©स्वामिनी चौगुले
मैथिली सकाळी उठली. तिचं आवरून तिला देवघरात जायची सवय होती. तिला तिच्या आईला देवपूजेत मदत करायला खूप आवडायचे.
कधी फुले घेऊन ये, तर कधी सहाणेवर चंदन उगाळून दे, तर कधी हार तयार कर. ती ही छोटी मोठी कामे करायची. तिला मात्र सगळ्यात जास्त कोणता देव आवडायचा तर तो म्हणजे लड्डू गोपाल म्हणजेच श्रीकृष्ण!
हे तिचे लाडके दैवत होते. असेच आजही ती आईला चंदन उगाळून देत होती आणि तिच्या आईने पूजा करता करता विषय काढला.
आई -“मैथु तुझ्याशी मला थोडं बोलायचं होतं.” त्या म्हणाल्या.
मैथिली- “बोल ना आई मग! इतका विचार कशाला करतेस?” ती म्हणाली.
आई- “तुला सुबोध काका माहीत आहेत ना त्यांची अँजिओप्लास्टी झाली पण आता बायपास करायला सांगितली आहे. बाबा गेले होते त्यांना काल भेटायला.” त्या म्हणाल्या.
मैथिली- “ओह! म्हणून बाबा अपसेट आहेत का?” तिने विचारले.
आई-“ते तर कारण आहेच पण आणखीन एक कारण आहे. सुबोध भाऊजींनी तुला मागणी घातली आहे त्यांच्या लहान मुलासाठी. त्यांची शेवटची इच्छा आहे म्हणे ही. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत मैथु त्यामुळे बाबा विचारात पडले आहेत.
पण निर्णय तुझा असेल असं म्हणत होते. तू नाही म्हणालीस तर ते नकार देतील सुबोध भाऊजींना पण आयुष्यभर त्यांना खंत राहील की ते त्यांच्या जिवलग मित्राची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत.
स्थळ तसं श्रीमंत आहे, माणसं चांगली आहेत. आपल्या पाहण्यातलं आहे सगळं. तू जर त्या घरात पडलीस तर सुखी होशील पोरी.
यातून दोन गोष्टी साध्य होतील; एक तुझ्या बाबांना त्यांच्या मित्रासाठी ते काहीतरी करू शकल्याचं समाधान मिळेल आणि आम्हालाही तुझी चिंता राहणार नाही.
बघ विचार कर. बाबा तुला विचारणारच आहेत पण मी तुला आधीच कल्पना देऊन ठेवली.” त्या तिला समजावत बोलत होत्या.
त्यांचं बोलणं ऐकून मैथिलीने होकारार्थी मान हलवली पण ती विचारत पडली होती. एका बाजूला तिची स्वप्ने होती तर दुसऱ्या बाजूला तिचे बाबा आणि त्यांची मैत्री होती. ती स्वप्नांच्या मागे धावली तर बाबांना आणि त्यांच्या जिवलग मित्राला दुःख होणार होते पण तिने जर लग्न करण्यासाठी होकार दिला तर तिला तिच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागणार होती.
तिच्या स्वप्नांपेक्षा बाबा आणि त्यांच्या मैत्रीचे पारडे जड निघाले. तिने मन घट्ट करून लग्नासाठी होकार द्यायचे ठरवले.
तिच्या बाबांनी तिला विचारले आणि तिने तात्काळ होकार दिला. बाबा सुबोधरावांना होकार कळवून आले आणि आठच दिवसात नितेश सोलापूरला आला.
पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्नाची सुपारी फुटली. पुढच्या पंधरा दिवसात लग्न झाले कारण पुढच्या महिन्यात सुबोधरावांची बायपास सर्जरी होणार होती.
मैथिलीने तिची सप्त रंगी स्वप्ने उराशी बाळगून तिच्या वैवाहिक आयुष्यात पदार्पण केले.
नितेश तसा चांगला होता. त्याला मैथिली पहिल्याच नजरेत आवडली होती. तोही सावळ्या रंगाचा पण दिसायला आकर्षक होता. दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरू झाले आणि मैथिलीला कळले की नितेशला दारूचे व्यसन आहे. त्याबाबत तिने त्याच्याशी बोलायचे ठरवले.
