ना उम्र की सीमा हो ( भाग 10 )

भाग 9 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
आज ट्रेकिंगचा  चौथा दिवस होता.
आज टूंडा भुज ते ठाकूर कुंवा असा टप्पा पार करायचा होता.
इथून पुढे बोल्ट पार करून जावे लागते पण सावधगिरी बाळगून पार केला की हा सहा ते सात तासचा ट्रेक तसा सोपा आहे. त्यामुळे संयमने सगळ्यांना अगदी सांभाळून हा ट्रेक पार केला होता.
आता झाडे आणि ऑस्कीजन लेवल आणखीन कमी झाली होती पण सगळे लोक व्यवस्थित होते कोणालाच तब्बेतीची कोणती ही तक्रार नव्हती.

संध्याकाळी सगळे लवकरच आपापल्या टेंटमध्ये जाऊन झोपले होते.
पाचवा दिवस ठाकूर कुंवापासून सुरू होऊन ऑडी थाचपर्यंतचा आहे.
इथून पार्वती नदीवर असलेल्या पांडू पूल 1 आणि पांडू पूल 2 पार करावे लागणार होते.
संयम सगळ्यांना ट्रेकबद्दल सांगत होता.

संयम- “आपल्याला आज पार्वती नदीवर असलेले दोन पूल आहेत पार करायचे आहेत.
त्यांना पांडू पूल 1आणि 2 म्हणतात. हे पूल मोठ्या मोठ्या बोल्डरपासून बनले आहेत.” तो म्हणाला आणि मैथिलीने विचारले.
मैथिली-“ बोल्डर म्हणजे काय?”
संयम- “ बोल्डर म्हणजे मोठे मोठे गोलाकार पाषाण जे पुलाच्या रुपात पार्वती नदीवर आहेत. ते मोठे मोठे पाषाण पार्वती नदी पार करण्यासाठी पांडवांनी ठेवले आहेत अशी आख्यायिका आहे त्यामुळे त्यांना पांडू पूल म्हणतात पण पहिला पांडू पूल पार करणे तसे अवघड आहे एका बाजूला घसरण आहे आणि दुसऱ्या बाजूला पाषाणात धरण्यासाठी छोट्या छोट्या कपारी आहेत.

आपण सुरक्षिततेसाठी एका मोठ्या रोप सगळ्यांच्या कमरेला बांधणार आहोत आणि तो पूल पार करणार आहोत. सगळ्यांनी सावधपणे पावले टाकायची आहेत.” तो म्हणाला आणि सगळे ट्रेकिंगला निघाले.
पांडू पूल सगळे सावधगिरीने पार करत होते आणि अचानक मैथिलीचा पाय घसरला.
तिच्या कमरेला दोरी बांधलेली होती त्यामुळे ती खाली पडली नाही पण हवेत लटकू लागली ते पाहून सगळे घाबरले.
मैथिली देखील घाबरली होती.

संयम मागे सगळ्यांना मदत करत होता त्याने ते पाहिले आणि तो बिना दोरीचा कपारिंमध्ये हात घालून खाली मैथिली जवळ उतरला आणि त्याने एक हात लांबवून  हवेत लटकणाऱ्या मैथिलीच्या कमरेत हात घालून तिलाजवळ ओढले.
घाबरलेली मैथिली त्याला बिलगली.
तिची वाढलेली धडधड  त्याला स्पष्ट ऐकू येत होती. तिला इतकं घाबरलेलं पाहून तो तिला हळूच कानात म्हणाला.

संयम-“ मॅडम घाबरू नका. काही होणार नाही तुम्हांला मी आहे ना! तुम्ही  या कपारीत हात घाला आणि हळूहळू खाली उतारा!” त्याच्या बोलण्याने तिला धीर आला आणि तिने पूल पार केला.
सगळे दुसऱ्या पुलावर पोहोचले दुसरा पांडू पूल पार करायला तसा सोपा होता. पण घसरल्यामुळे मैथिलीचा पाय मुरगळला होता आणि ती लंगडत चालत होती.
सगळे ऑडी थाचला पोहोचले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती.

