पदर

 © अपर्णा देशपांडे
“आई ग s !! ” नंदाची वेदनेने पिळवटलेली हाक आली , तशी हातातील ताट ठेवून सुमा वाहिनी धावत गेली . गोठ्यात काम करणारे हेरंबचे हातही थांबले . गेल्या काही दिवसांपासून नंदाच्या वेदना बघवत नव्हत्या .
गिरीजा आत्या मात्र जागच्या हलल्या नाहीत .
एक नजर आतल्या खोलीत टाकून  निर्विकारपणे त्यांनी पुन्हा आपली जपाची माळ ओढायला सुरुवात केली .
” खूप त्रास होतोय का ग नंदू ? डॉ . ला बोलावणं करू का ?” नंदा च्या डोक्यावरून हात फिरवत सुमा ने म्हटलं  ;  पण आपल्या बोलण्यातील पोकळपणा तिच्या लगेच लक्षात आला .

दोन दिवसांपूर्वी अडकलेली पहिलंटकरीन नंदा …सुटली तर खरं , पण मूल दगावलं…अशा वेळी डॉक्टर येऊन तरी काय करणार होते?
नंदा चा चेहरा घामाने डबडबला होता .
सुमा वाहिनीने पटकन आपल्या सुती पदराने नंदाचा चेहरा पुसून काढला . पदरानेच थोडा वारा घातला तिला .
” बरं वाटेल हो लवकर . खरं तर अजून दोन दिवस दवाखान्यातच ठेवायला पाहिजे होतं . तिथे नीट लक्ष दिलं असतं …डॉक्टर म्हणत होते खरं , राहू द्या म्हणून …पण .. ह्यांनी ..”  सुमा वाहिनीने बाहेर नजर टाकून आपले शब्द गिळले . 

बोलून काहीच उपयोग नव्हता .  अनंतानेच  म्हणजे नंदाच्या मोठ्या भावानेच तर नंदा ला घरी आणलं होतं … त्यात पुन्हा आगीत तेल ओतायला होत्याच ..आत्याबाई !! 
स्वतः चं प्रतिबिंब बघतात त्या नंदा मध्ये !  काय बाई आहे !  आपल्या सख्या भावाची पोर , पण जरा म्हणून मायेचा ओलावा नाही तिच्या बद्दल ! सुमा भानावर आली ते हेरंबच्या हाकेने .
” वाहिनी बाईसाहेब , आक्कांसाठी वैद्यबुवा कडून हा काढा आणलाय . यानी ताकद येते म्हणे . त्यांना द्यायचा का ?” हेरंब कुठलीही बाटली पुढे करत म्हणाला . 

” असू दे , जेवण झालं की देईन ताईंना . ठेव तिथे .”  सुमा वहिनीनी असं म्हटल्या बरोबर आत्याबाई बोलल्याच !
” इतकं काही वाटायला नको हो ! एका पाठोपाठ एक अशी तीन पोरं गेली होती माझी ! आमच्या माहेरी नव्हते झाले हे असले लाड!”  आत्याबाई ची जीभ फार काटेरी होती . आणि नंदा च्या बाबतीत तर तिला अजूनच धार चढत असे .
सुमा ला वाटलं जोरात ओरडावं …’गेली वीस वर्षे तर माहेरीच पडीक आहात न !! वाट्टेल ते पदार्थ करवून मागता ,  वाट्टेल ते बाजारातून आणता , कुठली जबाबदारी नको की  जीव लावणं नको ! नुसत्या बसून नाहीतर लोळून असता , आणि वरून आमच्यावरच तोरा  ? ..कडवट जिभेची म्हातारी कुठली!’  पण तिने पुन्हा आपले शब्द मनातच फिरवले . 

नंदा ला थकव्याने ग्लानी आली होती . मुळातच अशक्त झालेलं शरीर , त्रास तर होणारच होता .
सुमा ने दरवाजा ओढून घेतला , आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायला स्वयंपाक घरात गेली . 
गेले काही महिने सुमाला हाताशी नंदा असण्याची सवय झाली होती .
फार चटपटीत होती नंदा कामाला . वहिनीची  नेमकी निकड लगेच समजे तिला . 
अगदी नवव्या महिन्यापर्यंत कामं करत होती . सुमा सतत तिचा विचार करत असे .

