ना उम्र की सीमा हो ( भाग 6 )

भाग 5 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
मैथिलीचे बाबा तिला घरी तर घेऊन आले पण ती तीन महिने झाले तरी त्याच स्थितीत होती. कोणी सांगेल ते आणि तितकेच काम करायची आणि शून्यात नजर लावून बसायची.
या सगळ्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता.
ती अनेक मोरपंखी स्वप्ने घेऊन नितेशच्या आयुष्यात गेली होती पण त्या सगळ्या स्वप्नांना सुरुंग लागला होता.
ती जिवंत तर होती पण जगत मात्र नव्हती सगळं यांत्रिक सुरू होत तिचं! 

ते पाहून तिचे बाबा मात्र स्वतःला तिच्या या अवस्थेला जबाबदार मानत होते. लेकीची अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती.
सतत आपण मैथिलीचे लग्न नितेशशी करून खूप मोठी चूक केली आणि त्याची शिक्षा मात्र आपली लेक भोगत आहे असे त्यांना वाटत होते. पण तिला या मनःस्थितीतुन बाहेर काढून जगण्याची नवीन उभारी देणे खूप गरजेचे होते.
त्या दिशेने सगळे प्रयत्न करून झाले होते. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणे. तिच्या आवडीचे  पदार्थ करणे.तिचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी चित्रपट पहायला नेणे. तिच्या मैत्रिणींना घरी बोलावणे पण मैथिलीमध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती.

तिचे वडील, आई, भाऊ आणि वहिनी सगळे हतबल झाले होते. तिच्या वडिलांचे मन आता सैरभैर झाले होते.
एक दिवस मैथिली अशीच शून्यात नजर लावून खिडकीत बसली होती. तिची आई तिथेच भाजी निवडत होती आणि वहिनी काही तरी काम करत होती. बाबा कामावरून आले आणि त्यांना मैथिली खिडकीत उदास  बसलेली दिसली आणि त्यांना गलबलून आले. ते स्वतःला रोखू शकले नाहीत.

ते तिच्याजवळ गेले आणि बोली लागले.
बाबा-“ मैथु तू तुझ्या बापाच्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा किती दिवस स्वतःला करून घेणार आहेस? मी तुझा अपराधी आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली.
माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुझ्या मात्र  आयुष्याची परवड झाली. तुझ्या या अपराधी बापाला तू कधी माफ करू शकशील का?” ते तिचा हात धरून रडत तिला बोलत होते.

मैथिलीने तिच्या बाबांना इतकं हतबल आणि रडताना कधीच पाहिलं नव्हतं. ती भावावर आली आणि म्हणाली.
मैथिली-“ बाबा तुमची काय चूक आहे यात? माझंच नशीब खराब होते. तुम्ही तर सगळं चांगलंच पाहून माझे लग्न केले होते कदाचित सासूबाई म्हणाल्या तेच खरं आहे मीच पांढऱ्या पायाची असेल म्हणून नितेश असे अचानक मला सोडून गेले माझ्याचमुळे कदाचित…” ती रडत बोलत होती आणि तिचे बाबा तिचे बोलणेमध्येच तोडत बोलू लागले.

बाबा-“खबरदार मैथु पुन्हा स्वतःला पांढऱ्या पायाची म्हणशील तर  या सगळ्यात तुझी चूक मुळीच नाही. नितेश त्याच्या मस्तीने गेला. खरं तर माझं चुकलं मी त्याची चौकशी खोलात जाऊन केली नाही आणि मैत्री खातर तुला व्यसनी माणसाच्या गळ्यात बांधले. तुझ्या बाबांसाठी एक करशील का?” त्यांनी विचारले.
मैथिली- “ बोला ना बाबा मी तुमच्यासाठी काही ही करेन.” ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली.
बाबा- “ तू तुझे अर्धवट  राहिलेले शिक्षण पुन्हा सुरू कर अशी घरात किती दिवस बसून राहणार बेटा? तुझे मन रमेल आणि मला तुला आता स्वतःच्या पायावर उभं राहिलेले पाहायचे आहे.” ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

मैथिली-“ पण मी पुन्हा कॉलेजला?” ती अडखळत म्हणाली.
आई- “ का नाही मैथु? तू पुन्हा शिकायला सुरुवात कर जे  झालं ते विसरणे शक्य नसले तरी मागे सोडून पुढे पाऊल टाक बेटा! स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी तरी!” त्या म्हणाल्या. हे सगळं आतून ऐकणारी तिची वहिनी बाहेर आली आणि म्हणाली.
वहिनी- “ ताई आई-बाबा बरोबर बोलत आहेत तुम्ही नव्याने तुमच्या आयुष्याचा विचार करा. पुन्हा नव्याने आयुष्याला उभारी द्या आणि शिक्षण हेच मध्यम आहे आत्ता तरी तुमच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा प्रवाहित करण्याचे!” ती तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली आणि मैथिलीने होकारार्थी मान हलवली.

त्यानंतर तिने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. या पंधरा वर्षात तिने खूप मोठी झेप घेतली होती.
तिने ग्रॅज्युएशन पूर्ण करून हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझममधून  एम. बी.ए. केले आणि गेल्या दहा वर्षांमध्ये ती या कंपनीत उच्च पदापर्यंत पोहोचली होती.
आज तिच्याजवळ पैसा, पत प्रतिष्ठा सगळं होतं. पण आयुष्यात ती एकटी होती.
तिच्या वडिलांनी आणि बाकी घरच्यांनी तिला दुसरे लग्न करण्यासाठी अनेक वेळा आडून आडून सुचवले होते पण ती तयार नव्हती लग्न करायला.

