ना उम्र की सीमा हो ( भाग 4 )

भाग 3 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
मैथिली मात्र रडतच गाडीत जाऊन बसली होती. तिने डोळे पुसत ड्रायव्हरला घरी चल म्हणून सांगितले.
ती संयमच्या आज प्रपोज करण्यामुळे खूपच अस्वस्थ होती.
जणू तिने खूप दिवसापासून मनाच्या खोल डोहात लपवून ठेवलेल्या भावना आणि तिचा भूतकाळ आज ढवळला गेला होता मनाचा गूढ डोह आज गढूळ झाला होता. त्यात असणारे आठवणींचे दगड गोटे आणि राड पुन्हा उभाळून वर आली होती. ती रस्ताभर फक्त मुसमुसत होती.

ती लिफ्टने तिच्या फोर बी.एच.के. आलिशान आणि सुनंदा फ्लॅटचे लॉक उघडून आत शिरली आणि तिने स्वतःला बेडवर झोकून दिले. तिला कपडे बदलण्याचे देखील भान नव्हते.
जणू काही तिच्या कोणत्या तरी जुनाट जखमेवरची खपली कोणीतरी निर्दयीपणे काढली होती आणि ती जखम पुन्हा रक्तबंबाळ होऊन वाहत होती.
रडत रडत तिच्याही नकळत ती तिच्या भूतकाळात पोहोचली होती.

चौदा वर्षांपूर्वी…
मैथिलीचे बाबा नुकतेच बाहेरून आले होते. ते आज गहन विचारात मग्न होते. मैथिलीच्या आईने त्यांना चहा आणून दिला पण चहा थंड होऊन गेला तरी त्यांचे लक्ष त्याकडे नव्हते.
त्यांना असं विचारत पडलेलं पाहून मैथिलीची आई पोर्चमध्ये त्यांच्याजवळ येऊन बसली आणि त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, “काय झालं आहे आज? कामावरून आल्यावर सुबोध भाऊंजीकडे गेला होतात ना? कसे आहेत ते? आत्ता तर त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. घरीही सोडलं आहे की त्यांना हॉस्पिटलमधून, बरे आहेत ना ते?” त्या काळजीने विचारत होत्या. तिच्या बोलण्याने  ते भानावर आले.

बाबा-“हो म्हणजे सुबोध तसा बरा आहे पण त्याची बायपास करावी लागू शकते असे वहिनी सांगत होत्या. त्याच्या हार्टमध्ये असलेले ब्लॉकेज अँजिओप्लास्टीमध्ये पूर्ण निघाले नाहीत आणि बायपास म्हणजे जीवाशी खेळ त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आहेत.” ते सांगत होते.
आई- “म्हणून तुम्ही काळजीत आहात का? शेवटी तुमचे जिवलग मित्र आहेत ते, त्याने अनेक वेळा आपल्या अडी अडचणीत आपल्याला मदत केली आहे.
त्याच घर तसं गडगंज आहे पण आपली परिस्थिती आत्ता काही वर्षात सुधारली.
तुम्हाला मित्राविषयी वाईट वाटणे साहजिक आहे. पण आपण काही करू शकतो का? आलिया भोगासी…. त्या परमेश्वरावर सगळं सोपवून मोकळं व्हायचं.” ती त्यांना समजावत होती.

बाबा- “गोष्ट इतकीच नाही वसू! सुबोधलाही माहीत आहे की त्याचं आता खरं नाही. पण त्याने मला एक इच्छा बोलून दाखवली आहे; त्याची शेवटची इच्छा म्हणून त्याचाच टेन्शन आले आहे मला.” ते विचारमग्न होऊन बोलत होते.
आई – “काय इच्छा आहे त्यांची?” तिने विचारले.
बाबा- “त्याने त्याच्या धाकटा मुलगा नितेशसाठी आपल्या मैथिलीचा हात मागितला आहे.” ते उसासा टाकत म्हणाले.
आई- “नितेश म्हणजे तोच का जो बरीच वर्षे झाले त्याच्या मामाकडे म्हणजे नाशिकला असतो?”

बाबा-“हो तोच!” 
आई- “मग तुम्ही काय म्हणालात?”
बाबा-“विचार करून सांगतो. पण मला काय इतक्यात मैथिलीचे लग्न करायचे नाही ती अजून एकवीस वर्षाचीसुद्धा नाही. तिला शिकायचे आहे अजून आत्ता तर ती बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
आपण सुबोधच्या उपकराखाली असलो तरी त्याचा भार मला मैथिलीवर टाकायचा नाही.” ते उदास होत म्हणाले.

आई- “तुम्ही असा का विचार करत आहात? मैथिली कितीही शिकली तरी तिचे लग्न आज नाही तर उद्या आपल्याला करावेच लागणार आहे.
त्यात सुबोध भाऊजी आणि त्यांचे कुटुंब आपले चिरपरिचित आहे. चांगली माणसं आहेत. वडिलोपार्जित कपड्याची दोन दुकाने आहेत. मोठा मुलगा रमेश आत्ता सगळं सांभाळतो पण पुढे नितेशला एक दुकान मिळणारच की तो इथे आल्यावर शिवाय गावाकडे बागायती शेती आहे.
इतकं गडगंज स्थळ चालून आले आपल्या मैथिलीला! तसेही आता आपल्या विघ्नेशचे लग्न झाले आहे दोन वर्षांपूर्वी, मैथिली चांगल्या घरात पडली की आपली जबाबदारी संपली.