नितेश आजही नेहमीप्रमाणे दुकानातून येताना दारू पिऊन आला होता.
मैथिलीने त्याला जेवायला वाढले आणि ती बोलू लागली.
मैथिली- “अहो तुम्ही आजही पिऊन आलात? उद्या बाबांची सर्जरी आहे. तुम्ही प्लिज हे व्यसन सोडा बरं हे तुमच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे.” ती त्याला समजावत होती.
नितेश-“ए तू मला नाही शिकायचं हा. बाबांची सर्जरी डॉक्टर करणार आहेत तीही उद्या मी नाही करणार आणि मी दारू लिमिटमध्ये पितो. तुला कधी त्रास दिला का मी पिऊन?
आणि हो मी पीत असलो तरी तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. माझी कर्तव्य मी नीट पार पाडेन.” तो रागाने म्हणाला आणि निघून गेला.
मैथिलीला मात्र त्याला कसे समजवावे हेच कळत नव्हते.
सुबोधरावांची सर्जरी झाली पण ते उठलेच नाहीत.
ते कोमात गेले आणि आठच दिवसात जगातून निघून गेले.
सगळ्यांना माहीत होते की त्यांची वाचण्याची शक्यता कमी आहे पण मैथिलीच्या जावेने तिच्या सासूच्या मनात मैथिलीचा पायगुण चांगला नाही, तिचा पायगुण चांगला असता तर सुबोधराव वाचले असते असे भरवले पण तिच्या सासूने जावेच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले.
सगळं सुरळीत सुरू होते. नितेश मात्र रोज रात्री पिऊन यायचा.
मैथिलीने हे तिच्या माहेरी सांगितले नाही. या सगळ्यात मात्र मैथिली तिच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ शकली नाही.
तिच्या लग्नाला सहा महिने होत आले होते. पावसाळ्याचे दिवस होते. असाही रविवारच होता त्यामुळे दुकानाला आज सुट्टी होती. नितेशने त्याच्या मित्रांबरोबर वर्षा पर्यटनाचा प्लॅन केला.
त्याचे चार-पाच मित्र आणि तो बाईकवर जाणार होते.
मैथिलीने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.
सगळे मित्र मिळून जवळच्याच एका धबधब्यावर गेले. तिथे मनसोक्त उंडारले.
संध्याकाळी घरी येताना एका धाब्यावर जेवून मनसोक्त दारू ढोसली.
दारू पिऊन नितेश गाडी चालवत होता.
नशेत असल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला त्याला नीट क्रॉस करता आले नाही आणि तो ट्रकला धकला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गेला.
ही माहिती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा घरात शोककळा पसरली. मैथिली तर हे ऐकून स्तब्ध झाली.
तिच्या जावेने या दुर्घटनेचा फायदा घेऊन मैथिली अपशकुनी आहे, ती पांढऱ्या पायाची आहे हे तिच्या सासूच्या आणि दिराच्या मनावर बिंबवले.
नितेशचे प्रेत आले आणि मैथिलीची सासु बिथरली.
मैथिलीच्या आई, वडील, भाऊ, वहिनी सगळ्यासमोर तिच्या हाताला धरून घराबाहेर काढत म्हणाल्या.
सासूबाई -“निघ माझ्या घरातून अवदसे! लग्न करून घरात आली आणि माझ्या कुंकवाला गिळलं आणि आता माझ्या लेकाला गिळलं. कोणत्या मुहूर्तावर तुझा हात यांनी मागितला काय माहीत! पांढऱ्या पायाची अवदसा आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून!” त्या रागाने मैथिलीला ढकलून देत ओरडत होत्या.
मैथिली मात्र सुन्न होती. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते.
मैथिलीच्या घरचे गप्प बसले कारण ती वेळ नव्हती काही बोलायची.