आपण लग्न करून ह्या घरात आलो , तेव्हा फक्त तिसरीत होती ती !  मग वर्षभरात सासूबाई गेल्या … आपणच  आई झालो नंदा ची . आता आपला सौरव सहावीत आणि यामिनी चौथीत आहेत ; त्यांनाही किती लळा लावलाय नंदा आत्याने ! 
अनंता आणि सुमा ने अगदी थाटात लग्न लावून दिलं होतं नंदा – प्रतापचं .
किती  श्रीमंत घरात गेली पोर म्हणून हरखून गेले होते सगळे .
पण त्याच्या छळाला  आणि छंदी फंदी वागण्याला कंटाळून नंदा वापस आली तेच पाच महिन्यांचं पोट घेऊनच  . 

अत्यंत रेखीव आणि रसरशीत नंदाची अवस्था बघून सुमाचं काळीज तूटलं होतं . 
ह्या आधी पण नंदा ने दोन तीनदा सुमा कडे सासरकडून होणाऱ्या  छळाबद्दल निरोप पाठवला होता .
त्यावेळी अनंताने सारवासारव करून तिच्या नवऱ्याला आर्जव केली होती ,  एकदा प्रत्यक्ष जाऊन भेटला होता . 
पण   त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता . 

प्रताप चं नाव जरी काढलं तरी नंदा च्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटत असे . नंदा ने स्वतःच्या तोंडाने प्रताप चे नीच कारनामे सांगितले होते , तरीही आत्याबाई तिने सासरी वापस जावं म्हणून आग्रह करत होत्या .
त्यांच्या ह्या भूमिकेवर सुमा चा संताप होत असे . 
मग आता तिला त्या नालायक माणसाकडे वापस न पाठवण्या बाबत सुमानेच ठाम भूमिका घेतली होती . 
तीन दिवस अनंताशी वाद घातला , आत्याबाईंशी भांडली , पण नंदाच्या पाठीशी उभी राहिली होती सुमा . 
*****

” वहिनी , काल तो बाबूसेठ काय म्हणत होता ग ? दादा ला काही धमकी देत होता का ?”  भाजी चिरता चिरता नंदा ने विचारलं  , तशी सुमा चपापली .
तिने नंदा कडे रोखून बघितलं . कधीतरी हा विषय निघणार होताच , पण आत्ताच नको असं वाटत होतं सुमाला . 
” तू ओळखलास आवाज  बाबूसेठ चा ? “
” कुठूनही ओळखेल मी त्या डुकराचा आवाज .”
” तुला आठवतात त्याचे वडील ? …बडे शेटजी ?” 

” मी कशी विसरेन ग ? …हैराण केलं होतं ह्या बाबू ने . बारावीत होते मी जेमतेम . सतत पाठलाग करायचा . सलगी करायचा प्रयत्न करायचा . नाव घेऊन मोठ्याने रडायचा . चौकात जायला पण  घाबरायचे मी . लांडगा मेला ! …हेरंब दादू ने चोपला होता त्याला …तेव्हा बडे शेठ मध्ये पडले …अंतुदादा ला माझ्या विरुद्ध काय काय बोलले होते न ? खूप रडले होते मी !” अंगावरचं पांघरून नीट करत नंदा म्हणाली .
”  त्या वेळी तुझ्या दादाने तुझी बाजू घायला पाहिजे होती ग ! तुला त्रास देणाऱ्या त्या डुक्कर बाब्याची बाजू घेतली , आणि शेपूट घातलं होतं . फार फार संताप झाला होता तेव्हा माझा .”

