ना उम्र की सीमा हो ( भाग 9 )

भाग 8 इथे वाचा

© स्वामिनी चौगुले
दुसऱ्या दिवशीपासून  ट्रेकिंगला सुरुवात होणार होती. तरी ही आज दोन ते तीन तासच ट्रॅकिंग करायचं असल्याने संयमने सगळ्यांना निवांत उठू दिले.
सगळे नाष्टा करायला एकत्र जमले आणि संयमने सूचना द्यायला सुरुवात केली.
संयम-“ आजपासून आपले ट्रॅकिंग सुरू होणार आहे आज ट्रेकिंग पहिला दिवस आहे. आपल्याला इथून मनालीमधून बर्षेनी गावात  बसने जायचे आहे तिथे थोड्यावेळ तुम्ही फिरू शकता इथून दुपारचे जेवण करून आपण आपल्या ट्रॅकिंगच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. तिथून दोन तीन तास ट्रॅकिंग करून आपण कलगा गावात पोहोचू तिथे गेस्ट हाऊसमध्ये आपल्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तो आपला पहिला टप्पा असेल. बर्षेनी ते कलगा इतका कठीण ट्रॅक नसला तरी रस्ता जंगलातून जातो. आपल्याबरोबर  इथले दोन लोकल गाईड असतील शेवटपर्यंत इतकच करायचे की एकमेकांबरोबर राहायचे! आता आवरा लवकर आणि आप-आपल्या बॅगा घेऊन तयार रहा. बस येईलच.” तो म्हणाला आणि निघून गेला.
सगळे बसमधून मनालीमधील  बर्षेनी या गावी पोहोचले.
तिथे थोडी भटकंती करून जेवणं झाली आणि साधारण दोनच्या सुमारास  तिथून ट्रॅकिंगला सुरवात झाली.

दोन लोकल गाईड, केतन, मैथिली आणि स्वतः संयम वीस लोकांना घेऊन निघाला होता.
विस्तीर्ण हिरवी कुरणे आणि त्यात अधेमध्ये दिसणाऱ्या शेळ्या मेंढ्यांचे कळप आणि गावकरी तसेच उंचच उंच हिरव्यागार  देवदार वृक्षांनी वेढलेले जंगल खूपच सुंदर दिसत होते. पूर्ण चढतीचा रस्ता! कुठे एखादा पक्षी दिसत होता तर कुठे नुसताच त्यांचा आवाज यायचा! सगळे निसर्गाचा आनंद घेत रमत गमत  निघाले होते. तीन साडे तीन  तास चालल्यानंतर सगळे कलगामध्ये पोहोचले.

एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते.
जास्त चालले नसले तरी रस्ता चढतीचा असल्याने सगळे चांगलेच दमले होते. तिथले गेस्ट हाऊस छोटेखानी पण छान व्यवस्था होती. संयमने आधीच सगळी व्यवस्था करून घेतली होती.
सगळे फ्रेश झाले आणि चहा नाष्टा केला.
मैथिलीचे मात्र सगळं लक्ष संयमवरच होते.
संयम आणि केतन  पुढचे नियोजन करण्यात व्यग्र होते तर खाण्याची व्यवस्था मैथिली आणि मेधाला  पाहायला सांगितली होती.

आठ वाजता सगळ्यांची जेवणे झाले आणि शेकोटी पेटवली. सगळे शेकोटीच्या कडेने गोल करून बसले होते.
थंडी आता जाणवू लागली होती. कोणी तरी आपली आवडती गाणी आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी  म्हणायची असे सुचवले आणि एक एक करून सगळे गाणी म्हणू लागले.
मैथिली मात्र शांत बसून होती.
एक तर तिचे पद आणि वय यामुळे तिला कोणी गाणे म्हणण्याचा आग्रह केला नाही त्यात तिचा स्वभाव ही शांत आणि थोडा शिष्ठ होता.

