ना उम्र की सीमा हो ( भाग 7 )

भाग 6 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
असेच पंधरा दिवस निघून गेले. सगळे सुरळीत सुरू आहे असे वाटत असले तरी संयम वरून शांत वाटत असला तरी मनातून खूप अस्वस्थ होता.
त्याला मैथिलीबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं पण तिच्याबद्दल त्याला खूप प्रयत्न करून ही काहीच माहिती मिळत नव्हती. सगळीकडे तिची प्रोफेशनल माहिती उपलब्ध होती पण पर्सनल काहीच माहिती कुठेच नव्हती आणि ती मिळवण्याचा सोर्स देखील त्याच्याकडे नव्हता. 

त्यामुळे संयम अपसेट होता.
मैथिली देखील त्याला आता टाळू लागली होती. 
मेधा मात्र खुश होती कारण तिला संयम हवा होता. त्यातच मेधाचा दोन दिवसांनी वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने तिने एका पबमध्ये पार्टी ठेवली होती.
पार्टीचे निमंत्रण सगळ्यांना तिने दिले तसे ते मैथिलीला ही दिले.

मैथिलीला या सगळ्यात रस नव्हता पण मेधाने तिला खूप आग्रह केला आणि तिचा आग्रह डावलून तिच्या पार्टीला न जाणे म्हणजे खूप शिष्ठ वाटले असते.
तसेच स्टाफमध्ये गैरसमज झाला असता की ती खूप गर्विष्ठ आहे म्हणून तिने जायला होकार दिला.
संयमला मात्र या निमित्ताने ऑफिस बाहेर मैथिलीशी बोलण्याची एक संधी दिसत होती. दोन दिवस असेच गेले. आज रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.

संध्याकाळी संयम आणि केतन पार्टीत पोहोचले तर आधीच सगळे स्टाफ मेंबर आणि मैथिली देखील पबमध्ये पोहोचली होती.
तिने आज स्लीव्हलेस गुडघ्या पर्यंतचा पिंक कलरचा वनपीस घातला होता. संयम तिला पाहतच राहिला पण तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले.
मेधाने त्याला पाहिले आणि त्याला घेऊन गेली.
केक कट झाला. सगळ्यांनी मेधाला विश केले आणि गिफ्ट्स दिले.

कोणी ड्रिंक करत होते तर कोणी स्नॅक्स खात गप्पा मारत होते.
मेधाने ही चांगलेच ड्रिंक केले होते. म्युझिक सुरू झाले आणि तिने संयमचा हात धरून त्याला डान्स फ्लोअरवर नेले. ती त्याच्याशी नाचत लगड करू पाहत होती आणि संयम तिच्यापासून स्वतःला सोडवू पाहत होता.
हे सगळं मैथिली लांबून पाहत होती.
तिला संयमचा प्रचंड राग येत होता.

संयमने स्वतःला कसे बसे तिच्यापासून सोडून घेतले आणि तो वॉशरूमकडे गेला तर त्याच्या पाठोपाठ मेधा ही गेली.
तिने त्याला एका कॉर्नरजवळ गाठले आणि त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याच्या अगदी जवळ गेली. 
संयम- “ काय करते आहेस मेधा! बिहेव्ह युवर सेल्फ!” तो स्वतःला तिच्यापासून सोडवून घेत म्हणाला.
मेधा- “ तू का पळतोस रे माझ्यापासून कायम? माझ्यात काय कमी आहे?” ती नशेत पुन्हा त्याच्याजवळ जात बोलत होती.
संयम- “ हे बघ तू शुद्धीत नाहीस. जा तू मी आलोच.” तो तिला समजावत म्हणाला.

मेधा-“काय जा जा रे! तू त्या एजेड म्हाताऱ्या मैथिलीमध्ये  काय पाहिलेस रे! लूक एट यु अँड लूक एट हर! ती कशी आहे यु नो ब्लॅक उमन! काय पाहिलेस रे तिच्यात जे माझ्यात नाही.” ती रागाने तणतणत होती.
संयम-“ विल यु प्लिज शट युवर माऊथ! उगीच काही तरी बरळू नकोस तू नशेत आहेस.” तो चिडून म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला तर मैथिली केंव्हापासून त्यांचं बोलणं ऐकत तिथे उभी होती हे दोघांना ही कळले नाही.
संयमकडे मैथिलीने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती तिथून निघून गेली.

तिच्या मागे संयम गेला. ती पबच्या बाहेर पडली होती संयमने तिला तिथे गाठले.
संयम- “ मॅडम थांबा तुम्ही नेमकं काय ऐकलं तिथे?” त्याने विचारले.
मैथिली-“ जे ऐकायला नको होतं ते सगळं ऐकलं.तू जा इथून माझं डोकं आधीच फिरलं आहे.” ती रागाने म्हणाली.
संयम- “ मॅडम अहो ती मेधा नशेत आहे काही ही बडबडत आहे.” तो तिला समजावत म्हणाला.