आपला काय भरवसा सुबोध भाऊंजी सारखा सुदृढ माणूस अचानक हार्ट अटॅक आला आणि पाहताय ना काय अवस्था झाली त्यांची! आपण या स्थळाचा विचार करायला हवा.” ती त्यांना समजावत होती.
बाबा- “तुझं सगळं बरोबर आहे वसू पण आपण राहतो इथे सोलापूरमध्ये तो नितेश लहानाचा मोठा झाला त्याच्या मामाकडे नाशिकला. त्याचा स्वभाव कसा आहे? त्याला व्यसन वगैरे तर नाही ना? याची चौकशी आपण कशी आणि कुठे करणार आणि मैथिलीचे काय? तिला इतक्यात लग्न करायचे नसेल तर?” ते गंभीरपणे म्हणाले.

तोपर्यंत अकाउंटच्या क्लासवरून  मैथिली आली ती तिच्या बाबांच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.
मैथिली-“काय बोलणं सुरू आहे माझ्याबद्दल?”
बाबा- “काही नाही मैथु. जा तू फ्रेश होऊन ये मस्त फक्कड चहा घेऊ तुझ्या आईच्या हातचा संध्याकाळच्या जेवणाला अजून वेळ आहे.” ते कसंनुसं हसून तिला म्हणाले आणि मैथिली निघून गेली.
आई- “सुबोध भाऊजींचा मुलगा आहे म्हणजे चांगलाच असणार हो! आपण रमेशला पाहत नाही का? सुपारीचे पण व्यसन नाही त्याला.” ती त्यांची समजूत काढत म्हणाली आणि आत निघून गेली.

विघ्नेशची बायको म्हणजे सरितानेही दोघांचे बोलणे आतून ऐकले होते. आईने चहा करून दिला आणि मैथिली अभ्यासाला निघून गेली. दोघी सासू सुना स्वयंपाक करत होत्या. तेव्हा हळूच सरिताने विषय काढला.
सरिता-“आई तुमचे आणि बाबांचे बोलणे मी मघाशी चुकून ऐकले. मैथिलीताईंना सुबोध काकांनी मागणी घातली आहे त्यांच्या मुलासाठी स्थळ तसं चांगलं आणि गडगंज आहे.” ती म्हणाली.
आई- “हो माझंही तेच मत आहे पण हे कसे आहेत माहीत आहे ना तुला! काय करतील नेम नाही त्यात मैथु म्हणजे यांचा जीव की प्राण! ती नाही म्हणाली की झालं. हे देखील नाही म्हणून मोकळे होतील.” ती गंभीर होत बोलत होती.

सरिता- “बरोबर आहे आई तुमचं! माफ करा थोडं स्पष्टच बोलते. ताईंच्या सावळ्या रंगामुळे त्यांना पुन्हा इतकं चांगलं स्थळ मिळेलच असं नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की सगळ्यांना गोऱ्या मुलीच हव्या असतात.” ती घाबरत हळूच म्हणाली.
आई- “सरिता घरची सून आहेस तर मर्यादा ओळखून वाग. माझी मैथु सावळी असली तरी गोऱ्या मुली झक मारतील अशी दिसते.” त्या वर वर रागाने म्हणाल्या असल्या तरी त्यांना सरिताचे म्हणणे पटले होते.
आणि सरिता तरी मैथिलीची शत्रू थोडीच होती. तिचं आणि मैथिलीचं या दोन वर्षात चांगलंच गुलपीठ जमलं होतं. सरीतालाही मैथिलीचं चांगलाच व्हावं असं वाटत होतं आणि नितेशच स्थळ तिला आणि आईला सगळ्या बाजूने उत्तम वाटत होते.

मैथिली मात्र या सगळ्या घडामोडींपासून अनभिज्ञ तिच्या अभ्यासात मग्न होती.
पुढच्याच महिन्यात परीक्षा होती आणि तिला या वर्षी देखील फस्ट क्लास सोडायचा नव्हता त्यामुळे ती जीवतोडुन अभ्यास करत होती.
तिला पुढे जाऊन एम.बी.ए. करायचं होतं. त्यानंतर नोकरी मिळवायची होती. लग्न संसार या गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. 
तिची स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याची होती. आई-वडिलांनी केलेले कष्ट तिने समोर पाहिले होते. त्यांना तिला सुखाचे चार क्षण द्यायचे होते.

 पण नियती मात्र आपल्या स्वप्नांचा चुराडा करायला कायम सज्ज असते. आपण काही ठरवत असतो तेव्हा ती दात विचकत हसत असते आणि आपल्याला त्याची कल्पना देखील नसते.
सध्या मैथिलीच्या बाबतीत देखील हेच होत होते.
ती तिची स्वप्न रंगवण्यात दंग होती आणि नियती तिच्याकडे पाहून विकट हास्य करत होती.

तिला कुठे माहीत होते पुढे जाऊन ही क्रूर नियती तिच्या स्वप्नांच्याच नाही तर तिच्या नाजूक भाव-भावनांचाही खून करणार आहे.
भविष्यात असं काही तिची वाट पाहत होतं ज्याची तिने आणि तिच्या घरच्यांनी देखील कधी कल्पना केली नव्हती.
असं काय घडणार होतं मैथिलीच्या बाबतीत की तिची स्वप्ने आणि तिच्या भावना दोन्हींचा खून होणार होता? पाहू पुढच्या भागात!
क्रमशः… भाग ५ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!