©स्वामिनी चौगुले
भाग 1 इथे वाचा
संयम! उंचापुरा, मजबूत शरीर यष्टी, गोरा गोमटा, सरळ नाक, पाणीदार डोळे आणि उभट चेहरा असे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला. त्यामुळे त्याच्या मागे ऑफिसमधील मुली घोंडा घोळणार नाहीत तरच नवल.
पण तो मात्र जगा वेगळा होता. त्याला आवडायची त्याच्यापेक्षा तब्बल पाच वर्षांनी मोठी असलेली त्याची बॉस मैथिली जाधव!सर्वसाधारण बांध्याची सावळी, अप्रे नाक, मोठे चॉकलेटी डोळे, गोबरे गाल आणि उजव्या गालावर पडणारी जीवघेणी खळी, उभट चेहरा आणि निमुळती हनुवटी जी तिच्या चेहऱ्याला चार चांद लावायची.
कॉन्फिडन्ट आणि स्वतःच्या कामाशी काम ठेवणारी ती!
तिचे काम होते टूर्स अरेंज करणे, प्रत्येकाला आपली कामे वाटून देऊन टूर्सचे व्यवस्थापन करणे.
ती थोडी रागीट आणि शिस्तप्रिय होती. त्यामुळे सगळा स्टाफ तिला वचकून असायचा अपवाद मात्र संयम होता.
संयम नावाच्या अगदी उलट कोणत्याही गोष्टीसाठी धीर धरण्याचा संयम त्याच्याकडे नव्हता. बडबड्या आणि साहसी खेळाचे वेड असणारा तो! म्हणून तर त्याने टुरिझमचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले होते. पॅरासीलिंग, पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, बंकी जंपिंग हे खेळ तर त्याला आवडायचेच.
त्याने अनेक वेळा हे खेळ खेळले होते पण सगळ्यात जास्त आवडायचे त्याला ते म्हणजे ट्रेकिंग!
तो सोळा वर्षांचा असल्यापासून ट्रेकिंग करायचा. तो एक पट्टीचा ट्रेकर होता. वर्षातून दोनदा तरी तो विविध ठिकाणी ट्रेकिंगला जात असे. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या आधीन राहून स्वतः मधील शारीरिक आणि मानसिक क्षमता पडताळणे आणि स्वतःला नवनवीन चॅलेंज देऊन ते पूर्ण करताना मिळणारे थ्रिल अनुभवणे त्याला फार आवडायचे.
आणि त्यामुळेच त्याच्या घरच्यांना म्हणजेच आई-वडील आणि मोठा भाऊ यांना त्याची काळजी वाटायची.
संयमचे एकदा लग्न झाले. अंगावर जबाबदारी पडली की त्याच्या या उनाडक्या बंद होतील असे त्यांना वाटायचे म्हणून त्याच्या आईने त्याच्या मागे लग्न कर म्हणून भुणभुण लावली होती.
संयम मात्र त्यांना टाळत होता कारण त्याचा जीव तर मैथिलीवर जडला होता.
संयम आणि केतन घरी आले, फ्रेश झाले.
केतनने दोघांसाठी कॉफी केली.
तोपर्यंत संयमच्या आईचा फोन आला.
संयमने कॉफी मग घेत गॅलरी गाठली. त्याची ती फेव्हरेट जागा होती कारण त्यांचा फ्लॅट सिटीच्या आउट साईडला असल्याने त्यांच्या फ्लॅटच्या दहाव्या मजल्यावरील गॅलरीतून डोंगर आणि हिरवीगार शेते दिसायची आणि संयम गॅलरीतल्या झोपाळ्यावर बसून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा.
संयम,“बोल आई?” तो वाफाळलेला कॉफीचा एक सीप घेऊन म्हणाला.
आई, “आलास ऑफिसमधून? बिचाऱ्या केतूने दिली असेल गरगरम कॉफी करून. साहेब लगेच बसले असतील त्यांच्या आवडत्या गॅलरीत झोपाळ्यात डोंगर, झाडी बघत.” त्या म्हणाल्या आणि संयम मोठ्याने हसला.
संयम – “तुझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार ना मला?”
आई- “संया किती दिवस असा सडा राहणार तू? तिशी ओलांडली तुझी! लग्न कर बाबा आता. तुझ्या मोठ्या भावाला दोन मुलं झाली की लोक आम्हाला विचारतात लग्न कधी करणार लेकाच म्हणून?
त्यात तुझा तो जीवाशी खेळणारा छंद ट्रेकिंग का फेकिंग ते! उंच उंच डोंगरावर चढयला जातोस. तू परत येईपर्यंत आमचा जीव थाऱ्यावर नसतो. तुझं लग्न झालं की मग तुझीही असली थेरं बंद होतील.
मी मुलगी पाहू का म्हणलं तर नको म्हणतोस आणि स्वतः पण नाही सांगत कोणी गर्लफ्रेंड का काय ते हाय का?
असेल तर सांग लगेच बार उडवून देऊ.” त्यांच्या तोंडाचा पट्टा सुसाट सुटला होता.
संयमला त्याची सवय होती.
