ना उम्र की सीमा हो ( भाग 3)

भाग २ इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
आठवडाभर संयमच्या मनात नुसते मैथिलीला कसे प्रपोज करायचे वगैरे विचार घोळत होते.
या सगळ्यांपासून अनभिज्ञ  मैथिली पार्टीच्या व्यवस्थापनात व्यग्र होती कारण पुण्यातील त्यांची मेन ब्रँच होती आणि बाकी पुणे आणि आसपासच्या ब्रँचमधील स्टाफ आणि क्लायंट येणार होते.
पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मैथिली कंपनीतर्फे होस्ट होती.

 हा हा म्हणता पार्टीचा दिवस उजाडला.
पार्टी संध्याकाळी होती त्यामुळे आज मैथिली स्वतः बरोबर संयम, केतन, मेधा आणि आणखीन दोन स्टाफ मेंबर्सना घेऊन हॉटेलमध्ये अरेंजमेंट पाहत होती.
मेधा म्हणजेच संयमची कलीग देखील होती. तिला संयम आवडायचा पण संयमने तिला कधीच भाव दिला नव्हता.
आज देखील ती संयमशी लगड करण्याचा प्रयत्न करत होती पण संयम मात्र तिच्यापासून लांब पळत होता. हे सगळं मैथिलीच्या नजरेतून सुटले नव्हते. संयमला असं पळताना पाहून ती गालात हसत होती.

शेवटी सगळी व्यवस्था झाली आणि तीन वाजता सगळे घरी निघून गेले.
बरोबर सहा वाजता ठरल्याप्रमाणे संयम आणि केतन तयार होऊन हॉटेलवर जाण्यासाठी निघाले.
संयमने लाईट ब्ल्यू शर्ट त्यावर नेव्ही ब्ल्यू ब्लेझर आणि ट्राऊझर घातली होती. तो कातील दिसत होता.
केतनने त्याला पाहिले आणि म्हणाला, “हाय हाय आज तो कितने क़त्ल होंगे! ती मेधा तर आज तुझ्यावर अजूनच लट्टू होणार बाबा.” तो त्याला डोळा मारत म्हणाला.

संयम- “गप रे! त्या मेधाचं नाव नको घेऊ. एकतर आज तिने मला पिडलं आहे. त्यातून मला टेन्शन आलं आहे की मैथिली काय उत्तर देईल आणि बाय द वे माझा गोलुमोलू पण आज खूप क्युट दिसत आहे. जुईला फोटो पाठवला का?” तो केतनचे गाल ओढत हसून म्हणाला.
केतन- “टेन्शन नको घेऊ रे ती मैथिली होय म्हणेल नाहीतर नाय! त्यात इतकं काय?” तो म्हणाला आणि दोघे हॉटेलमध्ये पोहोचले.
तर समोर पाहुण्यांचे स्वागत करत असलेली मैथिली दिसली.

लोअर नेकचा दुधी कलरचा पायघोळ  वनपीस तिने घातला होता.केसांचा फ्रेंच रोल, गळ्यात नाजूक डायमंड नेकलेस, कानात त्याला मॅचिंग टॉप्स आणि एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात नाजूक डायलचे घड्याळ, लाईट मेकअप आणि हसून बोलताना गालावर पडणारी ती खळी! संयम तर तिला पाहून घायाळ झाला.
तो तिला भान हरपून नखशिखांत न्याहाळत होता.
तोच तिच्याच बोलण्याने त्याची तंद्री भंगली.

मैथिली – “बरं झालं तुम्ही दोघे आलात. संयम तिथे क्लायंट आहेत बघ आपले नेहमीचे तू आणि केतन त्यांना अटेंड करा जा.” ती म्हणाली आणि निघूनही गेली.
संयम- “कसली सुंदर दिसत होती रे ती!” तो आपल्याच धुंदीत म्हणाला.
केतन- “हो ती सुंदर दिसत होती पण तिने तुला साधं नोटीसही केलं नाही संया! अजूनही वेळ आहे सावर स्वतःला. चला गेस्ट अटेंड करूयात.” तो त्याचा हात धरून त्याला जवळजवळ ओढतच नेत म्हणाला.

मेधा तर संयमला पाहून पुरती फ्लॅट झाली होती. ती संयमच्या मागे मागे फिरत होती पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्याचं तर सगळं लक्ष मैथिलीकडे होतं.
पार्टी छान पार पडली आणि संयमचे हृदय धडधडू लागले कारण पार्टीत काही राडा व्हायला नको म्हणून त्याने पार्टी संपल्यावर मैथिलीला घरी जाताना प्रपोज करायचे ठरवले होते.
मैथिली मागचं सगळं पाहत होती. रात्रीचे अकरा वाजले होते आणि जवळ जवळ सगळे लोक निघून गेले होते.

मैथिली, संयम, केतन आणि  मेधा मागे राहिले होते. 
मैथिली घरी जायला निघाली आणि संयमने तिला अडवले.
संयम – “मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” धीर एकवटून म्हणाला.
मैथिली- “हा बोला ना!” ती पार्किंगच्या दिशेने जात बोलत होती.
संयम- “मॅडम इथे नाही. आपण तिथे गार्डनमध्ये जाऊन बोलूया?” त्याने विचारले.