” पण काल का आला होता तो ? काय म्हणत होता ? “
” काही नाही ग , ते शेतातील माला संबंधी काही बोलणं चाललं होतं .”
सुमावहिनी काहीतरी लपवतेय हे ओळखलं नंदा ने , पण तो  विषय तिने तिथेच बंद केला . 
हळू हळू नंदाची प्रकृती सुधारत गेली .
तिच्या खाण्या पिण्याकडे सुमा वहिनी आई सारखं लक्ष देत होती .  

सौरव यामिनीला घेऊन नंदा गणेश मंदिरात आली होती .
प्रदक्षिणा घालत असतांनाच तिला मागून येणाऱ्या व्यक्तीची  चाहूल झाली ; तशी प्रदक्षिणा टाळून  तिने झपाट्याने वेग वाढवत पायऱ्या उतरायला सुरुवात केली . मुलं पण लगेच नंदाआत्या पाठोपाठ आलेच . 
” आता तरी माज सोड नंदा राणी! खूप झालं ! ”  आपले पिवळे दात दाखवत किळसवाणे हसत बाबू  म्हणाला .
” काल दादाकडे का आला होतास ?”

” माझा वाडा कधी रिकामा करणार हे विचारायला आलो होतो !” 
” तुझा वाडा ? तुझा ? कोणता वाडा ? ”  येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेल्या नंदांचा संयम सुटत होता . 
बाबू ने  पारावर निवांत बैठक मारली , तंबाखू मळून तोंडात ठेवली ,  आणि सांगायला सुरुवात केली .
बोलतांना  तिच्या सर्वांगा वरून फिरणारी  त्याची नजर मात्र तिला असह्य होत होती . 
गेल्या तीस वर्षांपासून तिचा लाडका वाडा बडेशेठ कडे गहाण होता . त्याचे व्याज फेडणे तर दूर , मूळ कर्ज पण फेडणे जमले नव्हते अनंताला . काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन तो  जप्ती टाळत होता बस .

नंदा कॉलेज मध्ये जायला लागली आणि तिच्यासाठी तालेवार स्थळ सांगून आलं . त्यावेळी बाबू ने घरी येऊन खूप तमाशा केला होता. हे लग्न कसं होतं बघतोच अशी धमकी दिल्यावर सुमा वाहिनीने त्याच्यासमोर पदर पसरला आणि नंदा चा नाद सोडण्यासाठी हात जोडले होते . 
आपले सगळे दागिने तिने सेठ च्या हवाली केले होते …तरीही बाबू ऐकेना तेव्हा बुळ्या अनंताने अजिबात विचार न करता कागद पत्र त्याच्या हवाली केले होते  . 
नंदाच्या पणजोबांपासून दिमाखात उभा असलेला वाडा एका क्षणात सेठ चा झाला होता . हे सगळं ऐकून नंदाच्या पायाखालची जमीन सरकली .

सगळ्या गावात हा अंतु चा वाडा प्रसिद्ध होता . भरपूर शिसवी लाकडाचा वापर असलेला  हा वाडा अंतु च्या वडिलांना नीट राखताच आला नाही . त्यांची शेती पण असून नसल्यासारखीच होती . 
सर्वस्व गमावल्या सारखी विमनस्क अवस्थेत नंदा घरी आली .
प्रसाद देण्या च्या निमित्ताने बाबू ने केलेला किळसवाणा स्पर्श , त्याची नजर आणि वाड्या बद्दलचे  भयाण वास्तव …सगळं असह्य होतं. मुलं पण रस्त्याने गप्प गप्पच होते .

” म्हणजे गेले काही वर्षे आपण त्याच्या मेहेरबानी मुळे ह्या घरात रहातोय आत्या?  हा वाडा आताआपला नाही राहिला? ”  सौरव ने केलेल्या प्रश्नाला  तिने मानेनेच उत्तर दिले .
नंदा च्या नुसत्या चेहऱ्यावरून सुमा ने काय  झालं असावं ते ताडलं .
” नंदू …अग , ..”
” एक शब्द बोलू नकोस वहिनी ! आता कळतंय मला ..की तुझे दागिने कुठे गेले , वाड्याची डागडुजी का नाही होत, सगळे नोकर चाकर का गायब झाले …तुला का इतकं राबावं लागतंय ते ! मला का ग नाही बोललात आतापर्यंत ?” 