संयम- “काय गं आई मी इतका लांब राहतो घरापासून, मला कसा आहेस विचारायचं सोडून नुसतं लेक्चर देत असतेस! आणि ट्रेकिंग माझं पॅशन आहे. मला तर ट्रेकिंग गाईड बनायचं होतं पण बाबांनी नाही ऐकलं माझं म्हणून मग बसलो आहे कारकुनी करत टूर आणि ट्रॅव्हल कंपनीमध्ये.
वर्षातून एकदा जातो मी ट्रेकिंगला तरी तुमच्या पोटात दुखतं. आणि लग्न मला एवढ्यात नाही करायचं. जरा थांब कोणी आवडली तर सांगेन की तुला.” तो कॉफी संपवत म्हणाला.
आई- “गाढवा आत्ता नाही करायचे लग्न तर म्हातारा झाल्यावर करणार का?” त्या वैतागून म्हणाल्या.
संयम,-“प्लिज आई नको ना तीच कॅसेट पुन्हा पुन्हा! बरं दादा, वहिनी आणि बाबा कसे आहेत आणि आपली दोन माकडं कशी आहेत?” तो विषय बदलत म्हणाला.
“ताता माकल म्हणायचं नाय!” तिकडून त्याची पाच वर्षांची पुतणी रागात बोबडे बोलत म्हणाली
संयम-“हो गं नाकटे आधी नीट बोलायला शिक!” तो हसून म्हणाला.
आई- “निधी (पुतणी) रुसली आहे तुझ्यावर तू आला नाहीस बरेच दिवस झाले म्हणून आणि लग्नाचे मनावर घे बाबा!
आम्ही पिकलं पान…” त्या पुढे बोलणार तर संयमने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि तो म्हणाला, “म्हातारे उगीच आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस हा.”
आई-“म्हातारे कोणाला म्हणतो रे माकडा म्हातारा तू, तुझा बाप!” चिडून म्हणाल्या आणि संयम हसला.
संयम- “माझा बाप म्हातारा म्हणल्यावर तू पण म्हातारी! बरं मी ठेवतो आता काम आहे मला.” म्हणाला आणि फोन ठेवला.
तर त्याच्या मागे केतन येऊन उभा होता.
केतन- “संया काकू बरोबर बोलत आहेत कर बाबा लग्न तू! माझं पण ठरलंच आहे की लग्न, त्या जाधव मॅडम तुझ्या आवाक्यात नाहीत.” तो त्याला समजावत म्हणाला.
संयम- “तू असं नको बोलत जाऊ केत्या. मला प्रयत्न तर करू दे एकदा. आयुष्यभर मलाही खंत घेऊन जगायचे नाही की मी तिला माझ्या मनातले सांगितले नाही.
तिला सांगितले तर कदाचित ती नाही म्हणेलही पण मला कमीत कमी समाधान असेल की मी माझे प्रेम व्यक्त केले.” तो गंभीर होत म्हणाला.
केतन- “बरं बाबा इतका सिरीयस नको होऊ आता.” हसून म्हणाला.
दोघांचे मेसचे डबे आले आणि दोघे जेवून झोपायला गेले.
आज संयमच्या मात्र डोळ्यात झोप उतरत नव्हती. तो जागाच होता.
राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर मैथिलीचा चेहरा येत होता.
त्याला का कोण जाणे पण मैथिलीच्या डोळ्यात त्याच्याबद्दल काहीतरी दिसायचं.
तो त्याचा भ्रम होता की खरं हे मात्र त्याला कळत नव्हतं.
‛मैथिली मॅडम तुमच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल काहीतरी पाहिले आहे. ते खरं आहे की माझा भ्रम माहीत नाही पण मी तुम्हाला कशा नजरेने पाहतो हे तरी तुम्हांला कळत असेलच ना. तुम्ही जाणून बुजून माझ्याकडे दुर्लक्ष करता का? खरंच खूप प्रश्न आहेत पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला लवकरच मिळतील.
पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीची Anniversary आहे आणि त्या निमित्त पार्टीही. मी त्या दिवशी तुम्हाला प्रपोज करेन मग परिणाम काहीही होवो. तुम्ही नाही किंवा होय काहीतरी नक्कीच उत्तर द्याल.
पण एक गोष्ट नक्की! मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही माझी सहचारिणी म्हणून विचारच करू शकत नाही. तुम्ही नाही म्हणालात तर मी पुन्हा प्रेम आणि लग्नाचा विचार करू शकेन की नाही माहीत नाही.
पण माझ्या मनातल्या तुमच्या विषयीच्या भावना मात्र नक्कीच सांगितल्या याचे समाधान असेल मला!’
तो तिच्या विचारातच कधीतरी रात्री झोपेच्या आधीन गेला.
संयमचे उत्कट प्रेम मैथिलीवर होते आणि तो ते व्यक्तही करू पाहत होता पण मैथिलीच्या मनात नेमके त्याच्याबद्दल काय होते?
तो म्हणतो तसे तिला खरंच त्याच्या भावना कळत असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती का? की त्याच्या डोळ्यातले भाव तिला समजलेच नव्हते?
मैथिली संयमने त्याचे तिच्यावरचे प्रेम व्यक्त केल्यावर कशी रिअॅक्ट होणार होती?
ती संयमचे प्रेम स्वीकारेल की नाकारेल?
प्रश्न आणि फक्त प्रश्न तुम्हालाही पडले आहेत ना? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधू पुढच्या भागात!
क्रमशः… भाग ३ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.