सगळ्यांनी टेंट लावले आणि स्वयंपाक केला. जेवणं झाली आणि सगळे शेकोटी जवळ गप्पा मारत बसले होते.
मैथिली संयमजवळ येऊन बसली.
मैथिली-“ थँक्स! आज तू माझा जीव वाचवलास.” ती म्हणाली.
संयम-“ थँक्स म्हणायची काही गरज नाही. माझं कर्तव्य होतं ते कारण मी तुमचा टीम लीडर आहे आणि तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे.
तुमच्या ऐवजी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केले असते.

बाय द वे केतनकडे पाय मुरगळल्यावर घेण्याची गोळी आहे ती घ्या आणि रात्री पायाला क्राफ्ट बँडेज बांधा म्हणजे उद्यापर्यंत तुमचा पाय बरा होईल आणखीन खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला!” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट ही न पाहता निघून गेला. 
मैथिली मात्र त्याला पाहतच राहिली.
तिला संयमच्या बोलण्याचा राग ही आला आणि वाईट ही वाटले.
ती तिथून तिरिमिरीतच तिच्या टेंटकडे गेली तर तिथे केतन तिची वाट पाहत उभा होता त्याने तिला पाहिले आणि म्हणाला.

केतन-“मॅडम मला संयाने तुम्हाला ही गोळी द्यायला सांगितली आहे आणि क्राफ्ट बँडेज बांधून झोपा म्हणून सांगितले आहे.”  गोळी देत तो म्हणाला.
मैथिली-“ ठीक आहे.” ती गोळी घेत म्हणाली आणि टेंटमध्ये गेली.
तिने गोळी घेतली. पाय चांगलाच ठणकत होता तिने बँडेज पायाला बांधली आणि झोपली.

मनात स्वतःशीच बोलत होती, ‛ हा संयम समजतो कोण स्वतःला? तुमच्या जागी कोणी ही असते तर हेच केले असते म्हणे! आला मोठा! पण त्याच ही बरोबरच आहे की काय चुकीचं बोलला तो?
पण किती फटकून वागतो तो माझ्याशी! मग कसं वागायला हवं त्याने तुझ्याशी! तू त्याच्यावर जे आरोप केले त्यानंतर त्याने तुझ्याशी कसं वागायला हवं आहे मैथिली पण तुझ्यावर त्याच्या वागण्याचा आणि बोलण्याचा इतका परिणाम का व्हावा? तू त्याच्या प्रेमात तर नाही पडलीस?’ तिने स्वतःलाच विचारले आणि चमकली.

‛ नाही नाही मी असा विचार नाही करू शकत. संयम वर तुझे प्रेम नाही मैथिली!” तिने स्वतःलाच बजावले आणि ती झोपली.
★★★
ट्रेकिंगचा सहावा दिवस उगवला आज ऑडी थाचपासून  मानताली अकरा किलोमीटरचा पल्ला 5 ते 6 तासांचा होता.
मानताली एक शांत आणि सुंदर तलाव आहे ज्यात आसपासच्या पर्वतांचे प्रतिबिंब पडते ते पाहण्यात सगळेच मंत्रमुग्ध झाले होते.
त्या आधी एक शिवलिंग होते त्याचे दर्शन घेऊन ते पुढे गेले होते.
मानतालीला मिनी मनाली म्हणतात आणि पार्वती नदीचे उगमस्थान देखील हे आहे याची माहिती तिथल्या लोकल गाईडने दिली.