सुमा ने तिला जवळ घेतले ; आणि दोघींचाही बांध फुटला .  
त्या दिवसानंतर सुमाच्या लक्षात आलं की नंदाचं वागणंच बदललंय  .
ती अबोल तर झालीच होती , पण  अधून मधून बाहेर जाऊ लागली . 
ती  मंदिरात किंवा हॉटेलात बाबू ला भेटत असते असं सांगत होतं कुणी कुणी .
सुमा ने विचारल्यावर उडवाउडवी ची उत्तरं देत होती ती .

बाहेर जाताना तिच्या राहण्यात दिसण्यातही फरक पडतोय हे आत्या बाईच्या टोमण्यातून सगळ्यांना माहीत झाले होते .
आज नंदाने बाबू ला खास घरी येण्याचे आमंत्रण दिले होते . वाड्याचे आणि कर्जाचे सगळे कागदपत्र तो सोबत आणणार होता .
तिने सोलकर वकिलांकडून स्टॅम्प पेपर्सही तयार करवून घेतले होते . 
एका कराराचे पेपर्स!   
सुमाचा कुठलाच दागिना वापस न देता , फक्त वाड्याचे मूळ कागदपत्र अंतु ला  वापस करणार आणि बदल्यात त्याच्या पहिल्या पत्नी सोबत राहून ती बाबूशी लग्न करणार …असा तो करार होता . लग्नाचा उल्लेख लिखित स्वरूपात नव्हता कारण ते बेकायदेशीर होतं.

नंदा आरश्यासमोर उभी होती . आज एकदम झिरझिरीत साडी , अतिशय खोल गळ्याचा ब्लाऊज आणि  ओठांना गडद लिपस्टिक लावून ती स्वतःला निरखत होती .
बाबू सोबत च्या प्रत्येक भेटीत बाबू ची शोधक नजर तिच्या गळ्याखाली  घोटाळत असायची .
आधी तरी त्याने सूचक बोलून आपली इच्छा व्यक्त केली होती …पण गेल्या काही दिवसात तर तो स्पष्ट मागणीच करायला लागला होता . गेल्या आठ वर्षांपासून तिची आस ठेवून असलेला बाबू …आज लाळ घोटत वाड्यावर आलाच !! सगळ्या मूळ कागदपत्रांसहित ! वाड्यावर हेरंब आणि अंतूदादाशिवाय  कुणीच नव्हतं .

सुमवाहिनी मुलांना घेऊन आत्याबाईंसोबत तिनधारा दत्त मंदिराला गेली होती … नव्हे , नंदा ने मुद्दाम तसे घडवून आणले होते . 
” नंदे , पाणी आण जरा .” अंतू ने हाक मारली .
” चहा बरोबर बिस्किटंही येऊ द्या !” अंगणात चौपाई वर बसत बाबू ने हुकूम सोडला . 
नंदा ने देवघरात नजर टाकली , आणि देवाला हात जोडले . तीचं बालपण जिथे हुंदडलं , जिथे वहिनीने आईची माया लावली त्या वाड्याचा  अस्तित्वाचा प्रश्न होता . 

चहा करतांना दादा आणि बाबूचे बोलणे ती जीवाचा कान करून ऐकू लागली .
दादाचा आवाज वाढला ..त्याचा स्वर तापला होता .  त्यांच्यात बाचाबाची होत होती .
आता तिला मध्ये पडणे आवश्यक होते …
वेळीच स्वतःला सावरत नंदा पाणी  आणी चहा घेऊन  बाहेर आली . तिच्या नुसत्या दर्शनानेच बाबू घायाळ झाला …दादा मात्र तिच्या ह्या  पेहेरावाने  आणि बदललेल्या रूपाने अचंबित झाला होता .