मैथिली- “बरं चला!” ती थोडी वैतागून म्हणाली.
दोघेही हॉटेलमध्ये असणाऱ्या गार्डन एरियामध्ये गेले. केतन संयमची वाट पाहत पार्किंगमध्ये थांबला. त्याला संयमची काळजी वाटत होती कारण जर मैथिलीने नकार दिला तर तो कसा रिअँक्ट होईल? तो स्वतःला सांभाळू शकेल का? असा प्रश्न केतनला पडला होता म्हणून तो थांबला होता.
तर मेधाही तिथेच थबकली.

संयम मैथिलीला गार्डनमध्ये का घेऊन गेला असेल? म्हणून ती त्यांच्या न कळत त्यांचे बोलणे ऐकू येईल अशा अंतरावर एका झाडामागे लपली.
मैथिली आणि संयम दोघेही एका बेंचजवळ उभे राहिले आणि मैथिली म्हणाली ,“हा बोला काय बोलायचे आहे. आधीच खूप उशीर झाला आहे आपल्याला निघायला.” ती मनगटी घड्याळ पाहत बोलत होती 
संयम मात्र मनातल्या मनात शब्दांची जुळवा जुळव करत होता पण त्याला नाही म्हणाले तरी भीती वाटत होती.

त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याने आवंढा गिळला आणि ती घसा खाकरत बोलू लागला ,“मॅडम मला असं म्हणायचं होतं की…. माझं… ते मी!” तो अडखळत होता आणि मैथिली आता जाम वैतागली.
मैथिली- “काय आहे मिस्टर दरेकर मला, माझं, मी? हे बघा काय ते स्पष्ट बोला माझ्याकडे वेळ नाही एकतर मला खूप थकवा आला आहे.” ती मानेला हात लावून बोलत होती.
संयम- “मॅडम माझं ते मला म्हणायचं होत की माझं…” तो पुन्हा ततपप करत होता त्याचे शब्द जणू घशातच अडकले होते. आता मात्र मैथिली भडकली.

मैथिली-“व्हॉट द हेल इज दॅट? काय माझं माझं? मी निघते आता” ती रागाने म्हणाली आणि खरंच त्याच्याकडे पाठ करून निघून जाऊ लागली.
संयमने डोळे बंद केले आणि पाठमोऱ्या तिला म्हणाला ,“मॅडम माझं तुमच्यावर प्रेम आहे. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.” तो ओरडला आणि मैथिली तिथेच थबकली.
तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती त्याच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली आणि त्याला विचारले.

मैथिली- “व्हॉट डिड यु से?” ती त्याला रोखून पाहत विचारत होती. संयमने डोळे उघडले आणि तो उसन अवसान आणत म्हणाला.
संयम-“आय लव्ह यू! अँड आय व्हॉन्ट टू मॅरी विथ यू!” तो आता धाडसाने  मन घट्ट करून म्हणाला.
मैथिली- “आर यू आउट ऑफ युवर माईंड? माझ्याबद्दल काय माहीत आहे रे तुला? माझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करायचे आहे म्हणे!” तिने रागानेच विचारले.
संयम- “तुम्ही मनाने सुंदर आहात! प्रामाणिक आहात आणि कणखर आहात ही माहिती  माझ्यासाठी खूप आहे तुमच्यावर प्रेम करायला आणि तुमच्याशी लग्न करायला. बाकी तुमच्या भूतकाळाशी मला देणे घेणे नाही.” तो ठामपणे म्हणाला.

मैथिली- “हे प्रेम नाही तर आकर्षण आहे. आज माझ्याबद्दल वाटते उद्या दुसऱ्या कोणाबद्दल वाटेल. आजकालच्या तुमच्या सारख्या मुलांना सगळा खेळच वाटतो.” ती पुन्हा तणतणली.
संयम- “आकर्षण आणि प्रेम न कळायला मी काही पंधरा सोळा वर्षांचा नाही. तीस वर्षांचा मॅच्युअर पुरुष आहे.” तो शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
मैथिली- “ठीक आहे तर माझं उत्तर ऐक आय एम नॉट इंटरेस्टेड! माझं प्रेम वैगरे नाही तुझ्यावर!” असं म्हणून ती तरातरा निघून गेली.

संयम मात्र तिथेच उभा होता. मैथिली बोलत असताना त्याचे लक्ष तिच्या डोळ्यांकडे आणि तिच्या हावभावांकडे होते.
तिचे डोळे आणि चेहरा तिच्या ओठांना साथ देत नव्हता. तिचे ओठ जे बोलत होते तेच तिच्या डोळ्यात मात्र संयमला दिसत नव्हते.
तो हताश होऊन तिथेच उभा होता.
मेधा मात्र ते सगळं पाहून आणि ऐकून भलतीच खुश होती कारण तिचा संयमपर्यंत पोहोचण्याचा सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला होता.
संयमला तसे उभे पाहून केतन तिथे आला आणि संयमला घेऊन गेला.

तिचे ओठ बोलत होते खोटं
डोळ्यांनी गुपित उलगडलं होतं
पण फिरवताना पाठ तिने
तिच्या डोळ्यांनी मला छळलं होतं
संयमच्या मनाची अवस्था काहीशी अशी झाली होती.
संयम आणि मैथिलीची प्रेमकथा इथेच संपली होती की अजून बरच काही बाकी होतं? पाहू पुढच्या भागात!
क्रमशः… 
भाग 4 इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!