पण संयम मनमिळावू आणि मैत्रीपूर्ण वागणारा असल्याने त्याला सगळ्यांनी गाणं म्हणण्याचा आग्रह केला.
संयम- “ मी गाणे म्हणेन पण कोणासाठी हे विचारायचे नाही, तो म्हणाला आणि सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली.
(संयम मैथिलीला डोळ्यांच्या कोनातून पाहत गाणं म्हणू लागला.)
होंठों से छूलो तुम मेरा गीत अमर कर दो
बन जाओ मीत मेरे मेरी प्रीत अमर कर दो
होंठों से छूलो तुम मेरा गीत अमर कर दो

न उमर की सीमा हो न जनम का हो बंधन
न उमर की सीमा हो न जनम का हो बंधन
जब प्यार करे कोई तो देखे केवल मन
नई रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो
ये रीत अमर कर दो मेरा गीत अमर कर दो
(मैथिलीला कळत होतं की हे गाणं तिच्याचसाठी आहे पण ती खाली मान घालून जमीन उकरत बसली होती.
संयम मात्र गाणे गाण्यात तल्लीन झाला होता.)

सगळ्यांनी एकदमच  “ओहो !” म्हणून आरोळी ठोकली आणि तो भानावर आला.
संयम-“ जा झोपा आता! उद्या गुरुव्दारा आणि गरम पाण्याचे कुंड पाहून पुढे जायचे आहे उद्या सहा ते सात तासांचा ट्रेक आहे तर लवकरच निघावं लागणार आहे. सगळे पहाटे पाच वाजता इथे हजर हवेत मला!” तो म्हणाला आणि निघून गेला.
★★★
सगळे संयम म्हणाल्याप्रमाणे पाच वाजता हजार होते.
पहिल्यांदा सगळे गरम पाण्याचा कुंड पहायला गेले. कोणी त्यात अंघोळ गेली तर कोणी पाणी हातात घेऊन पाहिले.

इतक्या वर सगळे निर्सगाचा अद्भुत चमत्कार पाहत आणि अनुभवत होते.
नंतर गुरुव्दारामध्ये गेले. संयमने रुमाल काढून डोक्याला बांधला आणि तो गुडघ्यावर बसून हात जोडून डोळे झाकून प्रार्थना करत होता आणि मैथिली मात्र त्याच्या या रूपाकडे भान हरपून पाहत होती.
खरं तर ती संयमकडे ओढली जात होती ते तिला ही कळत नव्हते.

सगळ्यांनी तिथे थोडावेळ घालवला आणि सात वाजता कालगामधून सगळे खीरगंगासाठी निघाले 
“एकूण अंतर  दहा किमीचे आणि जंगलातील चढाई त्यामुळे खिरगंगाच्या ठिकाणी पोहोचायला सहा ते सात तास लागतात. जाताना वाटेत आपल्याला पार्वती नदी लागेल ती शेवटपर्यंत आपल्याला या ट्रॅकमध्ये साथ देणार आहे. जंगल देवदार आणि आखरोडच्या झाडांनी वेढलेले आहे. मध्येच मॅगीची दुकाने आहेत आपण तिथे नाष्टा करू.” संयम माहिती देत होता.
साधारण दुपारी दोन वाजता सगळे खिरगंगाला पोहोचले.

चारी बाजूनी डोंगरांनी वेढलेले ते पठार म्हणजे दुसरा स्वर्गच जणू! चार बाजूनी उंचच उंच बर्फाच्छादित डोंगर  पाहून मन मोहून जात होते.
सगळे थकवा आणि भूक विसरून निसर्गाचा दुसरा चमत्कार पाहत होते.
संयम-“ मॅडम तुम्ही आणि मेधा तांदूळ निवडा तोपर्यंत मी आणि केतन चूल पेटवतो. त्यानंतर मग टेंट लावू ” तो म्हणाला आणि निसर्गाचा आविष्कार पाहण्यात मग्न झालेली मैथिली भानावर आली.
मैथिली- “ ठीक आहे.”
मैथिली काम करत विचारांच्या गर्तेत पुन्हा हरवली होती.

