उद्या खावं लागेल . आता हे फिरायचे चोचले .पहिलं कुठं असं काही होतं .
कधी आकाशने आवडीने सुरेखाला साडी ड्रेस आणला की त्यावरून वेगळीच बडबड , बायको लाडकी तिलाच आणतो .आईला विसरला ..”त्यांच्या या अशा बोलण्यानं सुरेखाची बाहेर जायची इच्छाच व्हायची नाही .

सासरे तर कितींदा म्हणाले आकाशला ,” तूम्ही दोघं वेगळे व्हा ,तेव्हाच हिला किंमत कळेल माणसांची . जग इकडचं तिकडं होईल पण हिचा विचित्र स्वभाव .
पण आकाशआधी सुरेखानंच स्पष्ट नकार दिला होता .  तिला कारण व्हायचंच नव्हतं वेगळं व्हायचं . कधी ना कधी त्या बदलतील असं तिला वाटत होतं .पण तो कधी आलाच नाही .सुरेखाच्या पदरात देवानं दोन मुलं दिली . घराचं गोकुळ झालं पण तिच्या सासूबाई आहेत तशाच राहिल्या .
स्वभावाला कधी औषध असतं का ?

आधी आकाश आणि त्याच्या बाबांसमोर बोलणाऱ्या त्या आता सुरेखाला तिच्या मुलांपुढेही कधी नोकरी न करण्याचं कारण तर कधी घरातलं काही बाही पुढे करून बोलतच राहिल्या .
सवयच जडली होती ना त्यांना .
समंजस समजूतदारपणाचे बाळकडू मिळालेली ,मोठ्यांच्या आदराचे संस्कार झालेली सुरेखा कधी उलटून बोलली नाही पण काळ मात्र बोलला ..
तिची मुलं कॉलेजात जायला लागली . सुरेखाचं विश्व मात्र तिचं घर ,तिची माणसं ..

सगळं सुरळीत चालू असताना सासूबाईंचं पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं . आधीपासूनच त्यांना सांधेदुखी त्यात हे दुखणं .वयही जास्त . सक्तीची विश्रांती सांगितली डॉक्टरांनी .
प्रत्येक गोष्टीसाठी आता आधाराची गरज आणि तो आधार सुरेखाच झाली त्यांच्यासाठी .
तिला दिलेल्या शब्दांच्या जखमा तिनं दडपून टाकल्या तरी त्याचे सल आता सासूबाईंना क्षणाक्षणाला टोचताहेत ..

कधीकाळी तिला सुचलेल्या कवितेच्या ओळी तिच्या ओठावर आता आपोआपच येतात,
‘शब्दांच्या जखमांचे वार धारदार
काळीज चिरत राहिले
दिसले नाही तरी अश्रूंचे पाट वाहिले .’
समाप्त
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते ‘हिरण्या’ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!