तिला भीती वाटायची की आधी नितेश जसा तिला सोडून गेला तसंच पुन्हा झालं तर? तिच्या मनात आपण पांढऱ्या पायाचे आहोत या विचाराने पक्के घर गेले होते.
आज संयमने तिला प्रपोज करण्याने तिचा पंधरा वर्षांपूर्वीचा सगळा जीवन काळ तिचा भूतकाळ  तिच्या डोळ्यासमोरून सरसर सरकून गेला. तिचा मोबाईल वाजला आणि तिची तंद्री भंग झाली.
★★★

इकडे संयम देखील अस्वस्थ होता. तो मैथिलीने त्याला नकार दिला म्हणून अस्वस्थ नव्हता तर तिचे डोळे तिच्या ओठांची साथ देत नव्हते म्हणून तो अस्वस्थ होता.
जसं काही ती जे बोलत होती ते ती मनापासून नाही तर कोणत्या तरी मजबुरीमुळे बोलत होती असे त्याला वाटत होते.
त्याला विचार मग्न पाहून केतन त्याच्याजवळ आला त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
केतन,“ किती वाजले आहेत पाहिले का संया? अरे चार वाजले आहेत पहाटेचे! तू रात्रभर जागाच होतास का? आरे ती मैथिली नाहीच म्हणणार म्हणून मी तुला किती वेळा सांगितले होते.

बरं आपण कोणावर जबरदस्ती करू शकतो का प्रेम करण्याची? तिचं नाही तुझ्यावर प्रेम तर ठीक आहे ना! स्वीकार ते आणि पुढे चल. असे रात्र रात्र जागून आणि विचार करून काय साध्य होणार आहे संया?” तो काळजीने त्याला समजावत होता.
संयम-,“ केत्या ती नाही म्हणाली म्हणून मी अपसेट नाही रे कारण मी माझ्या मनाची तयारी केली होती ती नाही म्हणाली तरी स्वतःला सावरण्याची! पण ती नुसतं ओठांनी नाही म्हणत होती मात्र तिचे डोळे मात्र काही वेगळेच बोलत होते. ओठांना डोळ्यांची साथ नव्हती रे! ती कोणत्या तरी मजबुरीमुळे मला नकार देत आहे असं वाटत होतं मला!” तो त्याच्याच विचारात बोलत होता.

केतन-“ अरे मैथिली आजकालची मुलगी आहे. उच्च पदावर नोकरी करते. स्वतंत्र विचारांची आहे ती, तिची काय मजबुरी असणार? काही नाही तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे! तू जितक्या लवकर तिच्या विचारातून बाहेर येशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे.” तो त्याला समजावत म्हणाला.
संयम-“ मला तुझी काळजी कळते आहे पण काही तरी आहे जे मैथिली अशी वागत आहे. मला शोधायला हवं. ती मला म्हणाली की माझ्याबद्दल तुला काय माहीत आहे? आता तिच्याबद्दल मला सगळे जाणून घ्यायचे आहे आणि ते मी नक्कीच जाणून  घेईन.” तो निश्चयाने बोलत होता.

केतन- “ इतकं सोप्पं आहे का ते संया? तिच्याबद्दल कोणालाच जास्त काही माहीत नाही. ना आपल्या ऑफिसमधील कोणाशी तिचे घनिष्ठ संबंध आहेत.” तो बोलत होता.
संयम- “ काही ना काही मार्ग निघेल रे तिच्याबद्दल जाणून घेण्याचा!” तो हसून म्हणाला.
★★★
आज संयम नेहमीप्रमाणे ऑफिसला आला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून काल काही तरी घडले असेल असे अजिबात वाटत नव्हते. मेधाला वाटले होते की काल घडलेल्या घटनेमुळे संयम अपसेट असेल पण त्याला पाहून असे काहीच वाटत नव्हते.

तो  बायोमेट्रीकवर थम करून त्याच्या डेस्कवर जाऊन बसला.
मैथिली त्याला केबीनमधून पाहत होती. तिला ही वाटले होते की संयम अपसेट होईल पण तसे काहीच घडले नव्हते. तो रोजच्या सारखा अगदी नॉर्मल होता ते पाहून तिची शीर तडतडली.
‛काल मला प्रपोज केले. मी नाही म्हणाले तर आज जणू काही घडलेच नाही असा वागतोय हा माणूस! काही नाही मैथिली याने तुझ्यावर ट्राय मारला आहे

पटली तर करिअरमध्ये ग्रो करता येईल इतका प्रॅक्टिकल विचार होता त्याचा या सगळ्यां मागे आणि आपण उगीच अपसेट झालो. मिस्टर संयम माझ्यावर ट्राय मारलात ना आता पहा वेळ आली की तुम्हाला सांगते काय ते!’ ती मनात म्हणाली आणि स्वतःच्या कामाला लागली.
संयम मैथिलीचा भूतकाळ जाणून घेऊ शकेल का? मैथिलीचा झालेला गैरसमज दूर होईल का?
पाहू पुढच्या भागात
क्रमशः
भाग 7 इथे वाचा
©स्वामिनी चौगुले.
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!