रात्री झोपण्या आधी संयमने बोलायला सुरुवात केली.
संयम- “ उद्या आपण इथून पार्वती बेस कॅम्पपर्यंत जाणार आहोत. हा टप्पा तसा अवघड आहे. आपण तेरा किलोमीटरची ट्रेकिंग करणार आहोत. यासाठी आपल्याला सात तास लागणार आहेत पण आपल्याला पहाटे चार वाजताच निघावे लागेल.
कारण आपाल्याला खोरनाल्ला नावाचा एक जलप्रपात  पार करावा लागणार आहे आणि सकाळच्या वेळी पाण्याचा प्रवाह  कमी असतो.
त्यामुळे पहाटे चार वाजता आपण निघणार आहोत तयार रहा.

आपण आता समुद्र सपाटीपासून  16,207 फूटवर आहोत. चढतीचा रस्ता आहे. इथून पुढे विस्तृत  ग्लेशियरची शृंखला सुरू होते. निसर्गाचा अदभुत आविष्कार पाहायला मिळेल तो पहा पण सावधपणे कारण एक तर ऑस्कीजनची कमतरता आणि अति थंड वातावरण तसेच अशा ठिकाणी कधी वातावरण बदलेल आपण सांगू शकत नाही तर सगळ्यांनी सावध रहा.”  त्याने सगळ्यांना सांगितले आणि सगळे झोपायला निघून गेले. 
सातवा दिवस ही निर्विघ्नपणे पार पडला होता. संयमने त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती.

आता आठव्या दिवशी पिन पार्वती पॉईंट आणि तिथून दोन दिवसात मनाली असा प्रवास होता.
आज आठवा दिवस होता. आज तर संयमने सगळ्यांना पहाटे तीन वाजताच तयार रहायला सांगितले होते कारण ग्लेशिअरने आच्छादित भाग आणि ऊन झाले की बर्फ वितळून रस्त्यावर घसरण होत होती.
त्यामुळे तीन वाजताच ट्रॅकिंग सुरू केले.सगळे पुढच्या सहा तासात पिन पार्वती पॉईंट वर पोहोचले. सगळे समुद्र सपाटीपासून  17,388 फुटावर होते.

रक्त गोठवणारी थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता त्यामुळे सगळेच थकले होते. 
पिन पार्वती पॉईंटपर्यंतची ट्रॅकिंग यशस्वी झाली होती. त्यामुळे संयम ही खुश होता आता पुढे अगदी सोपा रस्ता होता.
तसे सगळेच आनंदित होते पण हा आनंद खूप काळ टिकला नाही.
कारण अचानक निसर्गाने रुद्र अवतार धारण केला होता.

बर्फ आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. चारी बाजूनी ग्लेशियर्स आणि सगळे इतक्या उंचावर अडकले होते. जर एकदा ग्लेशियर जरी ढासळला तर सगळे बर्फात गाढले गेले असते.
संयमने वॉकीटॉकीवरून  मदत मागवली होती पण मदत येई पर्यंत सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी थांबवून तग धरणे गरजेचे होते म्हणून त्याने एक मजबूत खडक पाहून त्याला एक मजबूत दोर बांधला आणि प्रत्येकाच्या कमरेला हुक्स लावून दोरीला धरून उभे राहायला सांगितले.

पण अचानक सोसाट्याचा वाऱ्यामुळे आणि वरून कोसळणाऱ्या बर्फ वर्षावामुळे  मेधा तग धरू शकली नाही आणि वरून येणाऱ्या एका मोठ्या ग्लेशियरच्या भल्यामोठ्या बर्फाबरोबर गरंघळत जाऊ लागली.
संयमने ते पाहिले आणि त्याने स्वतःचे हुक सोडून तिला वाचण्यासाठी तिचा हात धरला तिला सुरक्षित वर सोडले आणि अचानक आलेल्या दुसऱ्या बर्फाच्या लोटामध्ये तो स्वतःला सावरू शकला नाही आणि त्या पांढऱ्या शुभ्र बर्फात तो गायब झाला.   
संयम सापडेल का? आणि सापडला तरी तो जिवंत असेल का?
पाहू पुढच्या भागात…

क्रमश: भाग ११ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!