मैथिली- “ अच्छा? काही ही बडबडते का ती? मिस्टर संयम मुळात तिला हेच कसे कळले की तुम्हाला मी आवडते किंवा तुमच्या मनात माझ्या विषयी काही तरी आहे. तिला स्वप्न तर नक्कीच पडले नसणार तुम्हीच सांगितले ना?
हाच तर प्रॉब्लेम आहे तुमच्या सारख्या मुलांचा तुम्हाला मुली म्हणजे खेळणी वाटतात. तिच्याबरोबर तुमचे काही नाते असल्याशिवाय ती इतकी चिडून बोलत होती का माझ्या विषयी? की तुम्ही दोन दगडावर पाय ठेवू पाहत आहात? एक मिनिटं तुम्हाला मला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझा स्वतःच्या करिअरसाठी शिडी सारखा वापर तर नाही करायचा? पण सॉरी मी…..” ती पुढे बोलणार तर संयमने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो आता रागाने बोलू लागला.

संयम- “ बास मॅडम खूप बोललात तुम्ही! पहिले तर मेधा आणि माझ्यात तुम्ही समजता तसे काही नाही तसेच तिला तुमच्या आणि माझ्याबद्दल कसे कळले हे मला माहित नाही. तिसरे आणि शेवटचे तुम्ही समजत असला तरी मी इतका नीच नाही की कोणाच्या तरी भावनांचा शिडीप्रमाणे  वापर करेन.
तुमच्याकडे माझे आल्यापासून लक्ष आहे. मी आणि मेधा डान्स करत होतो तर तुमच्या डोळ्यात मला राग दिसत होता. त्या दिवशी ही तुमचे डोळे तुमच्या ओठांची साथ देत नव्हते. तुमच्या मनात माझ्याबद्दल  नक्कीच काही तरी आहे पण तुम्ही स्वतःला रोखत आहात पण  का मॅडम?” तो तिला पाहत विचार होता.

मैथिली- “ओ मिस्टर, प्लिज स्वतःची चोरी पकडली गेली म्हणून तुम्ही आता विषय बदलू नका. मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही हे सत्य लवकर स्वीकारले तर तुमच्यासाठीच  चांगलं आहे ते!” ती म्हणाली आणि निघून गेली.
संयम मात्र तिला जताना पाहत राहिला. 
★★★
मेधा मात्र आता चांगलीच घाबरली होती. मैथिलीबद्दल ती जे बोलली ते तिने ऐकलं होतं आणि आता मैथिली काय करेल हा विचार तिला पडला होता. शेवटी मैथिली तिची बॉस होती. तिने मैथिलीची माफी मागायची आणि वेळ आल्यास संयमवर सगळे ढकलून मोकळे व्हायचे असे ठरवले.

दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला आली आणि तिने काल ठरवले होते तसे ती माफी मागायला मैथिलीच्या केबीनमध्ये गेली.
मैथिली कामात होती. तिने नॉक करून आत  आलेल्या  मेधावर एक नेत्र कटाक्ष टाकला आणि ती म्हणाली.
मैथिली-“ येस बोला?” 
मेधा-“ सॉरी मॅडम काल मी नशेत नको ते बोलले but I didn’t mean that!” ती खाली मान घालून बोलत होती आणि मैथिलीला कालपासून जो प्रश्न सतावत होता त्याचे उत्तर मिळवण्याची संधी आयती मिळाली.
मैथिली-“ एक विचारू? तुला संयमला मी आवडते हे कसे  कधी कळले?  तुझा आणि  संयमचं काही सुरू आहे का जे काल इतका त्याच्यावर हक्क गाजवत होतीस ती?”

तिने मेधाला रोखून पाहत विचारले आणि मेधाला ही संधी मिळाली होती. मैथिलीच्या मनात  संयम  विषयी गैरसमज निर्माण करण्याची.
तिच्या मनात संयमने तिला नाकारल्याचा राग तर होताच त्यामुळे तिने ही संधी साधायचे ठरवले आणि बोलू लागली.
मेधा- “मॅडम मला संयमनेच सांगितले होते की तो तुम्हाला त्याच्या चार्मचा वापर करून प्रेमाच्या जाळ्यात ओढणार आणि तुमचा त्याच्या करिअरसाठी शिडी म्हणून वापर करणार.
संयमने मला काही दिवसांपूर्वी प्रपोज केले होते मी हो म्हणाले पण मॅडम मी पण मुलगी आहे मला संयम तुमच्या मागेपुढे करतो ते आवडले नाही म्हणून मी चिडले आणि काल नको ते बोलले.

मॅडम प्लिज तुम्ही माझ्या विषयी मनात राग ठेवू नका. आणि प्लिज तुम्ही संयमला हे कळू देऊ नका की मी तुम्हाला सगळे सांगितले आहे. माझे आणि त्याचे नाते खराब होईल मॅडम!” ती डोळ्यात पाणी आणत नाटकीपणे बोलत होती.  
मैथिली मात्र तिचे बोलणे ऐकून रागाने धुमसत होती.
मैथिली- “ ठीक आहे जा तू!” ती म्हणाली आणि मनात विचार करू लागली.

‛संयम तू इतका नीच असशील असे वाटले नव्हते मला! तुला मी चांगला मुलगा समजत होते. असो आता याच्यापासून सावध रहायला हवे.’
संयम मात्र या सगळ्या घडामोडीपासून अनभिज्ञ होता. मेधाने जाणून बुजून मैथिलीच्या मनात संयम विषयी विष कालवले होते आणि मैथिलीने कसली ही शाहनिशा न करता तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता.
पुढे काय घडणार होते? संयम मैथिलीच्या मनातला गैरसमज दूर करू शकेल का? पाहू या पुढच्या भागात
क्रमशः भाग ८ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!