कागदपत्र अजूनही बाबूच्या हातातच होते .
चहा देण्यासाठी ती  जरा जास्तच वाकली .. तसा तिचा पदर ढळला .
बाबू मंत्रमुग्ध ! 
आपली अवस्था तशीच ठेऊन ती म्हणाली ,” ते कागदपत्र जरा ..”
” ह्यां ..ह्यां …हो s , घे न! तूच घे! आपली नजर तिच्यावर रोखून त्याने ते पुडकं समोर धरलं . ते देतांना जाणीवपूर्वक तिचे हात कुरवाळले .

लगेच मागे फिरून तिने ते पुडकं दादाच्या हवाली केलं , आणि वेगात आत गेली . खांबापाशी उभा हेरंब हताश पणे तिच्या ह्या बदललेल्या रुपाकडे बघत होता . 
ती आत मध्ये कपडे बदलत असतांना बाहेर बाबू जोरजोरात ओरडत होता, “उद्या संध्याकाळी येतो ग नंदाराणी!! छान सजून तयार रहा !” 
तिने खिडकीतून बघीतले , सगळं अवसान गळालेला दादा ओसरीवर बसला होता . 

आत दोन बादल्या अंगावर ओतून नंदा दगडाने आपलं सगळं अंग ओरबाडून काढत होती . कितीही घासलं तरी घाण निघतच नव्हती …साऱ्या अंगभर गोचीड वळवळ करत असल्याचा भास होत होता .
ते गलिच्छ जीव आता आपल्याला खाऊन टाकतील असं वाटून तिने गच्च डोळे मिटून घेतले ..
****** 
सुमा धावतच वाड्यात शिरली . अंतु , हेरंब किंवा नंदा  कुणीच समोर नव्हतं . तिने हाका मारल्या ..आणि शेवटी शेजारच्या  काकींना विचारलं …कुठे गेले सगळे? 

गावदेवी च्या उरुसात गेल्याचं काकींनी सांगितलं .
देवीचा वार्षिक उत्सव म्हणजे मरी आईच्या टेकडीवरील मंदिरात अख्ख गाव लोटत असे .
रात्री उशिरापर्यंत तिथे उरूस , महा प्रसाद  आणि काय काय असायचं .
तिघेही एकत्र कसे गेले ? आता कधी येतील ? 
तिची घालमेल सुरू होती .

आत्याबाईने आपला तोंडाचा पट्टा सुरू केला होता , पण तिच्याकडे पूर्ण  दुर्लक्ष करत सुमा आत पळाली . जीव मुठीत धरून तिने कपाट उघडले .  कपाटात वाड्याचे कागदपत्र सुरक्षित होते .
कपाळावरचा घाम पदराने पुसत ती स्वयंपाक घरात गेली .
मनात किती वेडेवाकडे विचार येत होते .

ह्या कागदपत्रांपायी आपण सुमा चा बळी देणार नाही आहोत हे अंतू ने तिच्याकडे बोलून दाखवली होते , पण पुरुष जातीचा काय भरवसा? ती पार अस्वस्थ झाली होती .
रात्री अंधारल्यावर दरवाजा वाजला .
सुमा मुलांच्या झोपेची तयारी करत होती …आवाज ऐकून धावतच गेली .

अंतु , हेरंब आणि नंदा आले होते . तिघेही शांत ….एक विचित्र स्तब्धता आली होती वातावरणात .
“कुठे गेला होतात तुम्ही ? मी किती काळजी करत होते .”
…कुणीच काहीच बोललं नाही .
“कुणी काही बोलेल का आज ?” वहिनी जवळजवळ ओरडलीच .

” वहिनी ,  मरी आईच्या उंच कड्यावरून पाय घसरून बाबूशेठ खाईत पडला …खूप खोल ….सगळा गाव आता तिकडे जमलाय हो . दर वर्षी प्रचंड गर्दीत एक दोन जण असे जात्यातच ! ” हेरंब  घाबरत म्हणाला .
एक सुस्कारा सोडून नंदा ने वहिनीकडे बघितलं .
ती डोळ्याच्या कोपरातून किंचित हसली ,आणि काय ते समजून सुमाने देवाला हात जोडले .
( समाप्त )
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!