‛दोन दिवस झाले मी संयमला पाहते. मेधा म्हणाली होती की तिचे आणि संयमचे अफेअर आहे पण या दोन दिवसांत संयम मेधाशी साधं बोलला ही नाही. तसे असते तर काही तरी दिसले असतेच ना!
काही तरी गडबड आहे पण मी का इतका संयमचा विचार करत आहे.
मैथिली सावर स्वतःला!’ ती स्वतःलाच म्हणाली आणि तिने तिच्या मनातील विचार झटकून टाकले.
सगळ्यांनी जेवण करून चौघांच्या मदतीने टेंट लावले आणि तो दिवस आणि रात्र निघून गेली.
★★★

आज ट्रेकिंगचा तिसरा दिवस होता.
आज खिरगंगा ते टूंडा भुज हा एक टप्पा होता.
तो टप्पा बारा किलोमीटरचा होता. जो पार करायला सहा ते सात तास लागणार होते त्यामुळे संयमने सगळ्यांना सात वाजता तयार रहायला सांगितले होते.
सगळे सामान आवरून आणि नाष्टा करून निघाले.

संयम सगळ्यांना माहिती देत होता. 
संयम- “खिरगंगा ते टूंडा भुज हा ट्रॅक या  ट्रॅकमधील  सगळ्यात सोपा आणि सुंदर ट्रॅक मानला जातो. जिथे तिथे सुंदर जल प्रपात आणि वनस्पती,पशु- पक्षी पाहायला मिळतील सगळ्यांनी निसर्गाचा आस्वाद घ्या. आपल्याला टूंडा भुजपर्यंत जायला सहा ते सात तास लागतील. दुपारी मध्ये कुठे तरी जेवण करू थोडा आराम करू आणि  मग निघू. म्हणजे आठ तासांचा हिशोब धरायचा. आपण साधारण दुपारी तीन चारपर्यंत तिथे पोहोचू.” तो सांगत होता.

संयम म्हणाल्या प्रमाणे सगळ्यांनी साधारण एक वाजता जेवण केले आणि थोडा आराम केला.
सगळे चार वाजता टूंडा भुजला पोहोचले सगळे चांगलेच थकले होते 
“आपण समुद्र सपाटीपासून 10,935 फूट वर आलो आहोत इथे ऑस्कीजन लेवल कमी आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या. पाणी जास्त प्या सगळ्यांनी म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही.
आता टेंट लागले की आराम करा.” संयमने सूचना दिल्या.

ट्रेकिंगचा तिसरा दिवस ही निर्विघ्नपने पार पडला.
मैथिलीला मात्र आज तीन दिवस झाले तरी मेधा म्हणाली तसं तिच्यात आणि संयममध्ये काहीच दिसून येत नव्हते.
संयम ट्रेकिंग सुरू झाल्यापासून एकदा ही  मेधाशी धड बोलला ही नव्हता.
तो त्याच्या कामात गुंग होता.

मेधा खोटं तर बोलत नसेल? म्हणजे मग संयमबद्दल तिने जे सांगितले ते सगळेच खोटे होते का? असा प्रश्न तिला आता सतावू लागला होता.
आपण मेधा आणि संयमला देखील ओळखायला चूक तर केली नाही ना? असे प्रश्न तिला पडू लागले होते आणि संयमबद्दल तिच्या मनात आकर्षण निर्माण होऊ लागले होते.
मैथिलीच्या मनाची होणारी चलबिचल आणि तिला संयम विषयी वाटणारे आकर्षण तिला संयमच्या प्रेमात तर पाडत नव्हते ना?
पाहू पुढच्या भागात 
क्रमशः भाग १० इथे वाचा
© स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

4 thoughts on “ना उम्र की सीमा हो ( भाग 9 )”

  1. खुप सुंदर आहे हे ! एक वेडा तरुण अन ती अशी पोळलेली ! तीच्या मनातली भिती अन त्याच निख्खळ निर्व्याज प्रेम !

    खुप सुंदर , पण लवकर पुढील भाग लिहा !

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!