प्रेताचे अंत्यसंस्कार झाले आणि तिचे बाबा तिला घरी घरून आले. तीन दिवस होऊन गेले तरी मैथिली ना काही खात होती ना कोणाशी बोलत होती तिच्या कानात फक्त पांढऱ्या पायाची अवदसा माझ्या लेकाला गिळले हे शब्द घुमत होते.
तिचे बाबा मात्र गप्प बसणाऱ्यातले नव्हते. अपघात कसा आणि का झाला असावा म्हणून ते सरकारी दवाखान्यात नितेशचे पोस्टमार्टेम रिपोर्ट आणायला गेले.
त्यांच्या ओळखीमुळे आणि नितेश त्यांचा जावई असल्याने त्यांना ते लगेच मिळाले. ते वाचून त्याला धक्काच बसला.
ते तडक घरी गेले आणि मैथिलीचा हात धरून तिला तिच्या सासरी घेऊन गेले.
बाबा,“वहिनी वहिनी….” म्हणून जोरात ओरडत होते.
त्यांच्या आवाजाने मैथिलीची सासू, दिर, भाऊ आणि आणखीन घरात असलेले जवळचे नातेवाईक बाहेर आले.
सासू,“कशाला घेऊन आला या अवदसेला इथे? हीचा या घराशी काही संबंध नाही. पांढऱ्या पायाची मेली! इथं राहिली तर माझ्या वंशाचा नाशच करेल.” त्या रागाने तणतणत होत्या.
बाबा,“बास! एक शब्द जरी माझ्या लेकीविषयी काढला ना आता तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल! माझी मुलगी पांढऱ्या पायाची नव्हती तर तुमचा मुलगा दळभद्री होता. मित्राचं घर म्हणून विश्वासाने मुलगी दिली मी आणि तुम्ही त्याच विश्वसाचा घात केलात.
तुमचा मुलगा दारू पित होता हे आमच्यापासून लपवले.
हा पोस्टमार्टेम रिपोर्ट दारू पिऊन नितेशने बाईक चालवली आणि त्याला ती कंट्रोल झाली नाही. अपघात झाला आणि तो गेला. माझ्या मैथुमुळे नाही तर त्याच्या मस्तीने तो गेला.
त्याच्या व्यसनामुळे तो गेला. तुम्ही काय बाहेर काढणार माझ्या मुलीला? तुमची लायकी नाही माझ्या मुलीला घरात ठेवून घ्यायची. चुकलं माझं भावनेच्याभरात चुकीचा निर्णय घेतला पण आता तो सुधारतो आहे.
तुम्ही काय संबंध तोडणार माझ्या मुलीशी मीच संबंध तोडतो तुमच्याशी!”
ते रागाने बोलत होते पण डोळ्यातून मात्र कढ वाहत होते. त्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट त्यांच्या तोंडावर मारला आणि मैथिलीच्या सासू आणि बाकी सगळे खजील झाले.
त्यांनी मैथिलीचा हात धरला आणि ते घरी निघून आले. मैथिली या आघाताने गुमसुम झाली होती. ती एखाद्या यंत्रासारखी सांगेल ते करायची. ती श्वास घेत होती फक्त जगत मात्र नव्हती.
नितेशवर तिचे मनापासून प्रेम होते आणि त्याचे देखील तिच्यावर प्रेम होते पण व्यसनाच्या आहारी जाऊन त्याने अकाली मृत्यू ओढवून घेतला होता.
पण तो एकटाच गेला नाही तर मैथिलीचे जगणे त्याच्याबरोबर घेऊन गेला होता.
मैथिलीचे बाबा मात्र लेकीची अशी अवस्था पाहून तीळतीळ तुटत होते. त्यांना सतत मैथिलीचे लग्न नितेशशी करून दिल्याचा पश्चा:त्ताप होत होता. तरी ते हार मानून हातपाय गाळून बसनाऱ्यातले मुळीच नव्हते.
पुढे मैथिली इतक्या उच्च पदापर्यंत कशी पोहोचली असेल?
मैथिली स्वतःला अपशकुनी मानत असेल का?
पाहूया पुढच्या भागात
क्रमशः… भाग ६ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.